Site icon InMarathi

नेहरूंनी नाणेफेक जिंकलेल्या मॅचमध्ये मोदींनी सिक्सर मारली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

काश्मीर प्रश्नावर फेसबुकाच्या ह्या भिंतींवर अनेकवार लिहून झाले आहे. तरी प्रसंग झाला की तेच तेच पुन्हा पुन्हा लिहावे लागते, तसेच आजचे. काल मोदीशहांनी जे केले ते नेहरूंच्या धोरणाशीच नव्हे तर कार्यपद्धतीशी देखील सुसंगत होते. कसे ते पाहा.

भारत स्वतंत्र व्हायची वेळ आली तेव्हा कुणालाही स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली नव्हती.

भौगोलिक सलगता आणि धार्मिक बहुसंख्या हे विभाजनाचे सूत्र होते. हे सूत्र जे विसरतात ते भावनेच्या आहारी जातात. भावनेच्या आहारी गेलेल्याची न्यायबुद्धी मग जागेवर राहात नाही.

अगदी नेहरूंची न्यायबुद्धीसुद्धा आपल्या प्रांतप्रेमामुळे एका नाजूक क्षणी अतिशय अशक्त झाली.

 

defenceupdate.in

काश्मीर भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानला सलग होता आणि तेथे मुस्लीम बहुसंख्या होती. हा प्रांत पाकिस्तानात जाणार अशीच हिंदुंची अटकळ होती. असे नसते तर १५ आॅगस्ट १९४७ रोजी काश्मीर अधांतरी नसता.

त्या दिवशी काश्मीरशिवायच हे दोन देश जन्माला आले. तीन देश निर्माण करण्याचा कोणताही विचार जिना, काँग्रेस आणि मुख्य म्हणजे ब्रिटिशांच्या मनात नव्हता.

काश्मीर प्रश्न निर्माण होण्याचे पहिले कारण शेख अब्दुल्ला हे होय. काश्मीरचा राजा हरिसिंग होता. त्याला वल्लभभाई किंवा जिना सहज गुंडाळू शकले असते. पण शेख अब्दुल्ला ह्यांनी तोवर १५ वर्षे काश्मीरच्या बहुसंख्य मुस्लीम जनतेला स्वतंत्र राष्ट्राच्या कल्पनेने केवळ भारूनच टाकले नव्हते तर त्यांची मने पेटवूनही ठेवली होती.

शेख अब्दुल्ला ही अशी पीडा होती आणि तिचा उपद्रव पाकिस्तानला व्हायचा होता. भारताच्या दृष्टीने तो आपला प्रांतच नव्हता.

पाकिस्तानच्या दृष्टीने तो प्रांत त्यांचा होता कारण तो भाग त्यांना भौगोलिकदृष्ट्या संलग्न होता व तेथे निर्विवादपणे मुस्लीम बहुसंख्या होती. पण शेख अब्दुल्ला तिकडे जात नव्हता. त्यांना स्वतंत्र राष्ट्राचे पंतप्रधान व्हायचे होते.

 

शेख अब्दुल्ला आणि नेहरू | kashmirconnected.com

ह्या परिस्थितीत भारत स्वाभाविकपणे शांत बसला होता आणि पाकिस्तानात अस्वस्थता होती.

त्या अस्वस्थतेने पाकिस्तानी राज्यकर्ते अधीर झाले, मुत्सद्देगिरीचा विचार हरवला आणि त्यांनी काश्मीर बळे घ्यायचा आत्मघातकी निर्णय केला आणि इकडे नेहरूंमधील मुत्सद्दी जागा झाला.

नेहरू काश्मीरचे. काश्मिरी पंडित ते. त्यांची मायभूमी ती. ती पाकिस्तानात जाणार होती. त्या दुःखावर त्यांना आता उपाय दिसला.

पाकिस्तानने आक्रमण करेपर्यंत राजा हरिसिंग कदाचित आपणच स्वतंत्र राष्ट्राचे सर्वेसर्वा असू अशी आशा बाळगून होता. पण पाकिस्तानच्या आक्रमणाने तो क्षणात खचला आणि त्याने नेहरूंचे पाय धरले!

“‘मला‘ नाही जायचे पाकिस्तानात. माझे राज्य वाचवा” हरिसिंगाने भारताच्या पंतप्रधानांची मनधरणी सुरू केली.

हा भारताच्या आणि नेहरूंच्या न्यायबुद्धीचा कस लागण्याचा क्षण होता. हा मोहाचा क्षण नेहरूंना टाळता असता तर उभय राष्ट्रांचे भले झाले असते.

जुनागढ मध्ये साम वापरून आणि पुढे हैद्राबादच्या निजामाच्या बाबतीत सैनिकी दंडनीतिचा अवलंब करून भारत सरकारने जो ‘न्याय‘ केला व भारत एकजिनसी केला तो न्याय हरिसिंग रडू लागला तेव्हा नेहरू लावू शकले नाहीत.

 

india.com

त्यांनी हरिसिंगाला सांगितले, ‘तू आमचा नाहीस, तर तुझ्या बाजूने आम्ही लढणार कसे? तुला आम्ही ‘त्यांना‘ हाकलायला हवे असेल तर तू आधी सामीलनाम्यावर सही कर. मग आम्ही ‘आमच्या‘ राज्याकरिता लढलो असे होईल.‘

पाकिस्तानात जाण्यापेक्षा हरिसिंगाला नेहरूंची ही चतुराई बरी वाटली आणि त्याने सामीलनाम्यावर सही केली!

आज प्रत्येक भारतीयाला वाटते की काश्मीर आपखुषीने आपल्यात आला. त्यांना हरिसिंग म्हणज काश्मीर वाटते.

जर त्याचवेळी नेहरूंनी जम्मू लडाख आमचे, काश्मीर पाकिस्तानचा असा न्याय केला असता तर आज भारतीयांना काश्मीरबद्दल जी आपुलकी वाटते ती वाटलीच नसती आणि भारताने आपले नंदनवन चोरले अशी भावना पाकिस्तानात निर्माण होऊन त्यांच्या अफाट द्वेषाचे आपण कारण झालो नसतो.

हा सामीलनामा होणे ही सोपी गोष्ट नव्हती. हरिसिंग कागदावरचा राजा होता. मुस्लीम बहुसंख्येच्या मनात होते शेख अब्दुल्ला. त्यांस डावलणे शक्य नव्हते.

काॅंग्रेस आणि नेहरू ह्यांनी मोठ्या खेळी करायचे ठरवले. बरेचसे शेख अब्दुल्लांच्या मनासारखे झाले. ते नव्या काश्मीरचे मुख्यमंत्री नव्हे तर पंतप्रधान झाले!

काॅंग्रेस आणि नेहरू आपल्यापेक्षा अधिक हुषार, अधिक धूर्त, अधिक चलाख असतील असा अंदाज शेख अब्दुल्लांना त्यावेळी आला नसावा.

 

Ndtv.com

भारताने पाकिस्तानला काश्मीरात मागे हटविण्यास सुरुवात केली. ते काम सोपे नव्हते. ते जातीचे आक्रमक आणि हक्काच्या भूमीसाठी त्वेषाने लढत होते. हे समजल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल की आज जिला नियंत्रण रेषा म्हणतात तोपर्यंतचा भूभाग ‘आपला‘ करायला भारताला तब्बल अडीच वर्षे लागली.

येथे नेहरूंनी युद्ध थांबवले. आपल्या सैन्याची अजून लढायची इच्छा डावलून. प्रश्न युनोत नेला आणि अशी व्यवस्था केली की हे घोंगडे दीर्घकाळ भिजतच राहिले पाहिजे.

काश्मीर आपल्यात आणल्याबद्दल प्रस्तुत लेखकाने नेहरूंना दोष दिला आहे पण त्या निर्णयाची योग्यायोग्यता बाजूला ठेवली तर तो निर्णय घेतल्यापासूनचे नेहरूंचे वर्तन एखाद्या अतुलनीय मुत्सद्याचे आहे.

आणि नेहरूंचेच नव्हे तर सर्व काॅंग्रेसजनांचे ह्याबाबतीतील वर्तन संयम आणि अतीव धूर्तपणाचे आहे.

पंतप्रधान शेख अब्दुल्लांना मग त्यांनी कैदेत काय टाकले, पंतप्रधानांचा मुख्यमंत्री काय केला, ३७० वे कलम कसे हळूहळू अशक्त करीत आणले, काश्मीरी नेत्यांना कधी चुचकारले तर कधी फटकारले पण सैन्याच्या बळावर का होईना काश्मीर टिकवून धरला.

लक्षात घ्या, काश्मीर प्रश्नावर भारत जगात एकटा आहे. नेहरूंच्या त्या पहिल्या निर्णयामुळे कोणीही आपल्या बाजूने नाही. असे असतानाही संयमाच्या साथीने भारताने आज ३७०वे कलम हटवून दाखविले आहे.

 

livemint.com

अनेकांना वाटते, भारताने इतकी युद्धे लढली पण शेवटी तो तहात हरला! बाबांनो, तहात हरला तर बिघडले काय? काश्मीर गेले नाही ना हातातून? जे आपले नाही ते आपले करण्याचा हा उद्योग फसलेला नाही तो कुणामुळे?

कुण्या पक्षाच्या बाजूने ना विरोधात विचार करू नका. एकंदरीत भारत हा विषय कसा तडीला नेत आहे ते पाहा. मग तुम्हाला आजवर ज्या ज्या नेत्यांनी ह्या विषयात काम केले त्या प्रत्येकाची, नेहरूंपासून मोदींपर्यंत, कमाल वाटेल.

३७०, ३५ अ, राज्याचे विभाजन आदि विषय एका फटक्यात मोदीमहाशयांनी संपवून टाकले आहेत. ते पाहून मी काल लिहिले की काय सांगावे, आज हे केले, उद्या पाकव्याप्त काश्मीरही आणतील! तर खरोखरच आज अमित शहांनी म्हटलेले वाचले की मी काश्मीर म्हणतो तेव्हा त्यात पाकव्याप्त काश्मीर आणि चीनने घेतलेला अक्साई चीनदेखील असतो!

घडले ते असे घडलेले आहे. ज्याने त्याने आपापली विवेकबुद्धी वापरून निर्णय करावा. एकदा नेहरूंचा पहिला निर्णय स्वीकारला की पुढचे सारे जबरदस्त आहे.

आणि कालचा निर्णय अभूतपूर्व म्हणावा असा आहे. त्याने भारताला किती उपद्रव होईल हे काळ सांगेल पण जे झाले त्यात काश्मिरी जनतेचे भले आहे ह्यात शंका नाही.

नेहरूंनी नाणेफेक केली, कुणी चौकार मारले, कुणी क्षेत्ररक्षण केले पण मोदींनी अचानक सिक्सरच की मारली! आणि म्हणून ते आज प्रत्येक भारतीयाच्या, अगदी त्यांच्या विरो धकांच्याही प्रेम कौतुकाचे धनी झाले आहेत.

 

moneycontrol.com

 

कोणालाही फारसे न विचारता नेहरूंनी राजा हरिसिंगांबरोबर सामीलनाम्याचा करार केला होता. आज त्यांचा कित्ता गिरवीतच त्याच पद्धतीने मोदींनी हा नवा पराक्रम केला आहे. दोघांची कार्यपद्धती अशी समान आहे!

आजच्या लेखाची सुरुवात नेहरूंविरोधी आहे. नेहरूंनी ‘आपल्या‘ प्रांताच्या प्रेमापायी तो निर्णय केला असे त्यामागील गृहितक आहे. ह्याहून अधिक वेगळा दृष्टिकोन असू शकतो. त्या अंगाने विचार केला तर हा लेख खूपच बदलेल.

तो नवा लेख लिहिण्याचा आता प्रयत्न करतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version