६ पासपोर्ट, ६५ देश! ६५ वर्षांच्या तरुणीच्या भटकंतीची कथा चार भिंतीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रवास करण्याची आवड बहुतेकांना असते. आयुष्यात एकदा तरी, या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जगण्यातून बाहेर पडून मनसोक्त फिरून यावं, वेगळी वेगळी ठिकाण, तिथली संस्कृती, राहणीमान आणि एकंदरच एका वेगळ्या विश्वाचा अनुभव घ्यावा.
अशी प्रत्येकाचीच मनोमन इच्छा असते. काही हौशी लोकं असतात ज्यांना हे छंद जोपासायला आवडतात, बदल म्हणून किंवा आवड म्हणून किंवा नवीन काही शिकण्याची, वेगळं आयुष्य जगण्याची इच्छा म्हणून!
पण, प्रवास हेच जगणे झाले तर? शक्य नाही ना? पण, सुधा महालिंगम या ६५ वर्षांच्या तरुणीने हे शक्य करून दाखवलं आहे.
वयाच्या पन्नाशी पासून एखाद्या तरुण विद्यार्थांप्रमाणे पाठीवर बॅग लटकवून जग धुंडाळण्याचं अद्भुत साहस करणे हाच तिचा आवडता छंद आहे.
स्पेन, मारोक्को, बोर्निओ आणि इराण येथील तिच्या प्रवासाच्या सुरस कहाण्या तिने ‘द ट्रॅव्हल्स गॉड मस्ट बी क्रेझी’ या पुस्तकात मांडल्या आहेत.
सुधा महालिंगम यांनी आयुष्यातील बराच मोठा काळ, आपल्या पतीसोबत जगातील दुर्गम ठिकाणी फिरण्यात घालवला आहे. त्यांना फिरण्याची इतकी हौस आहे की, जगातील कोणतेही ठिकाण त्यांना वर्ज्य वाटत नाही.
२००२ मध्ये त्यांनी पत्रकारितेचा राजीनामा दिला. ‘इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनॅलिसिस’ मध्ये उर्जा क्षेत्रातील विश्लेषक म्हणून रुजू झाल्यानंतर जगभरातून त्यांना परिषदांसाठी आमंत्रणे येऊ लागली.
तेलाच्या व्यापाराबाबत बदलत्या भू-राजकीय दृष्टीकोनातून भारत आणि चीन सारख्या उमद्या ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आशियातील उर्जा तज्ञांशी संवाद साधण्याची नितांत गरज वाटत होती.
त्यामुळे पन्नाशीतच ती एक धाडसी प्रवासी बनली. सहा पासपोर्ट आणि जवळपास ६५ देशांतून प्रवासाचा अनुभव घेतल्यानंतर तिने या अनुभवावर आधारित, ‘द ट्रॅव्हल्स गॉड मस्ट बी क्रेझी’ हे पुस्तक लिहिले.
या पुस्तकातूनतिने झपाटल्यागत केलेल्या प्रवासाचे आणि त्यातील अचाट साहसाचे किस्से वाचल्यास अक्षरशः पोटात गोळा येतो.
२०१२ मध्ये तिने बोर्निओ रेनफॉरेस्ट मध्ये मुसळधार पावसात केलेले ट्रेकिंग, विषारी टोड, मोठमोठे लीच आणि आक्रमक मुंग्या, त्यात चिखलात रूतणारे पाय आणि दर एक-दोन मिनिटाला चष्म्यावर साचलेला धुके पुसण्यासाठी घ्यावा लागणारा थांबा, हे वाचूनच आपले डोळे विस्फारतात.
मग २०१५ सालचा अनुभव जेंव्हा ती चुकून इराणच्या याझ्द येथील जामा मशिदीच्या एका मिनारात अडकून पडल्याचा अनुभव तेही सूर्यास्ताच्या वेळी.
योगायोगाने मुंबईहून आलेले तीन पारसी प्रवासी तिची तेथून सुरक्षित सुटका करतात, पण हा अनुभव वाचताना अक्षरशः काही काळ श्वास रोखला जातो.
दोन वर्षापूर्वीच ती नेपाळ येथील अन्नपूर्णा शिखर चढून गेली. तिच्यासोबत असणाऱ्या एका तरुणाला मात्र यावर अजिबात विश्वास बसत नव्हता, “माताजी, तुम्ही इतका त्रास का घेता, अन्नपूर्णा शिखरावर अगदी एखाद छोटसं मंदिर देखील नाहीये.” असं तो वारंवार सांगत होता.
परंतु, ते पूर्ण टोक चढून जाईपर्यंत माताजी या शब्दावर महालिंगम यांचा जराही विश्वास नव्हता. तिच्या प्रवासाची पद्धत देखील एखाद्या पोक्त स्त्रीला साजेशी नाहीये. कोणत्याही ठिकाणी ती अगदी बुकिंग न करता देखील जाऊ शकते.
अगदी कमी रकमेत मिळणाऱ्या कोणत्याही हॉस्टेलवर, विद्यार्थ्याप्रमाणे कॉट बेसिसवर देखील ती राहू शकते. फेज मधील खिडकी नसलेली कोठडी किंवा रोम मधील एकाच रूम मध्ये ११ सहप्रवाश्यांसह रूम शेअर करत अगदी फक्त सोफ्यावर झोपण्याचा देखील अनुभव तिने घेतला आहे.
“माझ्याप्रमाणे प्रवास करण्याची तुमची कधीच इच्छा होणार नाही,” ती हसत हसत सांगते, तेंव्हा तिच्या डोळ्यात एक मिश्कील चमक असते.
“एका अश्वेत देशातून आलेली एक म्हातारी, म्हणून बरेच लाभ मिळतात,” महालिंगम सांगतात, “कारण कुणाचेच तुमच्याकडे लक्ष नसते, अगदी कुणाचेही नाही आणि कोणी तुम्हाला फारश्या गांभीर्याने घेतही नाही.”
वेगवेगळे देश आणि तिथली संस्कृती यापेक्षाही तिथले डोंगर आणि जंगलच मला जास्त आकर्षित करतात असे महालिंगम सांगतात. त्यांची प्रवासाची संकल्पना इतर पर्यटकांप्रमाणे अजिबात नाही.
त्या अशा ठिकाणी जात नाहीत जिथे जायला सर्वाना आवडतं तर त्या अशा ठिकाणी प्रवास करतात जिथे कुणीही फारसं जात नाही. म्हणजे त्याच त्याच देशातील तीच तीच पर्यटन स्थळे फिरण्यात त्यांना बिलकुल रस नाही.
त्यांच्या मते आजच्या भांडवली जगाने तुम्हाला प्रवासी कमी आणि पर्यटकच जास्त बनवले आहे. तिच्या प्रवासाच्या अनुभवावर अधारित ब्लॉगदेखील ती लिहिते हे ब्लॉग वाचल्यावर लक्षात येईल की तथाकथित टूर्सवाले जेंव्हा एखाद्या पर्यटन स्थळाच वर्णन करणारे लेख लिहितात तेंव्हा ते किती सजवून, किंवा अधिक रंगवून लिहिलेले असतात.
टुरीझम नावाच्या कार्पेट-बॉम्बिंग क्षेत्राने आपल्या या पृथ्वीचा इंच न इंच व्यापला आहे. अशी खंत देखील त्या बोलून दाखवतात.
“अनोळख्या देशातून असे एकटीने फिरल्याने आपल्यातील सुप्त शक्तींची आपल्याला नव्याने ओळख होते. आपण देखील सक्षम आहोत दुर्बल नाहीत ही जाणीव प्रबळ होते आणि अशी जाणीव प्रत्येक स्त्रीला झाली पाहिजे असे मला वाटते. माझ्या या प्रवासाच्या अनुभवातून स्त्रियांनी किमाव इतकं तरी जाणून घ्यावं अशी माझी इच्छा आहे.” सुधा सांगतात.
“आयुष्यभर तुमच्यासाठी काय चांगल आहे काय चांगल नाही हेच ऐकवलं जातं. कुठे फिरणे सुरक्षित आहे कुठे फिरायला नाही पाहिजे असे अनेक पूर्वग्रह आपल्या मनात घर करून असतात.
अमुक एक ठिकाण सुरक्षित तर अमुक एक ठिकाण असुरक्षित असे बरेच गैरसमज असतात. परंतु, मी बाहेर पडल्यानंतर मला कळत गेलं हे सगळे मनाचे खेळ आहेत. प्रवास केल्याने तुमच्यातील सुप्त गुण तुम्हाला जाणवायला लागतात.
तुम्ही कोणत्या गोष्टी करण्यास सक्षम आहात कोणत्या नाहीत हे देखील समजायला लागतं. पण यासाठी बाहेर पडणं गरजेच आहे.” सुधा सांगतात.
१९९६ साली सुधा यांनी कैलाशमानस सरोवर ट्रेकिंग केलं होतं. यासाठी त्यांना तब्बल ३२ दिवसांचा कालवधी लागला आणि त्यावेळी त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या मुलाला देखील घरच्यांच्या जबाबदारीवर सोडलं होतं.
“पण, यामुळे मी एकटी देखील काही गोष्टी करण्यास सक्षम आहे हा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला,” असं त्या सांगतात. वर्षातून पाच-सहा ट्रीपतरी त्यांच्या वार्षिक वेळापत्रकात नमूद केलेल्या असतातच.
अलीकडे मात्र प्रवास करताना सोबतीला कोणी असेल तर त्यांना बरं वाटतं. यावर्षी सप्टेंबर मध्ये त्या मादागास्कर आणि डिसेंबर मध्ये पॅटागोनियाला जाणार आहेत. एकच गोष्ट कधीही जाऊ शकत नाही आणि ती म्हणजे त्यांची प्रवासाची खाज…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.