Site icon InMarathi

लोभी माणसांनी भरलेल्या जगात प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायला लावणारी ही सत्यघटना प्रत्येकाने वाचायलाचं हवी..!

Kashmiri-cab-driver-Tariq InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘हल्लीच्या जगात कुठे मिळतो प्रामाणिकपणा?’, ‘विश्वास ठेवण्यासारखा जमाना राहिला नाही’, ‘कलियुग आलंय कलियुग’ सध्याच्या वास्तवाबद्दल अशी बरीच नकारात्मक वाक्य ऐकायला आणि अशा घटना पाहायला मिळतात. अगदी जिवाभावाच्या नात्यातही लोकं स्वार्थ शोधतात.

परंतु, वाळवंटात ओएसिस असावं त्याप्रमाणे चांगुलपणा जपणारी, स्वतःच्या व्यवसायाशी प्रामाणिक असणारी आणि विवेकानं वागणारी माणस आजही या जगात आहेत आणि अगदीच काही सगळं बुडलेलं आहे, संपलेलं आहे, असं नाही, पण माणुसकीचा वारसा आणि विचार पुढे घेऊन जाणारे काही प्रवासी आजही भेटतातच.

 

 

“विवेक हा पैशापेक्षा जास्त मौल्यवान असतो,” अशी एक जुनी म्हण आहे. ज्याचा विवेक जागृत असेल त्याच्या हातून कधीच चुकीची गोष्ट होणार नाही, इतरांना लुबाडून जगण्याची इच्छा होणार नाही.

या म्हणीप्रमाणे जगणारी लोकं कमी असली तरी दुर्मिळ अजिबात नाहीत आणि काश्मीरच्या तारिक अहमद या टॅक्सी ड्रायव्हरने ही बाब निर्विवादपणे सिद्ध केली.

अगदी क्षुल्लक रकमेवरून एकीकडे माणूस माणसाच्या जीवावर उठत आहे. किरकोळ रकमेसाठी चोरी, दरोडे, खून असेप्रकार जेव्हा आजूबाजूला घडतात तेव्हा सामान्य माणसांचा माणुसकीवरचा विश्वासच उडतो.

परंतु, दुसरीकडे तारिक अहमद सारखे काही प्रामाणिक लोक आहेत ज्यांच्या एका नि:स्वार्थ कृतीमुळे माणुसकी जिवंत असल्याचाही प्रत्यय येतो. तारिक सारख्या लोकांमुळेच हे जग आपल्याला आजही चांगलं वाटतं.

 

 

तारिक हा व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर आहे, त्यामुळे अर्थातच त्याची आर्थिक परिस्थिती यथातथाच आहे, परंतु या माणसाचे मन मात्र उदार आणि प्रामाणिक आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात त्याचे गाव आहे. काही दिवसापूर्वी त्याने भोपाळहून आलेल्या एका प्रवासी कुटुंबाला प्रसिद्ध आहारबल धबधबा दाखवण्यासाठी नेलं होतं.

प्रवासावरून परत घरी गेल्यानंतर त्या कुटुंबाच्या लक्षात आलं की, त्यांच्या सामनातील एक बॅग गायब आहे. ही काही साधीसुधी बॅग नव्हती. तर त्यामध्ये सुमारे १० लाख किमतीचे सोन्याचे दागिने आणि ३ ब्रँडेड मोबाईल फोन देखील होते. त्या कुटुंबाची तर पंचाईतच झाली.

एवढी मौल्यवान चीजवस्तू असलेली बॅग आता नेमकी शोधणार कुठे आणि समजा कुणाला सापडलीच तर कुणी प्रामाणिकपणे परत करणार आहे का? अशा विवंचनेत असतानाच तारीकने मात्र या कुटुंबाला एक सुखद धक्का दिला.

 

 

तारिकच्या टॅक्सीमध्येच ते बॅग विसरले होते. तारीकने जेव्हा बॅग पहिली तेव्हा त्याला त्यामध्ये तीन मोबाईल फोन दिसले. त्याला वाटले की, तिन्हीपैकी एका मोबाईलवर तरी कुणाचा कॉल आला तर बॅगच्या मूळ मालकापर्यंत पोहोचण अगदी सोपं आहे.

इतका पैसा आणि मौल्यवान दागिने पाहूनही तारिकचे मन पालटले नाही, त्याला कशाचाच मोह देखील झाला नाही. त्याने ती बॅग शोपियनच्या टुरिस्ट कार्यालयात आणून दिली आणि तिथून ती बॅग त्या प्रवाशांना परत करण्यात आली, अशी माहिती तेथील अधिकार्यांनी दिली.

त्या प्रवाशांनी तारिकच्या प्रामाणिकपणबद्दल त्याने काहीतरी स्वीकारावे अशी अपेक्षा केली, परंतु आपल्या प्रामाणिकपणाच्या बदल्यात तारिकने काहीही स्वीकारण्यास नकार दिला.

“त्याने त्या प्रवाशाकडून कसलाही मोबदला किंवा बक्षीस स्वीकारले नाही.” अधिकारी म्हणाले. “त्याला जेव्हा बॅग सापडली तेव्हा त्याने आधी बॅग मधील फोनवर कुणाचा फोन येतो का याची वाट पहिली आणि नतंर तो ती बॅग घेऊन टुरिस्ट कार्यालयात आला. त्याचा प्रामाणिकपणा पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले.

नंतर त्या कुटुंबाने देखील बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल तारिकला धन्यवाद दिले, परंतु त्यांनी त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल जे बक्षीस देऊ केले ते मात्र तारिकने स्वीकारले नाही.”

 

 

तारिक सारखी माणसे आहेत म्हणून आजही जगात माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव येतो. कसलाही लोभ किंवा लाभाची अपेक्षा न ठेवता त्याने केलेले हे कृत्य म्हणजे समाजासमोर घालून दिलेला एक आदर्श वस्तुपाठ आहे.

“तारिक सारख्या लोकांमुळे आम्हाला जगात माणुसकी आजही जिवंत असल्याची साक्ष मिळाली. घरी गेल्यानंतर आमच्या जेव्हा लक्षात आले की, मौल्यवान वस्तू असलेली आपली बॅगच गायब आहे तेव्हा आम्हाला प्रचंड धक्का बसला.

खरंतर ती बॅग मिळेल याची आम्ही अशाच सोडून दिली होती. परंतु, शोपियनच्या टुरिस्ट कार्यालयातून फोन आला की, तुमची बॅग आम्हाला सापडलेली आहे. तेव्हा अक्षरशः आमचा आनंद गगनात मावत नव्हता. मग आम्ही पुन्हा काश्मीरला आलो ती बॅग ताब्यात घेतली.

तारिकने आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. त्याच्या या उपकाराबद्दल त्याचे ऋण कसं फेडावं हे आम्हाला काळात नाहीये. त्याने बक्षीस म्हणून देऊ केलेली रक्कम देखील स्वीकारली नाही.” त्या कुटुंबियांनी त्यांच्या मोल्यवान वस्तू परत मिळाल्याबद्दल तारिकचे आभार मानले आणि त्याच्या प्रामाणिक आणि निस्वार्थ गुणाचे तोंडभरून कौतुक केले.

 

 

खरंतर, पर्यटकांना लुबाडणाऱ्या काही भुरकट टॅक्सी ड्रायव्हर्समुळे अनेकांना शरमेने मान खाली घालावी लागते. एका टॅक्सी ड्रायव्हरच्या फसवणुकीमुळे सगळ्याच ड्रायव्हरना त्याच तराजूत तोललं जातं,

पण सगळेच लुबाडण्यासाठी म्हणून हा व्यवसाय करत नाहीत. ज्यांच्या अंगी प्रामाणिकपणा असतो आणि तो जपण्याची जिद्द असते असे लोक कोणत्याही मोहाला बळी पडत नाहीत. पैशासमोर त्यांचा विवेक ढळत नाही.

काश्मीर हे तर पृथ्वीवरील नंदनवन मानले जाते. एकेकाळी पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाणारा काश्मीर आज अशांत असला तरी, पर्यटकांना त्याचे आकर्षण नेहमीच राहिले आहे.

 

 

देशभरातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येथे निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येतात. भारत आणि त्यातही काश्मीर हे जगभरातील पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण स्थळ आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना जर आपल्या इथे प्रामाणिक आणि दर्जेदार सेवा मिळत असेल तर, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ठरते.

पर्यटकांना जर असे प्रामाणिक अनुभव येत असतील तर नक्कीच जगभरातील पर्यटकांमध्ये भारताबद्दल विश्वासार्ह प्रतिमा निर्माण होईल. यामुळे पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल. देशाचे नागरिक देशाच्या विकासात कशाप्रकारे आपलं योगदान देऊ शकतात हे तारिकने आपल्या उदाहरणावरून दाखवून दिले आहे.

 

 

काश्मीर मधील जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी देखील ही गोष्ट फारच अभिमानाची आहे. यामुळे त्यांची विश्वासार्हता देखील वाढते. फक्त टॅक्सी ड्रायव्हरच नव्हे तर, आज तारीकने समस्त काश्मिरी लोकांना त्याचा अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version