आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आजवर अजरामर मराठी सिनेमे दाखवणारी ‘फक्त मराठी’ वाहिनी आता कालानुरूप स्वतःमध्ये बदल घडवत नव्या मालिकांचे प्रक्षेपण करताना दिसेल.
बार्क रेटिंग्सनुसार मराठीतील सर्वोत्तम वाहिन्यांच्या यादीत दुसरा क्रमांकावरील या वाहिनीवर आता प्रेक्षकांना ‘सिंधू’ नावाची आगळीवेगळी मालिका बघायला मिळणार आहे. एकोणिसाव्या शतकातील ही नवीन मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘सिंधू…एका सामान्य मुलीची असामान्य कथा’ या मालिकेत एकोणिसाव्या शतकातील सिंधू या चिमुरड्या निरागस मुलीची उत्कट कथा बघायला मिळेल. यानिमित्त तिचा आयुष्यातील खडतर प्रवास विशेषतः शैक्षणिक मिळवण्यासाठीची धडपड दिसून येईल.
नेहमीच्या टिपिकल सास-बहू ड्रामाला तडा देत ‘सिंधू’ ही काल्पनिक मालिका प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी ठरेल. अगदी वयवर्षे ५ ते ६० अशा सर्वगटांतील महिला त्यातील आशयाशी स्वतःला एकरूप करू शकतील अशी ही मालिका आहे.
त्यातच एकोणिसाव्या शतकातील वातावरण, आचार-विचार, केशभूषा, वेशभूषा, वाडे, अशा अनेक निराळ्या गोष्टी यात बघायला मिळतील. यानिमित्त महाराष्ट्रातील ही अग्रगण्य वाहिनी आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करताना दिसेल.
‘फक्त मराठी’चे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात, ‘आजवर आम्ही चोवीस तास उत्तमोत्तम मराठी सिनेमा दाखवणारी वाहिनीचे बिरुद मिरवले. आता मात्र या नवनिर्मितीच्या माध्यमातून आम्ही उत्तमोत्तम मालिकाही प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
सिंधूची कथा सर्ववयोगटातील प्रेक्षकांना नक्की भिडेल असा मला विश्वास आहे’.
बालकलाकार अदिती जलतरे सिंधूची भूमिका साकारत असून तिच्यासोबतच श्रीहरी अभ्यंकर, वेद आंब्रे, सौरभ सुतार, वंशिका इनामदार असे आणखीनही चिमुकले कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसतील.
त्यांसोबतच गौरी किरण, पूजा मिठबावकर, शाश्वती पिंपळीकर, प्रसाद दाबके, निकिता कुलकर्णी असे अनेक कलाकार या मालिकेतून महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.
या मालिकेची संकल्पना श्रीरंग गोडबोले अशा चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची असून त्यांच्याच इंडियन मॅजिक आय कंपनीतर्फे या कलाकृतीची निर्मिती होत आहे. विभावरी देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले यांच्या या सुंदर कथेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्नील मुरकर सांभाळत आहेत.
सध्या ‘सिंधू’चा प्रोमो इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे त्याच्या प्रोमोमुळे. त्यातील गोंडस बालकलाकार आणि पार्श्वसंगीत सगळ्यांचे लक्ष विशेष आकर्षित करत आहे.
या मालिकेला शशांक पोवार यांचे संगीत असून टायटल सॉंग गोड आवाजाच्या आनंदी जोशीने ते गायले आहे. एकूणच, स्वातंत्र्याच्या आधीचीही ही कथा असल्याने प्रेक्षकांना त्याकाळचे अनेक पैलू यानिमित्त छोट्या पडद्यावर बघता येतील.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.