रवीश? अर्णब? की “बातमी”? : एका वार्ताहाराची कैफियत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक: चिन्मय भावे
===
रवीश कुमारला मॅगसेसे पुरस्कार मिळाला. अर्थातच यावर अनेकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. मी रविशचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली त्यावर उपहासात्मक विडंबन झालं आणि काही जणांनी इनबॉक्समध्ये आश्चर्य वगैरे व्यक्त केले!
परंतु विचारसरणीच्या चौकटीतच वैयक्तिक नात्यांना जोखणाऱ्या लोकांना मी रविशचे अभिनंदन करण्यात आश्चर्य वाटणे अतिशय स्वाभाविक आहे.
मला गंमत या गोष्टीची वाटली की अनेकांनी रवीशचे अभिनंदन करण्यापेक्षा अर्णब बॅशिंग मध्ये ऊर्जा जास्त लावली आणि अर्णबच्या आक्रस्ताळेपणाच्या तुलनेत रवीशची संयत मांडणी ग्रेट कशी वगैरे तुलनात्मक कौतुकही झाले.
लोकांना एक लक्षात येत नाही की टीव्ही जर्नलिझम हा व्यवसाय आहे. कोणीही कितीही लोकशाहीचा स्तंभ असल्याचा दावा वगैरे केला तरीही अशी एकही न्यूजरूम भारतात किंवा जगात कुठेही नाही जिथं टीआरपी किंवा प्रेक्षकांकडे दुर्लक्ष केलं जातं.
रवीश आणि अर्णब दोघेही तेच करत आहेत. दोघांचा टार्गेट प्रेक्षक वेगळा आहे इतकंच.
रवीशचा प्रेक्षक डावीकडे झुकलेला आणि भाजप विरोधक हिंदी भाषी वर्ग आहे आणि अर्णबचा प्रेक्षक उजवीकडे कललेला भाजप समर्थक इंग्लिश भाषी वर्ग आहे आणि रिपब्लिक सुरु झाल्यानंतर तो हिंदी भाषी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे.
या दोघांपैकी कोणीच मला पाथ-ब्रेकर वाटत नाही. कारण दोघेही फील्डवर जाऊन खोलवर माहिती घेऊन बातमी करण्यापेक्षा आपल्या सोयीच्या राजकीय विचारधारेला पोषक अशी ओपिनियन मांडणी करतात.
याचा परिणाम पत्रकारितेतील रिपोर्टींग ची जागा सवंग आणि उथळ डिबेट ने घेण्यात झाला आहे. हा फॉर्म्युला अर्णबने दहा वर्षांपूर्वी आणला आणि इतर सर्वांनी त्याला फॉलो केलं.
खरंतर रवीश सुरुवातीच्या काळात टीव्ही माध्यमाचा उत्कृष्ट वापर करत रवीश कि रिपोर्ट सारखे सुंदर कार्यक्रम करत असे. त्यात ऑन फील्ड व्हिज्युअल्स असत. मुलाखत किंवा बोलणाऱ्या लोकांपेक्षा व्हिज्युअल्स ना अधिक महत्व होते.
त्याची जागा आज ओपिनियनने घेतली आहे आणि रवीशने अजिबात त्याला विरोध केलेला नाही. त्याच्या कार्यक्रमाची सुरुवातीची ५-६ मिनिटे तोच एकटा बोलत असतो.
चर्चेत सुद्धा विविध विचारसरणीच्या लोकांना वाव दिल्याचा आभास असतो पण पार्टी प्रवक्ते आणि दक्षिण दिल्लीतील ठराविक चार डोकी त्याच त्या चर्चा करतात. त्या संयत असतात म्हणून फार ज्ञानवर्धक किंवा वस्तुनिष्ठ असतात असं अजिबात नाही.
त्याने रेल्वेबद्दल एक मालिका केली होती. त्या काळात रेल्वेचा युजर एक्सपीरियन्स खरंतर झपाट्याने सुधारत होता आणि माझ्या कामाच्या दृष्टीने मी त्यात रस घेत होतो.
पण उत्तर प्रदेश बिहार या दोन राज्यातील रेल्वेच्या अनुभवावर त्याने एकंदरीतच भारतीय रेल्वेबद्दल सोयीचे निष्कर्ष काढणारी मांडणी केली त्यानंतर मी त्यात रस घेणे बंद केले कारण विश्लेषण पूर्णतः पूर्वग्रहदूषित होते.
त्याने राहुल गांधींची घेतलेली मुलाखत आणि किरण बेदींची घेतलेली मुलाखत पहा आणि करा तुलना! स्क्रीन काळे करणं, डायलॉगबाजी हे गिमिक आहे आणि ते आवडलं तर अजिबात हरकत नाही.
त्याला जेव्हा काहीतरी जबरदस्त क्रांतिकारी केल्याचा मुलामा दिला जातो तेव्हा अडचण होते. जेव्हा नितीन गोखलेंनी पूर्व नौसेना प्रमुख डी के जोशींची मुलाखत घेतली आणि त्यात यूपीए सरकारने ज्या पद्धतीने नौसेनेच्या पाणबुड्यांच्या बाबतीत अक्षम्य हलगर्जीपणा केला हे उघड झालं.
तेव्हा काँग्रेस वरिष्ठांकडून फोन गेले आणि ती मुलाखत काढली गेली ते पाहता प्रेस फ्रीडम वर बोलण्याआधी आपल्या वाहिनीचा रेकॉर्ड पाहणं गरजेचं आहे! बरं इतके दिवस मी समजत होतो की शांतपणे चर्चा फक्त रवीश कुमार करतो.
बालाकोट च्या वेळेला न्यूज १८ आणि इंडिया टुडे पाहिलं तिथेही शांतपणे चांगल्या चर्चा सुरु होत्या. तज्ज्ञ लोकांमध्ये वैविध्य होते. मुख्य म्हणजे भाजप किंवा काँग्रेस प्रवक्त्यांपेक्षा जास्त महत्व वायुसेनेचे पूर्व अधिकारी आणि संरक्षण संशोधक-विश्लेषकांना होतं.
मला पत्रकार आणि संपादकांकडून विश्लेषण नको आहे. मला बातमी द्या. मत किंवा ओपिनियन सगळ्यांकडे आहे आणि ते फुकट मिळते.
विश्लेषणासाठी मी रिसर्च वाचू शकतो, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचे मत घेऊ शकतो आणि ते भाजप किंवा सरकारच्या बाजूचे असले पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नाही.
इंडिया स्पेंड सारख्या वेबसाईट, मिंट सारखी वर्तमानपत्रे वस्तुनिष्ठ बातम्या आणि विश्लेषण करत आहेत. पी साईनाथ सारखे लोक भाजप समर्थक आहेत असं कोणी मूर्खच म्हणेल, पण मला ते आवडतात कारण ते ऑन फील्ड काम करून बातमी देतात.
स्टुडिओत बसून ज्ञानवाटप करत नाहीत. रवीश काय आणि अर्णब काय दोघेही परफॉर्मर आहेत.. थोर पत्रकार नाहीत. अर्णबच्या बाबतीत म्हणाल तर त्यालाही टीव्ही माध्यमाची चांगली जाण आहे.
मी त्याचे डिबेट पाहत नाही कारण म्यूट वर पाहिले तरी डोकं दुखेल इतका आवाज असतो. पण भाजप सत्तेत येण्याच्या खूप आधीपासून त्याने संपादक म्हणून वाहिनी प्रॉफिटेबल चालवली आहे आणि सरळसरळ सरकारविरोधी असे अनेक रिपोर्ट तिथेही असतात.
या दोघांचाही कल्ट निर्माण झाला आहे आणि हे एकंदरीतच पत्रकारितेतील ‘बातमी’ साठी पोषक नाही. माझी पहिली नोकरी टीव्ही न्यूजमध्ये होती. रवीशच्याच वाहिनीत होती.
आता बातम्यांची जागा ओपिनियन नी घेतली आहे आणि हा भयानक ट्रेंड मराठी आणि इतर प्रादेशिक वाहिन्यांमध्येही आला आहे. किती ठिकाणी स्पोर्ट बुलेटिन बंद झाली आहेत विचारा..
बातम्यांची पॅकेज सुद्धा खूप कमी झाली आहेत आणि प्राईम टाईममध्ये ५० खिडक्यांमध्ये तेच ५० लोक कशाही वर ज्ञानवाटप करत बसतात. त्यामुळे मी टीव्ही न्यूज पाहणे कमी केलं आहे. वेब त्यापेक्षा उपयुक्त ठरते.
एक वरिष्ठ सहकारी म्हणून रवीशबद्दल आदर आहे. त्याच्या सुरुवातीच्या कामाबद्दल आकर्षणही आहे. अर्णबच्या बाबतीतही त्याचा न्यूज सेन्स उत्तम आहे असं मला वाटतं. पण दोघेही माझे पत्रकारितेतील आदर्श नाहीत. ज्यांचे आहेत.. त्यांच्या मताचा आदर आहेच.
जो कोणी टीव्हीच्या दुनियेत बातम्यांना पुन्हा जागा मिळवून देईल त्याला सेलिब्रेट करायला मला जरूर आवडेल.
ही पोस्ट राजकीय नाही. अनेक भाजप-विरोधी पत्रकार मला आवडते आहेत.. माध्यम अभ्यासाच्या अंगाने हे मांडलेलं आहे. तेव्हा राजकीय वाद घालायचा असेल तर दुर्लक्ष करण्यात येईल!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.