या लुटारूने भारतात लुटलेली संपत्ती मोजणं केवळ अशक्य!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता अशी भारताची ख्याती होती. भारत हा जगातील एक अत्यंत श्रीमंत देश होता. जगातील सर्वात जुनी नागरी संस्कृती असणाऱ्या या देशाने तंत्रज्ञानापासून ते कलेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवला होता.
आयुर्वेद, गणित, साहित्य, तत्वज्ञान, ज्योतिष, खगोलशास्त्र, वास्तुरचनाशास्त्र अशा सर्व क्षेत्रात भारताने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे वेद, पुराण आणि शास्त्रांमध्ये वर्णन केलेले आहे. सैद-अल-अंदालुसी या ११ व्या शतकातील एका अरबी न्यायाधीशाने आपल्या पुस्तकात
भारतीय लोकांविषयी लिहून ठेवलेले गौरवोद्गार स्फूर्तीदायी आहेत.
परंतु, परकीय आक्रमणे वाढत गेली तसतसे या वैभवाला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली. त्यानंतर भारतावर ब्रिटीशांचे राज्य आले. काही परकीय लुटारूंनी देशाची वारंवार लुट केली.
देशाची संपत्ती लुटली, मंदिरे आणि धर्मस्थळे उध्वस्त केली, गडकोट-किल्ले पाडले, निष्पाप जीवांची हत्या केली इतकेच नाही तर, गावेच्यागावे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
स्त्रियांना गुलाम म्हणून पळवण्यात आले. जेंव्हा जेंव्हा हे लुटारूंनी आक्रमण केले तेंव्हा तेंव्हा त्यांनी ही कृत्ये पुन्हापुन्हा केलेली आढळतील.
पण, भारताची सर्वात जास्त आणि भयानक लुट केली ती गझनीचा राजा ‘सुलतान मोहम्मद गझनी’ याने. मोहम्मद गझनीने इ.स. ९७१ ते इ.स. १०३० या कालखंडात गझनीवर राज्य केले. इ.स. १००१ साली भारतावर त्याने पहिला हल्ला केला त्यानंतर त्याने सतरा वेळा स्वारी केली.
प्रत्येक वेळी जाताना त्याने आपल्या सोबत प्रचंड लुट नेली. इ.स. १०२५ साली गझनीने फक्त सोन्यासाठी सोमनाथवर १६ वा हल्ला केला.
भारतातील संपत्ती, धन-दौलत, खजिना यांचा प्रचंड साठा बघून त्याचे डोळे दिपून गेले होते. म्हणून त्याने तब्बल सतरा वेळा भारतावर स्वारी करून भारतातील संपत्ती लुटून नेली.
इतकेच नाही तर या हल्ल्यांना त्याने धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न केला. तो प्रत्येकवेळी भारतावर आक्रमण करताना इथली मंदिरे आणि त्यातील मुर्त्यादेखील उध्वस्त करायचा. त्याला स्वतःची मूर्तिभंजक अशी प्रतिमा निर्माण करायची होती.
गझनीच्या आक्रमणामुळे भारतातील राजकीय परिस्थितीवर काही फरक पडला नसला तरी, राजपुतांच्या युद्ध कौशल्यातील उणीवा त्यामुळे जगजाहीर झाल्या.
तसेच, भारतीय राजे विखुरलेले होते, त्यांच्यात आपसांत एकी नव्हती या परिस्थीचा फायदा घेणे सोपे आहे हे लक्षात आल्यावर या आक्रमणांमध्ये वाढच झाली. गझनीने सोमनाथ, कांगरा, मथुरा आणि ज्वालामुखी अशा अनेक मंदिरावर आक्रमणे केली तिथली संपत्ती तर लुटलीच पण, देवांच्या मूर्त्या देखील फोडल्या.
इ.स. १००० मध्ये पहिल्यांदा गझनीने सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्थान भागात आक्रमण केले. हिंदू राजा जय पालचा त्याने पराभव केला. जयपालने नंतर आत्महत्या केली आणि त्याच्या जागी आनंदपालकडे त्याचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी आली.
गझनीने इ.स. १००६ साली मुलतान वर आक्रमण केले पण, आनंदपालने त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले. पण, त्याचा फारसा निभाव लागला नाही.
इतकी आक्रमणे करून देखील भारतीय राजांना एकदाही गझनीचा बिमोड करता आला नाही याचे नेमके कारण काय असावे? भारतात अहिंसेच्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार इतका वाढला होता की, भारतीय राजे आणि सैनिकातील लढाऊ वृत्ती कमी झाली होती.
अनेक भारतीय राजे आणि त्यांच्या प्रजेला देखील युद्धात स्वारस्य राहिले नव्हते. पिढ्यानपिढ्या हीच मानसिकता जोपासल्याने भारतीयांमधील धैर्य, शौर्य, धाडस, बेडरपणा आणि पराक्रम गाजवण्याची वृत्ती लोप पावत चालली होती.
युद्धभूमीवर देखील धर्म आणि नितीशास्त्रांचे नियम पाळण्याकडेच भारतीय राजांचा अधिक कल होता. एखादा योद्धा आधीच कुणाशी लढण्यात व्यस्त असेल तर, ते त्याच्याशी युद्ध करत नसत.
शरण आलेल्याला माफ करणे ही त्यांची वृत्ती होती. स्त्रिया, कैदी, शेतकरी यांना पावित्र्याचे आणि आदराचे स्थान होते. काही भारतीय राजांनी प्रचंड ताकदीचे सैन्य उभारणे किंवा लष्करी सुविधांचे अत्याधुनिकीकरण करवून घेण्याकडे दुर्लक्ष केले.
इस्लामी आक्रमणकर्त्यांनी मात्र असे कोणतेही नियम पाळले नाहीत. उलट, त्यांनी अतिबिकट प्रसंग पाहूनच भारतावर हल्ले केले. ज्या राजांनी आपले सैन्य वाढवण्यावर भर दिला यांनी सैन्याचे आधुनिकीकरण करवून घेतले त्यांनी मात्र गझनीला जोरदार लढत दिली. अशा राजांना हे लुटारू धक्का देखील लावू शकले नाहीत.
अनेक ऐतिहासिक साधनाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार गझनी भारताच्या दक्षिणेकडील राज्यांत पाय देखील रोवू शकला नाही. त्याने केलेले हल्ले आणि लुट ही फक्त उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील राज्यांपुरतीच मर्यादित होती.
पण, त्याने केलेली लुट इतकी अवाढव्य होती की त्याची मोजदाद होणे देखील अशक्यप्राय आहे. त्याने एकावेळी लुटून नेलेल्या संपत्तीचे जरी वर्णन करायचे म्हंटले तरी, एका लेखात ते वर्णन पूर्ण होऊ शकणार नाही. एकट्या सोमनाथ मंदिरातील संपत्तीचे वर्णन वाचतानाच आपले डोळे दिपून जातात.
मोहम्मद आक्रमण करून परतून गेल्यानंतर तो तिथे भारतातून लुटून नेलेल्या संपत्तीचे खुल्या मैदानात प्रदर्शन करीत असे. सोने, चांदी आणि हिऱ्या-मोत्यांचे अक्षरश: तो मोठेचामोठे ढीग लावत असे आणि आपल्या सुभेदारांना त्यातील काही लुट बक्षीस म्हणून वाटत असे.
इतकी प्रचंड संपत्ती त्याने भारतातून लुटून नेली होती. भीम किल्ल्यावरील त्याने केलेल्या लुटीचे वर्णन करताना फरिश्तेने आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे, “भीम किल्ल्यावर ७००,००० सोन्याच्या दिनार होत्या, शिवाय ७०० मण सोने आणि चांदी होती.
शिवाय, शुद्ध सोने २०० मण, २००० मण चांदीच्या विटा, आणि वीस मण वेगवेगळे हिरे ज्यामध्ये मोती, हिरे, रुबी, अशा किमती वस्तूंचा समावेश होता. एकट्या भीम किल्ल्याच्या लुटीचे हे वर्णन आहे.
ठाणेश्वर हल्ल्यानंतर तर, सुलतान मोहम्मदने दोन लाख हिंदूंना गुलाम म्हणून कैद करून नेले होते. या लुटीनंतर गझनी शहराला एखाद्या भारतीय शहराचे रूप आल्याचे वर्णन फारीश्तेने आपल्या पुस्तकात केले आहे.
सोमनाथ मंदिराचे वर्णन करताना फरिश्ते लिहितो, “सोमनाथ मंदिर हे महाकाय संपत्तीचे अगर होते. कोणत्याही राज्याच्या खाजान्यात देखील इतकी प्रचंड संपत्ती नव्हती. सुलतान मोहम्मदने मंदिरातील ही सर्व संपत्ती लुटून नेली.
मंदिराच्या या खाजान्यात एक सोन्याची साखळी होती जिचे वजन तब्बल २०० मण होते. मंदिरातील सर्वात मोठ्या घंटेला ही चैन बांधण्यात आली होती. सोमनाथ मंदिरातील भिंती आणि देवांच्या मुर्त्या देखील हिऱ्यांनी मढवलेल्या होत्या.
यामुळे रात्रीच्या वेळी, एक जरी दिवा लावला तरी त्याचा प्रकाश परावर्तीत होऊन संपूर्ण मंदिर झगमगत असे. यावरून १००० वर्षांपूर्वीचा भारत किती समृद्ध, संपन्न आणि श्रीमंत होता, याची कल्पना येईलच
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.