कॅन्सरशी कडवी झुंज आणि टेबल टेनिसमध्ये गोल्ड मेडल : ८ वर्षाच्या चिमुकल्याने करून दाखवलं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
पश्चिम बंगालच्या ८ वर्षीय पिटुकल्याने ‘अरोन्यतेश गांगुली’नं मॉस्को मध्ये झालेल्या वर्ल्ड चिल्ड्रन विनर गेम्स २०१९ मध्ये टेबलटेनिस या खेळात सुवर्णपदक मिळवलं.
हो! तुम्हाला यात काही विशेष कदाचित वाटलं नसेल पण हे सगळं करताना तो नुकताच कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देऊन आलेला एक मुलगा होता.
आजाराच्या दुनियेत अनेक वेगवेगळी नाव आहेत पण त्यात ‘कॅन्सर’ म्हटले कि भल्या भाल्यांचे हात पाय लटपटू लागतात, घशाला कोरड पडते.. अर्धा जीव तर ‘कॅन्सर’ आहे म्हटल्यावरच उडून जातो.

अंगाला बाहेरून लागलेला रंग, माती, चिखल वेगैरे झटकून टाकता येतो पण आतून लागलेली कीड कशी काढावी? हा आजार फक्त शरीरालाच नाही तर मनालाही आतून पोखरतो, माणसाची हिम्मत तोडू पाहतो..
जगण्याचा इच्छाशक्तीला एक पुरेपूर आव्हान देण्यासाठीची एक परीक्षाच जणू!
निदान झाल्या पासून ते त्याचा शेवट करेपर्यंत अनेक गोष्टी पार कराव्या लागतात. कधी कॅन्सर पेशन्टचा वॊर्ड जाऊन पहाच. जीवघेणे रेडिएशन्स, रक्ताच्या तपासण्या, किमोथेरपी आणि तेही सतत अंगातला त्राण किंवा प्राण जाईपर्यंत. मस्करी नाही हो.
मुळात इतकी ताकद आणण हे खायचं काम नाही.. त्यात सकारात्मकता कुठेच कमी पडायला नकोय.
आपल्याच अंगातल्या पेशी आपल्याशीच गद्दारी करून त्रास देऊ लागतात तेव्हा त्यांना आटोक्यात आणताना जे काही दिव्य करावं लागत त्याची कल्पना देखील करवणार नाही.
या सर्वात अंगात सळसळत असणारी उष्णता जगणं नकोस करत राहते पण जिद्दीने या सर्वांना सामोरे जाऊन धैर्याने या रोगाला तोंडघशी पाडून त्या मृत्यूशी पैज जिंकून फार कमी लोक बाहेर पडतात.

यातूनही बाहेर पडून अशी कामगिरी करून दाखवणारे अरोन्यतेश सारखे लोक खरे ‘चॅम्पियन्स’ आहेत.
पश्चिम बंगाल मधील सेरामपूर मध्ये राहणारा अरोन्यतेश गांगुली हा एक अतिशय कणखर व्यक्तिमत्व असलेला मुलगा एक जागतिक स्पर्धा जिंकून आलाय.
या कामगिरीने त्याने आपल्या शिरपेचात एक मनाचा तुरा तर खोवला आहेच पण सोबतच त्याने जगाला दाखवून दिले आहे कि ‘कॅन्सर’ ने कोणाचंही काहीही अडत नाही. ४ ते ७ जुलै मध्ये मॉस्कोत झालेल्या वर्ल्ड चिल्ड्रन विनर गेम्स २०१९ मध्ये अरोन्यतेशने हे यश संपादन केलं आहे.
काय आहेत वर्ल्ड चिल्ड्रन विनर गेम्स?
द विनर गेम्स म्हणून प्रचलित असलेली हि जागतिक स्पर्धा Podari Zhizn या रशियन फाउंडेशन ने २०१० पासून चालू केली आहे, या स्पर्धा विशेषतः कॅन्सर सोबत लढा देऊन जिंकलेल्या म्हणजेच त्या आजारातून वाचलेल्या लहान मुलांसाठी आयोजित केल्या आहेत.
२०१८ पासून त्या रशियाच्या बाहेरही आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत यावर्षी त्या मॉस्को मध्ये खेळल्या गेल्या.
या स्पर्धांमागचा खरा हेतू असा आहे की कॅन्सर या आजारात अडकल्यानंतर मुलांचा धीर खचून जातो, त्यातून वाचल्यावरही खूप वेळा त्यांचं पुनर्वसन करण्याची गरज असते.
या स्पर्धांमधून त्यांना त्यांचं आत्मविश्वास परत मिळवून देणे आणि त्यांचं मानसिक, शारीरिक पुनर्वसन करणे हा आहे. अनेक देशातून संघ तयार होऊन इथे भाग घेतात.

यावर्षी भारतातून १० मुलांचा गट स्पर्धेत उतरला होता यातील एक अरोन्यतेश गांगुली होता. याबद्दल अरोन्यतेशच्या आई कावेरी गांगुली म्हणतात,
“या स्पर्धांसाठी अरोन्यतेश इतका उत्साहात होता कि तो विसरूनच गेला होता त्याने गेल्या काही दिवसांत काय काय सहन केलं आहे.”
स्पर्धक या स्पर्धेत असलेल्या ६ वेगवेगळ्या खेळात भाग घेतात त्यात बुद्धिबळ, नेमबाजी, टेबलटेनिस, पोहणे, फ़ुटबाँल इत्यादी खेळांचा समावेश आहे.
कर्करोगाच्या उपचारासाठी अरोन्यतेश मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये दाखल झाला होता तिथे कॅन्सरग्रस्त मुलांच्या विभागात सामाजिक कार्यकर्त्या व स्वयंसेविका असलेल्या अमिता भाटिया म्हणतात.
“अरोन्यतेश गांगुली हा भारतातील १० मुलांपैकी एक आणि पश्चिम बंगालमधून आलेला एकमेव होता जो यावर्षी द विनर गेम्स २०१९ मध्ये सहभागी झाला. त्याची खिलाडूवृत्ती अगदी विस्मयकारक आहे, त्याने सर्व खेळांमध्ये भाग घेतला.”
एप्रिल, २०१६ मध्ये रक्ताच्या कर्करोगाचंनिदान होऊन अरोन्यतेश मुंबईत ११ महिन्यांच्या दीर्घ उपचारांसाठी मुंबईत दाखल झाला. अनेक किमोथेरपी आणि वेगवेगळ्या उपचारांनंतर शेवटी डॉक्टरांनी त्याला डिसेंबर, २०१८ मध्ये “कॅन्सर मुक्त” घोषित केलं.

पण कॅन्सर पुन्हा उपटू नये म्हणून त्याचे उपचार आणि तपासण्या नंतर देखील काहीदिवस चालूच होत्या.
त्याच्या दीर्घकालीन वास्तव्यामुळे खेळाबद्दल असलेल्या त्याच्या आकर्षणाबद्दल सर्व स्वयंसेवक आणि डॉक्टरांना समजलेच होते. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी त्याच्या या तपासणीच्या दरम्यान देखील अरोन्यतेश २ महिन्यांहून जास्ती दिवस अतिशय मन लावून तयारी करत होता,
“त्याचा दिवस पहाटे ५.३० वाजता सुरु होत असे, ६ ते ७.३० तो धावणे आणि फुटबॉल प्रॅक्टिस करत असे, त्यानंतर पोहण्याचा सर्व आणि नंतर बुद्धिबळ व टेबलटेनिस. संध्याकाळी तो नेमबाजीचा सर्व जाण्यासाठी जात असे” कावेरी सांगतात.
तो नेमबाजीचं प्रशिक्षण घेण्यासाठी रोज भद्रेश्वर पर्यंत प्रवास करून जात असे.
बुल्स आय नेमबाजी प्रशिक्षण केंद्राचेचे मुख्य प्रशिक्षक पंकज पोदार यांना अरोन्यतेश मध्ये एक चमक जाणवली जेव्हा त्याने प्रशिक्षणाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी लक्ष्य अगदी मध्यभागी भेदून दाखवला.. आणि त्याची रोज प्रगती होत गेली.

एक उल्लेखनीय नेमबाज असलेले पंकज पोदार म्हणतात की,
“अरोन्यतेश एक अतिशय प्रतिभासंपन्न मुलगा आहे, इतक्या कमी वयात असताना त्याची असलेली एकाग्रता आणि शांतपणा पाहून मला आश्चर्य वाटते, त्याला यापुढे प्रशिक्षण द्यायचा आमचा विचार आहे.”
पोदार यांनी अरोन्यतेशच्या प्रशिक्षणासाठी एक रुपयादेखील घेतला नसून ते त्याच्यासाठी कोणी प्रायोजक शोधत आहेत जेणेकरून त्याच्या मॉस्कोच्या स्पर्धेनंतर ते त्याला पुढील प्रशिक्षण देऊ शकतील.
फक्त पोदारच नाही तर स्वतःच्या जिद्द, मेहनत, ऊर्जा, निश्चय आणि कौशल्याने अरोन्यतेशने सर्व प्रशिक्षकांची मने जिंकली आहेत.
त्याला टेबलटेनिसची कला शिकवणारे सौमेन मुखर्जी, बुद्धिबळ शिकविणारे शरद वझे, पोहण्यास शिकविणारे कोईल नियोगी या सर्वांनाच अरोन्यतेशने स्वतःच्या चिकाटीने थक्क करून सोडले.
स्वतःला खितपत पडलेलं पाहून तर लवकरात लवकर धीर सोडतात लोक! आपल्याला तर नुसता ताप आला असेल तरी इथे उठून ४ पावलं चालवत नाही आणि हे पोरगं मॉस्कोत जाऊन मैदान मारून आलंय.
अरोन्यतेशच्या या यशस्वी कामगिरीतून एक सकारात्मक ऊर्जेचा झरा आपल्या दिशेने वाहत येतोय हे मात्र नक्की.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.