' “भारतीय संस्कृती” म्हणत आपल्या चुका किती झाकायच्या? : एका जर्मनीस्थित भारतीयाचं मनोगत – InMarathi

“भारतीय संस्कृती” म्हणत आपल्या चुका किती झाकायच्या? : एका जर्मनीस्थित भारतीयाचं मनोगत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक : तेजल राऊत 

===

मी भारतीय आहे आणि कायम भारतीयच राहणार, स्वतःच्या आणि इतरांच्या नजरेतदेखील. कर्मभूमी जर्मनी असली तरीही जन्मभूमी भारत आहे आणि मला भारताचा अभिमान आहे. झालं, हे असं लिहिलं की नंतर शिव्या घालायला मी मोकळे.

उपरोधिक वाटतंय का, मग तसंच आहे. भारत किंवा कोणताही देश म्हणजे काय? नद्या, दऱ्याखोरी, समुद्र, ऋतू, पीकं, तंत्रज्ञान, पैसा?

ही सगळी एखाद्या देशाची वैशिष्ठ्ये असली तरी माझ्या मते देश बनतो ते फक्त आणि फक्त त्यातल्या लोकांमुळे. बनतोही आणि बिघडतोही.

उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धात जर्मनीमुळे लोकांनी जे भोगलं आणि ज्यामुळे जर्मनीने जे भोगलं त्यासाठी तेव्हाचे जर्मन्स जबाबदार होते आणि त्यानंतर आज जर्मनी जी आहे (युरोपातली सर्वात मोठी आणि बळकट इकॉनॉमी आणि कॉमन माणसाला राहण्याकरिता अत्यंत सुखकर, शांत लाइफस्टाइल देणारा देश) तीदेखील जर्मन्समुळे. तसा भारत हा भारतीयांमुळे आहे.

 

germany inmarathi
Spiegel Online

बालीमधली जी घटना व्हायरल झालीये त्यामुळे भारतीयांबद्दल काय मत होतंय ते वेगळं सांगायला नको. सांगायला हे हवं की असं काही पहिल्यांदा झालेलं नाहीये, कदाचित पहिल्यांदा पकडलं जाऊन इतक्या मोठया प्रमाणात व्हायरल झालंय, एवढंच.

मी काही वर्षांपासून जर्मनीत राहते आणि पूर्वी माझा जॉब कन्सल्टिंग स्वरूपाचा असल्यामुळे पायाला सतत भिंगरी असायची. दर आठवड्याला जिथे प्रोजेक्ट तिथे ट्रॅव्हल त्यामुळे बरंच काही पाहिलं, बरीच माणसं पाहिली. मी स्वतः पाहिलेले भारतीयांचे काही किस्से:

१. ऑफिसमध्ये प्रोजेक्टवर काम करणाऱ्या लोकांसाठी क्लायंटने काही चॉकलेट्स, फळे ठेवलेली होती.

फार जास्त बुद्धिमत्ता लागत नाही हे समजायला की दिवसभर काम करणाऱ्या कलिग्सकरिता एक गुडविल म्हणून क्लायंटने ती फळं, चॉकलेट्स ठेवली आहेत ज्यातलं एखादं फळ, चॉकलेट आपण घेऊन तिथल्या तिथे म्हणजे ऑफिसात खावं.

डेप्युटेशनवर भारतातून आलेली एक मुलगी ते ऑफिसात असताना खायचीच, त्याउपर घरी जाताना रात्रीची सोय व्हावी म्हणून त्यातली काही फळं आपल्या बॅगमध्ये टाकून घ्यायची.

 

fruit_and_chocolate inmarathi
Baskets Because

डेप्युटेशनवर आलेली म्हणजे तिला रोजच्या खाण्यापिण्याचा allowance मिळत होता, तिला तरीही युरोज वाचवायचे होते ते ही ठीक, पण हे अशारितीने? एक आठवड्यानंतर जिथे ती फळं, चॉकलेट्स ठेवली होती तिथे एक प्रिंटेड नोट आढळली

“These items are for our colleagues who work in the project. Please refrain from carrying the stuff back home.🙂”.

त्या नोटेच्या शेवटी स्मायली होती पण ती नोट वाचून as a fellow indian मला मेल्याहून मेल्यासारखं व्हायचं.

२. हॉटेलमध्ये रिसेप्शन डेस्कवर मोस्टली एका परडीत काही फळं (मोस्टली सफरचंदं) ठेवलेली असतात. आल्या गेल्या गेस्टसाठी गुडविल म्हणून.

तिथेही एक कलीग रोज दोन-तीन सफरचंदं हातात घेऊन रूमवर जात असे. त्याला कोणी काही बोललं नाही पण रिसेप्शनिस्टच्या चेहऱ्यावरचे भाव सगळं सांगून जायचे.

३. क्लायंटने एकदा पार्टी दिली होती. इथल्या पार्टीत अल्कोहोलिक ड्रिंक्स फार कॉमन असतात. त्यामुळे बियर, वाईन्स, व्हिस्की, कॉकटेल्सची रेलचेल होती.

पार्टी रंगात आली होती आणि दोन कलिग्सनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यांना दारू चढली होती आणि आणखीन हवी होती. वेटरला अत्यंत रूडली “आणखीन वाईन हवीय” असं त्यांनी सांगितलं.

जर्मन प्रोजेक्ट मॅनेजरने वेटरला “नाही” म्हणून नजरेने खुणावलं. पार्टी आटोपती घेतली गेली. ह्या दोघांनी तिथून बियरच्या दोन बाटल्या उचलल्या आणि ट्रेन स्टेशनवर त्या फोडल्या.

क्लायंटकरीता ते ही भारतीय आणि मी ही भारतीय. शरमेने मान किती खाली गेली असेल ह्याचा फक्त अंदाज लावता येईल.

ह्याव्यतिरिक्त इथल्या कलिग्जना पहिल्या भेटीत पर्सनल प्रश्न विचारणे, आपल्याबद्दल न विचारलेली माहिती देणे, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकणे आणि त्यांनी सांगितल्यावर ते नापसंतीने डिलीट करून त्यांच्या मागे त्यांना शिव्या घालणे असे अनेक प्रकार आहेत.

हे सगळं मी स्वतः पाहिलेलं आहे. काही बाबतीत इथल्या लोकांचे स्वभाव, इथली सिस्टीम माहित नसल्यामुळे गोंधळ उडू शकतो हे मान्य. पण असं काही करण्यापूर्वी निदान कोणाला विचाराल तरी? पण नाही, भसकन करून टाकायचं आणि नंतर तोंड पाडून राहायचं.

या आधी मी जर्मनी आणि भारत ह्यांची तुलना करणारी एक पोस्ट लिहिली होती. आपण इथलं काय काय घेऊ शकतो ह्या आशयाची ती पोस्ट होती.

त्यावर काही जणांच्या “पण आपल्या कल्चरसारखं कल्चर नाही त्यांचं. ते ही लिहा की” अश्या अर्थाच्या कमेंट्स आल्या होत्या. काय आहे आपलं कल्चर ज्याचा आपला इतका अभिमान आहे?

मोका मिळताच गोष्टी लंपास करणे, फुकट दारू मिळतेय म्हणून पिणे हे आहे आपलं कल्चर?

माझा एक जर्मन कलीग भारतात ट्रीपला गेला होता. त्याचे तिथले अनुभव अगाध आहेत, मी त्याला सांगितलंय की आपण दोघं मिळून त्यावर एक पुस्तक लिहू, त्यामुळे जास्त खोलात जात नाही. पण तिथे त्याने वारंवार अनुभवलेलं एक म्हणजे त्याच्यासोबत फोटो काढून घेण्याचा लोकांचा अट्टाहास.

त्याने नाही म्हटल्यावरही झालेली जबरदस्ती आणि शेवटी त्याने थोडं घाबरून दिलेली संमती. कसं वाटलं असेल त्याला? अतिथी देवो भव आहे ना आपलं कल्चर?

 

europe inmarathi
Naukri Nama

Denial मध्ये राहून काही उपयोग नाही. म्हणतात की प्रवास केल्याने, वेगवेगळ्या देशांत फिरल्यामुळे माणूस प्रगल्भ होतो, त्याची क्षितिजे रुंदावतात. पण मनावर, बुद्धीवर झापडं लावली असल्यास कितीही आणि कुठेही फिरा, माणसाचा कूपमंडूकच राहणार.

चुकीच्या गोष्टी बदलायच्या असतील तर आधी त्या चुकीच्या आहेत हे स्वीकारायला हवं. आपण तेच करत नाही आणि “भारतीय संस्कृती”च्या पदराखाली प्रत्येक गोष्ट झाकण्याचा तोकडा प्रयत्न करतो.

जोपर्यंत चोरी पकडली जात नाही तोवर कोणी चोर आहे हे कळत नाही. त्यामुळे बाली मधलं जे “व्हायरल” झालं ते एका अर्थाने चांगलंच झालं.

निदान ह्यामुळे का होईना असं करण्याआधी कोणीतरी पुन्हा एकदा विचार करेल. हे कौतुकास्पद नाहीये पण ह्यामुळे असले प्रकार कमी होणार असतील तर हे ही नसे थोडके.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?