आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : चिन्मय भावे
===
मुंबईसकट संपूर्ण महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हवाच. मराठी शाळा, साहित्य, नाट्य, चित्रपट, व्यापार आणि रिटेल क्षेत्रात मराठीचा वापर, तंत्रशिक्षणात मराठी, लोकाभिमुख सरकारी व्यवहारात मराठीचा वापर या सगळ्याचा मी कट्टर समर्थक आहे.
त्या दृष्टीने मराठीच्या हक्काची आणि सन्मानाची चळवळ मजबूत व्हायलाच हवी. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आणि ती अनेक अधिकृत भाषांपैकी एक आहे आणि एकंदर हिंदी वर्चस्ववाद रोखला पाहिजे हेही माझं निश्चित मत आहे.
दुर्दैवाने समाजमाध्यमांवर मराठीबद्दल बोलणारे लोक आणि याबाबतीत चालवलेली काही पेजेस, त्यांनी निर्माण केलेली मीम्स पाहून मला प्रश्न पडला की फोकस मराठी संवर्धन आहे की हिंदीचा द्वेष?
दक्षिण भारतातील प्रामुख्याने कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये असलेल्या भाषिक चळवळीतील फुटीर आणि हिंदी द्वेषी सूर काही मराठी लोकही लावू लागले आहेत. दक्षिणेतले लोक आपली भाषा कशी जपतात, उत्तरेतील लोंढे त्यांनी कसे रोखले आहेत वगैरे रोमँटिक आणि वस्तुस्थितीपासून फारकत घेतलेलं चित्र या लोकांनी रंगवलेलं आहे.
याबाबतीत काही भ्रम दूर करणे गरजेचे आहे –
१) एक लक्षात घ्या की हिंदी द्वेष आणि उत्तर भारतीय लोकांचा रेशियल विरोध हा सत्तालोलुप द्राविडी राजकारणातील बाय प्रॉडक्ट आहे. त्याने कन्नडा आणि तमिळ या दोन्ही भाषांचे अजिबात संवर्धन झालेलं नाही.
तमिळ किंवा कन्नडा भाषांचे संवर्धन हा त्यांचा हेतू नसून हिंदी विरोधाची व्होटबँक एवढाच मुद्दा आहे. या द्वेषात भाषेपलीकडे माणसाचा रेशियल द्वेष आहे या विखारी वास्तवाला जागरूकपणे सामोरे जाण्याची गरज आहे.
२) त्यांनी द्विभाषा धोरण अंगीकारले वगैरे आपण ऐकत असतो. शहरी भाग सोडले तर तामिळनाडू आणि कर्नाटकात लोकांना इंग्लिश फारशी येत नाही..
त्यामुळे इंग्लिश ही लिंक लँग्वेज म्हणून वापरणे अशक्य असते आणि संवाद साधताना डम्ब शराडज खेळण्यावाचून पर्याय नसतो.
३) अभिजनांनी आणि उच्चभ्रु लोकांनी तमिळ-कन्नडा माध्यमांचे बळकटीकरण न करता इंग्लिश माध्यमाकडे आणि खासगी शाळांकडेच लक्ष दिले आहे.
या वर्गातील मुलांना अजिबात तामिळ-कन्नडा लिहिता वाचता येत नाही. बोलणंही यथातथाच असतं. भाषेची गळचेपी झालीच. फक्त हिंदीची जागा इंग्लिशने घेतली. महाराष्ट्रातही काही वेगळं चित्र आहे असं नाही.
४) दक्षिणेत लोकांचे लोंढे हिंदी द्वेष करून थांबले आहेत का? बेंगळुरू आणि चेन्नईत वर्षानुवर्षे राहूनही तामिळ-कन्नडा न येणारे आणि इंग्लिशवर मस्त राहणारे कित्येक लोक मला व्यक्तिशः माहिती आहेत.
५) मी बेंगळुरूत राहिलो आहे तेव्हा हेच दिसलं की तमिळ लोक तिथं जाऊन, अनेक दशके राहूनही तमिळमध्येच बोलतात.. .. तिथं माझ्या कार्यालयात तर स्थानिकांना डावलून बहुसंख्य तमिळ लोक भरलेले होते…
तेव्हा उगाचच कन्नड हवी, हिंदी नको वगैरे फॉरवर्ड फिरवणाऱ्या मराठी पोरांना हे ठाऊक नसतं की दुसऱ्याच्या प्रदेशात गेल्यावर हे लोक उत्तरेतील लोकांपेक्षा फारसं वेगळं वागत नाहीत.
६) आंध्र प्रदेश आणि केरळ या प्रदेशातील लोकांना हिंदीचे वावडे नाही. आपला व्यवसाय वाढावा म्हणून ते हिंदी वापरतात आणि स्वतःची भाषाही वापरतात… विजयवाडा ते विशाखापट्टणम आणि कन्नूर ते त्रिवेंद्रम मी हेच पाहिलं.
केरळला लागून असलेल्या तामिळनाडूतील कन्याकुमारीत सुद्धा हिंदी वापरात आहे. कारण पर्यटनातून मिळणारे उत्पन्न.
एक अतिरिक्त भाषा शिकलो म्हणजे आपल्या भाषेची किंमत कमी होत नाही. तुम्हाला स्वतःची भाषा शिकायची नसेल तर बाजारपेठ इंग्लिशला अनुकूल आहे म्हणून तुम्ही भाषिक आग्रह सोडून मातृभाषेकडे दुर्लक्ष करताच.
७) नोकरीची गरज माणसाला विविध ठिकाणी घेऊन जाते. मुंबई हे जागतिक नकाशावरील शहर आहे. अशा ठिकाणी migration रोखणे अशक्य आहे.
उत्तर भारतीय लोंढे आणि त्याने होणारे त्रास अगदी मान्य आहेत, पण हिंदी द्वेष करून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारला नोकऱ्या आणि शिक्षणाच्या बाबतीत काही ठाम निर्णय घ्यावे लागतील आणि अंमलातही आणावे लागतील.
८) मुंबईत आयआयटी पवईत आणि चेंबूरच्या अणुशक्ती नगर भागात दक्षिणी लॉबीचा मी बऱ्यापैकी अनुभव घेतला आहे. कोणीही मराठी शिकत नाही. आपापले घेट्टो निर्माण करतात. नोकऱ्या, कंत्राटे सगळ्या बाबतीत आपल्या लोकांना घुसवतात.
आपल्या समाजातील लोकांना प्राधान्य देणं हे मानवी स्वभावाचं अंग आहे. हिंदी विरोध करून हा प्रश्न सुटणार आहे या भ्रमात राहू नका. आपलेच मराठी सरकारी अधिकारी कागदपत्रे देताना काळजी घेत नाहीत, तपासणी करत नाहीत. तिथं आपण आग्रही असलं पाहिजे.
९) मासेमारी सारख्या उद्योगाचे दरवाजे स्थानिकांनीच उत्तर आणि दक्षिण भारतीय लोकांना उघडे करून दिले आहेत.
मुंबईत रिक्षा टॅक्सीचं काही वेगळं नाही. तिथं परवाना नसलेले लोक, स्थानिक नसलेले लोक भ्रष्टाचार करून घुसतात, टिकतात आणि हे मराठी भाषिक अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या संगनमताशिवाय अशक्य आहे.
हिंदी द्वेष करून भैय्याला रिक्षा बेकारदेशीरपणे चालवायला मिळणे बंद होणार नाही.
१०) सुबत्ता वाढली की माणूस श्रमाची कामे इतरांना देतो. चेन्नई, बंगळुरू, तिरुवनंतपुरम, कोळीकोड सगळीकडे रेस्तरॉं, दुकाने अशा ठिकाणी उत्तर भारतीय, नेपाळी, उत्तर पूर्व राज्यातील मुले मजूर म्हणून काम करत आहेत. हिंदी द्वेष करून लोंढे थांबत नाहीत.
हिंदी भाषा येत असेल तर केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि इतर अनेक व्यवसायात अनेक संधी तुम्हाला उपलब्ध होतात! माझे डिझाईन रिसर्च चे जवळपास ७०% काम उत्तर भारतातून येते.
माध्यमातही मराठी टक्का वाढू शकतो, मराठीचा आवाज बुलंद करू शकतो. स्थानिकांना प्राधान्य आणि मराठी संवर्धन याबद्दल आग्रही असलेच पाहिजे. फक्त हे करत असताना देशात अंतर्गत भाषिक, वांशिक द्वेषभावना वाढेल अशा विखारी अजेंड्याला बळी पडणं ठीक नाही.
११ कोटी मराठी लोकांचे राज्य आपल्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःची दृष्टी वापरून मराठी संवर्धन करू शकते, द्राविडी राजकारण्यांचे विष इथं भिनवू नका.
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.