आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
कुंभमेळा आपल्या देशातील जागतिक सांस्कृतिक वारसा असलेला उत्सव आहे. ह्या सोहळ्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.
खरं तर ह्या सोहळ्याचे कुणालाही औपचारिक आमंत्रण देण्यात येत नाही. तरीही देशविदेशातले भाविक आपण होऊनच मोठ्या प्रमाणावर ह्या उत्सवात सहभागी होतात.
कुंभमेळ्याचे एक मोठे वैशिष्टय असे की, ह्या सोहळ्यात विविध आखाड्यांचे साधू सहभागी होतात. हा कुंभमेळ्याचा अविभाज्य भाग आहे.
शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षण आहे आणि कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी विविध आखाडे आणि त्यात सहभागी असणारे साधू ह्यांना अग्रक्रम दिला जातो.
त्यांचे स्नान झाल्यावर इतर भाविक स्नान करतात अशी परंपरा आहे. कुंभमेळ्यात सहभागी होणारे विविध आखाडे हे शेकडो वर्षांपासूनचे पारंपरिक आखाडे आहेत.
२०१९ साली झालेल्या कुंभ मेळ्यात लक्ष्मी नारायण त्रिपाठी ह्या तृतीयपंथीयांच्या नेत्या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या तंबूमध्ये ह्यावेळी सतत भक्तांचा राबता होता. अनेक भाविक येऊन त्यांना नमस्कार करून जात होते.
मूळच्या ठाण्याच्या असलेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी ह्या तृतीयपंथी नेत्या बिग बॉस सिझन ५ मध्ये सहभागी झाल्या होत्या. तसेच त्यांनी अनेक रियॅलिटी शोज मध्ये सहभाग घेतला आहे.
त्या एक भरतनाट्यम नर्तिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तृतीयपंथीयांच्या समस्या जगापुढे आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे तसेच त्या तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी कार्य करीत आहेत.
प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ह्या कुंभमेळ्यात सहभागी होऊन पवित्र गंगा यमुना संगमात शाही स्नान करणारा त्यांचा किन्नर आखाडा हा पहिला तृतीयपंथीयांचा आखाडा होता.
साधारपणे ह्या सोहळ्यात जे हिंदू सहभागी होतात ते सगळे बहुतांश पुरुषांचे आखाडे असतात.
ह्यावेळी पहिल्यांदाच तृतीयपंथीयांनाही ह्या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. ह्याबद्दल बोलताना लक्ष्मी म्हणाल्या की, “पहिल्यांदा तृतीयपंथीयांना त्यांचे खरे स्थान मिळाले.”
ह्या सोहळ्यात सहभागी झालेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठींचे अनेकांनी कौतुक केले.
हिंदू धर्मात दैवी गणांमध्ये यक्ष, गंधर्व ह्यांच्याबरोबर स्वर्गात किन्नरांनाही मानाचे स्थान दिले आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र तृतीयपंथीयांना हेटाळणी आणि भेदभावाचीच वागणूक मिळाली आहे.
त्यांच्या समाजाला कायम उपेक्षित जिणेच नशिबी आले आहे. ह्याचे कारण म्हणजे १८७१ साली ब्रिटिशांनी तृतीयपंथीयांवर कायमचा “गुन्हेगार” असा ठपका ठेवला आणि त्यांच्याबरोबर अन्यायकारक वर्तणूक केली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्यांची परिस्थिती बदलली नाही. समाजाने त्यांना कधीच आपल्यात स्थान दिले नाही आणि कायम चांगल्या वाईटातून सुद्धा वगळले. त्यांना शिक्षण, नोकरी ,सण वार, समारंभ ह्या कशातही स्थान दिले नाही.
त्यांनी जन्माला येऊनच फार मोठा गुन्हा केला आहे अशीच वागणूक त्यांना मिळाली. त्यांना कायम वाळीतच टाकले गेले.
त्यामुळे त्यांच्याकडे भीक मागण्यावाचून पर्याय उरला नाही. समाजाचे रक्षक असलेल्या पोलिसांकडून सुद्धा त्यांना वाईटच वागणूक मिळत गेली.
ह्या समूहातील लोकांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर २०१४ साली सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना तिसरे लिंग म्हणून अधिकृत मान्यता दिली. ह्या समूहातील प्रसिद्ध कार्यकर्त्या म्हणून लक्ष्मी नारायण त्रिपाठी ह्यांचे नाव आहे.
“एका पडक्या मशिदीच्या” जागेवर मंदिर बांधण्याच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांना LGBT समूहातील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा महत्वाकांक्षेसाठी त्या राजकारणातील “उजव्या” विचारसरणीच्या पक्षाला पाठिंबा देत आहेत असाही आरोप त्यांच्यावर झाला.
तृतीयपंथीयांचे अस्तित्व जगात हजारो वर्षांपासून आहे. अगदी रामायण आणि महाभारतात सुद्धा किन्नर आणि तृतीयपंथीयांचा उल्लेख आला आहे.
रामायणात तर श्रीराम अयोध्या सोडून वनवासाला निघतात तेव्हा सगळे अयोध्यावासी श्रीरामांना निरोप देण्यासाठी गावाबाहेर आलेले असतात. तेव्हा श्रीराम त्यांना परत जाण्यास सांगतात.
श्रीराम १४ वर्षांनी परत अयोध्येत येतात तेव्हा त्यांना एक तृतीयपंथी व्यक्ती १४ वर्षांपासून त्याच जागेवर त्यांची वाट बघत असलेली दिसते.
तेव्हा त्या व्यक्तीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन “तुमचे आशीर्वाद नेहमी फळाला येतील, खरे होतील” असे वरदान किन्नरांना /तृतीयपंथीयांना श्रीरामांनी दिले. असा रामायणात किन्नर/ तृतीयपंथीयांचा उल्लेख आढळतो.
गेली शेकडो वर्षं तृतीयपंथीयांचे आयुष्य खडतरच होते. पण त्यांचा दरबारापासून तर जनानखान्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेण्यापर्यंत सगळीकडे सहभाग होता.
आज त्यांना कायद्याने तिसरे लिंग म्हणून मान्यता मिळाली असली तरीही रूढीवादी समाजाने त्यांना आजही स्वीकारले नाहीये ही सत्य परिस्थिती आहे.
त्यांना जगण्यासाठी देहव्यापार करणे, लग्नकार्यात आणि मुलांच्या जन्माच्या वेळी जाऊन “शकुन” मागणे ही कामे करावी लागतात.
हे शकुन मागणे म्हणजे आजकाल भीक मागणे समजले जाते. त्यांच्यावर असलेला राग म्हणा किंवा त्यांना स्वीकारले नसल्यामुळे त्यांच्यावर होणारे अत्याचार आजही थांबले नाहीत.
तसेच HIV चा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण ह्यांच्या समाजात खूप जास्त आहे.
१९७९ साली ठाण्यात जन्म झालेल्या लक्ष्मी त्रिपाठी ह्यांचे बालपण फार काही चांगले गेले नाही. त्यांच्या जवळच्याच नातलगांनी त्यांच्यावर अत्याचार केले.
शाळेत सुद्धा “बायल्या मुलगा” म्हणून कायम त्यांना चिडवले जात असे, त्यांना त्रास दिला जात असे. पण भरतनाट्यम शिकायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल झाला.
त्यांना लहानपणापासूनच वाईट वागणूक मिळाली असली तरी त्या म्हणतात की,
“मी वाईट आठवणींना मनात स्थान देत नाही. मी कायम चांगल्या आठवणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करून एखाद्या इंद्रधनुष्यासारखे रंगेबेरंगी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.”
२०१५ साली त्यांनी किन्नर आखाड्याची सुरुवात केली. आणि त्याबद्दल तृतीयपंथीयांमध्ये जाहिरात करण्यास सुरुवात केली. तृतीयपंथीयांनी त्यात सहभागी होऊन कुंभमेळ्यात पहिल्यावहिल्या शाही स्नानाचा लाभ घ्यावा असे त्यांनी तृतीयपंथीयांना आवाहन केले.
“धर्मातील आमचे गेलेले स्थान परत मिळवण्यासाठी हे सुरु करण्यात आले आहे असे त्या म्हणतात. “२०१५ पूर्वी मी फार धार्मिक नव्हते. पण त्यानंतर माझ्यात बदल झाला” असेही त्यांनी सांगितले.
कुंभमेळ्यात पारंपारिकपणे १३ आखाडे सहभागी होतात. सुरुवातीला किन्नरांचा १४वा आखाडा असण्यास प्रमुखांनी मान्यता दिली नव्हती.
पण लक्ष्मी त्रिपाठी ह्यांच्या प्रयत्नांनी आणि “जुना आखाडा” ह्यांच्या मदतीने किन्नर आखाड्याला मान्यता मिळाली आणि त्यांना शाही स्नानाचा लाभ घेता आला.
शाही स्नानाच्या दिवशी पहाटे चार वाजता उठून भगवी वस्त्रे परिधान करून लक्ष्मी त्रिपाठी व त्यांच्या शिष्यांनी पारंपरिक पद्धतींचे पालन करत पवित्र संगमात शाही स्नान केले. आता त्यांच्या आखाड्याला मान्यता मिळाली असल्याने पुढील सर्व कुंभ मेळ्यांत त्यांचा सहभाग असेलच.
लक्ष्मी म्हणतात की, “आम्ही ब्रह्मचारी नाही. आम्ही संत नाही, आम्ही किन्नर आहोत. आमच्यात इतरांपेक्षा वेगळे नियम असतात. आम्ही त्यांचे पालन करतो.”
आता समाजाने त्यांना अन्यायकारक वागणूक न देता एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून मोकळ्या मनाने स्वीकारले तर त्यांची आयुष्ये नक्कीच सुधारतील.
त्या दिवसासाठी लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्यांच्या समाजातील अनेक लोक अथक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळो हीच आशा ठेवूया.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.