या सोळा वर्षांच्या मुलाने असे यंत्र बनवलंय ज्याने अनेकांचे जीव वाचतील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
पावसाळा आला की दरवर्षी जमीन खचून दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अशा दुर्दैवी घटनेत अनेकदा जीवितहानी होते,
मोठे आर्थिक नुकसान होते. दरड कोसळणे ही खरं तर नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे असे अपघात कधी घडेल याचा नेमका अंदाज लावणे कठीण आहे.
मुंबईच्या पावसामुळे बऱ्याचवेळा जनजीवन विस्कळीत होते. मुंबईची लोकसंख्या आणि राहण्यासाठी घरांची संख्या यांची आकडेवारी बघितली की मुंबईत जागोजागी झोपडपट्ट्या का उभ्या राहिल्या आहेत याचे उत्तर आपोआपच सापडते.
चांगल्या हवेशीर आणि पक्क्या घरात, चांगल्या जागेत राहायला कुणाला आवडणार नाही?
पण प्रत्येकाला हे परवडेलच असे नाही. आणि हातावर पोट घेऊन जगणाऱ्या गोरगरीब जनतेला तर साधं एका खोलीचं घर सुद्धा परवडणे कठीण होते. मग अश्यावेळी झोपडपट्ट्या उभ्या राहतात.
अशा ठिकाणी राहणे म्हणजे नरकासमान राहणे असते हे तिथे गेल्यावर कुणालाही पटेल. साध्या मूलभूत सुविधा नसलेल्या या झोपडपट्ट्या पण अश्या जागेवर उभ्या राहतात ज्या प्रचंड गैरसोयीच्या तरी असतात किंवा धोकादायक ठिकाणी असतात.
त्या बांधायला कुणी तज्ज्ञ येत नाही, त्यामुळे ज्याला जसे जमेल तशी घरे बांधली जातात जी थोड्याश्याही धक्क्याने उध्वस्त होऊ शकतात.
सखल जागी असल्या तर पावसाळ्यात वस्तीत ,घरांमध्ये पाणी शिरणे तर या लोकांसाठी नेहमीचेच असते.
ही काही सिमेंट कॉंक्रिटची पक्की घरे नसतात. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात तर पाण्याच्या जोरदार प्रवाहात अख्खेच्या अख्खे घर एका रात्रीत वाहून जाऊ शकते. पावसाळ्यात या जागा राहण्यासाठी अत्यंत असुरक्षित असतात.
अवैध बांधकाम असल्याने या जनतेचा कुणी वालीही नसतो आणि सरकार सुद्धा अशा घरांच्या व त्या घरांत राहणाऱ्या लोकांच्या भानगडीत फार लक्ष घालत नाही.
तसेच जमीन खचली किंवा दरड कोसळली किंवा काही नैसर्गिक आपत्ती आली तर स्वतःचा बचाव कसा करायचा हे ही इथे राहणाऱ्या लोकांना माहित नसते.
त्यामुळे दुर्दैवाने कुठले संकट आले तर अश्या वस्तीत प्रचंड जीवितहानी व वित्तहानी होते.
मोठ्या मोठ्या माणसांना या सर्व परिस्थितीची जाणीव असते पण फार कुणी ह्या समस्येत लक्ष घालायला तयार होत नाही.
हीच परिस्थिती ओळखून धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमध्ये बाराव्या वर्गात शिकणाऱ्या रियान बखडा ह्या मुलाने भूस्खलन शोधयंत्र (लँडस्लाईड डिटेक्शन डिव्हाईस) तयार करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यादृष्टीने त्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.
ह्याखेरीज तो झोपडपट्ट्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबतीत जनजागृती करण्याचे महत्वाचे काम देखील करतो आहे.
सोळा वर्षीय रियानने त्याच्या ह्या यंत्राबाबत बोलताना द बेटर इंडियाला सांगितले की,
“ह्या झोपडपट्ट्या ज्या ठिकाणी उभ्या आहेत आणि ज्या प्रकारचे त्यांचे कच्चे बांधकाम असते त्यामुळे त्या पावसाळ्यात राहण्यासाठी अत्यंत असुरक्षित असतात.
त्यात राहणारी शेकडो-हजारो माणसे पावसाळ्यात असुरक्षित असतात आणि स्वतःचे रक्षण करण्यास अक्षम असतात.
ह्या झोपडपट्ट्या बहुतांशवेळी अवैध असतात त्यामुळे सरकार त्यांच्या प्रश्नांत फारसे लक्ष घालत नाही.
एनजीओ आणि लोकांकडून मिळणारी मदत पुरेशी नसते. कारण इथे राहणाऱ्या लोकांनाच संकटाच्या काळात स्वतःला कसे वाचवावे हे माहितीच नसते. पण मला हे सगळे बदलायचे आहे.”
रियानचे हे प्रयत्न आत्ताचे नाहीत. तो गेल्या पाच वर्षांपासून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने एका आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत भाग घेतला होता.
त्याबाबतीत अधिक माहिती देताना त्याने सांगितले की,
“आमच्या टीममध्ये आम्ही सहा विद्यार्थी होतो. आम्ही सगळे वेगवेगळ्या शाळांतील होतो. आणि आम्ही सगळे लेगो लीग रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत होतो. ही स्पर्धा स्पेन मध्ये झाली होती.
आम्ही एक स्ट्रॅटा नावाचा वर्किंग प्रोटोटाइप डिझाईन केला होता. हा प्रोटोटाइप असुरक्षित टेकडी किंवा डोंगरउतारावरील भूमिगत हालचाली (subterranean soil movements) शोधू शकतो आणि त्यामुळे भूस्खलन केव्हा होऊ शकेल ह्याचा अंदाज बांधता येऊ शकतो.
आम्हाला ह्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला. आणि त्यानंतर मी हे प्रोजेक्ट पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. मी त्या यंत्रात अधिक चांगले सुधारित तंत्रज्ञान वापरून ते अधिक चांगले बनवण्याचा निर्णय घेतला.
स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवल्यानंतर रियानने पुढील चार वर्षे ह्या यंत्रात अधिक सुधारणा आणण्यासाठी भरपूर अभ्यास केला तसेच ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सुद्धा मार्गदर्शन घेतले.
यंत्र तयार करताना त्याने अश्या लोकांचेही मत घेतले ज्यांनी ह्यापूर्वी भूस्खलन प्रत्यक्ष बघितले आहे किंवा त्याचा स्वतः अनुभव घेतला आहे.
त्याने मुंबईच्या डोंगराळ भागातील असलेल्या झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या लोकांचेही मत आणि अनुभव यांचा अभ्यास केला.
रियान पुढे म्हणतो की,
“यंत्राची ही सुधारित आवृत्ती तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणि ऑन ग्राउंड कार्यक्षमतेच्या बाबतीत अधिक सक्षम असणे आवश्यक होते. म्हणूनच एल अँड टी तसेच रेल्वेतील अधिकारी उदारणार्थ सिव्हिल इंजिनिअर्स, भूगर्भशास्त्रज्ञ, सॉईल एक्सपर्ट ह्यासारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक होते.
तसेच ज्या भागात भूस्खलनाचा धोका जास्त आहे तिथे वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक होते.ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर २०१९ पर्यंत हे यंत्र मी तयार करू शकलो.”
हे यंत्र काम कसे करते हे सांगताना त्याने सांगितले की,
“भूस्खलन होण्याआधी भूगर्भांत काही हालचाली होतात. पृष्ठभागापासून १ ते २ मीटर खाली ह्या हालचाली घडतात. गायरोस्कोपिक सेन्सर्स आणि गणित ह्यांचा वापर करून हे यंत्र भूगर्भातील हालचालींचा वेध घेते आणि वेळेत भूस्खलनाचा अंदाज वर्तवू शकते.
ह्यात अचूकता आणण्यासाठी तंत्रज्ञान भूस्खलनाच्या आधी घडणाऱ्या भूगर्भातील हालचालींचा पॅटर्न तपासते. तसेच मानवी हालचाली किंवा भूगर्भांतील पाण्याच्या स्रोतामुळे घडणाऱ्या हालचालींकडे दुर्लक्ष करण्यासाठी ह्या यंत्रात एक खास यंत्रणा आहे.”
स्ट्रॅटाची ही सुधारित आवृत्ती लहान आणि कमी खर्चात तयार होणारी आहे. रियानच्या मते ह्या यंत्राने चांगल्याप्रकारे काम करायला हवे असेल तर अशी अनेक यंत्रे विविध ठिकाणी बसवावी लागतील.
एका यंत्राची इन्स्टॉलेशनसकट किंमत फक्त पाच हजार रुपये इतकी आहे.
त्याने पुढे असेही सांगितले की, पुढील काही महिन्यात तो हे यंत्र इंटरनेटशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. असे केल्याने हे यंत्र लांबून सुद्धा वापरता येऊ शकेल.
अंधेरी येथील साकीनाकाच्या झोपडपट्टीत पहिल्यांदा हे यंत्र बसवण्यात येणार आहे.तसेच नंतर इतर काही ठिकाणी सुद्धा हे यंत्र बसवण्यात येईल.
“डोंगराळ भागातील रेल्वेलाईनच्या जवळ सुद्धा स्ट्रॅटा बसवता येऊ शकेल.
ह्याबाबतीत पी. के. शेष हे तज्ज्ञ अधिकारी मला मार्गदर्शन करीत आहेत. पण त्याआधी मी ह्या यंत्राचे पेटन्ट घेण्याचा प्रयत्न करीत आहे जेणे करून इन्स्टॉलेशनचे काम सुरु करता येऊ शकेल”, असे रियानने सांगितले.
तो पुढे असेही म्हणाला की,
“स्पर्धेमुळे तर मला ह्या यंत्राची प्रेरणा मिळालीच पण भूतकाळात काही भयानक अपघात घडले त्यामुळे मला हे यंत्र तयार करण्याची प्रेरणा मिळाली जेणेकरून भविष्यात असे घडले तर जीवितहानी टाळता यावी. सुरुवातीला मी डोंगराळ भागासाठी हे यंत्र तयार करत होतो. नंतर एक दिवस मी माझ्या घराच्या जवळ एका २२ वर्षीय तरुणाला विजेचा झटका बसताना स्वतःच्या डोळ्याने बघितले.
त्यानंतर मी एक तीन वर्षांचे बाळ गटारात पडतानाचा व्हिडीओ बघितला आणि तसेच मालाडच्या भिंत कोसळण्याच्या अपघाताबद्दल वाचले. ह्या सगळ्यांमुळे माझ्या लक्षात आले की आता फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. काहीतरी करून ही परिस्थिती बदलायला हवी आहे आणि ती बदलण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे”.
त्यानंतर त्याने “वर्षा” ला सुरुवात केली.
वर्षा ही एक मोहीम आहे ज्यात मुंबईच्या झोपडपट्टीतील लोकांना आपत्ती व्यवस्थापनाविषयी खास करून पूर आणि भूस्खलन किंवा दरड कोसळणे ह्याबद्दल माहिती दिली जाते.
ह्या मोहिमेअंतर्गत आजवर त्याने २०० पेक्षाही जास्त विद्यार्थी व जुहू, विक्रोळी आणि अंधेरी येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मदत केली आहे.
त्याने जुहू, विले पार्ले, भांडुप आणि विक्रोळी येथील झोपडपट्टीत असणाऱ्या शाळांमध्ये कार्यशाळा घेतल्या.
त्याने या वस्त्यांमध्ये डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, टायफॉईड,गॅस्ट्रोएंटरायटिस ह्या आजारांविषयी माहिती दिली तसेच हे आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी हे ही त्यांना सांगितले.
ह्या भागात सेप्टीसेमिया आणि लेप्टोस्पायरोसीस ह्या आजारांचा देखील प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण जास्त आहे.
रियानने विद्यार्थ्यांना ह्या आजारांच्या लक्षणांविषयी माहिती दिली आणि हे आजार होऊ नयेत म्हणून काय करायला हवे हे ही सांगितले.
तसेच रियानकडून रस्त्यांवर असलेल्या उघड्या विजेच्या तारांबद्दल सुद्धा त्यांना माहीती देण्यात येते. कार्यशाळा संपल्यावर मुलांना फर्स्ट एड किट्स देण्यात येतात. जेणे करून ही मुले ती किट घरी नेतील आणि त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांना ही माहिती देतील.
ह्या “वर्षा” मोहिमेत झोपडपट्टीत पोस्टर्स, पॅम्प्लेट्स वाटण्यात येतात. ह्यावर इंग्लिश, हिंदी आणि मराठीत इमर्जन्सी नंबर दिले असतात.
रियानने सुरु केलेल्या वर्षा मोहिमेत आजवर झोपडपट्ट्यांतील २००० लोकांना ही माहिती देण्यात आली आहे.
रोबोटिक्स इंजिनिअर होण्याचे ध्येय असणाऱ्या रियानचे असे मत आहे की मोठे होणे ह्याचा वयाशी काहीही संबंध नाही. तुम्ही जेव्हा जबाबदारी घेऊन काही करता, तेव्हा तुम्ही मोठे होता. तो म्हणतो की,
“आपल्यापैकी सगळ्यांकडे काही ना काहीतरी कौशल्य आहे. त्या कौशल्याचा उपयोग आपण इतरांसाठी केला तर अनेकांची आयुष्ये घडू शकतील. मला जे जमतेय ते मी करतोय. माझ्यासाठी तर आत्ता ही सुरुवात आहे. अजून मला बरेच काही करायचे आहे.”
रियान सारखे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहेत. जर बहुतांश विद्यार्थ्यांनी रियानप्रमाणेच ध्येय ठेवले तर देशाचे भविष्य उज्ज्वल असेल ह्यात शंका नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.