‘चंद्रयान २’ मिशन यशस्वी होण्यामागे या महिला शास्त्रज्ञांचे योगदान आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
अंतरिक्षात भारताने आज परत एक नवा इतिहास रचला आहे. ISRO म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ने सोमवारी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी यशस्वीपणे चंद्रयान २ लाँच केले आहे.
भारताने सलग दुसऱ्यांदा चंद्रावर यान पाठवले आहे आणि हे भारताचे सर्वात मोठे दुसरे मिशन आहे. आणि हे मिशन यशस्वी होण्यामागे ISRO च्या महिला रॉकेट सायंटिस्ट आहेत.
ISRO च्या रितू करीधल आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम इंजिनिअर मुथय्या वनिथा ह्या शास्त्रज्ञांनी ही अचाट कामगिरी करू दाखवली आहे. रितू करीधल ह्यांनी मंगलयान मिशनमध्ये सुद्धा महत्वपूर्ण योगदान दिले होते.
त्यांना “भारताची रॉकेट वुमन” असे म्हटले जाते. त्या व इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम इंजिनिअर मुथय्या वनिथा चंद्रयान २ मध्ये प्रोजेक्ट ओव्हरसाइट आणि लँडिंगची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहेत.
रितू करीधल ह्या मंगलयान मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन्स मॅनेजर होत्या आणि चंद्रयान २ मिशनच्या त्या मिशन डायरेक्टर आहेत तर मुथय्या वनिथा ह्या प्रोजेक्ट डायरेक्टरची जबाबदारी सांभाळणार आहेत.
रितू करीधल ह्यांनी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. तर मुथय्या वनिथा ह्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम इंजिनिअर आहेत.
ह्या दोघींचेही वैज्ञानिक कौशल्य वाखाणण्याजोगे आहे तसेच त्या स्पेस इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञ आहेत. म्हणूनच गेली दोन दशके ह्या खगोल शास्त्रज्ञ ISRO मध्ये काम करीत आहेत.
आजवर त्यांनी ISRO च्या अनेकी उपग्रहांच्या सब सिस्टीम डेव्हलपमेंट आणि लाँचमध्ये महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे.
ISRO चे चेअरमन के शिवन ह्यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की,”चंद्रयान २ हे भारतासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण मिशन आहे आणि हे मिशन भारतासाठी एक मोठी झेप ठरेल कारण इतिहासात पहिल्यांदाच असे मिशन संपूर्णपणे महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होते आहे.
ISRO मध्ये ह्यापूर्वी महिला शास्त्रज्ञांनी काही उपग्रहांच्या लाँचच्या वेळेला प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून जबाबदारी यशस्वीपणे हाताळली आहे.
ISRO चे माजी चेअरमन के राधाकृष्णन ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रोजेक्ट डायरेक्टरवर मिशन सुरु झाल्यापासून संपूर्ण सिस्टीम कॉन्फिगर करणे, सिस्टीमचे वारंवार पुनरावलोकन करणे, असेम्ब्ल करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे तसेच संपूर्ण प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी सांभाळणे अश्या जबाबदाऱ्या असतात.
त्यांनी पुढे हे ही सांगितले की जेव्हा यान अवकाशातील कक्षेत झेपावते तेव्हापासून मिशन डायरेक्टर सगळी जबाबदारी सांभाळतात.
त्यांच्यावर प्रारंभिक ऑपरेशन पासून ते कक्षा वाढवणे आणि गरज पडेल तेव्हा काही आकस्मिक कारवाई करणे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा मिशन डायरेक्टरवर असतात.
प्रोजेक्ट डायरेक्टर प्रोजेक्टला सुरुवात झाल्यापासून त्यात सहभागी असतात आणि मिशन डायरेक्टरचे काम यान कक्षेत पोहोचल्यानंतर सुरु होते.
एम अण्णादुराई ह्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की प्रोजेक्टच्या दृष्टीने बघायचे झाल्यास वनिथा ह्या पहिल्यांदाच इन चार्ज आहेत आणि हा अनुभव त्यांच्यासाठी खूप मोठा आहे.
त्यांच्या करियरच्या दृष्टीने हा त्यांच्यासाठी खूप मोठा आणि महत्वाचा क्षण आहे.
वनिथा ह्यांनी ह्यापूर्वी वेगळ्या डोमेन साठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्यांनी रिमोट सेन्सिंग उपग्रहांसाठी डेटा हँडलिंग सिस्टीम तयार केल्या होत्या.
अण्णादुराई ह्यांनी असेही म्हटले की एखाद्या मिशनचे नेतृत्व महिलांनी करणे हे ISRO साठी नवीन नाही.
ह्या आधी अनेक मिशन महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली पार पडले आहेत. फक्त इतके मोठे मिशन पहिल्यांदाच महिला शास्त्रज्ञ हाताळत आहेत.
एम अण्णादुराई हे चंद्रयान १ साठी प्रोजेक्ट डायरेक्टर होते. ते चंद्रयान २ मिशनमध्ये देखील सहभागी होणार होते पण नंतर त्यांनी ह्या प्रोजेक्ट मधून माघार घेतली.
मुथय्या वनिथा ह्यांना २००६ साली ऍस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञ म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
त्या Cartosat-1, Oceansat-2 आणि Megha-Tropiques ह्या रिमोट सेन्सिंग उपग्रहांच्या डेटा सिस्टिम्ससाठी डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. तसेच उपग्रह केंद्रातील डिजिटल सिस्टीम ग्रुपच्या टेलीकमांड डिव्हिजन आणि टेलीमेट्रीच्या त्या प्रमुख होत्या.
हे केंद्र आता युआर राव स्पेस सेंटर म्हणून ओळखले जाते. मुथय्या वनिथा ह्यांचा ५ नोव्हेम्बर २०१३ रोजी लाँच झालेल्या मंगलयान मिशनमध्ये सुद्धा महत्वपूर्ण सहभाग होता.
रितू करीधल ह्या लखनऊ शहरातील आहेत. त्यांना लहानपणापासूनच अवकाशाबद्दल जाणून घेण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची मनापासून इच्छा होती. त्यांना मंगल मिशनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
मंगळ मिशनसाठी त्यांच्यासह इतर शास्त्रज्ञांवर यानाच्या ऑपरेशन्सची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती.
ह्या प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदाच ऑन बोर्ड ऑटोमेशन करण्यात आले होते आणि रितू करीधल ह्यांनी ह्या सगळ्या ऑपरेशन्समध्ये साहाय्य केले होते.
हाच क्षण त्यांच्या करियरमधील निर्णायक क्षण ठरला. आणि आज त्यांचे कष्ट फळाला येऊन त्यां चंद्रयान २ मिशनची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्यावर वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला.
भारतासाठी आज अत्यंत अभिमानाचा क्षण आहे कारण हे मिशन खूप मोठे आणि महत्वपूर्ण होते. आज भारताने प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे आणि त्या मागे मुथय्या वनिथा आणि रितू करीधल ह्यांच्यासारख्या अनेक शास्त्रज्ञांची मेहनत आहे.
लखनऊच्या एका सामान्य घरातून आलेल्या रितू करीधल ह्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
ह्या दोन्ही शास्त्रज्ञांकडून प्रेरणा घेऊन पुढच्या पिढीतील मुली खगोल शास्त्रज्ञ होण्याचे ध्येय बाळगतील तसेच भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जातील अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.