आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
प्रतिकूल परिस्थितीतून कोणी अफाट यश मिळवलं की, त्याचं विशेष कौतुक केलं जातं. कारण सोई-सुविधा असताना यश मिळवणं फार सोपं असतं असं नाही पण निदान त्या मागापर्यंत जाण्याचे मार्ग तरी उपलब्ध असतात.
पण अडचणीतून वाटचाल करणार्याकडे जिद्द असावी लागते, एक ध्येय असावं लागतं आणि ज्याच्याकडे जिद्द आणि ध्येय आहे त्याला कोणताच मार्ग कठीण नाही, मग तो चंद्राचा का असेना, अहो खरंच!
आता हेच बघा ना, बंगालच्या एका सामान्य शेतकर्याचा मुलगा करतोय ‘चांद्रयान २’ या मोहिमेचं नेतृत्व. आहे ना असामान्य गोष्ट? पाहुया काय आहे त्याच्या यशाची गाथा. विशेष म्हणजे त्यांचे नावही चंद्रकांत आहे.
चंद्रकांत हे उपप्रकल्प संचालक आहेत, चांद्रयान- २ च्या आरएफ प्रणालीची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि युआर राव सॅटेलाईट सेंटर (यूआरएससी) च्या ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक’ विभागाचे ते प्रमुख आहेत.
हुगळीच्या शिबपूर गावातील शेतकरी मुधुसूदन कुमार यांच्या मुलाचे नाव त्यांनी ठेवले सूर्यकांत, परंतु शाळेच्या शिक्षकांनी त्यांना त्याचे नाव बदलून चंद्रकांत करा असे सांगितले.
जणू त्या शिक्षकांना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ म्हणीप्रमाणे त्या मुलांच्यात काही गुण दिसले असावेत किंवा तसे काही संकेत त्यांना मिळाले असतील असं म्हणायला हरकत नाही.
वडिलांबराबेर शेतात काम करीत असलेल्या चंद्रकांतनी ‘चांद्रयान – २’ मोहिमेतून लांबचा पल्ला गाठला आहे. बंगाली शेतकर्याचे पुत्र चंद्रकांत हे भारतातील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे महत्त्वाचे भाग आहेत.
दैवी योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, पण हाच मुलगा जणू ‘चंद्रकांत’ म्हणजे ‘चंद्राप्रमाणे कांती’ असा ज्याच्या नावाचा अर्थ होतो तेच चंद्रकांत भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेचे (इएसआरओ) एक वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
आता चांद्रयान-२ मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत, जे यान आज दुपारी प्रक्षेपित झाले.
‘चांद्रयान – २’ म्हणजे काय आहे ही मोहीम? चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट आहे.
या मोहिमेअंतर्गत चांद्रयान-२ चे आज म्हणजेच २२ जुलै २०१९ ला जीएसएलव्ही-एमके३-एम१ या शक्तिशाली रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मागच्या आठवड्यात म्हणजेच १५ जुलै २०१९ लाच ही मोहीम आखली गेली होती.
परंतु तांत्रिक अडचणींमुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इस्रोने चंद्रयानाचे उड्डाण तांत्रिक अडचणींमुळे केवळ ५६ मिनिटे आधी हे प्रक्षेपण रद्द केले.
चंद्रकांत यांचे वडील, मधुसूदन कुमार, त्यांच्या पत्नीसह आणि संपूर्ण गावासह थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी रविवारी रात्रभर जागे होते असे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत यांचे वडील कुमार म्हणतात, ‘‘मला त्याच्या कामाविषयी जास्त काही समजत नाही, पण वरिष्ठांना त्याच्या कामाबद्दल विश्वास असल्यामुळे त्याला इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.’’
न्यूज चॅनेलशी बोलताना कुमार म्हणजे त्यांचे वडील म्हणाले, ‘‘आम्हाला दु:ख आहे की, आम्ही पूर्ण रात्र जागरण केलं, पण प्रक्षेपण पाहायला मिळालं नाही, ते पुढे ढकललं गेलं, पण तरीही आम्हाला खात्री आहे की, मिशन नक्कीच यशस्वी होणार आहे.
आमचा मुलगा या संघाचा भाग आहे याचा अत्यंत अभिमान आणि आनंद आहे’’ ते म्हणाले की, ते शेतीच्या कामात नेहमीच व्यस्त असल्याने मुलांना शिकवण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही, पण चंद्रकांतला चांगले शिक्षक मिळाले त्यांनी त्याला तयार केलं. तो स्वत:ही खूप मेहनती होताच.’’
२००१ मध्ये चंद्रकांत इस्रोमध्ये सामील झाले. नंतर इतकी वर्ष कठोर परिश्रम आणि समर्पण दिलं. त्याचंच फळ म्हणून आता चंद्रकांत या प्रातिष्ठित ‘चांद्रयान – २’ प्रोजेक्टमध्ये प्रमुख वैज्ञानिक म्हणून पुढे सरकले.
मुलाच्या यशाने त्यांच्या वडिलांना अतिशय आनंद झाला आहे आणि मुलाचा अभिमानही वाटतो असं ते म्हणतात कारण त्यांनी सगळ्या अडचणींवर मात करून हे यश मिळवलं आहे.
चंद्रकांत यांना उपग्रह प्रणालीचा विभाग देण्यात आला, जो पृथ्वीवरील चंद्र, चंद्रमार्ग आणि मिशन नियंत्रणादरम्यान संप्रेषण दुवा सुनिश्चित करण्यास महत्त्वपूर्ण आहे.
चंद्रकांतचा भाऊ शशिकांत हाही भारतीय अंतरिक्ष संस्थेत शास्त्रज्ञच आहे. विशेष गंमत म्हणजे दोन्ही मुलांची नावं चंद्राशी साधर्म्य राखणारी आहेत.
१५ जुलैला समोर आलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. रॉकेट उत्तम स्थितीत आहे. मोहिमेआधीची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे,’ असे ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांनी चेन्नई येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोमवारी दुपारी म्हणजेच २२ जुलै, दुपारी २.४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे.
चांद्रयान – २ ची वैशिष्ट्ये
* भारताची ही दुसरी चांद्रमोहीम आहे.
* ‘इस्रो’च्या इतिहासातील सर्वाधिक गुंतागुंतीची आणि प्रतिष्ठेची मोहीम
* आजवर कोणत्याही देशाने अभ्यास न केलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणार.
* एकूण खर्च 978 कोटी
* उड्डाणानंतर सोळा मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश
* नंतर 48 दिवसांत 15 महत्त्वाच्या टेस्ट
* सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावरदाखल…!
‘चांद्रयान – २’ तर आता सुरू होणार आहेच याच्या आधीचं ‘चांद्रयान – १’ हे २२ ऑक्टोबर २००८ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजून २२ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले.
हे प्रक्षेपण इस्रोचे ४४.४ उंचीचे व चार टप्प्यांचे पी. एस. एल. व्ही. प्रक्षेपक वापरून करण्यात आले. नोव्हेंबर 8, 2008 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या कक्षेत सोडण्याचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा टप्पा पूर्ण करण्यात आला.
या यशस्वी टप्प्यानंतर भारत जगातील पाचवा देश बनला ज्यांनी चंद्राच्या कक्षेत यान सोडले आहे.
या आधी केवळ अमेरिका, पूर्वीचा सोवियत संघ, चीन व जपान या देशांनी व युरोपियन स्पेस एजंसीने आपल्या यानांना यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत सोडले आहे.
पहिली मोहीम यशस्वी झाली, तशीच दुसरी मोहीम यशस्वी होणारच. दुसर्या मोहिमेचे प्रमुखांचे नावाचा अर्थ चंद्राशी संबंधित आहेच. कांत म्हणजे मराठीत तेज, तकाकी, सौंदर्य, तेजस्वी. म्हणजे चंद्रकांत याचा अर्थ असा होईल की, च्रंदाचे तेज, तकाकी ज्याच्या चेहर्यावर आहे तो चंद्रकांत.
तर आपले या ‘चांद्रयान-२’ प्रमुख चंद्रकांत सर्व अडचणींवर मात करून, परिस्थितीशी संघर्ष करून चंद्राचेच तेज घेऊन त्याला सामोरे जात आहेत त्यामुळे त्यांना यश नक्कीच मिळेल यात शंकाच नाही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.