आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
हल्ली जग असं झालंय की माणसाला माणसाशी संवाद साधायला वेळ नसतो, त्यांना तशी किंवा इच्छाच नसते. जगातील सर्वात धोकादायक प्राणी कुठला असेल तर तो मनुष्य हा आहे. ह्या मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी सतत निसर्गाला, पर्यावरणाला गृहीत धरलेले आहे.
“ह्यूमन्स डोन्ट डिझर्व्ह धिस प्लॅनेट” हा व्हिडीओ तर बहुसंख्य लोकांनी फेसबुक, इंस्टाग्रामवर बघितला असेलच. आपल्या स्वार्थासाठी आपण झाडे, पाणी, हवा, आकाश, पक्षी, प्राणी अगदी सूक्ष्मजीवांना सुद्धा युझ अँड थ्रो करतो.
लेदर हवंय का? करा शिकार! प्राण्याचं कातडं आवडलं का? करा शिकार! गेली हजारो वर्षे आपण पृथ्वीवरील एकूण एक गोष्ट अब्युज करत आलो आहोत. होय! आपल्या वागण्यासाठी Abuse हा एकच शब्द अगदी चपखल बसतो.
आपल्याच स्वार्थीपणामुळे पृथ्वीवर वास्तव्य केलेले, त्यांच्याही पृथ्वीवर आपल्याच इतका हक्क असलेले अनेक प्राणी आपण नामशेष करून टाकले आहेत.
जगातला सध्याचा एक्सटिन्क्शन रेट बघितला तर आपण किती क्रूर आहोत ह्याची खात्रीच पटेल. दर वर्षी शेकडो प्रजाती नामशेष होत आहेत. हा जो रेट आहे तो नैसर्गिक रेट पेक्षा हजार पटींनी जास्त आहे.
असेच सुरु राहिले तर येत्या काही वर्षात हा रेट दहा हजार पटींनी जास्त होईल आणि जे प्राणी आपल्या आजूबाजूला आपण आत्ता बघत आहोत त्यातील अनेक प्रजाती आपल्या पुढच्या पिढीला फक्त गुगल सर्च मध्ये दिसतील.
हेच लक्षात घेऊन काही माणसे जीवाचे रान करून पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न करीत आहेत. पर्यावरणाचे आणि प्राण्यांचे व पक्ष्यांचे रक्षण व त्या बाबतीत जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ह्या कार्यासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देणारी अनेक माणसे आहेत. त्यापैकीच एक आहेत आनंद शिंदे!
आनंद शिंदे ह्यांना जग “द एलिफन्ट व्हिस्परर” म्हणून ओळखतं. वृत्तपत्र छायाचित्रकार ते चक्क हत्तींशी संवाद साधणारा एक अचाट माणूस म्हणजे आनंद शिंदे! आनंद शिंदेंचं हत्तींवरच प्रेम बघून हत्तींवर प्रेम करणाऱ्या “चल चल मेरे साथी” म्हणणाऱ्या राजेश खन्नांच्या हाथी मेरे साथी हा चित्रपट आठवतो.
तो चित्रपट होता पण आनंद शिंदे हे खरे खुरे गजमित्र आहेत असे म्हणायला हरकत नाही.
छायाचित्रणाची अतिशय आवड असणारे आनंद शिंदे हे छायाचित्रकार-पत्रकार म्हणून काम करत होते आनंद शिंदे हे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करत असताना कामासाठी त्यांचे जवळजवळ संपूर्ण भारतभ्रमण होत असे. त्यांची छायाचित्रे कायम वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असत.
त्यांच्या अनेक छायाचित्रांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. पण ह्यात मध्येच हत्तींशी संवाद साधणे कसे सुरु झाले हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो.
त्यांच्या कामाच्या निमित्ताने त्यांना एकदा केरळला जावे लागले. केरळात असताना त्यांनी कलरीपयट्टू आणि कथकलीवर फिचर स्टोरी करण्याचे ठरवले. ही स्टोरी करत असताना त्यांची हत्तीशी गाठ पडली. तेव्हापासून आनंद हे हत्तींचे मित्र बनले. हत्तींनी त्यांचं पूर्ण जगच व्यापून टाकलं.
खरं तर आनंद ह्यांना लहानपणापासूनच प्राण्यांविषयी आकर्षण होते. आपल्याही घरात आपला एखादा प्राणीमित्र असावा अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांच्या घरी एकही प्राणी नव्हता.
एकदा त्यांनी त्यांच्या वडिलांना कुत्रा पाळायचा का असे विचारले तेव्हा “कुत्रा पाळणे सोपे नाही. त्यासाठी खूप खर्च होतो.” असे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले. त्यामुळे “एकतर तुझे शिक्षण होईल किंवा कुत्रा येईल” दोन्हीही होणे शक्य नाही असे वडिलांनी सांगितले. वडिलांचे हे उत्तर ऐकल्यावर त्यांनी घरात प्राणी पाळण्याविषयी एकदाही विषय काढला नाही.
तर फोटो फिचर करण्यासाठी आनंद जेव्हा केरळला गेले तेव्हा त्यांनी तिथला “त्रिचूर” हा प्रसिद्ध फेस्टिव्हल त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला.
त्यांना तेव्हा मल्याळी भाषा येत नव्हती. त्या फेस्टिव्हलमध्ये आनंद ह्यांनी पहिल्यांदाच हत्तींचे फोटो काढले. आनंद त्या फेस्टिव्हलमध्ये एकामागे एक असे शिस्तीत रांगेत उभे असलेले हत्ती बघतच राहिले.
हत्ती हा ताकदवान प्राणी असतो पण त्याचे हृदय किती मऊ असते ह्याचा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा आनंद ह्यांनी घेतला. एका हत्तीचा माहूत त्या हत्तीच्या पायाला सारखं टोचून त्याला पुढे पुढे जाण्यास भाग पाडत होता.
सारखे सारखे टोचल्यामुळे बिचाऱ्या हत्तीच्या पायाला जखमा झाल्या होत्या. पण बिचारं मुकं जनावर ते! स्वतःला झालेलं दुःख तोंडाने बोलून सांगू शकत नाही म्हणून ते इतरांनाही कळू नये? तरीही हत्ती बिचारा माहूतावर चिडला नाही.
ह्याउलट जेव्हा माहुताला तीव्र उन्हाचे चटके बसू लागले, तेव्हा त्याच हत्तीने त्याच्या पाय जखमी करणाऱ्या माहुताला स्वतःच्या चार पायांमध्ये असलेल्या जागेत चक्क बसायला जागा दिली.
म्हणजे हत्ती किती हुशार असतो शिवाय त्याला भावना असतात आणि त्या कळतात तसेच हत्तीचे हृदय एखाद्या निरागस बाळाप्रमाणे मऊ असते आणि त्याच्या आकाराकडे आणि ताकदीकडे बघून त्याला घाबरण्याची गरज नाही हे आनंद ह्यांना कळले.
हत्ती ह्या प्राण्याने आनंद ह्यांना झपाटून टाकले होते. हत्तीच्या आयुष्याबद्दल त्यांना अनेक नवननवीन गोष्टी कळत गेल्या.
वय वाढलं की माणूस जसा पोक्त होतो तसा म्हातारा हत्ती सुद्धा तरुण हत्तीपेक्षा पोक्त होत जातो ते माणसांसारखी एकमेकांशी थट्टामस्करी करतात. त्यांच्या मनुष्य मित्रांची देखील ते गंमत करतात.
मस्करी करतानाचा हत्तीचा आवाज वेगळा असतो. कुठलीही प्रतिक्रिया द्यायची असेल तर नर हत्ती त्यांचा पाय आपटून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करतात. बायकांप्रमाणेच नर हत्ती पेक्षा मादी हत्ती जास्त गप्पिष्ट असतात, त्या अखंड बोलत असतात ह्या गोष्टी ह्यांना हत्तीचा अभ्यास करताना लक्षात आल्या.
हत्तींबरोबर वेळ घालवला तर ते माणसांना लळा लावतात. एकदा ओळख झाली की हत्ती माणसाचे स्वागतच करतो.हत्तींच्या आकाराप्रमाणे त्यांचं मन सुद्धा खूप मोठं असतं.
ते सहसा रागावत नाहीत. आपण बोललेले जेव्हा हत्ती गंभीरपणे ऐकत असतो,तेव्हा त्याचे कां त्याच्या शरीराला चिकटतात. जसे माणसाच्या बाळांना त्यांच्या आईपासून वेगळे राहणे कठीण जाते तसेच हत्तीच्या पिल्लांना सुद्धा त्यांच्या आईपासून वेगळे राहणे खूप जड जाते.
आपल्या आईपासून दुर्दैवाने वेगळे झालेल्या पिल्लांना कसे सांभाळायचे ह्याचा अभ्यास आनंद ह्यांनी केला.
त्रिवेंद्रम प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉक्टर जेकब अलेक्झांडर ह्यांनी आनंद ह्यांना हत्तींबाबत साहाय्य केले. त्यांना कुठली पुस्तके वाचायची हे सांगितले, आणि मार्गदर्शन केले.
श्रिया पाटील ह्या आनंदच्या पत्नी आहेत. आनंदनी जेव्हा श्रिया ह्यांना सांगितले की ते हत्तीशी बोलतात, तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही. पण हळूहळू त्यांनाही अनुभव येत गेले आणि त्यांचा विश्वास बसला. त्यांना कळले की आता हेच आनंद ह्यांचे ध्येय आहे. त्यामुळे त्यांनी आनंद ह्यांना आश्वस्त केले की,
“तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. संसाराची आर्थिक बाजू मी सांभाळेन.”
एक हत्तीचे पिल्लू होते, त्याचे नाव कृष्णा होते. आणि त्याचा पाय मोडला होता. हे बघून आनंद ह्यांना खूप दुःख होत होते. कृष्णाला त्याच्या आईची खूप आठवण येत होती, कुठल्याही बाळाप्रमाणे तो ही त्याच्या आईशिवाय राहू शकत नव्हता. आणि त्याच्या भावना पोहोचवण्यासाठी तो एका विशिष्ट पद्धतीने आवाज काढत होता.
जसे आपण एकमेकांशी बोलतो, विविध स्वराघात आणि व्यंजने वापरून आपण भाषा तयार केली. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचे आवाज काढून प्राणी आणि पक्षी देखील एकमेकांशी संवाद साधतात.
हत्ती ज्या भाषेत एकमेकांशी बोलतात त्या भाषेला ऱ्हमलिंग असे म्हणतात. एक हत्ती दुसऱ्या हत्तीशी सात किलोमीटर अंतरापर्यंत संवाद साधू शकतो. ही माहिती ऐकून आनंद अगदी चकित झाले. आणि त्यांनी सुद्धा हत्तींशी संवाद साधण्यासाठी त्याच प्रकारे आवाज काढण्याचा सराव केला.
हळूहळू सरावाने त्यांना हे जमू लागले. हत्तीच्या पोटातून जसा आवाज येतो तो आवाज घशातून काढण्यास आनंद ह्यांना जमले. आनंद ह्यांनी कृष्णाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आणि कृष्णाने सुद्धा कान हलवून आनंदना भेटण्याचा आनंद व्यक्त केला.
कृष्णा आणि आनंद ह्यांच्यात मैत्री झाली. कृष्णाचा एक ‘हम्बलिंग साऊंड’ समजून घेण्यास, शिकण्यास आनंदना दीड महिन्याचा कालावधी लागला. कृष्णाच्या पिंजऱ्याजवळ बसून सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असत.
हत्तीच्या पिल्लाशी बोलण्याचा इतका आटोकाट प्रयत्न करणारे आनंद तिथल्या लोकांना वेडे वाटायचे. एक दिवस काही कारणाने आनंद ह्यांना मुंबईला यावे लागले तेव्हा त्यांनी हे त्यांच्या भाषेत कृष्णाला सांगितले.
तेव्हा कुणास ठाऊक का पण कृष्णा आनंदना सोडायलाच तयार नव्हता.आणि त्याच्या भाषेत काहीतरी सांगायचा प्रयत्न करू लागला. पण आनंदना कृष्णाला काय सांगायचे आहे हे कळत नव्हते.
आनंद मुंबईला आल्यानंतर दोनच दिवसांत कृष्णाचा मृत्यू झाला. त्याला कदाचित त्याच्या मृत्यूची जाणीव झाली असावी म्हणूनच कदाचित तो आनंदना जाऊ देत नव्हता.
ट्रंक कॉल-द वाईल्डलाईफ फाउंडेशन ही संस्था हत्तींची कमी होणारी संख्या, त्यांचे जतन, त्यांचे संरक्षण, त्यांचे नैराश्य, आणि हत्तींशी संवाद साधणे ह्यासाठी कार्य करते. ही संस्था २०१४ साली विनय सहस्रबुद्धे ह्यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.
आईपासून लांब झालेल्या हत्तीच्या पिल्लांना जगवणं आणि तणावात असलेल्या हत्तींना नॉर्मल करणं हा ह्या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. तसेच हत्तींशी कसं वागायचं ह्याचं माहुतांना ट्रेनिंग दिलं जातं.
ही संस्था केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गोवा येथे काम करीत आहे. आणि पुढे इतर राज्यात सुद्धा काम करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
ही संस्था २०१४ साली सुरु झाली असली तरी आनंद ह्यांचा अभ्यास मात्र २०१२ सालापासूनच सुरु झाला होता. आनंद ह्यांनी हत्तींसाठीचे अनेक खेळ तयार केले आहेत. हत्तींबरोबर काम करताना आनंद ह्यांना अनेक विलक्षण अनुभव आले.
लॉरेन्स अँथनी हे एक हत्तीतज्ज्ञ होते. ते जगातील पहिले एलिफन्ट व्हिस्परर होते. त्यांनी अनेक हत्तींचा जीव वाचवला. आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना लळा लावला.
जेव्हा अँथनी गेले तेव्हा त्यांचे हत्ती मित्र कित्येक मैल चालून आले आणि त्यांच्या घरापुढे येऊन उभे राहिले होते.
जेव्हा त्यांच्या पत्नीने हत्तींच्या सोंडेला हात लावून त्यांना परत जायला सांगितलं तेव्हाच ते परत गेले. अँथनी ह्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी परत ते सगळे हत्ती अँथनी ह्यांच्या घरी परत आले होते.
ह्या घटनेबद्दल बीबीसीने मोठी बातमी केली होती. आता ते गेल्यानंतर आता आनंद हत्तींशी संवाद साधत आहेत हे ऐकून अँथनी ह्यांच्या आफ्रिकेत राहणाऱ्या पत्नीला खूप समाधान वाटले.
आनंद सांगतात की ,”हत्तींना काय म्हणायचे आहे ते त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा दिसतं. हत्तींनी मला माणुसकी शिकवली.”
आनंद शिंदे ह्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा असेल तर Snovel Podcast हे ऍप डाउनलोड करा आणि त्यावर असलेल्या “गोष्ट गजानंदाची” ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही त्यांच्याच आवाजात त्यांच्या ह्या कार्याची माहिती तीन भागात ऐकू शकता. (ऍप ची लिंक)
आनंद शिंदे ह्यांचे हे कार्य अत्यंत वंदनीय आहे. “भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे” ही शिकवण ते खऱ्या आयुष्यात जगत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.