आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आपल्याकडे बायका चाळीशीत पोचल्या की त्यांना आता आपले वय झाले असे वाटते. समाज सुद्धा चाळीशी पार केलेल्या बायकांना पदोपदी “आता तुमचे दिवस गेले” अशी जाणीव करून द्यायला चुकत नाही.
चाळीशी पार केली, की बायकांना तब्येतीचे त्रास सतावू लागतात. अंगातली शारीरिक ताकद कमी झालेली असते शिवाय शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे , मेनोपॉजच्या प्रोसेसला सुरुवात झाल्यामुळे मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो.
चाळिशीतल्या स्त्रियांना नैराश्य येण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. ह्याला अनेक कारणे आहेत. साधारणपणे चाळिशीतल्या स्त्रियांची मुले मोठी झालेली असतात. कळती झालेली असतात.
इतके दिवस आई, आई करत मागे मागे फिरणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीत आईवर अवलंबून असणाऱ्या मुलांचे जग आता बदललेले असते. मुले किशोरवयीन झालेली असतात.
त्यामुळे त्यांना बाहेरचे जग जास्त खुणावत असते आणि सतत मागे मागे करण्याची सवय झालेल्या आईची त्यांनाच कटकट वाटू लागलेली असते. साधारण फरकाने असेच चित्र घरात दिसते.
नवरा आपल्या व्यापात, मुले त्यांच्या मित्रमंडळीत रममाण, अश्या वेळी जर बाई गृहिणी असेल आणि तिला स्वतःची काही व्यवधानं नसतील तर तिला सर्वबाजूंनी एकटे पडल्यासारखे वाटते. त्यात शारीरिक ताकद कमी झाल्याने आधीसारखे काम करताना थकवा येऊ लागतो.
अश्या वेळी नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते. पण हीच ती वेळ असते जेव्हा स्त्रिया सर्व व्यापातून मोकळ्या होऊन स्वतःसाठी काहीतरी छान वेगळे करू शकतात. छन्द जोपासू शकतात.
ज्या स्त्रिया स्वतःला असा वेळ देतात ,त्यांचे व्यक्तिमत्व चारचौघीत वेगळे उठून दिसते. त्यामुळे चाळीशी आली, आता काय करायचे, आता तारुण्य संपले, आता मी काहीच करू शकत नाही असा विचार करणाऱ्या स्त्रियांपुढे ह्या सुपरमॉमने एक आदर्श निर्माण केला आहे.
भावना टोकेकर ही एक ४७ वर्षीय स्त्री. तिने ओपन एशियन चॅम्पियनशिपमध्ये पावरलिफ्टिंगमध्ये, चक्क ४ सुवर्णपदकांची कमाई केली. यामुळे आपल्या देशाची मान कायमची उंचावली आहे.
भावना टोकेकर ह्या दोन किशोरवयीन मुलांच्या माता आहेत हे विशेष! सहा वर्षांपूर्वी वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी वेट ट्रेनिंगची सुरुवात केली आणि त्यांनी सर्वच महिलांना प्रेरणा देणारे कार्य करून दाखवले.
त्वचेच्या आजारसाठी भावना ह्यांना काही औषधे घ्यावी लागली. त्यामुळे त्यांच्या शरीरावर साईड इफेक्टस झाले. ते कमी करण्यासाठी त्यांनी जिम मध्ये जाऊन व्यायाम करण्यास सुरुवात केली.
सहा वर्षानंतर वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी त्यांनी AWPC/ WPC च्या ओपन एशियन पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतला आणि देशासाठी ४ सुवर्णपदकांची कमाई केली. ही स्पर्धा चेल्याबिन्स्क, रशिया येथे जुलै २०१९ मध्ये पार पडली.
भावना टोकेकरांचे पती ग्रुप कॅप्टन एस टोकेकर हे भारतीय वायुसेनेत फायटर पायलट आहेत. भावना ह्यांना वायुसेनेतील बॉडीबिल्डिंग टीममधील लोकांनी पावरलिफ्टिंग बद्दल माहिती दिली आणि तेव्हापासून त्यांनी वेट ट्रेनिंगला सुरुवात केली.
हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भावना म्हणाल्या की ,”पावरलिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंगविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत.
लोकांना वाटते की ज्या खेळांमध्ये शारीरिक शक्तीचा कस लागतो ते खेळ स्त्रियांसाठी कठीण आहेत. तसेच फक्त तरुण वयातील स्त्रियाच ह्या खेळात भाग घेण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात.
अश्या प्रकारच्या खेळांमुळे शरीर बल्की बनते असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. मी एक्केचाळिसाव्या वर्षी ट्रेनिंग सुरु केले. पण मला चुकीच्या पद्धतींनी वेट ट्रेनिंग करून स्वतःला दुखापत करून घेण्याची इच्छा नव्हती.
आपल्याकडे बायकांनी इतक्या उशिरा वेट ट्रेनिंग घेणे फारच दुर्मिळ आहे.”
पूर्णवेळ गृहिणी असलेल्या भावना ह्यांनी वेट लिफ्टिंग विषयी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या व्हिडीओजमधून, विविध वेबसाईट्स वरून माहिती मिळवण्यास सुरुवात केली.
त्याच बरोबर त्यांनी भारतीय वायुसेनेच्या बॉडीबिल्डिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली व इंटरनेटवरून भरपूर माहिती मिळवून वेट ट्रेनिंग सुरु ठेवले. त्या म्हणतात की ,”अश्या कुठल्या स्पर्धेत भाग घेणे म्हणजे माझ्यासाठी फारच कठीण आणि वेगळी गोष्ट होती.
मी ह्या वयात स्पर्धेत घेऊ शकेन की नाही, किंवा त्यांच्या स्टँडर्ड्सप्रमाणे मी असेन की नाही ह्याची मला काहीच माहिती नव्हती. पुण्यात वास्तव्य करणाऱ्या भावना ह्यांनी रशिया येथे झालेल्या ह्या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेऊन त्यात चक्क चार सुवर्णपदके मिळवली. त्यांना ह्या स्पर्धेबद्दल इंस्टाग्रामवरून माहिती झाली.
भावना ह्यांनी वर्ल्ड पावरलिफ्टिंग काँग्रेसचे कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचे मुख्य असलेल्या मोहम्मद अझमत ह्यांची भेट घेतली. मोहम्मद अझमत ह्यांच्या वेटलिफ्टिंगचे व्हिडीओ बघून भावना ह्यांना प्रेरणा मिळाली.
त्या सांगतात की , “मला आठवतंय की मी त्यांना १० फेब्रुवारी रोजी मेसेज करून विचारले होते की मी भारतीय संघात समाविष्ट होऊन ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकते का? पावरलिफ्टिंग हे वेटलिफ्टिंग पेक्षा बरेच वेगळे असते.
तेव्हा अझमत सरांनी मला लगेच उत्तर दिले व सांगितले की मी तिथे जाऊन ट्रायल द्यावी, तेव्हा मला अतिशय आनंद झाला.”
मे महिन्यात बंगळुरू येथे झालेल्या ट्रायलमध्ये भावनांनी भाग घेतला आणि त्यांची मास्टर्स२ ह्या गटात निवड झाली. हा गट ४० ते ४५ ह्या वयासाठी असतो.
भावना ह्यांची स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवड झाल्यानंतर त्यांना पावरलिफ्टींगसाठी त्यांच्या टेक्निकमध्ये काही बदल करण्यास सांगण्यात आले तसेच स्पर्धेच्या नियमांची माहिती देण्यात आली.
त्यांनी कसून सराव केला होता. आणि स्पर्धेत असामान्य यश मिळवले. त्यांच्या ह्या प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मोलाची साथ दिली. त्यांचे पती व दोन्ही मुले ह्यांनी कायम भावना ह्यांना पाठिंबा दिला.
माणसाने ठरवले तर तो कुठल्याही वयात यश मिळवू शकतो. फक्त गरज असते ती स्वतःचा आतला आवाज ऐकून त्या ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची!
भावना टोकेकर ह्यांनी हे असामान्य यश मिळवून सर्वच स्त्रियांना हाच संदेश दिला आहे की “एज इज जस्ट या नंबर!”
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.