भावाच्या हत्येचं दुःख विसरून तो स्पर्धेच्या मैदानात उतरला आणि त्याने इंग्लंडला वर्ल्डकप मिळवून दिला!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सर्वसामान्य माणसाला वाटते की ह्या क्रिकेट खेळाडूंची मज्जा असते. मस्त पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते. सगळीकडे कौतुक होतं. सगळीकडे फिरायला मिळते.
पण आपण हे विसरून जातो की त्या स्थानावर पोहोचण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागते. दिवसरात्र कष्ट करावे लागतात. प्रेशरखाली चांगले खेळून दाखवावे लागते. तेव्हा त्यांना हे सगळे मिळते.
पण ते कशाच्या किमतीवर? महिनोंमहिने घरच्यांपासून लांब राहावे लागते. तिकडे घरात त्यांच्या स्वतःच्या बाळाचा जन्म झालेला असो की कुणाचा दुःखद मृत्यू,त्यांची जर टीमला गरज असेल तर त्यांना त्यांचा खेळ अर्धवट टाकून जात येत नाही.
शो मस्ट गो ऑन म्हणत खेळ सुरु ठेवावा लागतो आणि स्वतःच्या भावना बाजूला ठेवून आपल्या देशासाठी, आपल्या संघासाठी चांगलेच खेळावे लागते.
असेच काहीसे इंग्लंडच्या फास्ट बॉलर असलेल्या जोफ्रा आर्चरच्या बाबतीत झाले. जोफ्रा आर्चरने ह्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला यश मिळवण्यात योगदान दिले.
त्याने ह्या स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली. पण त्याच्या ह्या यशाला दुःखाची काळी किनार होती. त्याला त्याचा देश विश्वविजेता झाल्याच्या आनंदाबरोबरच मनात भावाच्या मृत्यूचे दुःख देखील होते.
जोफ्राचे वडील फ्रॅंक आर्चर ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोफ्रासाठी हे दुःख मनात ठेवून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणे कठीण होते.
त्याने चांगली कामगिरी बजावली पण त्यावेळी तो स्वतःच्या मनात मात्र भावाच्या अकाली जाण्याच्या दुःखाशी झगडत होता.
जोफ्राचा चुलत भाऊ, चोवीस वर्षीय ऍशन्टीयो ब्लॅकमन ह्याचा ३१ मे च्या संध्याकाळी त्याच्या बार्बेडोस येथील सेंट फिलिप येथील त्याच्या घराबाहेर खून झाला.
कुणीतरी त्याच्या घराबाहेरच त्याच्यावर गोळ्या झाडून त्याचा जीव घेतला. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड व दक्षिण आफ्रिका ह्यांच्यात जो पहिला सामना झाला त्यानंतरच्या दिवशी ही घटना घडली.
म्हणजेच संपूर्ण स्पर्धेत जोफ्रा त्याच्या मनात भावाच्या मृत्यूचे दुःख घेऊन खेळला.
ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली पण नंतर त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल न होता त्यांना सोडून देण्यात आले. जोफ्राचे वडील फ्रॅंक आर्चर ह्यांनी द टाइम्सशी बोलताना असे सांगितले की,
“जोफ्राचा भाऊ साधारण त्याच्याच वयाचा होता आणि त्या दोघांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते होते. त्या दोघांचे कायम एकमेकांशी बोलणे चालायचे. त्याच्या मृत्यूच्या काही काळ आधीच दोघेही एकमेकांशी बोलले होते.
–
ऍशन्टीयोच्या अकाली मृत्यूचा जोफ्राला खूप मोठा धक्का बसला आणि त्याला प्रचंड दुःख झाले.पण त्याला हे सगळे दुःख मनातच ठेवून खेळाकडे लक्ष देणे गरजेचे होते. “
जोफ्राने ही घटना व त्यामुळे झालेले दुःख मनातच ठेवले व पूर्ण स्पर्धा संपेपर्यंत फार कुणाला ह्याविषयी माहिती दिली नाही. कारण त्याला स्पर्धा व खेळावर पूर्ण लक्ष केंद्रीत करायचे होते.
त्याने पीचवर त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवली. तो ह्या स्पर्धेत उत्तम फॉर्ममध्ये होता. केवळ मिचेल स्टार्क आणि लोकी फर्ग्युसनने त्याच्यापेक्षा जास्त बळी घेतले.
अंतिम सामन्याची सुपर ओव्हर जोफ्रा आर्चरने टाकली आणि न्यूझीलंडला १५ धावांवरच रोखण्यात यश मिळाले. आणि ज्या क्षणाची तो व त्याचे संघ सहकारी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आला आणि इंग्लंडला विश्वविजेता म्हणून घोषित करण्यात आले.
ह्याच क्षणासाठी जोफ्रा आर्चरने त्याच्या करियरची सोळा वर्षे कसून मेहनत घेतली होती.
त्याला अपेक्षित असे यश मिळाल्यानंतर सुद्धा त्याने शांतपणे संघाचा विजय साजरा केला. कुठलीही अतिरेकी व आततायी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
जोफ्राचा जन्म देखील बार्बेडोस मध्ये झाला पण त्याच्या वडिलांमुळे त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले. फ्रॅंक आर्चर ह्यांनी पुढे असेही सांगितले की, “जोफ्रा आठ वर्षांचा होता तेव्हापासून इंग्लंडच्या क्रिकेट संघात जागा मिळवायचे त्याचे स्वप्न होते. त्याने ते स्वप्न पूर्ण केले.
जे घडले ते अविश्वसनीय आहे. लोकांना त्याच्या ब्रिटिश असण्याबद्दल शंका होती. पण इंग्लंडकडून खेळताना त्याने सर्वांच्या प्रश्नांना त्याच्या खेळातूनच उत्तर दिले.
त्याचा खेळ बघून सर्वांनाच क्रिकेट खेळावेसे वाटेल कारण क्रिकेट हा उच्चभ्रूंचा खेळ समजला जातो. मी त्याला सेमी फायनल सामन्यानंतर इ मेल केला आणि म्हटले की हीच तुझी वेळ आहे.
सर्वांना तू काय करू शकतोस हे दाखवून दे. इंग्लंडच्या हिरोजना तू काय चीज आहेस हे दाखवून देण्याचा हाच क्षण आहे.”
अर्थात खेळाडूंच्या आयुष्यात अश्या अनेक घटना घडतात जेव्हा त्यांना स्वतःचे खाजगी आयुष्य बाजूला ठेवून देशाचे प्रतिनिधीत्व करावे लागते. ते सुद्धा आपल्या भावना बाजूला ठेवून देशाला महत्व देतात.
खेळ माणसाला अनेक गोष्टी शिकवतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे धैर्य आणि खंबीरपणा!
बाळाचा जन्मामुळे झालेला आनंद असो किंवा आप्तजनांच्या मृत्यूचे दुःख असो, तरी ते मनातच ठेवून त्याक्षणी “शो मस्ट गो ऑन” म्हणत आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची ताकद तुमचे देशप्रेम आणि तुमचा खेळच तुम्हाला देऊ शकतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.