पुणे तिथे काय उणे : या सुप्रसिद्ध झणझणीत मिसळींचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायलाच हवा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती इतक्या मस्त मस्त चटकदार पदार्थांनी समृद्ध आहे की एकेका पदार्थाचे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटतं. श्रीखंड बासुंदीसारख्या गोड पदार्थांना जेवढी डिमांड आहे त्याही पेक्षा जास्त तिखट पदार्थांना आहे.
गोडाचं कसं असतं ते सणासुदीला किंवा मुख्य जेवणासोबत छान लागतात पण झणझणीत पदार्थ कसे केव्हाही छान लागतात.
अगदी ब्रेकफास्ट असू दे किंवा संध्याकाळी मैत्रिणीबरोबर बाहेर फिरायला गेल्यावर मस्त चटकदार भेळ किंवा मिसळ किंवा बटाटेवडे चापायला छान वाटतात.
त्यात लालभडक तर्रीवाली मिसळ खायची म्हणजे नुसतं वॉव…. सुटलं ना तोंडाला पाणी नुसतं नाव निघाल्याबरोबर?
चला दोस्तहो…
मिसळीवरती बोलू काही….( संदीप खरे, सॉरी यार…)
चला मंडळी, जरा बघुया तरी पुण्यात कुठे कुठे मस्त झणझणीत मिसळ खायला मिळते ती.. काय आहे ना आता मिसळीचं नाव निघालय तर पोटात लगेच कावळ्यांनी कल्ला करायला सुरुवात केलीय.. त्यांना शांत नाही केलं तर फारच वांदे होतील हो. तर मारुया किक बाईकला आणि सुटुया इथून.
हां तर आमच्या दोस्तानं सांगितलेलं ठिकाण आलं बरं का. हे आहे कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेज जवळील “काटा किर्र”. इथली मिसळ म्हणजे एकदम तरुणाईच्या भाषेतील जाळ धुर्रर्रर्र..मिसळ.
आत आल्यावर समोर दिसतंय ना ते भलं मोठ्ठं पातेलं त्यात उकळतोय एकदम लालभडक मसालेदार रस्सा. यात मोड आलेली कडधान्य मसाल्यासह शिजत असतात. यालाच सॅम्पल म्हणतात बरं का!
तर इथे बसलो की समोर येते उकडलेला बटाटा, फरसाण आणि शेव घातलेली प्लेट आणि त्यात ओतलेली ती लालभडक तर्री… नाकाशी येतो तो त्यावर पेरलेल्या कांद्याचा आणि कोथिंबीरीचा घमघमाट.
त्या सोबत आलेल्या पावजोडीतील एका पावाचा तुकडा त्यात बुडवायचा आणि घशात सोडायचा. क्षणार्धात कानातून धूर बाहेर पडतोय असं वाटायला लागतं.
आणखी एक दोन घास घेतल्यावर मग मिसळीची खरी चव समजू लागते. आता त्यातील मसाल्याची चव कळू लागते. मग मात्र ब्रह्मानंदी टाळी लागते. पोटात उसळलेली आग शमवायला इथं दिलं जातं थंडगार ताक. ते मात्र हवंच हं …
या काटा किर्रर्र मिसळ चेनची चक्क ५ आऊटलेट्स आहेत पुणे आणि परिसरात. पण हे मात्र सर्वात जुने आहे. नाव देखील असे की मिसळ नक्कीच मेंदूत किर्रर्र आवाज करणार.
चला आता आणखी एक झक्कास ठिकाण गाठूया. हे आहे तुळशीबागेतील “श्रीकृष्ण भवन”.
इथं तुळशीबागेत खरेदीसाठी पुण्यातील तमाम स्त्रीवर्ग रोज येत असतो आणि भूक लागल्यावर पाय वळतात ते श्रीकृष्ण भवनकडे.
हां इथं मिसळ इतकी फक्कड मिळते की रसना एकदम तृप्तच होते. इथं पूर्वी तळमजल्यावर चार टेबल आणि दहा बारा जण बसतील इतकीच जागा होती पण लोक बाहेर उभं राहून नंबर येण्याची वाट बघायचे.
आता जिना चढून वर गेलं की बऱ्यापैकी मोठी जागा आहे.समोरच ओपन किचनमध्ये मोडाची मटकी घातलेली तर्री उकळत असते.
मस्त मसाल्याचा स्वाद नाकातून थेट मेंदूपर्यंत पोचतो. इथल्या मिसळीची तऱ्हा वेगळीच.
पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा बटाट्याची भाजी आणि त्यावर शेव घालून समोर येतो आणि त्यावर ती स्वादिष्ट तर्री आणि वर बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर. सोबत लुसलुशीत पाव. इथली मिसळ झणझणीत आहे पण अगदी कानातून धूर काढणारी नाहीय.
स्त्री वर्गात भलतीच पॉप्युलर. खरेदीस नवरोजी पण सोबत आले असतील तर ते ही इथं चिकटून बसायला तयार असतात. सौ ना खरेदीला पाठवून आणखी डबल मिसळ खादाडायला हे मोकळे इतकी टेस्टी असते इथली मिसळ.
चांगला ७८ वर्षांचा भरभक्कम अनुभव आहे या मिसळीच्या चवी मागे. उगाच नाही लोक त्यातून पुणेकर नंबरची वाट बघत ताटकळत उभे रहात.
तेव्हा महाराजा लक्षात आलं असेलच किती टेस्टी असणार ते.
अशीच एक फेमस मिसळ आहे बुधवारपेठेतील शंभरी ओलांडलेल्या “वैद्य उपहार गृहा “तील हिरव्या कटाची अप्रतिम चवीची मिसळ.
बहुतेक ठिकाणी लाल तर्री असलेली झणझणीत मिसळ असते. इथे मात्र हिरव्यागार मिरच्या आणि कोथिंबीर वाटून केलेला हिरवा रस्सा मस्त टेस्ट आणतो.
बाकी ह्या शंभरी ओलांडलेल्या उपहारगृहाचा अवतार पण तसाच जुनापुरणा. कधीकाळी लावलेल्या पिवळ्या रंगाचा दरवाजा. आजूबाजूच्या पोलवरून लोम्बकळणाऱ्या वायर्स आणि ग्रॅनाईट व संगमरवरी टेबलं भिंतीवर कुठलीशी जुनी चित्र.
एकंदर थांबावं की नाही या विचारात असताना समोर येते पोहे,चिवडा व शेव घातलेली प्लेट आणि हिरवा मसाला वाटून केलेला अप्रतिम रस्सा आणि वरून घातलेला बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर.
मग आजूबाजूचं वातावरण विसरून हातातोंडाची जी लढाई सुरू होते ती थांबते किमान दोन प्लेट संपल्यावरच. अगदी ताजी ताजी चव पुढील दोन तीन दिवस तरी जिभेवर रेंगाळत राहते.
थोडीशी आंबट गोड टिपिकल ब्राह्मणी चव असलेली मोडाची मटकी घातलेली आणि चिवडा व शेव घातलेली सणसणीत तिखट अशी बेडेकर मिसळ ही पुणेकरांची अत्यंत आवडती.
या मिसळीसाठी घातलेला चिवडा आणि शेव अत्यंत कुरकुरीत आणि टेस्टी. बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर मिसळीची टेस्ट वाढवतो. रोज सॉलिड गल्ला जमवणारी आणि पुणेकरांची लाडकी मिसळ मिळते बेडेकर टी स्टॉल बुधवार पेठ येथे.
मस्ट व्हिजिट हे लेबल अभिमानाने मिरवणारी आणि शनिवार रविवार घरी फॅमिली पार्सल म्हणून न चुकता मागवली जाणारी अस्सल पुणेरी मिसळ म्हणजे बेडेकर मिसळ.
जवळपास ४५ वर्ष खवय्यांच्या लिस्टवर अव्वल नंबर राखून असलेली ही मिसळ म्हणजे पुणेकरांची प्रथम पसंतीची मिसळ.
पुणेकरांच्या पसंतीस उतरलेली आणखी एक खास मिसळ म्हणजे “भाडाईत मिसळ” प्रभात रोड. पोहे,फरसाण शेव आणि कांदा कोथिंबीर घातलेली प्लेट पूर्ण भरून आणलेली आणि मसाल्याच्या स्वादाने भूक जागवणारी ही मिसळ कोलाहल नसलेल्या प्रभात रोडवर मिळते.
टॉप क्लासमध्ये मोडणारी ही मिसळ बनते मोड आलेल्या कडधान्यापासून आणि वाटण्यांपासून. मुद्दाम जाऊन टेस्ट करावी अशी नक्कीच.
विमान नगर इथला एक फूड जॉईंट फेमस झालाय तो त्याच्या नावाने आणि वेगळ्या चवीने. या जॉईंटचं नावच मुळी “मिसळ आणि बरंच काही” असं आहे. या “बरंच” मध्ये वेगवेगळ्या चवीच्या मिसळी मिळतात.
इथली प्रसिद्ध नाशिक मिसळ सकाळी आठ ते साडेदहा या वेळेतच मिळते. बाकी प्रकार नेहमीच उपलब्ध असतात. हिरव्या मसाल्याची इथली मिसळ त्याच्या अनोख्या स्वादाने खूप प्रसिद्ध झालीय. इथं मिसळी बरोबर दही, पापड आणि खोबरा बर्फी पण मिळते.
एक खास पुणेरी चवीची मिसळ जी अगदी सदाशिव पेठी चवीची आहे आणि ऑफकोर्स सदाशिव पेठेतच मिळते, ती आहे “श्री उपहारगृह” इथली चटकदार आंबटगोड चवीची मिसळ.
पोहे बटाटे,शेव चिवडा,उकडलेली मोडाची कडधान्य आणि मस्त आंबट गोड सॅम्पल. कांदा कोथिंबीर या कॉम्बो व्यतिरिक्त इथली खासियत म्हणजे वरून घातलेल्या टोमॅटोच्या चकत्या कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव.
सदाशिव पेठेत कोणत्याही कामासाठी गेलं की पावलं इकडं हमखास वळतातच. खूप जुनं असलेलं असं हे उपहारगृह मिसळीसाठी खवय्यांच्या पसंतीचे आहे. चुकवू नये या कॅटॅगरीतील आहे.
पुणेरी मिसळी प्रमाणे कोल्हापुरी मिसळ हा एक अफलातून प्रकार आहे. मुळात कोल्हापूर प्रसिद्ध आहे ते तेथील तांबड्या रश्यासाठी. तशीच चव त्यांच्या मिसळीत उतरलेली असते.
पुण्यात ठिकठिकाणी कोल्हापुरी मिसळचे बोर्ड बघायला मिळतात. सर्वच ठिकाणची मिसळ मस्त असतेच पण आवर्जून खावी अशी कोल्हापूरच्या नावाशी आणि चवीशी इमान राखून असलेली मिसळ आहे टिळक रोडच्या हॉटेल रामनाथची.
पोहे, शिजवलेली कडधान्य आणि भरपूर शेव असलेली,वरून मस्त कांदा कोथिंबीर घालून सजवलेली प्लेट आणि त्यात तो टिपिकल कोल्हापुरी तांबडा रस्सा.. क्या बात है… इथे पावजोडी ऐवजी मस्त पांढऱ्या लुसलुशीत ब्रेड स्लाइस मिळतात.
बुडवा स्लाइस कटात आणि ओरपा मिसळ. दुसरी तिसरी प्लेट मागवल्याशिवाय तुमची तृप्ती होतच नाही. कट हा खास कोल्हापुरी शब्द. याच मिसळीच्या कटात बटाटेवडा घालून आणला की झाला “कटवडा”. कोल्हापुरी मिसळ शौकींनांना हा हवाच असतो मिसळीबरोबर.
उगाच कोल्हापुरी आहे म्हणून तिखटजाळ आहे असे नाही पण मसाल्याचा जोरदार स्वाद दीर्घकाळ रेंगाळत राहणारा.. तुम्हाला फार तिखट चालत नसेल तर आधीच ऑर्डर देताना सांगा म्हणजे इथं तुमच्यासाठी नॉर्मल व्हर्जन पण अव्हेलेबल आहे.
आणखी एका मिसळीबद्दल सांगितलं नाही तर मनाला त्रास होईल कारण आम्ही जातिवंत मिसळ शौकीन असल्याने ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवली नाही तर अपराधी वाटेल.
ही आहे रास्ता पेठेतील “आबाची मिसळ“. जबरदस्त मसालेदार आणि न विसरता येण्याजोगी चव ही या मिसळीची खासियत. रास्ता पेठेतील “श्री कला स्नॅक्स सेंटर” इथे मिळते ही मिसळ.
मोडाची मटकी मूग वाटाणे यांनी युक्त रस्सा, प्लेट मध्ये पोहे, फरसाण, आणि स्पेशल नायलॉन पोह्यांचा पिवळाधम्मक चिवडा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि वर लिंबाची फोड.
जोडीला बाऊलमध्ये तांबडा जर्द रस्सा.. साथीस पावजोडी एक गोष्ट आवर्जून करायची ती म्हणजे वरून उतारा म्हणून ग्लासभर ताक प्यायचे.
चार दिवसांनी आपसूकच पावले इकडे वळली नाहीत असे होणारच नाही ही आपली गॅरंटी.
तर दोस्त हो… जाता जाता आणखी दोन मिसळींचा उल्लेख नाही केला तर अपूर्ण वाटेल हा लेख. एक आहे ओंकारेश्वर पुलावरून सरळ शनिवार पेठेत येताना साधारणपणे शंभर मीटरवर उजवीकडे कोल्हापुरी मिसळीचा बोर्ड दिसेल तिकडे घुसायचं आणि मिसळ “ओढायची” नुसती.
दुसरी मिसळ अलीकडेच पॉप्युलर झालीय ती आहे तिरंगा मिसळ. काळा, हिरवा, लाल अशा तीन रंगांच्या आणि तीनही चवी वेगवेगळ्या असलेल्या या मिसळीची टेस्ट निव्वळ अफलातून.
सोबत देतात एक गुलाबजाम उतारा म्हणून. यांचे देखील पुणे वेगवेगळ्या ठिकाणी जॉइन्ट्स आहेत. आम्ही आमच्या आवडीचे मिसळीचे जॉइन्ट्स तुम्हाला कळवलेत.
तसेही पुणेरी किंवा कोल्हापुरी मिसळ बोर्ड दिसले की बिनधास्त आत घुसायचं आणि आडवा हात मारायचा…आता झणझणीत हवी की नॉर्मल तेवढं ऑर्डर देताना सांगून टाकायचं म्हणजे झालं.
कोल्हापुरी झटका मिसळीशी आंबटगोड चवीची पुणेरी मिसळ सॉलिड टक्कर देतेय हां. चला तर मग मारा किक बाईक किंवा स्कुटरला आणि सुटा आम्ही सांगितलेले जॉइन्ट्स व्हिजिट करायला.
काय मग निघतायना ?? निघायलाच हवं…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.