तुम्ही गुगलवर काय सर्च करता हे फेसबुकला कळतंच… कसं ते जाणून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
गूगल…आजच्या काळातला गुरु. जे हवं ते सारं तिथं जाऊन सांगायचं..विचारायचं.. गणिताच्या सूत्रापासून ते ज्योतिष विद्येपर्यंत.. सौंदर्य प्रसाधनांपासून सौंदर्य उपासनेपर्यंत सारं काही मिळतं. एकही गोष्ट अशी नाही जी गूगलवर सापडत नाही.
एकाच वेळी एकाच गोष्टीचे शंभर पर्याय दिसतात. तुम्ही बटन दाबायचा अवकाश..अलिबाबाची गुहाच समोर!
एक विचारा दहा पर्याय उपलब्ध. घरात बसून जग मुठीत आणून देतं हे गूगल. पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, परफ्यूम मागाल ते उपलब्ध. जे गावात मिळत नाही ते एका क्लिकवर घरपोच होतं.
यातूनच ऑनलाइन खरेदी विक्रीचे नविन मार्केट सुरु झाले.
फेसबुक! याबद्दल वेगळं काय सांगावं? करोडो चेहरे ओळखीचे…अनोळखीसे या फेसबुकने दाखवले आहेत. जग जवळ आणायचं काम याच फेसबुकने केलं आहे.
कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हा मोठा प्लॅटफाॅर्म ठरला आहे. तसंच खरेदी विक्रीचे व्यवहार सुध्दा सर्रास इथं होतात. लाखो बिझनेस ग्रूप आहेत. या ग्रूपमध्ये होलसेल, रिटेल खरेदी विक्री होते.
नव्या नव्या बिझनेसच्या कल्पना लढवून तो वाढवता येतो. त्या माध्यमातून अनेक खरेदीदार व विक्रेते एकमेकांना भेटतात. पण एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या?
गूगलवर आपण खुल जा सिम सिम.. तिळा तिळा दार उघड म्हणत गुहेत प्रवेश करतो… काही खरेदीसाठी वस्तू शोधतो. तो शोध घेताना दिसणारी हजारो डिझाईन्स, हजारो नमुने, हे सारं पाहताना भूलभुलैया मध्ये अडकल्यासारखं होतं.
खरोखर अलिबाबाच्या गुहेत अडकलेला कासिम जसा काय घेऊ यातलं असा प्रश्न पडून गोंधळून गेला होता तीच अवस्था आपली होते.
ज्या वस्तू आपण शोधल्या, पाहील्या नेमक्या तसल्याच विविध कंपन्यांच्या वस्तू आपल्याला फेसबुकवर पण दिसू लागतात. आंयऽऽ या सरदाराला कसं समजलं आपण गुहेची सफर केली ते?
लगेच शो केस समोर आली…आपण चाटमचाट पडतो. केला आहे का कधी हा विचार..हे कसं होतं?
तुम्ही प्रवासाला जायचं ठरवता. त्या अनुषंगाने ठिकाणं विमान तिकीटाचे दर, तिथं असलेली हाॅटेल्स, त्यांचे दर हे सारं तपासत असता. हे सारं करत असताना आपला ब्राऊझर तो डाटा जाहीरातदारांना पाठवत असतो.
म्हणजेच जाहिरातदार कंपन्या, फेसबुक हे एकमेकांना संलग्न आहेत. गूगल, फेसबुक आणि या कंपन्या एकमेकांना एका अल्गोरिदमनं जोडलेल्या असतात.
त्यामुळे आपला आयपी अॅड्रेस या कंपन्यांना समजतो. आपला आयपी अॅड्रेस internet protocol address हा आपल्या घराच्या पत्त्यासारखा असतो. हा त्या जाहिरातदार कंपन्यांना दिला जातो.
त्यामुळे तिथे आपला संभाव्य ग्राहक म्हणून हा अॅड्रेस कळतो. आणि पत्रं, कुरीयर जसे आपल्या पत्त्यावर सहजासहजी येऊन पोहोचतात त्याचप्रमाणे या कंपन्या विविध वस्तूंच्या जाहिराती, वेगवेगळ्या वेबसाईट यांचा डाटा फेसबुकवर आपल्या वाॅलवर आणून ओततात.
पण व्यापार जगतात एक अलिखित नियम आहे, तुम्हाला व्यापार करायचा असेल तर तुमचा ग्राहक, त्याच्या आवडीनिवडी माहीत असायला हवी.
रोजच्या जीवनात आपला नेहमीचा दुकानदार आपल्या ओळखीचा असतो. त्याला आपली आवड नावड माहीत असते. तो त्यानुसारच वस्तू दाखवतो.
ऑनलाइन मार्केटमध्ये ही माहिती कशी मिळवायची? ती असली तरच तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी देऊ शकतात.मग तरीही या जाहिराती आपल्यापर्यंत येतात कशा?
थोडासा विचार करा मग लक्षात येईल, तुम्ही फेसबुक जाॅईन केलं तेंव्हा तुमचा डाटा भरला होता.. तुमचं नांव, गांव,लिंग, आवडते सिनेमा, तुमचे राजकिय मत, तुमच्या आवडी…या नोंदी अगदी बिनचूक असतात.
हाच बिनचूक डाटा कंपन्यांना दिला जातो आणि तोच लक्षात घेऊन या जाहिराती बनवल्या जातात आणि त्या त्या माणसांच्या आवडीनिवडी, इंटरेस्ट, यांचं वर्गीकरण करुन त्यानुसार पाठवल्या जातात.
थोडक्यात या ऑनलाइन जाहिराती आपल्याकडे ब्राऊझर किंवा सोशल मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून येतात. हे करत असताना संभाव्य ग्राहक म्हणून तुमचा डाटा म्हणजे तुमच्या आवडी निवडी, तुमचे इंटरेस्ट हे सारं विचारात घेतलं जातं.
कारण हे तुम्ही फेसबुक जाॅईन करत असताना तिथं माहिती भरताना दिलेलं असतं.
म्हणजे फेसबुक तुमची हेरगिरी करतं का? याचं उत्तर काही अंशी हो असंच आहे. तुम्ही वेबसाईटना दिलेल्या भेटी, तिथं घालवलेला वेळ हा डाटा, तुम्ही पोस्ट करता त्या पोस्ट, फोटो यातून तुमचा कल समजत असतो.
उदा. तुम्ही तुमच्या मित्रांसह काढलेले फोटो पोस्ट करता. त्यात तुम्ही जर विविध ठिकाणी वेगवेगळ्या वेषभूषा करुन पोस्ट टाकल्या असतील तर तुम्हाला कपड्यांची आवड आहे हे समजतं आणि मग त्या प्रकारच्या जाहिरातदारांना हा तुमचा ग्राहक होऊ शकतो बरं का.
अशी टिप मिळाली की ते लगेच आपला लवाजमा घेऊन तऱ्हेतऱ्हेच्या आॅफर…नवी डिझाईन… डिस्काउंट..नव्या स्कीम्स… यांसह आपल्या वाॅलवर प्रकट होतात.
तसंच ब्राऊझरमध्ये तुम्ही कोणत्या वेबसाईटवर गेला, तिथं किती वेळ काय काय शोधलं यांचा डाटा ही या जाहिरातदार कंपन्यांना मिळतो.
तो छोट्या टेक्स्ट फाईलच्या रुपात असतो. त्याला कुकीज असं म्हणतात. त्यामुळं तुम्हाला काय आवडतं…काय द्यायचं हे त्यांना बरोबर समजतं.
तुम्ही कोणत्या साईटवरुन काही खरेदी केली तर नंतर त्यांची नवी प्राॅडक्ट्स, नव्या आॅफर हे सारं पुन्हा पुन्हा तुमच्या वाॅलवर आणून दिलं जातं.अगदी तुम्ही शाॅपिंग कार्टमध्ये जरी टाकलं तरीही!
कारण त्यामुळे तुम्ही संभाव्य ग्राहक म्हणून त्यांच्या यादीत असता. आणि ग्राहक हा देव आहे!!!!
मग जाहिरातींचा ओघ सुरु होतो. जाड असाल तर बारीक व्हा…बारीक असाल तर जाड व्हा.. त्यासाठी हे खा..ते वापरा असं सांगत कामात अडथळे आणणारी चित्रं आठवली का?
या जाहिराती अती त्रासदायक ठरत आहेत असं वाटलं तर आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो हा भागही आहे यात. सेटींग्ज मध्ये जाऊन तुम्ही जाहिराती नको असं सांगू शकता आणि हा अडथळा थांबवू शकता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.