आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
जैसी करनी वैसी भरनी ही म्हण तर आपणा सर्वांना माहिती आहेच. चुकीच्या किंवा अप्रामाणिक वागण्याची शिक्षा ही कधी न कधी भोगावी लागतेच. मग चूक करणारा राजा असो वा रंक… तिथे भेद नाही!
अशाच एका गंभीर चुकीसाठी एका प्राध्यापकाला अमेरिकन न्यायालयाने सुनावलेली ही शिक्षा ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल!
कॅलीफोर्नीयातील इलेक्ट्रिक इंजिनियर असलेल्या एका प्राध्यापकाने अमेरिकेचे मिसाईल सिक्रेट्स चोरून चीनला विकण्याचा प्रयत्न केल्याने त्याला तब्बल २१९ वर्षांची तुरुंग्वासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे!
यी-ची शीह हे ६४ वर्षांचे प्राध्यापक लॉस एंजिलीसच्या कॅलीफोर्नीया विद्यापीठात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. त्याच्या वर जवळजवळ सहा महिने तब्बल १८ आरोपांखाली खटला सुरु होता.
त्यांनी एका अमेरिकन कंपनीकडून बेकायदेशीर रित्या मायक्रोचिप्स विकत घेऊन त्या चीनला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
या मायक्रोचिप्स लष्करी शास्त्रास्त्रापासून ते मिसाईल, फायटर जेट बनवण्यापर्यंत सर्वत्र उपयोगी ठरू शकतात.
एमएमआयसी या कंपनीच्या वेबपोर्टल वरून शीह यांनी कंपनीशी संवाद साधला. आपण स्थानिक ग्राहक असून वैयक्तिक कारणासाठी या चीप खरेदी करत असल्याचे त्यांनी कंपनीला सांगितले. शीह यांनी घेतलेल्या या चिप्स अनेक ठिकाणी उपयोगी ठरू शकतात.
जसे की, मिसाईल बनवणे, मिसाईल गायडन्स सिस्टीम, फायटर जेट, इलेक्ट्रोनिक वारफेअर आणि रडार मिजर्स अशा अनेक गुप्त आणि सुरक्षे संबधित गोष्टींसाठी या चिप्सचा वापर केला जाऊ शकतो.
मुळात या या चिप्स ज्या कंपनी कडून घेतल्या गेल्या ती कंपनी या चिप्स सुरक्षेच्या ठिकाणी जसे की, सैन्य, वायुदल, नौकादल आणि अत्याधुनिक संशोधन करणाऱ्या एजन्सी अशा ठिकाणी वापरल्या जातात, तिथेच त्यांचे ग्राहक आहेत.
न्याय विभागाने मंगळवारी शीह यांना कायदेशीर रित्या २१९ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्यातील सह आरोपी कीट अहन मै याला या आधीच स्मगलिंगच्या आणि या गुन्ह्याच्या कटात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली गुन्हेगार ठरवण्यात आले होते.
अमेरिकेतील एका कंपनीकडून शीह यांनी ग्राहक असल्याचा दावा करत मोनोलीथिक मायक्रोव्हेव इंटिग्रेटेड सर्किट्स (एमएमआयसी) म्हणजे मायक्रोचिप्स विकत घेतल्या. त्यानंतर या चिप्स त्याने चीनच्या चेंगडू गस्टोन टेक्नोलॉजी या कंपनीला विकल्या.
शीह याच कंपनीचे काही अध्यक्ष देखील होते. ही कंपनी सध्या स्वतःच अशा एमएमआयसी बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.
सीजीटीसी ही कंपनी २०१४ साली अमेरिकेच्या स्वायत्त कंपनीच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणजेच या कंपनीशी गुप्तपणे केला जाणारा व्यावहार हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो.
अशा कंपनीला वाणिज्य खात्याच्या परवानगी शिवाय कोणताही वव्यवहार करता येत नव्हता. तशीच ही कंपनी अवैध खरेदीच्या व्यवहारात गुंतलेली असून अशा प्रकारे खरेदी केलेल्या वस्तू या चीनसाठी युद्ध सामग्री बनवण्यासाठी वापरल्या जातात.
अशा प्रकारे अवैध प्रकारे एका देशातील गुप्त माहिती दुसर्या देशात पाठवण्याच्या गुन्ह्या खालीच त्यांना २१९ वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे.
शीह यांनी चीनला अवैध मार्गाने सेमीकंडक्टर्स चीनला पाठवले आहेत ज्यांचा उपयोग मिलिटरी आणि इतर कारणासाठी केला जाऊ शकतो. या व्यवहारातून त्यांना मिळालेल्या फायद्यावरील कर त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केल्याचे प्राप्तीकर खात्याच्या चौकशीत हे लक्षात आले.
अशी माहिती अमेरिकेचे सरकारी वकील निक हन्ना यांनी दिली. गुप्त माहितीची अवैध विक्रीचा गुन्हा तर आहेच याशिवाय शह यांच्यावर आणखीही काही आरोप लावण्यात आले आहेत.
यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप तसेच मेल घोटाळा, वायर घोटाळा, कर न भरणे, सरकारी संस्थांना खोटे जबाब देणे, सायबर चोरीचा प्रयत्न करणे, असे कितीतरी आरोप आहेत.
शिक्षेची अंमलबजावणी करण्याची तारीख अजूनही घोषित करण्यात आलेली नाही.
शीह हे अलीकडेच कॅलीफोर्निया विद्यापीठात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून रुजू झाल्याचे त्यांच्या नोंदीवरून लक्षात येते. विद्यापीठांनी देखील आत्ता नियुक्ती करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
कॅलीफोर्निया विद्यापीठात त्यांनी अलीकडेच साम्युली स्कूल ऑफ इंजिनियरिंग आणि अप्लाइड सायन्स हा कोर्स शिकवला होता.
यासोबतच अमेरिकेच्या न्याय विभागाने, या कृत्यात शीह यांचे भाऊ देखील सामील असल्याच्या संशयावरून त्यांची देखील तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शीह यांचे बंधू मॅकगिल युनिव्हर्सिटी मध्ये सहाय्यक इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक आहेत. यापूर्वी त्यांनी आपल्या भावासोबत अनेक प्रोजेक्टस वर काम केले आहे.
या घटनेवरून युनिव्हर्सिटी किंवा अशा संवेदनशील ठिकाणी कर्मचार्यांना नोकरी देताना किमान त्यांची पार्श्वभूमी सूक्ष्मरित्या का तपासली जात नाही अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.
या प्रकरणातून तरी सरकारने धडा घेणे गरजेचे आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.