Site icon InMarathi

४२ शाळांनी मुलाच्या प्रवेशास नकार दिला, आज तिच्या स्वतःच्या शाळेत ८० विद्यार्थी शिकत आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

आपल्याकडे लहान लहान मुलांच्या शाळाप्रवेशासाठी सुद्धा प्रचंड मारामार आहे. तीन साडेतीन वर्षांच्या लहान मुलाच्या शाळेच्या प्रवेशासाठी सुद्धा आईवडिलांना शाळांचे उंबरे झिजवावे लागतात.

लहान मुलांचे इंटरव्यू घेतले जातात, त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा इंटरव्यू घेतले जातात. नंतर तुम्ही नशीबवान असाल, तुमचे मूल भविष्यातील आईन्स्टाईन किंवा स्टीफन हॉकिंग असेल तरच शाळेच्या निकषाप्रमाणे तुम्ही पास होता.

शाळेच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर लागतो. प्रत्येक शाळेला हुशारच मुले विद्यार्थी म्हणून हवे असतात. त्यामुळे सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेल्या मुलांच्या आईवडिलांना शाळेच्या प्रवेशासाठी जरा जास्तच प्रयत्न करावे लागतात.

 

YouTube

खरं तर भारतात सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत सर्वच मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. त्यात स्पेशल मुले देखील येतात. पण शाळा मात्र स्पेशल मुलांचा शिक्षणाचा अधिकारच नाकारतात. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलायला तयार होत नाहीत.

तुमच्या स्पेशल मुलाचं तुमचं तुम्ही बघत बसा असा ऍटिट्यूड ठेवत स्पेशल मुलांना प्रवेश देत नाही.

नकार मिळाल्यानंतर लोक विविध प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करतात. बहुतांश लोकांना नकार मिळाल्यावर त्यांच्या मनात अगतिकपणाची भावना घर करू लागते आणि त्यांना नैराश्य येते.

परंतु काही असेही लोक असतात जे नकार मिळाल्यावर अधिक जिद्दीने पेटून उठतात आणि व्यवस्थेशी झगडून त्यांना हवे ते मिळवून दाखवतातच. सरस्वती सिंग ह्या अश्याच ध्येयाने झपाटलेल्या लोकांपैकी एक आहेत.

सरस्वती सिंग हा एक लढाऊ वृत्तीच्या महिला आहेत, त्या एक शिक्षिका आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या एक आई आहेत. प्रत्येक आईला असते वाटत असते कि तिच्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे, स्वतःच्या पायांवर उभे राहावे आणि आयुष्यात यशस्वी व्हावे.

 

The Better India

हीच इच्छा सरस्वती ह्यांची देखील आहे आणि त्यासाठी, त्यांच्या मुलासाठी त्या व्यवस्थेशी झगडत आहेत कारण त्यांचा मुलगा हा स्पेशल चाईल्ड आहे. त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत सरस्वती ह्यांना अनेक ठिकाणांहून नकार मिळाला.

पण ते नकार त्यांनी पचवले आणि मुलासाठी त्या अधिक धैर्याने प्रत्येक वेळेला नवीन समस्येला सामोऱ्या गेल्या. समस्या सोडवतानाच त्या इतर स्पेशल मुलांसाठी सुद्धा सुंदर मार्ग तयार करत गेल्या.

त्यांनी डेहराडूनमध्ये ऑटिझम आणि इतर डेव्हल्पमेंटल डिसऑर्डर असलेल्या लहान मुलांसाठी व थोड्या मोठ्या मुलांसाठी सेंटर आणि ग्रुप होम उभे केले आहे.

हे सेंटर नव प्रेरणा फाउंडेशनच्या अंतर्गत चालवले जाते . ह्या सेंटरमध्ये ऑटिझम आणि इतर डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असलेल्या मुलांना सुरक्षित वातावरणात राहायला मिळते आणि त्यांना रोजच्या जीवनात ज्या ज्या समस्या येतात त्यातून त्यांना कसा मार्ग काढायचा हे शिकवले जाते.

 

The Better India

चांगले व सुरळीत आयुष्य जगायला मिळावे ह्यासाठी प्रयत्न केले जातात. द बेटर इंडियाशी बोलताना सरस्वती सिंग ह्यांनी ह्या सेंटरबद्दल अधिक माहिती दिली.

त्या म्हणाल्या की ,”अजूनही आपल्या देशातील काही भागात ऑटिझम आणि लर्निंग डिसॉर्डर्सबाबत जनजागृती नाही.

लोकांना असा काही प्रकार असतो हेच माहिती नाही. अगदी मोठ्या शहरांत सुद्धा अनेकांना ह्याबाबतीत काहीच कल्पना नसते. लहान मुलांच्या बाबतीत तर मुलांचे आईवडील, शाळा ह्यांना मुलाला भाषण समस्या आहे असेच वाटते.

ते लोक लहान मुलांना स्पीच थेरपी देतात. पण ऑटिझम असलेल्या लहान मुलांकडे डिक्शनरीमधील सगळे शब्द शिकण्याची क्षमता असते. पण त्यांना लोकांशी संवाद साधण्यास अडचण येऊ शकते.”

सरस्वती सिंग ह्यांनी ऑटिझम असलेल्या मुलांसाठी काहीतरी ठोस कार्य करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील २४ वर्षे कष्ट केले आहेत. आजवर त्यांनी विकासात्मक समस्या असलेल्या २००० लहान मुले व मोठ्या मुलांबरोबर काम केले आहे.

ह्याबरोबरच त्या ऑटिझम आणि विकासात्मक समस्या ह्यांच्याविषयी समाजात जनजागृती करत आहेत. तसेच विविध प्रशिक्षण कार्यशाळा देखील घेत आहेत. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे आजवर त्यांनी तब्बल पंधरा हजार लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.

 

www.autism-india.org

त्यांची ही प्रेरणादायी वाटचाल कशी सुरु झाली ह्याबाबतीत सांगताना त्या म्हणतात की ,”माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेला डिलिव्हरीच्ये वेळी काही गुंतागुंत उद्भवली होती. तो गुदमरला होता आणि मला भीती वाटत होती की आता आमच्या दोघांचाही जीव वाचणार नाही.

डिलिव्हरीनंतर पंधरा दिवस त्याला आयसीयूमध्ये ठेवले होते.

नशिबाशी झगडत तो पाच महिन्यांचा झाला आणि तेव्हा मला जरा आशा वाटू लागली. आम्ही दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. पण दिल्लीतील वातावरण त्याला सहन झाले नाही आणि त्याची तब्येत बिघडली.

आम्ही दिल्लीला पोचण्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्याची तब्येत नंतर थोडी सुधारली.पण तो चार वर्षांचा असताना त्याला एकदा खूप ताप आला आणि परत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

त्याला तिथे असताना एकाच महिन्यात अपस्माराचे दोन मोठे झटके आले. ह्या दोन मोठ्या झटक्यांमुळे त्याच्या शरीर आणि मेंदूवर गंभीर परिणाम झाला आणि तो अक्षरश: ऑटिझम स्पेक्ट्रममध्ये ढकलला गेला.

कधी कधी तर तो स्वतःचे नाव सुद्धा विसरतो. ह्या अपस्माराच्या झटक्यांपूर्वी तो न्यूरॉटिपिकल चाईल्ड म्हणून शाळेत जात होता आणि तो बोलणे सुद्धा शिकला होता.”

पण तो अत्यंत हायपरऍक्टिव्ह असल्याने सरस्वतींना नेहेमीच त्याची काळजी वाटत असे. “मला कायम असे वाटत होते की त्याच्या बाबतीत काहीतरी चुकतेय.

तो प्रचंड हायपरऍक्टिव्ह होता आणि मी त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्याच्या ह्या हायपरऍक्टिव्हिटीबद्दल सतत सांगून सुद्धा कुणीही माझे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही.

 

Pediatrics Of Florence

त्याच्या हायपरऍक्टिव्हिटीमुळे त्याच्या शाळेतील शिक्षक त्याची तक्रार करत असत. पण माझ्या मुलाला नेमकी कुठली समस्या आहे हे शोधायला मला कुणाकडूनही मदत मिळाली नाही, ” असे सरस्वती सांगतात.

सरस्वतींच्या मुलाची हायपरऍक्टिव्हिटी आणि इतर वर्तणूक समस्येमुळे शाळेने त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. त्यांनी अनेक शाळांमध्ये त्यांच्या मुलाच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले पण दिल्लीतील ४२ शाळांनी त्यांना नकार दिला.

त्यांनी खूप प्रयत्न केल्यानंतर एका स्पेशल शिक्षकांनी सरस्वतींची मदत केली . आणि त्यांना सुचवले की त्यांनी त्यांच्या मुलाची ऑटिझमची तपासणी करून घ्यावी.

तेव्हा वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या मुलाला अटिपिकल ऑटिझम आहे असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंन्टल हॅंडीकॅप, सिकंदराबादच्या डॉक्टर रिता पेशावरियांनी निदान केले.

“जेव्हा माझ्या मुलाच्या ADHD चे निदान झाले तेव्हा मी माझ्या मुलीच्या वेळेला गरोदर होते. पण तेव्हा कुठल्याही डॉक्टरांना ऑटिझमची पुसटशी शंका देखील आली नाही.

 

Kare Psychology

जेव्हा मला कळले की माझ्या मुलाला ऑटिझम आहे तेव्हा मी प्रचंड दुःखी झाले. मी पूर्णपणे हादरले होते. मला आठवतंय की ही बातमी कळल्यावर पुढचे काही दिवस मी नुसती ढसाढसा रडत होते.

पण ह्यामुळे मी कोसळून जाणार नाही असे मी मनाशी ठरवले. ह्याउलट माझ्या मुलासाठी मी उभे राहण्याचे ठरवले.माझ्या समस्यांनाच मी माझी शक्ती बनवले. प्रेरणा,माझी मुलगी.. तिने मला ह्यात खंबीरपणे साथ दिली. ”

बायोलॉजीच्या शिक्षिका म्हणून नोकरी करणाऱ्या सरस्वतींनी नोकरी सोडून मुलालाच संपूर्ण वेळ देण्याचे ठरवले. आणि ऑटिझमबद्दल जनजागृती करणे सुरु केले.

त्या विविध शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना भेटल्या आणि त्यांनी त्यांना ऑटिझमविषयी माहिती दिली. शिक्षकांना ह्याविषयी किती कमी माहिती आहे हे बघून त्यांना आश्चर्य वाटले.

ह्या आजाराबद्दल माहितीच नसल्यामुळे कित्येक मुलांचे नुकसान झाले आहे आणि त्यांचा शिक्षणाचा हक्कच काढून घेण्यात आला आहे हे बघून त्यांनी ह्या मुलांसाठी काहीतरी ठोस कार्य करण्याचे ठरवले. त्यांनी ह्या स्पेशल मुलांसाठी स्वतःच शाळा सुरु करायचे ठरवले.

त्यांनी १९९५ साली दिल्लीस्थित त्यांच्या फ्लॅटमध्येच ही शाळा सुरु केली. त्यांनी त्यांच्या मुलासारख्याच आणखी ज्या ज्या मुलांना शाळांतून नकार मिळाला त्या मुलांच्या पालकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. त्यांची सुरुवात फक्त तीन विद्यार्थ्यांपासून झाली. पण त्यांच्या संपर्कातील लोकांच्या मदतीमुळे वर्षभरातच त्यांच्या शाळेत १२ विद्यार्थी आले.

इतरांनीही त्यांच्या शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा दर्शवली. थोड्याच काळात त्यांच्या लक्षात आले की विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे फ्लॅटमध्ये शाळा चालू शकणार नाही आणि त्यांनी दुसऱ्या जागेचा शोध सुरू केला.

त्यांनी १९९६ साली “इन्सिपिरेशन” ह्या नावाने सामाजिक संस्थेचे रजिस्ट्रेशन केले आणि किरण बेदी ह्यांना संपर्क केला. सरस्वती ह्यांचे काम बघून त्यांना त्यांच्या शाळेसाठी टिळकनगरच्या कम्युनिटी सेंटरमध्ये जागा देण्यात आली.

आता त्यांच्या शाळेत एकूण ८० विद्यार्थी आहेत आणि तिथे सरस्वती ह्यांच्यासारख्याच इतर माता ह्या मुलांची काळजी घेतात.

त्यांच्या ह्या कार्याची दखल घेतली गेली आणि त्यांचे त्यांची मनेका गांधी ह्यांनी General Secretary of PARIVAAR – National Confederation of Parents Organisations (NCPO) म्हणून जपानमधील सामाजिक संस्थांना भेट देण्यासाठी निवड केली. तसेच त्यांनी २००१ साली वॉशिंग्टन डीसीला देखील भेट दिली.

 

commons.wikimedia.org

तिथे त्या स्पेशल ऑलिंपिक्स मध्ये आशिया पॅसिफिक मधून १३ देशांच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या होत्या.

अश्या पायऱ्या चढत चढत २०१० साली न्यू प्रेरणा फाउंडेशनची सुरुवात झाली. २००५ साली त्यांनी डेहराडूनला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. दिल्लीपेक्षा तिथल्या वातावरणात मुलांना आणखी चांगल्या प्रकारे शिकता येते हे त्यांना त्यांच्या मुलाच्या अनुभवावरून लक्षात आले.

त्यांच्या ह्या शाळेत मुलांना विविध थेरपीज, GFCF (Gluten Free and Casein Free Diet) ,पालक आणि कुटुंबीयांचा प्रेमळ सहवास आणि सुरक्षित उबदार वातावरण ह्यातून शिक्षण मिळते. त्यांच्यात सुधारणा घडते आहे.

 

Facebook

त्यांचे आयुष्य सुरळीत कसे जगायचे हे ही स्पेशल मुले हळूहळू शिकत आहेत. व्होकेशनल कोर्सेस करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा देखील प्रयत्न करीत आहेत.

आज सरस्वती ह्यांचा मुलगा ३१ वर्षांचा आहे आणि त्यांना शाळेत मदत करतोय. त्यांची मुलगी देखील त्यांना त्यांच्या कामात मोलाची मदत करतेय. सरस्वती ह्यांच्या प्रयत्नांमुळे आज अनेक स्पेशल मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत.

ठरवलं तर एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते आणि आपल्या मुलाबरोबरच इतर मुलांचेही कल्याण करू शकते हे सरस्वतींनी दाखवून दिले आहे. त्यांच्या ह्या कार्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version