आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
ताजमहाल म्हणजे भारताची शान… जगातील सात आश्चर्यांपैकी एक! भारतातील आग्रा या नगरात यमुनानदीकाठी हे स्मारक बांधलेे आहे. प्रेमाची निशाणी म्हणून मुघल बादशाह शाहजहानने त्याच्या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात ‘मुमताजमहल’ नावाचं हे स्मारक उभे केले.
ताजमहालचे बांधकाम संपूर्ण संगमरवरी आहे. ताजमहालचे बांधकाम इ. स. १६५३ मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली २०,००० कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले.
ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उदाहरण आहे. युनेस्कोने ताजमहाल या वास्तूला इ. स. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
हजारो पर्यटक दरवर्षी ताजमहाल बघण्यासाठी जातात. त्याची मूर्ती आपल्या डोळ्यांत साठवतात. ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीकच बनले आहे.
ताजमहालचे सौंदर्य आणि त्याची कारागिरी याबद्दल नेहमीच बोलले जाते.
ताजमहालचं बांधकाम म्हणजे एक आश्चर्यच आहे.
तर अशा या आश्चर्यकारक वास्तूबद्दल सर्वांत विचित्र अशी एक गोष्ट नेहमीच बोलली जाते, की हे बांधकाम झाल्यानंतर शहाजहानने कारागिरांचे हात कापून टाकले.
बापरे! किती भयानक आहे ना ही गोष्ट. ऐकल्यावर अंगावर सरसरून काटा आल्याशिवाय राहात नाही. ज्या हातांनी सुंदर कलाकृती केली, त्या कलाकृतीसाठी आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं.
त्या कलाकृतीच्या निर्मितीनंतर जर त्याचं फळ असं मिळणार हे माहीत असतं तर कोणीही कारागिरी ही कलाकृती करायला धजावला नसता, पण हे खरं आहे की ही एक दंत कथा आहे? पाहुया.
==
हे ही वाचा : ताजमहालशी निगडीत १५ रंजक गोष्टी, ज्या फारश्या कोणाला माहित नाहीत!
==
ताजमहालचं बांधकाम आणि ही वास्तू या सर्व गोष्टी आश्चर्यकारक तर आहेतच, पण पौराणिक गोष्टींपैकी आणखी एक गोष्ट सर्वांत विचित्र आहे ती म्हणजे एक पौराणिक वदंता.
या गोष्टीत असं सांगितलं जातं की, जे कारागीर स्वत:च्या हातांनी बनलेला ताजमहाल पाहून आनंदीत आणि आश्चर्यचकित झाले होते तेच दुसर्या दिवशी जास्त आश्चर्यचकित झाले कारण त्यांचे हात तोडले जाणार ही बातमी कानावर आली.
असे बोलले जाते की, दुसर्या दिवशी त्या सर्व कारागिरांचे हात तोडले गेले, पण ही एक सामान्य लोककथा असावी. पण तरीही पर्यटकांना ती आवर्जून सांगितली जाते. कारण ही गोष्ट खरी असेल याचा कुठेही पुरावा नाही.
पण या गोष्टीमुळे ताजमहालच्या आश्चर्यात अजूनच भर पडते. कोणत्याही इतर पौराणिक कथांपेक्षा ही कथा जास्त प्रसिद्ध आहे.
पौराणिक मतानुसार शहाजहानने ताजमहाल पूर्ण झाल्यानंतर हे विलक्षण अप्रतिम अशा स्मारकाचे बांधकाम केलेल्या कारागिरांचे हात तोडण्याचे आदेश दिले, जेणेकरून ते कधीही अशा प्रकारचे दुसरे वैभवशाली स्मारक बांधू शकणार नाहीत.
==
हे ही वाचा : शाहजहानची शेवटची इच्छा असलेला “काळा ताजमहाल” का नाही बनू शकला? जाणून घ्या
किती क्रूर कल्पना आहे ना? एवढ्यावरच हे थांबत नाही, तर असंही म्हणतात की, या बांधकामात असणार्या कामगारांचे डोळेपण काढून टाकले गेले, की त्यांनी याच्यापेक्षा दुसरी सुंदर गोष्ट पाहू नये.
जणू हे सुंदर स्मारक बांधून त्यांनी मोठा गुन्हाच केला.
जी वास्तू पाहून लोकांना अतीव आनंद होतो ती बांधणार्या कामगारांना ही शिक्षा का? त्यांनी आपले हात आणि डोळे गमावले तर त्यांच्या उर्वरित आयुष्याला काय अर्थ राहिला असेल? असे विचार आणि हळहळ आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही.
बर्याच इतिहास तज्ज्ञांचं असं मत आहे की, ही भयानक कथा चुकीची आणि निराधार आहे. त्याला काहीच पुरावा नाही. ही कथा उगीचंच रचित कथा असावी.
कारण असे कुठेही रेकॉर्ड किंवा पुरावे सापडले नाहीत, पण तरीही… जरी याला पुरावा नसला तरी त्या काळात हे असं घडण्याची शक्यता नाकारता मात्र येत नाही.
असं खरंच असेल तर हे फारच भयानक आहे. जे ऐकल्याने आपला आजही थरकाप उडतो.
पण काही लोकांचं म्हणणं असंही आहे की हे खरं नाही.
उलट शहाजहानने त्यांचे हात कापले असं म्हणतात म्हणजे काय केलं तर त्या कारागिरांना खूप पैसे दिले जेणेकरून त्यांना आयुष्यात परत काम करावं लागणार नाही.
काही लोक म्हणतात, की ताजमहालला आणि शहाजहानच्या त्याच्या पत्नीवरील प्रेमाला प्रसिद्धी देण्यासाठी ही कथा रचली आहे.
कारण ताजमहाल काय फक्त कारागिरांनीच बांधला का? त्याचं डिझाईन करणं किंवा कॉन्ट्रॅक्ट कुणीतरी दुसर्या संस्थानाने घेतलं असेल. ज्याने ते काम घेतलं असेल तोही तितकाच सामर्थ्यवान असणं आवश्यक आहे, मग त्याच्याबाबतीत असं कसं केलं जाईल?
सतराव्या शतकाच्या शतकादरम्यान शहाजहान ही जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी अशी त्यांची ओळख होती. मुघल साम्राज्यातील सर्वांत शक्तिशाली असा तो बादशहा होता.
त्यामुळे जर आपण अर्थशास्त्राप्रमाणे इतिहासाचा विचार केला, तर या गोष्टीला साफ नकार दिला जातो की, शहाजहानसारख्या पराक्रमी राजाने या मूर्खपणाच्या गोष्टी केल्या असतील.
तसंच काही विचार असेही मांडले जातात की, शहाजहानने कारागिरांचे हात तोडले हे चुकीचे आहे. कारण शहाजहान मुघल सम्राट म्हणून ओळखला जात होता तो अराजकतेने राज्य करत नव्हता.
तसंच शहाजहानला बांधकाम करण्यामध्ये खूपच आवड होती आणि ताजमहाल म्हणजेच आपली अंतिम निर्मिती आहे असा विचार त्यांनी केला नसावा.
त्यांनी मकबरे बांधले, लाल किल्ला, जामा मशिदी बांधून घेतली जर हे बनवणार्या कामगारांचे त्यांनी हात कापले असते तर कोण कारागीर त्यांच्याकडे काम करायला तयार झाला असता?
असंही म्हणतात की, खरंतर शहाजहानला स्वत:साठी पण ताजमहाल बांधायचा होता, पण तो काळ्या रंगात. यमुना नदीवर बरोबर पांढर्या ताजमहालच्या समोर ही जागा निश्चित केली होती.
त्याचे काही पुरावे पण आहेत. जर अशा पद्धतीचं बांधकाम परत करण्याची इच्छा होती, तर तो त्या कारागिरांचे हात कधीही कापणार नाही.
खरं काय खोटं काय इतिहासच जाणे.
पण या सर्वांवरून असं वाटतं की, ही खरोखरीच एक दंतकथा असावी. कारण प्रिय पत्नीच्या विरहानं व्याकूळ झालेल्या शहाजहानने आपल्या पत्नीसाठी ‘मुमताजमहल’ बांधला. म्हणजे तो बादशहा कितीही शूर असला, सम्राट असला तरी मनानं तितकाच हळवा असला पाहिजे.
असा सम्राट कधीही असा विचार करणार नाही. परंतु तरीही त्या काळात अशा शिक्षा किंवा असे प्रसंग होणारच नाहीत असंही काही सांगता येत नाही.
किंवा ताजमहालची प्रसिद्धी वाढविण्यासाठी ही कथा रचली गेली असावी आणि वर्षानुवर्षे ती आपण ऐकत आहोत म्हणून ती सत्य आहे यावर आपला विश्वास बसून जातो.
==
हे ही वाचा : ताजमहाल आणि राष्ट्रपती भवन सुद्धा विकणारा भारताच्या इतिहासातला चलाख महाचोर!
काही असो ताजमहाल सारखी प्रतिकृती परत झाली नाही एवढं मात्र निश्चित आणि ताजमहालची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे, पर्यटकांची गर्दी होत आहे आणि तो बघताना पर्यटक म्हणत आहेत, ‘किती सुंदर आहे.
ही वास्तू ती बनविणार्या कारागिरांना, बादशहाला लाख लाख सलाम’
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.