' चटपटीत “भेळपुरी” मुळे गोऱ्या सायबाने ‘आचाऱ्यावर’ झाडल्या बंदुकीच्या गोळ्या! – InMarathi

चटपटीत “भेळपुरी” मुळे गोऱ्या सायबाने ‘आचाऱ्यावर’ झाडल्या बंदुकीच्या गोळ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी,

कधी ऐकलंय का तुम्ही की भेळपुरीमुळं कोणाचा जीव गेलाय?

आत्ता तुम्ही म्हणाल, “हम तो जान छिडकते हैं भेलपुरी पर।और भी किसीने जान छिडक दी होगी”।
अशी “जान देणं” वेगळं हो..पण खरोखरच कोणी केवळ भेळपुरीसाठी कोणाचा जीव घेतला असेल?

हो खरंच अशी घटना घडलीय. खोटं नाही सांगत राव..

ऐका खऱ्याखुऱ्या भेळपुरीपायी झालेल्या हत्येची गोष्ट ती देखील कोणा सोम्यागोम्याची नव्हे तर चक्क एका ब्रिटिश खानसाम्याच्या हत्येची.

 

Bhelpuri

 

भारत हा खवय्यांचा देश. इथे अनेक राज्य. प्रत्येक राज्याची अगदी तिथल्या छोट्या छोट्या गावाची स्वतःची अशी एक खाद्यसंस्कृती आहे.

आता आपण गावाची म्हणतोय पण खरंतर प्रत्येक घराची किंवा प्रत्येक गृहिणीची स्वतःची अशी एक खासियत असते.

अमुक व्यक्तीच्या हातची खिचडी मस्त लागते, तमुक एक व्यक्तीच्या हातची पुरणपोळीची चव दुसऱ्या कोणाच्या सुद्धा हाताला येणारच नाही असं छातीठोकपणे सांगितलं जातं.

म्हणजे एकच पदार्थ दहा जणींनी केला तरी कोणतीच चव दुसरीशी जुळणार नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याचे अगदी साधे कारण म्हणजे त्यात घातलेले घटक पदार्थ किंवा मसाले एकच असले तरी त्याचे प्रमाण कमी जास्त असू शकते, किंवा पदार्थ शिजवायची, तळायची पद्धत भिन्न असू शकते.

आपल्याकडे संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर दिवसभराचा शीण घालवण्यासाठी काहीतरी चटकदार खायची इच्छा होते.

या मध्ये लोकांच्या आवडीचे पदार्थ म्हणजे कांदाभजी, पाणीपुरी, रगडापुरी, भेळ, भेळपुरी, बटाटेवडा, वडापाव, सामोसे, कचोरी असे विविध पदार्थ.

त्यातही भेळेचा आणि पर्यायाने भेळपुरीचा नंबर अव्वल.

 

chai pakodas

 

भेळ म्हणजे नाव काढल्यावर तोंडाला पाणी सुटणारच.

मस्तपैकी कुरकुरीत मुरमुरे, शेव, पापडी आणि गाठी, तळलेले शेंगदाणे, कांदा लिंबू, आणि पुदिना घालून केलेली चिंचगुळाची खट्टाई.

इतकेच घटक पदार्थ पुरेसे असतात.

आता एवढे छान पदार्थ एकत्र आणून केला जाणारा नवीन पदार्थ म्हणजे आपली चटकदार भेळ. आणि यातच छोट्या स्पेशल बनवलेल्या पुऱ्या घातल्या की झाली भेळपुरी.

खरंतर ही भेसळच म्हणायला हवी. हाहाहा !! पण पब्लिक या भेसळीवर जाम खुश असतं हं.

बहुतेक भेसळ शब्दातील स काढून टाकला असावा खवय्यानी आणि नुसता भेळ शब्द प्रचलित झाला असावा.

 

bhel

 

आता ही भेळ आपल्या भारतीय खवय्यांसारखी एक ब्रिटिश ऑफिसरला देखील आवडली. मग काय विचारता?

जरा बघुया ही गोष्ट काय आहे ती..

ब्रिटिश भारतात आले तेव्हा इथल्या लोकांचे मिरची आणि मसाल्यावरील प्रेम बघून त्यांना जाम ठसकाच बसला होता. भारतात तसे मसाल्याचे आणि एकूणच तिखटाचे प्रमाण बऱ्याच अंशी जास्त आहे.

पण हळूहळू भारतीय चवीशी किमान पन्नास टक्के तरी जमवून घ्यायला हवे हे ध्यानात घेऊन ते इथले पदार्थ चाखून बघू लागले. त्यात त्यांना कांदा, कोथिंबीर मिश्र वास आकर्षित करू लागला. मग तो गंध भेळ नामक पदार्थाचा आहे हे कळल्यावर इंग्रजांनी तिकडे मोर्चा वळवला.

साहेबाला फार तिखट सोसत नाही हे लक्षात घेऊन खास कमी तिखटाची भेळ किंवा भेळपुरी साहेबांसाठी बनू लागली. साहेब आपले फुरफुरणारे नाक पुसत भेळपुरी तबियतसे चापू लागले.

ब्रिटिश अधिकाऱ्यांचा एक अतिशय प्रसिद्ध असा आचारी म्हणजे साहेबांच्या भाषेत शेफ होता, ज्याचे नाव होते विल्यम हेरॉल्ड. तर भारतातील युद्धापरिस्थितीचा आढावा घेणाऱ्या एका पथकासोबत तो भारतात आला होता.

 

british inmarathi
Pinterest

तो ज्या अधिकाऱ्याकडे शेफ म्हणून चाकरी करत होता तो अधिकारी इंग्लंडमधेच होता मात्र त्याने शेफला आपल्या आवडत्या शेफला भारतातून येताना आपल्या आवडत्या भेळपुरीची रेसिपी आणायला सांगितले.

आपले इंग्रज बल्लवाचार्य विल्यम हेरॉल्ड सगळीकडे जाऊन भेळपुरीची रेसिपी जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागले. आता त्यांना सुरवातीला सांगितल्याप्रमाणे भारतातील प्रत्येकाच्या स्वतःच्या अशा रेसिपीची माहिती नव्हती.

एकाने माहिती दिली आणि ती उतरवून घेतली आणि सायबाला धाडली. असे करून चालणार नव्हते.

त्या काळात नेमके इंटरनेट नव्हते म्हणजे असलं काही मायाजाल असतं याचा पुसटसा गंध देखील नव्हता कोणालाच. नाहीतर घरबसल्या सायबानीच शोधली नसती का रेसिपी?

आता आपल्या सायबाला त्याला आवडणारी भेळपुरीची रेसिपी शोधून द्यायची आणि तेवढंच नाही तर ती करून खायला घालायची कारण साहेब सारखं सारखं फ्रेंच फ्राईज खाऊन कंटाळला होता!

आणि भारतात असताना खाल्लेली भेळपुरी त्याला आठवत होती.

विल्यमने भेळपुरीची रेसिपी शिकून आपल्याला भेळपुरी खायला घालावी ही सायबाची मनीषा.

 

bhel puri inmarathi

 

वास्तविक विल्यम इतका चांगला शेफ होता की त्याच्या हातच्या पदार्थाची चव ही अंतिम समजली जायची इतकी की कधीकधी इंग्रज ऑफिसर देखील त्याच्या पदार्थांची चव भारतीयांसारखी बोटं चाटून पुसून घ्यायला लागले होते.

विल्यम मुंबई दिल्लीतील गल्ल्या पालथ्या घालू लागला. हा भेळपुरीवाला तो भेळपुरीवाला असे एका कडून दुसऱ्याकडे जाऊ लागला.

गम्मत अशी की प्रत्येकजण त्याला वेगळीच रेसिपी सांगू लागला. प्रत्येकाचे घटकपदार्थ वेगवेगळे असायचे.

बरं तितक्या चवी चाखून देखील एकाची चव दुसऱ्याशी जुळत नव्हती. तो बिचारा चक्रावला. यातील नेमकी कोणती चव आपल्या सायबाला आवडली होती हे कसे समजणार?

बरं आत्तासारखे मोबाईल अस्तित्वात नव्हते नाहीतर फोनवरून विचारता नसतं आलं का? विल्यम बिचारा थकून गेला.

ब्रेड बटर चीझ अंडी आणि फ्रेंच फ्राईज खायच्या सोडून हे सायाबानं कसलं खुळ डोक्यात घेतलंय हेच त्याला समजेना.

बरं सायबाची ऑर्डर होती की मोठ्या प्रमाणात भेळपुरी करून खाऊ घालायची.

त्यातून इतक्या कमी कालावधीत त्याने एवढ्या वेळा भेळपुरी खाल्ली होती की तिखट खाऊन तोच हैराण झाला होता.

आपलं काम आटोपून विल्यम परतला तेव्हा तो रिकाम्या हाताने परतला होता कारण ना त्याच्याकडे भेळपुरीचे सामान होते ना रेसिपी.

साहेब मात्र मुरमुरे, बारीकचिरलेला लाल कांदा , शेव, पुरी, बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा घमघमाट वरून घातलेली आंबटगोड चटणी, चाट मसाला आणि थोडीशी तिखट चव याच आठवणीत रमला होता.

विल्यम आल्यावर साहेबाने भेळपुरीची चौकशी केली.

“साहेब मी शोधलं बरंच पण नाही मिळाली रेसिपी तुम्हाला हवी तशी. आता फ्रेंच फ्राईजवरच भागवावे लागेल”. विल्यम घाबरत सांगू लागला.

भेळपुरीच्या स्वप्न रंजनात मग्न झालेल्या साहेबांचा राग अनावर झाला. त्याच झटक्यात साहेबाने बंदूक उचलली आणि थेट विल्यमवर गोळी झाडली. बिचारा विल्यम जागीच मृत झाला.

 

gun point inmarathi

 

भारतीय चटकदार भेळपुरीमुळे एखाद्याचा जीव जाण्याची ही घटना अजब आणि दुःखदच म्हणायची.

एक मग्रूर अधिकाऱ्याच्या वर्तनाला आधीच सर्व सैनिक कंटाळले होते त्यात त्यांना चांगलं चविष्ट खाउपिऊ घालणारा त्यांचा लाडका शेफ

अधिकाऱ्याच्या बेमुवर्त वर्तनाने त्यांना सोडून कायमचा निघून गेला होता ही त्यांच्यासाठी मोठी हानीच होती. तर अशी ही भेळपुरीची कहाणी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?