आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
मानवी मनाला नेहमीच वेगवेगळया ठिकाणांची, आश्चर्यचकित करणाऱ्या निसर्गाच्या चमत्कारांची भुरळ पडते आणि तो ती एक्सप्लोअर करायला घराबाहेर पडतोही! अश्या अनेक गोष्टी ज्या मानवनिर्मित आहेत त्याही बघायला आपल्याला आवडतं.
अशीच काही पर्यटन स्थळं काही काळ खूप चर्चेत होती परन्तु कधी निसर्गामुळे तर कधी वाढत्या शहरीकरणामुळे, कधी चुकीच्या अंधश्रद्धांमुळे, मानवी चुकांमुळे आता अस्तित्वात नाहीत.
पाहूया त्यापैकी काही स्थळांची थोडक्यात माहिती…
१०जून १८८६, रोजी, न्यूझीलॅन्डमध्ये एक अशीच घटना घडली. जगातलं आठवं आश्चर्य असं समजलं जाणारे रोतामाहाना तलावाकाठचे गुलाबी आणि पांढरे उतार नष्ट झाले. काय होते उतार? तर जगात सगळ्यात जास्त सिलिका संचय असलेले उतार हे निसर्ग निर्मित आश्चर्य होतं.
एका पर्वताच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे नैसर्गिक आकर्षण खऱ्या अर्थी पाताळात गेलं, आणि एक नवीन आश्चर्य जगाला दिसलं तो होता- वाईमांगु गिझर!
वाईमांगु ज्वालामुखीच्या उद्रेकात खूपच काळी माती आणि वाळू जवळजवळ १५०० फूट उंच उडाली. ह्या घटनेने लोकांची नजर उत्तर भागाकडे वळली जो ज्वालामुखी उद्रेकप्रवण आहे.
तिथेच १९०४ मध्ये एक मोठं भूस्खलन झालं होतं. जरी ही दोन्ही स्थळं आता नाही आहेत तरीही पर्यटकांवर त्यांचे अस्तित्व नक्कीच छाप पाडतं. त्यांचं अस्तित्व काही फोटोंपुरतं आणि काही पुस्तकातच आपल्याला दिसेल.
१. पूर्वीचे पेन्अनसिल्व्हानिया स्टेशन (न्यू यॉर्क,अमेरिका)
ज्याला आता पेन स्टेशन म्हणून ओळखतात, ते मोठ्या विस्ताराचं स्टेशन असेलही, परंतु जुन्या स्टेशनची सर त्याला नक्कीच नाही,
कुठे कमी उंचीचे मोठेमोठे हॉलवेज आणि एकदम चौकोनी ठोकळेबाज स्टेशन आणि कुठे वेळ लावून घडवलेलं बॉक्स पद्धतीचं मोठ्या मोठ्या कमानी असलेलं, घुमट असलेलं आणि सुंदर नक्षीकाम असलेलं जुनं स्टेशन, ती अदा ती नजाकत कामातली नव्या स्टेशन मध्ये नक्कीच नाही .
जवळजवळ दर वर्षी १०० मिलियन प्रवाशांचं १९४० च्या काळात ह्या स्टेशनने स्वागत केलं. परंतु १९५० च्या दशकात जेट एज च्या प्रारंभामुळे आणि राज्यांतर्गत हायवेजमुळे प्रवाशांची संख्या खूप कमी झाली.
नवीन पेन प्लाझा आणि मॅडिसन स्क्वेअर गार्डन १९६२ साली करण्याची घोषणा झाली अन् अगोदर च्या सुंदर स्टेशन एक तळघरातील छोटयाशा रूममध्ये सीमित झाले. हे अगदी सहजही झालं नाही. १९६३ मध्ये जेव्हा जुन्या स्टेशनचं डिमॉलिशन झालं तेव्हा लोक अस्वस्थ झाले.
‘न्यूयॉर्कटाइम्स’ मध्ये प्रश्न विचारला गेला,
“एखादं शहर असं कसं परवानगी देऊ शकतं, अशा विद्रुपीकरणाला, एका काळच्या मोठ्या आणि सुंदर रोमन कलेच्या प्रतिकाच्या तोडफोडीला?”
पुढे ह्याच गोष्टीमुळे ऐतिहासिक वारसे जपण्याच्या चळवळीला खतपाणी मिळालं! आणि पुढच्या दशकातच, ‘न्यूयॉर्क सिटी लँडमार्क प्रिझेर्वेशन ऍक्ट’अन्वये ‘ग्रँड सेंट्रल टर्मिनल’ वाचवलं गेलं.
२. गुएरा फॉल्स (पॅराग्वे,ब्राझील)
गुएरा फॉल्स धबधबा हा त्याच्या क्षमतेनुसार सर्वात शक्तीशाली धबधबा म्हणून ओळखला जातो. त्यातून १७५०००० क्यूबिक फूट पाणी प्रत्येक सेकंदाला वहातं.
हे नायगरा धबधब्याच्या दुप्पट आहे आणि व्हिक्टोरिया फॉल्स्च्या १२पट. पण हा भूतकाळ झाला.
आता हे फॉल्स इटाईपु धरणाच्या खाली शोधावे लागतील.
एकूण १८ धबधबे मिळून हा तयार झाला होता आणि तो ३७५ फुटांवरून कोसळत असे आणि त्याचा आवाज अगदी २० मैलांवरूनही ऐकू येई. जवळपास तीस वर्षांपूर्वी १९८२ मध्ये हा एवढा मोठ्ठा धबधबा एका जलविद्युत प्रकल्पासाठी नाहीसा केला गेला. त्या अगोदर तो बघायला देशोदेशीचे पर्यटक ब्राझील- पराग्वे सीमेवरील ‘पराना’ नदीला भेट देत असत.
३. ओरिजीनल शेक्सपिअरचं ग्लोब (थिएटर)
थेम्स नदीने मागच्या पाच शतकांपासून आतापर्यंत तीन ग्लोब थिएटर्स पाहिली. पहिलं जे १५९९ मध्ये विलियम शेक्सपिअरच्या ‘द लॉर्ड चेंबर्लेन कंपनी’ने बांधलं होतं. परन्तु जून महिन्याच्या २९ तारखेला, ते हेन्री आठवा’ ह्या प्रयोगाच्या वेळेस आगीत भस्मसात झालं.
त्यानंतर दुसरं ग्लोब थिएटर बरोबर एका वर्षाने त्याच जागी सुरू झालं; तेही १६४२ साली काही लोकांमुळे ज्यांना थिएटर परफार्मन्सेस नको होते, बंद झालं
पहिल्या ग्लोब थिएटर ची परंपरा चालू ठेवण्यासाठी पुन्हा एक बांधकाम केलं गेलं जे ७५० फूट अंतरावर होतं पहिल्या ग्लोब थिएटर पासून आणि त्याचं नाव ठेवलं गेलं शेक्सपिअर्स ग्लोब! ते १९९७ पासून लोकांना उपलब्ध केलं गेलं. ओरिजिनल ग्लोब हे आपल्या नजरेआड झालं आणि ते पुन्हा दिसू शकणार नाही हे एक कटू सत्य आहेच!
४. सुत्रो बाथ्स-सॅन फ्रान्सिस्को-अमेरिका
१८९४ मध्ये सुत्रो बाथ्स लोकांसाठी उपलब्ध झाले. एकूण तीन एकराच्या विस्तारावर पसरलेल्या ह्या वास्तूमध्ये एकूण सात पूल होते त्यासर्वांमध्ये पाण्याचं तापमान वेगवेगळं असायचं.
तलावाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे स्प्रिंग बोर्ड, उंच उडीसाठी असलेले बोर्ड,आणि ट्रेप्रिझ ही होते, त्याची क्षमता १०००० लोक मावतील एवढी होती आणि पाण्याशिवाय ही इतर आकर्षणही खूप होती जसे ‘हिस्टरी म्युझियम’ ज्यात इजिप्तच्या ममीजची मॉडेल्स ,मेक्सिको आणि चीनमधील कलाकृती होत्या.
जगाच्या दृष्टीने ते खूप सुंदर मैदान होते ,जे सुमद्रासमोर होतं आणि ‘ सॅन फ्रान्सिस्को’ सारख्या ठिकाणी होतं. त्याची सगळ्यात मोठी अडचण ही त्याचा अवाजवी दर होता.
त्याच्या मालकाने ह्या प्रकल्पाला ‘आईस स्केटिंग रिंक’ मध्ये बदलवून सुद्धा तो चालला नाही. असा हा व्यवसाय चालला नाहीच आणि तोट्यात चालल्यामुळे १९६४ मध्ये बंद पडला आणि पुढे दोन वर्षांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
आता त्याचे अवशेष, ‘गोल्डन गेट रिक्रिएशन एरिआ’ म्हणून संरक्षित केले आहेत.
५. नानजिंगचा पोर्सलेनचा मनोरा – चीन
मध्ययुगातील सात आश्चर्यांपैकी एक मानलं जाणारं आश्चर्य म्हणजे हा मनोरा! तो पंधराव्या शतकात बांधला गेला. ‘मिंग’ राजघराण्याच्या काळात बांधलेली हि रचना मानवी कल्पनाशक्तीचा एक सुंदर नमुना होता.
अष्टकोनी पायावर २६८ फूट उंच हा मनोरा होता. यांगत्से नदीच्या तीरावरील हा एकूण नऊ मजली मनोरा सूर्यप्रकाशात चमकत असे कारण त्याचं अंग न् अंग पॉलिश केलेलं होतं. चार शतके तो दिमाखात उभा राहिला पण ‘ताईपिंग’ बंडखोरीच्या काळात मात्र तो नष्ट केला गेला.
त्याचे अवशेष २०१० पर्यंत तसेच होते, एका चिनी उद्योजकाने तो मनोरा पुन्हा बांधण्यासाठी १५६ मिलियन डॉलर्स देणगी दिली.
६. न्यूयॉर्क हिप्पोड्रोम-अमेरिका
१०० बाय २०० फूट स्टेज आणि ५३०० लोकांना बसण्याची क्षमता असलेलं प्रेक्षागृहाची कल्पना करू शकता? होतं, असं प्रेक्षागृह,मॅनहॅटन शहराच्या मध्यभागी जगातील सगळ्यात मोठं प्रेक्षागृह न्यू यॉर्क हिप्पोड्रोम!
ह्या प्रेक्षागृहात तेव्हा खूप मोठे मोठे कार्यक्रम झाले जसे हॅरी हौदिनी आणि जम्बो मुझिकल्स!पण सॅनफ्रान्सिस्कोच्या सुत्रो बाथ्ससारखंच ते खूप खर्चिक/महागडं होतं.
चालू झाल्यानन्तरच्या १७ वर्षांनी मुरीश पद्धतीच्या इमारतीचं बॉंड विल्हे थिएटर ,झालं आणि पाच वर्षांनंतर ते चित्रपटगृह आणि ऑपेरा हाऊस आणि अखेर खेळाचं मैदान! जागतिक मंदीचा तडाखा बसून हेही बंद पडलं आणि जिथं अभिनय होत, तिथे कार्यालये आणि पार्किंग झाली.
७. चाकलटया ग्लेशिअर (बॉलिव्हिआ)
बॉलिव्हिआचं सगळयात नावाजलेलं पर्यटन स्थळ, चाकलटया ग्लेशियर, अँडीज पर्वतावर १७४०० फीटवर होतं. जगभरातले स्कीअर्स पृथ्वी वरील सर्वोच्च ठिकाणी स्किंग करायला येत असत.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेल्या तापमान वाढीमुळे हे १८००० वर्षं जुनं आकर्षण बर्फाच्या ढिगाऱ्यात बदलेलं आहे जिथं कुणी साधा स्किअर पण जाणार नाही!
चाकलटया ग्लेशियर च्या इथे पहिला रोप वे होता जो दक्षिण अमेरिकेतील पहिला असा प्रयत्न होता. त्यांनंतर, सगळ्यात उंच स्की लॉज ही होता;
जो एव्हरेस्ट च्या बेस कॅम्पपेक्षा जास्त उंचीवर होता,त्याचा स्की एरिया विषुववृत्ताच्या अगदी जवळ होता, तो आता बंद केला गेला आहे अनिश्चित कालावधीसाठी! अमायरा भाषेत बर्फाचा ब्रीज असं त्याला सम्बोधलं जाई (bridge of ice) परन्तु आता मात्र त्याचं जुनं वैभव अस्तंगत झालं आहे.
८. अमेरिका डिस्नी चं रिव्हर कन्ट्री आणि डिस्कव्हरी आयलँड
वॉल्ट डिस्ने चं पहिलं वॉटरपार्क जे आता बंद पडलं आहे.
ते पूर्वी एक पर्यटन स्थळ होतं. जवळजवळ १०वर्षे झाली ह्या गोष्टीला!
फ्लोरिडा मध्ये बे लेक एरिया इथे असणाऱ्या ह्या वॉटरपार्क मध्ये स्लाईड्स, झुले होते.
राफ्टिंगही व्हायचं परन्तु वार्षिक डागडुजी साठी ते २००१ मध्ये बंद केलं गेलं ते आजतागायत! डिस्ने चे नवीन पार्क टायफून लगून आणि बिझ्झार्ड बीच ह्यांना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे आणि ९/११नन्तर पर्यटकांचा ओढा रिव्हर कन्ट्रीला कमी झाला.
बे लेक ला लोक अजून एका गोष्टीसाठी यायचे ते म्हणजे झू -डिस्कव्हरी आयलँड. जो आता बंद झाला आहे, तिकडेच पशुपक्षी डिस्ने ऍनिमल किंग्डम मध्ये हलवले गेले जे १९९८ मध्ये सुरू झाले आणि १९९९ मध्ये डिस्कव्हरी लॅन्ड पूर्ण पणे बंद केलं गेलं. पण अजूनही डिस्नेचे अधिकारी तिथे आणि रिव्हर कन्ट्रीवर लक्ष ठेऊन असतात.
९. रॉयल ऑपेरा हाऊस, वॅलेटा-माल्टा
हे रॉयल ऑपेरा हाऊस एडवर्ड मिडलटन बॅरी ह्या आर्किटेक्ट ने १८६० साली डिझाईन केलं होतं. हे ऑपेरा हाऊस माल्टाच्या राजधानीचे सौंदर्य वृद्धिंगत करत होते; परन्तु केवळ सहा वर्षानीच, आगीत त्याचा आतला भाग भस्मसात झाला, त्यांनतर त्याची दुरुस्ती केली गेली पण दुर्दैव पहा!
दुसऱ्या जागितक महायुध्दात त्यावरच बॉम्बच पडला. सगळी वास्तू नष्ट झाली, केवळ काही खाम्ब उरले, ज्यांचा वापर करून २०१३ मध्ये ओपन रॉयल पाइझा थिएटर चालू झालं.
१०. जोनाह ची कबर-इराक
इसिस च्या अतिरेक्यांनी उध्वस्त केलेलं हे खूप महत्त्वाचं धार्मिकपर्यटनस्थळ! १९१४ मध्ये स्फोटकं लावून हे उध्वस्त करण्यात आलं. का बरं? तर इसिसच्या एकदम कट्टरपंथीय अतिरेक्यांना हे मान्य नाही.
मोसुल मधील खूप प्राचीन मस्जिद जिथे प्रेषित जोनाहची कबर आहे हे यहुदी आणि ख्रिश्चन तसेच मुस्लिम समुदायासाठी देखील महत्त्वाचं आहे ज्या जोनाहला व्हेलने गिळले होते असे मानले जाते.
आपल्या कट्टरतेपायी इसिस च्या लोकांनी अनेक इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्याच पण एक ऐतिहासिक वारसाही नष्ट केला.
हे सर्व वाचून वाईट वाटतं, हो ना? नक्कीच आपण ह्यावरून बोध घेतला पाहिजे. निसर्गामुळे होणाऱ्या हानीबद्दल आपण काही करू शकत नाही परन्तु मानवी चुकांमुळे होणारं पर्यटन स्थळांचं नुकसान आपण नक्कीच टाळू शकतो.
ह्या वास्तू, ही ठिकाणे बोलत असतात, सांगत असतात कहाण्या अनेक! माहिती देत असतात त्यांच्या काळाची, त्यांचं झालेलं थोडंसं ही नुकसान खूप मोठा इतिहास नजरेआड करत असतं आणि जुन्या आणि नवीन पिढीतील अंतर वाढवत असतं.
म्हणूनच त्यांचे होईल तेवढे संरक्षण करणं हे त्या त्या राष्ट्राची, पर्यटक म्हणून आपल्या पातळीवर आपली जबाबदारी आहे. आपण ती नक्कीच पाळू या.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.