Site icon InMarathi

द्राक्षांच्या एका घडाची किंमत तब्बल साडेसात लाख रुपये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

“फळं” आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणार्‍या महत्वाच्या घटकांपैकी एक. लहान मुलंअसोत किंवा मोठी माणसं, गर्भवती स्त्री, आजारी माणसे सर्वांना फळ हे अतिशय उपयुक्त आणि पोषक शिवाय सर्वांचे आवडतेही.

फळे आवडत नाहीत असा मनुष्य विरळाच बघा. कोणी फळं नुसती कापून खातो तर कोणी मिल्क शेक्स किंवा स्मूदी बनवून आपल्या आवडीच्या फळांचा समाचार घेतो.

काहीजण तर डायटच्या नावाखाली नुसतीच फळे आणि ज्यूस वर दिवसभर पळत असतात.

कधी कधी ऋतुमान किंवा काही अन्य कारणांनी त्यांच्या किमतीत वाढ होते तेव्हा नेहमी इतकं नाही पण प्रत्येक जण जमेल तशी आपल्या ऐपती प्रमाणे फळे खरेदी करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करत असतो.

 

 

एकूणच काय तर प्रत्यक्ष आहार म्हणून आपण फळे खात नसलो तरी फळांना आपल्या निरोगी आयुष्यासाठी आपण आपल्या रोजच्या खाण्यात कुठे ना कुठे एक हक्काचं स्थान दिलेल आहे.

सामान्य माणसाचं त्यासाठीही बजेट ठरलेलं असतं. प्रत्येक कुंटुंबात मिळकतीचा एक भाग अन्नधान्यासाठी राखीव असतोच नाही का? 

शेवटी माणूस कमावतो कशासाठी? सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठीच ना? परंतु फळे खाऊन मिळणार्‍या ह्या निरोगी आयुष्यासाठी काही लोक प्रचंड किम्मत मोजतात.

फळांसारख्या वस्तुसाठी ते एवढा पैसा खर्च करतात की त्यात आपल्या सात पिढ्या बसून फळं खातील. आज अशाच एका प्रचंड महाग अशा फळाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याची किम्मत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

 

 

जपान, आपल्या नव्या नव्या शोधांसाठी ओळखला जाणारा एक प्रगत आणि स्वयंपूर्ण देश.

केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर अन्न धान्याच्या बाबतीतही ते सतत प्रयोगशील आहेत मग ते रसायन विरहित शेती करणे असो किंवा कमीत कमी जागेत शेतीचे मोठ्यात मोठे उत्पादन घेणे. त्यासाठी नव्या नव्या प्रजातींवर येथे सतत शोध कार्य होतच असते.

तर ह्याच जपान मध्ये ईशिकावा येथे एका विशिष्ट प्राकारच्या द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. ही द्राक्षे खाणे हा तिथला स्टेटस सिंबॉल मानला जातो.

आपल्या खास आणि जवळच्यांना ही द्राक्षे भेट म्हणूनही दिली जातात. आणि म्हणूनच ही द्राक्षे खरेदी करण्यासाठी आपली साधारण खरेदी विक्रीची पद्धत वापरली जात नाही. मग कशी होते ह्या द्राक्षांची खरेदी विक्री ?

 

 

तर ऐका मंडळी, येथे चक्क द्राक्षांचा लिलाव केला जातो. होय लिलावच केला जातो. आत्ता परवाच द्राक्षांसाठी आजवरची सर्वात जास्त बोली लावली गेली आहे. आणि तीही लाखांच्या घरात.

होय होय लाखांच्याच घरात. ह्या द्राक्षांचा एक घड चक्क साडेसात लाखात विकला गेलेला आहे. चकित झालात ना? होय ही द्राक्षाचीच किम्मत आहे.

द्राक्षाच्या जातीतले हे फळ म्हणजे “रुबी रोमन” जातीची द्राक्षे. ह्या द्राक्षांच्या एका घडाची किंमत सुमारे पावणे तीन लाखांपसून सुरू होते.

एका घडामध्ये केवळ तीस ते पस्तीस द्राक्षे असतात आणि यातील प्रत्येक द्राक्षाचे वजन सुमारे वीस ग्राम इतके असते. ह्याचा रंग माणका सारखा लालबुंद असल्याने सर्वानुमते ह्या फळाचे नाव “रुबी रोमन” असे ठेवण्यात आले.

ह्याचा द्राक्षाचा आकार एका पिंग पॉंग बॉल एवढा असतो. ह्याची पहिली लागवड झाली ती २००८ साली. आणि अल्पावधीतच हे प्रसिद्ध झाले.

ह्या द्राक्षाची लागवड करण्याचा हक्क केवळ आणि केवळ जापान कडेच आहे, इतर कुठेही त्याची लागवड केली जात नाही. जपानमध्ये ही द्राक्षे विकण्यासंबंधी नियमही फार कडक आहेत.

 

 

शिवाय ह्या द्राक्षांच्या घडातील प्रत्येक द्राक्षाचे वजन २० ग्राम त्यानुसार आकार आणि त्यातील साखरेचे प्रमाण कमीतकमी १८% हवे हया विषयी  काटेकोर नियम आहे. जे तितकेच काटेकोरपणे पाळले जातात.

प्रत्येक द्राक्षाच्या गुणवत्तेची अगदी कसून तपासणी केली जाते आणि नंतरच त्यावर खात्रीचा शिक्का मारला जातो. आणि हे सर्व सोपस्कार झाले की मग ही द्राक्षे लिलावासाठी ठेवली जातात.

हया व्यतिरिक्त जपानमध्ये आणखी काही आणखी महागडी फळे आहेत मात्र त्यात खास प्रसिद्ध आहेत, “तइयो नो तामागो” म्हणजेच  “सूर्याचे अंडे” नावाचा आंबा.

हा दिसायला सूर्यासारखाच सोनेरी दिसतो. म्हणून कदाचित ह्याला सूर्याचे नाव देण्यात आले असावे.

ह्या एकेका आंब्याचा आकार एका मोठ्या अंड्यासारखा असतो. ह्या आंब्यांच्या एका जोडीची किंमत सुमारे दोन लाख रुपये एवढी असते. मात्र हे फळ जास्त खाल्ले जात नसल्याने ह्या आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात घेतलेे जाते.

ह्या व्यतिरिक्त जपानचे स्क्वेयर मेलन देखील प्रसिद्ध आहे. “स्क्वेअर मेलन”, म्हणजे आकाराने चौकोनी असणारे कलिंगड, ह्याची लागवड देखील केवळ जपानमध्येच केली जाते.

 

 

ह्याची किंमत पन्नास हजार रुपये प्रतिनग पासून पुढे असून कालिंगडाचे वजन पाच किलो एवढे असते. कालिंगडाला हा विशिष्ट असा चौकोनी आकार यावा ह्यासाठी त्याला खास कालिंगडासाठी तयार केलेल्या चौकोनी साच्यात ठेवून वाढवले जाते.

हळूहळू कलिंगड जसे जसे मोठे होत जाते तसे तसे ते ह्या साच्यानुसार आकार घेत जाते.

कालिंगडाचा आकार चौकोनीच ठेवण्याचे कारण म्हणजे हे वाहतूक करण्यास सोपे पडते आणि जास्त संख्येत कंटेनर्स मध्ये साठवले जाऊ शकते.

तर ही होती जगातल्या सर्वात महागड्या फळाची माहिती. वाचून नक्कीच तुम्ही विचारात पडला असाल,पण मित्रांनो हयातून एक वेगळा विचार नक्कीच लक्षात घेण्यासारखा आहे.

दिवसेंदिवस इतर वस्तूंसोबत फळं आणि भाज्यांच्या किमती सुद्धा भराभर वाढत आहे.

आपण प्रगति करतोय पण त्यासाठी झाडांची कत्तल देखील करतोय ज्यापायी आपण आपल्या जल चक्राची वाट लावली आहे परिणामी अवेळी पाऊस पडतो आणि शेतीचे अतोनात नुकसान होते.

 

 

ज्यामुळे अन्न धान्याच्या किमतीत आणखिनच वाढ होते. असंच चालत राहिलं तर एकवेळ अशी येईल की आपल्याकडेही प्रत्येक फळ असंच लिलाव करून इतकच किंवा हयापेक्षा जास्तच महाग विकलं जाईल.

फळं खाणे हा आपल्याकडेही स्टेटस सिम्बॉल होऊन बसेल. अशी वेळ येऊ न देणे आपल्या हाती आहे.

झाड लावा. झाड जगवा. जेणेकरू पुढच्या पिढीलाही निसर्गाकडून त्यांच्या आवाक्यात असणारी रसाळ गोमटी फळे मिळतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version