Site icon InMarathi

आयआयटीच्या प्रवेशाची प्रश्नपत्रिका पाहून परदेशी प्राध्यापकांचे डोळे पांढरे झालेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

इंजिनिअर होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की आयआयटीला प्रवेश मिळावा. आयआयटीमध्ये ज्या प्रकारचे शिक्षण मिळते ते इतर कुठेही मिळत नाही म्हणूनच तिथे प्लेसमेंट सुद्धा चांगले होतात.

आयआयटीमधून इंजिनिअर झालेल्यांची गोष्टच वेगळी असते. पण आयआयटीला प्रवेश मिळवणे म्हणजे अत्यंत कठीण असते.

विद्यार्थी त्यासाठी अक्षरश: जीवाचे रान करतात. दिवसरात्र अभ्यास करतात. कोटासारख्या ठिकाणी जाऊन त्यासाठी खास कोचिंग घेतात.

काहीही करून एनआयटी किंवा आयआयटीला प्रवेश मिळावा हाच ध्यास घेऊन वर्ष दोन वर्षे अभ्यास करतात. अगदी आठवीत असल्यापासून तयारी सुरु करतात.

 

jagranjosh.com

हे सगळे अशासाठी की आयआयटीची प्रवेश परीक्षा असते, जिला आपण जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा JEE म्हणतो ती पार करणं हे फारच अवघड आहे.

ह्या परीक्षेचा मुलं इतका स्ट्रेस घेतात की त्यापायी जीव सुद्धा देतात.

हल्ली प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसचा सुळसुळाट झाला आहे. भरमसाठ फी देऊन प्रायव्हेट कॉलेजातून कुणीही सात-आठ वर्ष घालवून बीई किंवा बीटेकची डिग्री मिळवतो.

पण त्या डिग्रीला मार्केटमध्ये फार किंमत मिळत नाही. म्हणूनच जर तुम्हाला भारतात चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करायचे असेल तर JEE द्यावीच लागते आणि त्यात हाय रँक मिळवला तरच तुम्हाला IIT, IISc किंवा NIT कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो.

BITs ला प्रवेश मिळवायचा असेल तर BITSAT मध्ये चांगला रँक मिळवावा लागतो.

 


careers360.com

ह्या सगळ्या प्रवेश परीक्षा इतक्या कठीण आहेत की सामान्य विद्यार्थ्याला त्यांचे पेपर बघूनच टेन्शन येते. ह्या परीक्षेचे विद्यार्थ्यांबरोबरच अख्ख्या घरादाराला टेन्शन असते.

कारण इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे भवितव्य JEE वर अवलंबून असते.

दर वर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात आणि त्यातील फक्त काही हजार विद्यार्थी आयआयटी किंवा एनआयटीला प्रवेश मिळवू शकतात.

ही परीक्षा खरंच इतकी कठीण का ठेवतात हा प्रश्न पडतो कारण ह्या परीक्षेचे पेपर बघूनच परदेशी प्राध्यापकांचे सुद्धा डोळे पांढरे व्हायची वेळ आली तर विचार करा आपल्या विद्यार्थ्यांचे काय होत असेल!

काही आंतरराष्ट्रीय प्रोफेसरांनी JEE चा पेपर बघितला आणि हा त्यांचे म्हणणे आहे की ही परीक्षा “इम्पॉसिबली टफ” म्हणजेच आपल्या रोजच्या भाषेत “अशक्य कठीण” आहे.

 

krishijagran.com

टीबीज नावाच्या एका युट्युबरने युट्युबवर ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नमधील प्रोफेसरांना हा पेपर दाखवला आणि हा असा अवघड पेपर बघून ते प्रोफेसर सुद्धा घाबरले, दचकले असेच म्हणावे लागेल.

ह्या व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा होते आहे आणि आपण सुद्धा बघू शकतो की ह्या पेपरपुढे ऑस्ट्रेलियाच्या प्रोफेसरांनी सुद्धा हात टेकले.

काही प्रोफेसरांचे असे म्हणणे आहे की हा पेपर फारच मोठा आहे आणि काहींनी असे मत व्यक्त केले की ह्या एका पेपरमधून विद्यार्थ्यांच्या तिन्ही विषयांच्या ज्ञानाची परीक्षा होते.

ह्या पेपरबद्दल बोलताना गणितज्ज्ञ असलेले डॉक्टर बॅरी ह्यूज म्हणाले की,

“एकाच पेपरमधून मुलांच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणिताच्या ज्ञानाची परीक्षा घेणे हा अतिमहत्वाकांक्षी निर्णय आहे.

मी ह्या पेपरमधील गणित विभागातील काही प्रश्न बघितले आणि मी असे म्हणू इच्छितो की एका तासात ह्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळवणे हे माझ्यासाठी सुद्धा अवघड असेल.

 

Scholr

कदाचित मी एक प्रोफेशनल गणिती आहे म्हणून माझे विचार असे असू शकतील. पण मला गणित सोडवताना ते विस्तारित स्वरूपात सोडवायला आवडते.

एखादे गणित सोडवताना त्याचे उत्तर काढताना ते उत्तर तसे का येतेय हे स्टेप्समधून दाखवायला मला आवडते.

एखाद्या गणिताचे शेवटचे उत्तर “१००” इतके आले, पण ते कसे आले हे सांगायला मला आवडेल. नुसतेच “१००” असे उत्तर लिहून टाकणे मला जमणार नाही.”

तर डॉक्टर जॅस्मीना लॅझेंडिंक-गॅलोवे ह्यांचे असे मत आहे की हा पेपर चक्क मेकॅनिकल आहे आणि एखाद्याचे ज्ञान तपासण्यासाठीचा “ड्रिल फॉरमॅट” आहे.

त्या म्हणतात की, “ड्रिल फॉरमॅटमध्ये असलेल्या प्रवेश परीक्षा देताना मोठ्या परीक्षेच्या आधी मुलांनी भरपूर सराव करणे आवश्यक असते. ह्या परीक्षेवरून मुले पुढील शिक्षणात कशी प्रगती करतील ह्याचा अंदाज लावता येणे कठीण आहे. ”

 

The Guardian

JEE ची काठिण्य पातळी इतकी जास्त का असते हा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे.

कदाचित स्पर्धा कमी करणे हा त्यामागील उद्देश असावा किंवा फक्त हुशार आणि मेहनती व पात्रता असलेल्यांनाच त्यात प्रवेश मिळावा असा त्यामागचा उद्देश असेल असाच आपण अंदाज लावू शकतो.

कारण दर वर्षी सुमारे १२ ते १५ लाख मुले JEE मेन्स परीक्षेला बसतात आणि त्यातील फक्त २.२ लाख मुले JEE ऍडव्हान्स द्यायला पात्र ठरतात.

ह्या २.२ लाख मुलांपैकी केवळ अकरा हजार मुलांना देशातील सर्वोत्तम कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते. आणि उरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे पर्याय शोधावे लागतात.

ह्या परीक्षांची काठिण्य पातळी इतकी जास्त आहे आणि तरीही विद्यार्थी त्यातून तावून सुलाखून निघतात म्हणूनच बहुतेक बाहेरच्या देशात भारतीय टॅलेंटला मागणी आहे.

 

CNBC.com

असो. तर ह्यातून हे सिद्ध होते की JEE क्रॅक करणे हे परदेशी प्रोफेसरांना सुद्धा ‘अशक्य कठीण” वाटते त्यामुळे जे विद्यार्थी ह्यात यश मिळवतात त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version