Site icon InMarathi

“खून केलेल्या लोकांचं बर्गर” विकणाऱ्या माणसाची अंगावर काटा आणणारी सत्यकथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

क्रौर्य किती पराकोटीचं असू शकतं याची माणसाला कल्पना देखील करता येणार नाही. पण, काही लोकांच्या या क्रौर्याने गाठलेल्या परिसीमा पहिल्यावर लक्षात येतं माणूस नावाच्या सुसंकृत प्राण्यातही एक भयानक हिंस्र जनावर दडलेलं असतं.

मीटीनिची बायको त्याला वैतागून घर सोडून गेली, तिच्यासोबत त्यांचा छोटा मुलगा देखील होता.

त्या दोघांना शोधण्यासाठी आणि तिने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून बाहेर पडलेल्या मिटीनिने एकामागून एक खून करण्याचा सपाटाच लावला.

सावजाचा खून करून झाल्यानंतर त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून मिटीनि त्यांचे बर्गर बनवत असे आणि आपल्या छोट्या शॉपमधून ते विकत असे.

 

All That’s Interesting

मिटीनि एका छोट्या लाकडाच्या वखारीत काम करत होता. पोलिसांनी त्याला पहिल्यांदा पकडलं तेंव्हा तो पोलिसांशी भांडण करेल असा त्यांचा कयास होता. या माणसाचा स्वभाव प्रचंड तापट असल्याचे पोलिसांना माहित होते.

शेवटी, तो थोडा तरी विरोध करेल असं देखील त्यांना वाटलं. परंतु, तो स्वतःहून स्वतःच्या हीणकृत्याची कबुली देईल असं पोलिसांनादेखील वाटलं नव्हतं.

आपल्या कबुली जबाबात तो म्हणाला,

”माझ्या मनात बदला घेण्याची एक अतृप्त आग होती. माझ्या बायकोला शोधण्याच्या आणि तिचा बदला घेण्याच्या नादात मी खूप अधमपण केला, क्रूर बलात्कार केले, खुन केले.

पुरावे नष्ट करण्यासाठी मी त्या लोकांच्या मृत शरीराचे तुकडे तूकडे पण केले. पहिल्यांदा मी दोन वेश्या आणि बेघर लोकांचा खून केला.”

खून करणं आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करणं एवढ्या पुरतीच त्याच्या क्रौयाची सीमा मर्यादित नव्हती. तर तो ज्या पद्धतीने या मृतदेहांची विल्हेवाट लावायचा त्याची ती पद्धत फारच भयानक होती.

 

All That’s Interesting

तो या मृतदेहांना दफन करण्याऐवजी त्यांचे अगदी छोटे छोटे तुकडे करायचा आणि हे मांस तो डुकराच्या मांसात मिसळायचा आणि आपल्या मेरिलँड रस्त्यावरील बार्बेक्यू शॉप मध्ये त्यांचे बर्गर बनवून तो गिर्हाईकांना खावू घालायचा.

त्याला अटक होण्याआधी दोन वर्षापासून त्याचे हे खून सत्र सुरूच होते. मिटीनिच्या बायकोला ड्रगचे व्यसन होते आणि या व्यसनाच्या नादातच ती आपल्या छोट्या मुलासह मिटीनीचे घर सोडून बाहेर पडली. त्याने तिचा खूप शोध घेतला.

त्याने कित्येक धर्मशाळा पालथ्या घातल्या, ज्या रस्त्यावर बसून ती ड्रग घ्यायची ते रस्ते, पूल सगळीकडे शोधाशोध केली पण याला ती कुठेही सापडली नाही.

ज्या पुलाखाली तो तिचा शोध घेत होता तिथे, त्याला त्याची बायको सापडली नाही पण, दोन व्यक्ती दिसल्या. त्यांनी आपल्या बायकोसोबत ड्रग’ घेतली असेल आणि ते आपल्याशी खोटे बोलत असल्याच्या रागातून त्याने त्यांचा कुऱ्हाडीच्या सहाय्याने खून केला.

त्यांचा खून केल्यानंतर जवळच एक मच्छिमार होता, मिटीनिला वाटले यांचा खून करताना त्या मच्छिमाराने त्याला पहिले असेल म्हणून त्याने त्या मच्छिमाराचा देखील खून केला.

सुरुवातीला हे तिन्ही खून त्याने रागाच्या भरात आणि सुडाच्या भावनेने केले, आपल्या हातून किती गंभीर गुन्हा घडला असल्याची जाणीव झाल्यानंतर मिटीनिला पश्चाताप होऊ लागला…. त्याने हे तिन्हि मृतदेह नदीत फेकून दिले.

 

youtube.com

या तिन्ही खून केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान दीड वर्षे तो तुरुंगात राहिला.

परंतु, त्याने मृतदेह पाण्यात टाकलेले असल्याने आणि त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा हाती न लागल्याने त्याला या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले.

आता सुटून आलेल्या मिटीनिच्या डोक्यात पुन्हा आपल्या बायकोला आणि मुलाला शोधून काढण्याचे वेड लागले. जरी त्याने सुनावणीसाठी तब्बल दीड वर्षे तुरुंगात काढली असली तरी, त्याच्या डोक्यातील सुडाची भावना शांत झाली नव्हती.

त्याच्या वृत्तीत कोणताही फरक पडला नव्हता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा दोन वेश्यांचा खून केला.

यावेळी मात्र त्याने त्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावण्याची त्याने एक भयानक कल्पना शोधून काढली. आत्ता, तो बदला किंवा सूड उगवण्यासाठी म्हणून कुणाचा खून करत नव्हता तर खून करण्याच्या त्याला छंदच जडला होता.

हे मृतदेह नदीत फेकून देण्याऐवजी तो ते घरी घेऊन आला. तिथे त्याने त्याचे शरीराचे तुकडे केले आणि ते फ्रीझरमध्ये ठेऊन दिले. त्यांच्या शरीराचा नकोसा भाग त्याने पुरून टाकला.

 

De Arrepiar

घरी परत आल्यानंतर त्या वेश्यांचे मांस त्याने बीफ आणि डुकराच्या मटणासोबत मिक्स केले, आणि त्यांचे छोटे छोटे पॅटीज बनवले. कित्येक आठवड्यानंतर त्याने हे पॅटीज त्याच्या रस्त्यावरील बार्बेक्यू मधून विकून टाकले.

कित्येक आठवडे कसलीही माहिती नसलेले, ट्रक ड्रायव्हर्स, गावातील, परिसरातील लोक, येणारे-जाणारे सगळ्यांनी या पॅटीजची चव चाखली पण त्यामध्ये मानवी मांस असल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही.

मारलेले मृतदेह लपवून टाकण्याची एक नामी युक्ती मितीनिला मिळाली होती.

त्याला अटक करण्यात आली तेंव्हा त्याने पोलिसांना सांगितले की, त्या पॅटीजमध्ये मानवी मांस असल्याचा संशय देखील कुणाला आला नाही. कुणीही त्या बर्गरची चव वेगळी लागल्याची तक्रार केली नाही.

“मानवी मांस आणि डुकराचे मांस यांची चव अगदी सरखीच असते. दोन्ही जर तुम्ही एकत्र केले तर, तुम्हाला दोन्हीतील फरक अजिबात ओळखता येणार नाही,” मिटीनिने सांगितले.

 

documentingreality.com

त्याला जेंव्हा कधी असे “चविष्ट मांस” लागेल तेंव्हा तो कुणा ना कुणा व्यक्तीला धरून त्याचा खून करत असे.

त्याने दिलेल्या कबुली जबाबानुसार त्याने अशा प्रकारे जवळजवळ दहा व्यक्तींचा खून केला होता. त्याला जर अटक झाली नसती तर त्याने हे खूनसत्र कधीच थांबवले नसते.

शेवटी डिसेंबर १९९६ मध्ये त्याला अटक करण्यात आली. मिटीनि यावेळी देखील आपल्या सावजाच्या शोधात होता, त्याला एक व्यक्ती सापडली देखील पण खून करण्याआधीच ती व्यक्ती त्याच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाली आणि त्याने मिटीनि विरुद्ध पोलिसात तक्रार दिली.

मिटीनिने आपण केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची तपशीलवार कबुली दिली. अगदी पहिले तीन खून सुद्धा त्यानेच केल्याचे काबुल केले ज्या केस मधून तो काही वर्षापूर्वी निर्दोष सुटला होता.

यावेळी मात्र त्याने स्वतःच कबुली दिली आणि त्याचा अपराध सिद्ध झाला होता. त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. २०१७ मध्ये त्याच्या तुरुंगाच्या कोठडीत तो मृतावस्थेत आढळून आला.

आपल्या कबुली जबाबावेळी त्याने सांगितले की, “मी इतक्या लोकांना संपवले पण ज्या दोन लोकांना संपवणार होतो ते मात्र माझ्या हाती लागले नाहीत, माझी बायको आणि तिला पळवून नेणारा तिचा मित्र.”

 

Baltimore Sun

त्यामुळे पुढल्या वेळी कुठेही फिरायला गेलात तर रस्त्यावरील बार्बेक्यू शॉप मध्ये खाण्यापूर्वी तुम्हाला या मिटीनिची कथा नक्कीच आठवेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version