' शेतकऱ्याला थेट ग्राहकाशी जोडणारं अकोल्याच्या तरूणाचं ‘वावर’ अॅप – InMarathi

शेतकऱ्याला थेट ग्राहकाशी जोडणारं अकोल्याच्या तरूणाचं ‘वावर’ अॅप

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

तंत्रज्ञानाने आपलं जीवन अगदी सुकर केलंय. आपल्या जीवांच्या प्रत्येक कणाकणात तंत्रज्ञान वसलंय असं म्हटलं तर वावग ठरू नये. तंत्रज्ञान जीवन सुकर करण्याबरोबरच मानवाला वैयक्तिकदृष्ट्या फायदे देखील मिळवून देते. तंत्रज्ञानाचा असाच फायदा शेतकऱ्यांना देखील वैयक्तिकदृष्ट्या व्हावा आणि त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या भावनेने महाराष्ट्रातील एका तरुणाने ‘वावर’ नावाचं एक अॅप बनवलंय.

आणि मुख्य म्हणजे अल्पावधीत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

 

farmers-marathipizza04

 

शेतकऱ्याचं ‘वावर’ धनसंपन्न करण्यासाठी अकोला जिल्ह्याच्या मुर्तीजापूर तालुक्यातील अमोल खंडारे नामक एका इंजिनियरने आपली शक्कल लढवत या वावर अॅपची निर्मिती केली आहे. खरं तर त्याच्या डोक्यात ही कल्पना आलीच मुळी घरातील एका दु:खद घटनेमुळे!

अमोलचे काका एक उत्तम शेतकरी होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. काकांच्या आत्महत्येची वेदना अमोलला शेतकरी प्रश्नांकडं घेऊन आली.

 

wavar-app-marathipizza01

स्रोत

मध्यस्थांच्या साखळीने बाजारात शेतकऱ्याची होणारी कुचंबना पाहिली. बेभवशाच्या बाजारावर मात करण्यासाठी त्याने थेट शेतकऱ्यांना ग्राहकांशी जोडण्याचं ठरवलं. रेल्वेत अभियंता पदावर काम करत असतानाही वेळ काढून त्यानं वावर अॅप तयार केलं. रब्बीतील पिकं बाजारात आल्यावर शेतकरी-ग्राहकांना या अॅपचा वापर होणार आहे.

farmers-marathipizza02

 

अकोल्यात दरवर्षी थेट शेतकरी ते ग्राहक कृषी प्रदर्शन भरतं. जिथं हजारो क्विंटल धान्य आणि शेतमालाची विक्री होते. मात्र इथे आलेले अनेक ग्राहक वर्षभर थेट शेतकऱ्याकडून शेतमाल मिळावा असा आग्रह धरतात.

हे पाहून अकोला प्रशासनाने हे अॅप लोकांपर्यंत पोहचवण्याचं ठरवलं आणि याचं लोकार्पण झालं. आता हे अॅप गुगल प्ले स्टोवर देखील उपलब्ध आहे.

 

farmers-marathipizza

स्रोत

शेतकरी या अॅपवर आपल्या शेतमालाची मोफत जाहिरात करतील. त्यावर शेतमालाचे फोटो, त्याचा दर आणि संपर्क क्रमांक टाकतील. ज्या ग्राहकांना शेतमाल हवा आहे ते शेतकऱ्यांशी संपर्क करतील आणि शेतमालाची खरेदी होईल. याचा सर्वाधिक फायदा फलोत्पादक शेतकऱ्याला होणार आहे. इथं प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार आहे.

या शिवाय शेतीविषयक विविध योजना, किड-रोग आणि त्यावरील उपचारपद्धती, सोबत बेरोजगार तरुणांसाठी नोकरीचं पोर्टलही इथं असणार आहे.

बळीराजाच्या प्रगतीचा उद्देश मनी बाळगून अमोलने केलेलं हे कार्य एखाद्या समाजसेवेपेक्षा कमी नाही, कारण त्याचा फायदा हा समस्त शेतकरी वर्गाला होणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?