लहान भावाचा जीव वाचवण्यासाठी बिबट्याशी दोन हात करणाऱ्या बहाद्दराची थरारक कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भावंडं म्हंटली की भांडण आलंच! अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीकधी न पटवून घेणारी भावंडे देखील असतात! कित्येकदा शब्दीक चकमकी तर कित्येकदा हाणामारी सुद्धा होते.
पण, भावंडावर आपलं इतकं प्रेम असतं की, जेंव्हा याच भावंडांवर एखादा प्रसंद गुदरतो तेंव्हा मात्र सगळी भांडण विसरून एकमेकांसाठी जीवसुद्धा द्यायला देखील आपण मागेपुढे पाहत नाही!
ही एक अशीच रोमांचकारी गोष्ट आहे दोन चिमुकल्या भावंडांची! हर्षद आणि नरेश यांची!
हर्षद ७ वर्षांचा तर नरेश १४ वर्षांचा दोघेही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील करपटवाडी या गावचे! १४ वर्षांच्या नरेशने बिबट्याच्या तावडीतून छोट्या हर्षदचा जीव वाचवला त्याची ही साहसकथा!
खरे तर दंग मस्ती करत असताना आई वडील किती ओरडतात ना! पण, त्यांच्या ओरडण्यामागे हाच हेतू असतो की मुलांना काही दुखापत किंवा इजा होऊ नये.
खरे तर बालसुलभ खोडकरपणा सगळ्याच मुलांमध्ये असतो. जाऊ नको म्हणेल तिकडे मुद्दन, हटकून जाण्याचा एक व्रात्यपणा देखील असतो. असेच काहीसं या दोघांसोबतही झालं.
शुक्रवारी संध्याकाळी दोघेही आजीसोबत शेतात गेले. आजी कामात गुंग झालेली पाहून तिला चकवा दिला आणि करवंदं शोधायला जंगलात घुसले.
थोड्या अंतरावर गेले नाहीत तोच झुडूपाआड दाबा धरून बसलेल्या एका बिबट्याने मोठ्या नरेशवर हल्ला केला, थोड्याच वेळात त्याला दूर ढकलून देत त्याने छोट्या हर्षदला पकडले.
एवढ्यात परिस्थितीचे भान राखत नरेशने त्या चीत्त्यावर दगडांचा मारा सुरु केला, जवळच पडलेली एक काठी घेतली आणि त्याच्या अंगावर धावून गेला….
इतक्या कठीण परीस्थित देखील नरेशने धीर सोडला नाही, की हर्षदला एकट्याला टाकून त्याला पळून जावं वाटलं नाही. उलट, तो आलेल्या संकटाशी सामना करण्यास सज्ज झाला.
काही करून आपल्या भावाची त्या बिबट्याच्या तावडीतून सुटका करायची एवढच त्याला माहित होतं.
दोन्ही मुलांचा आरडाओरडा ऐकून जवळच काम करत असलेली आजी कान्हीबाई हातातल्या कोयत्यासह धावूनच आली. आजीला पाहताच त्या चीत्याने मुलांना तिथेच सोडले आणि तो जंगलात पळून गेला.
बिबट्याच्या हल्ल्यात नरेश आणि हर्षद दोघांनाही जबर मार लागला होता. आजीने तत्काळ त्यांना दवाखान्यात आणले. दोघांवर देखील जवळच्या रुगणालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी, ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून सुमारे ३०० मीटर अंतरावर ती चित्ता मृतावस्थेत आढळून आला. बिबट्याचे पोस्टमार्टम केल्यानंतर त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत.
त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तो म्हातारा झाल्याने मरण पावला असल्याचे नोंदवले गेले आहे.
दरम्यान, रविवारी या दोन शूर आणि साहसी मुलांचा टोकावडे पोलिसांनी त्यांचा शौर्याबद्दल सत्कार केला. टोकावडे पोलीस स्टेशनचे इनचार्ज सुहास खरमाटे, म्हणाले,
“इतक्या लहान वयात नरेशने दाखवलेले शौर्य आश्चर्यकारक आहे. त्याच्या जवळचे धैर्य आणि समयसूचकता वाखाणण्याजोगी आहे. खरे तर या दोघांकडूनही हे गुण घेण्यासारखे आहेत.”
एकीकडे मुलं मार्क्स कमी मिळाले, आई-वडील रागावले किंवा मित्रांनी अपमान केला अशा क्षुल्लक कारणावरून जीव देतात. जीवनातल्या छोट्या छोट्या अपयशांना घाबरून जातात.
तिथे या दोन चिमुकल्यांनी समोर आलेल्या संकटाशी केलेले दोन हात नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरतील.
फक्त नरेश आणि हर्षदच नाही तर इतरांसाठी जीवांची बाजी लावणार्या कितीतरी धाडसी मुलांच्या कथा वरचेवर आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात येतच असतात.
अशा छोट्या जीवांचा निश्चितच आपल्याला अभिमान तर वाटतोच पण, त्यांच्यापासून एकप्रकारची लढण्याची उर्जा देखील मिळते. नुकताच जिला राष्ट्रीय शोर्य पुरस्कार मिळाला त्या ममता दलाईची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला?
हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वात छोटी मुलगी ठरली आहे. गावातील तळ्यात अंघोळीसाठी गेल्यानंतर तळ्यातील मगरीने तिच्या छोट्या बहिणीवर हल्ला केला.
ममताने त्याक्षणी असीम धैर्य दाखवून त्या मगरीच्या तावडीतून आपल्या बहिणीची सुटका करून घेतली.
ममता ही ओडीशातील केंद्रपाडा जिल्ह्यात राहते. एके दिवशी ममता आपल्या दहा वर्षांची बहिण असंती दलाई हिच्यासोबत गावातील तळ्यात अंघोळीसाठी गेली होती.
इतक्यात तळ्यातील एका मगरीने असंतीवर हल्ला केला. असंती घाबरून गेली परंतु, जोपर्यंत मगरीच्या तावडीतून असंतीची सुटका होत नाही तोपर्यंत ममता त्या मगरीवर हल्ला करत राहिली.
एकीकडे मगर असंतीला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करत असतानाच ममता मात्र असंतीला मगरीच्या जबड्यातून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.
त्या दोघींच्या ओरडण्याने शेवटी असंतीला तिथेच सोडून ती मगर पुन्हा पाण्यात निघून गेली आणि ममता असंतीला घेऊन घरी आली. दुसर्या दिवशी वनविभागाच्या कर्मचार्यांनी त्या मगरीला पकडून नदीत सोडून दिले.
पण, या क्षणी ममताने दाखवलेले अतुलनीय शोर्य वाखाणण्याजोगे आहे. तिच्या प्रसंगावधानामुळेच ती आपल्या बहिणीचा जीव वाचवू शकली.
छोट्या ममताच्या या धाडसी कृत्याबद्दल तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इतरांच्या हितासाठी किंवा प्राण रक्षणासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत करण्यार्या छोट्या शूरवीरांना दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
छोट्या छोट्या प्रसंगांनी हताश न होता त्याक्षणी थोडीशी सावधगिरी दाखवून आपण टिकून राहिलो तर मोठमोठी संकटेपण माघार घेतात हेच या मुलांनी केलेल्या कृत्यांवरून सिद्ध होते.
इतक्या लहान वयातही दुसर्यासाठी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याच्या निस्वार्थ कृतीसाठी खरोखरच या मुलांना सलाम केला पाहिजे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.