प्रेमासाठी धर्मत्यागाचा विचार करणाऱ्या गुरुदत्त यांच्या ‘वहिदा प्रेमा’ची कथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
हिंदी सिनेमातील प्रेमकहाणी आपण मोठ्या चवीने ऐकतो. कधी ती पूर्णत्वाला जाते तर कधी अपुर्णातली गोडी तशीच राहाते. अशा अधुर्या प्रेमकहाणीचं नाव घेतलं की एका जोडीचं नाव डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नाही ते म्हणजे वहिदा रहेमान आणि गुरुदत्त.
गुरुदत्त यांच्या जयंती निमित्तानं ऐकूया या वेगवेगळ्या धर्म असणार्या प्रेमिकांची प्रेमकहाणी.
गुरुदत्त १९५० ते १९६० या दशकातील गाजलेले चित्रपट दिग्दर्शक, निर्माते. प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम आणि चौदहवी का चाँद हे त्यांचे गाजलेले चित्रपट.
आणि ‘चौदहवी का चाँद हो या खुला आस्मा’ या गाणं जणू तिच्यासाठीच लिहिलंय असं म्हणायला हरकत नाही अशी हिंदी चित्रपटसृष्टीतील तारका वहिदा रहेमान. या दोघांमध्ये पेमसंबंध निर्माण झाले. पण ते पूर्णत्वाला गेले का?
असं म्हणतात की गुरुदत्त तर वहिदा रहेमानच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला होता की तो तिच्यासाठी आपला धर्मही बदलायला निघाला होता. मग इतकं होतं तरी यांची प्रेमकहाणी अपूर्णच का राहिली पाहुया.
चित्रपट ‘प्यासा’ साठी गुरुदत्तनी वहिदा रहेमानला साइन केलं होतं. अशी बातमी होती की, गुरुदत्त पहिल्यांदा या चित्रपटासाठी हिरो म्हणून दिलीप कुमारला घेणार होते, पण अचानक त्यांनी आपला निर्णय बदलला आणि त्यांनी स्वत:च हिरोची व्यक्तिरेखा साकारण्याचं ठरवलं.
असंही ऐकण्यात येतं की चित्रपटातील नायिकेसाठी गुरुदत्तनी मुधबाला आणि नर्गिस यांना घेण्याचाही विचार केला होता.
पण शेवटी दुसरीच जोडी पडद्यावर झळकली आणि त्यात त्यांची केमिस्ट्री इतकी सुंदर जमली की काही विचारू नका.
‘हम आप की आखों में इस दिल को बसा ले तो? ‘हम मूंद की पलकों को, इस दिल को सजा दे तो’, ‘जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला,’ ‘सर जो तेरा टकराये’ अशी एकाहून एक अशी सरस गाणी, आणि या जोडीचा सुंदर असा अभिनय यामुळे ‘प्यासा’ ने चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला.
जगातील टॉपच्या १०० चित्रपटांत या चित्रपटाची गणना केली जाते. यांनंतर आपसूकच प्रत्येक चित्रपटांत गुरुदत्त आणि वहिदाची जोडी मुख्य भूमिकांत चमकू लागली.
आणि म्हणतात ना, सहवासाने प्रेम वाढतं तसंच त्या दोघांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. खरं तर गुरुदत्तचं पहिलं लग्न झालेलं होतं, त्यांच्या बायकोचं नाव होतं गीता दत्त.
पण त्यांचं दोघांचं जास्त दिवस पटलं नाही, असं म्हणतात की, त्यांच्यातील दुराव्याचं कारण वहिदा वरील प्रेम हेच असावं.
गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांच्यात इतकं प्रेम होतं की, की गुरुदत्त वहिदाला नेहमी आपल्या नजरेसमोर ठेवणं पसंत करत होते, ‘नजर के सामने जिगर के पास’ असं काहीसं असावं.
त्यासाठी त्यांनी ‘गुरुदत्त फिल्म्स’ च्या सेटवर गुरुदत्तच्या मेकअप रूम शेजारीच वहिदाची मेकअप रूम होती आणि त्याच्यासमोर अशी एक खोली होती की ती त्या दोघांची होती.
जरी वहिदा दुसर्या बॅनरच्या चित्रपटात काम करत असली तरी ती दत्त फिल्म्सचीच मेकअप रूम वापरत असे. इतकं गाढं प्रेम होतं दोघांच्यात.
वहिदा रहेमान च्या बहिणीच्या नवर्यानं सांगितलं होतं की, ‘गुरुदत्त वहिदाशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलण्यासही तयार होता.’ इतकं प्रेम होतं गुरुदत्तचं.
पण एक दिवस अचानक वहिदा तिच्या मेक अप रूममध्ये जात असताना तिला एका विश्वसनीय माणसाकडून सांगण्यात आलं की, गुरु दत्तने तिला त्या रूममध्ये येण्याची बंदी घातली आहे.
हे ऐकल्यावर वहिदाला फारच वाईट वाटलं. तिला रडू आलं. ती रडत रडत तिथून निघून गेली त्यामुळे लोकांनी परत बातमी उठवली की गुरुदत्तने वहिदाला सोडून दिलं.
या प्रेमकहाणीचा अंत होण्याचं कारण काय होतं माहीत आहे का?
तर असं कारण होतं की, गुरु दत्त आणि वहिदाच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या येऊ लागल्या, अशा गोष्टी फार काळ लपून राहात नाहीत. त्यात चित्रपट सृष्टीतील लोकांच्या तर अजिबातच नाही.
गुरुदत्तची पत्नी गीता दत्त हिला या प्रेमकहाणीबद्दल समजलं तेव्हा ती लंडनमध्ये होती. आणि तिला असंही कळलं की, भारतात गुरुदत्त वहिदाशी लग्न करण्यासाठी मुसलमान धर्म स्वीकारत आहे.
खरं तर लंडनहून ती लवकरच घरी परतणार होती, पण ही बातमी समजल्यामुळे ती घरी जाण्याऐवजी तिच्या काश्मीरच्या घरी गेली. खूप दिवसानंतर पण ती घरी येईना तेव्हा गुरुदत्तनी तिच्यावर दबाव टाकायला सुरुवात केली.
गीता दत्त ला परत जायचं नव्हतं तिने कळवलं की, मी घोड्यावरून पडले आहे आणि माझ्या खांद्याला जखम झाली आहे. आता काही दिवस मी प्रवास करू शकणार नाही.
गुरु दत्त हळवे होते. त्यांना गीता दत्तची काळजी वाटू लागली. तिच्यावर पण त्यांचं प्रेम होतं.
ते कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी त्यांचा मदतनीस श्याम कपूर याला काश्मीरला पाठवलं. पण तिथे काही वेगळंच दृश्य दिसलं. गीता परत न येण्यामागचं कारण होतं एक पाकिस्तानी युवक. ती त्याच्यात गुंतली होती.
ही गोष्ट ऐकून गुरुदत्त नाराज झाले. त्यांचा विश्वासच बसेना की त्यांची पत्नी दुसर्या पुरुषासोबत आहे आणि जेव्हा त्यांना हे कळलं तेव्हा त्यांनी वहिदा बरोबर असलेल्या दहा वर्षांच्या प्रेमाला तिलांजली दिली.
ते परत आपल्या पत्नीबरोबर राहू इच्छित होते. पण वहिदाला याची कल्पना नव्हती. ‘साहब बीवी और गुलाम’ या चित्रपटाचं शूटिंग त्यावेळीच सुरू होतं. तेव्हा शेवटी एकदा वहिदाने त्यांना, ‘आखीर दत्त को हुआ क्या है?’ असं रागानं विचारलं होतं.
जेव्हा वहिदाला ही गोष्ट समजली की, तिच्यामुळे गुरु दत्त यांचा संसार तुटला तिला वाईट वाटले आणि तिने ‘कागज के फूल’ या चित्रपटानंतर त्यांच्याबरोबर काम नाही केले, ती पण गुरुदत्तना सोडून दूर निघून गेली.
‘दो हंसो का जोडा बिखर गया’ या उक्तीप्रमाणे दोघं एकमेकांपासून दूर झाले. असं म्हणतात की, ‘कागज के फूल’ हा चित्रपट गुरुदत्तच्या जीवनावर आधारित आहे.
या चित्रपटासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले होते. खरंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना इतका खर्च न करण्याबद्दल समजावले होते, पण त्यांनी कोणाचे ऐकले नाही.
गुरुदत्तना वाटलं होतं की ही फिल्म हिट होईल, पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांना कळलंच नाही की, गुरुदत्त या चित्रपटातून काय सांगू इच्छितात, त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.
गुरुदत्तना यामुळे मोठा धक्का बसला आणि त्यांनी दिग्दर्शन करणे थांबवले.
चित्रपट अपयशी ठरला त्यामुळे गुरुदत्तचे मोठं नुकसान झालं. नंतर ते चित्रपटात सहनिर्देशक आणि अभिनय करू लागले. पण पत्नी गीताचं घर सोडणं आणि ‘कागज के फूल’ चे अपयश यामुळे त्यांना नैराश्य आलं आणि त्या नादात त्यांनी दारू आणि सिगरेटला जवळ केलं.
गुरुदत्तचा सगळ्यात जवळचा मित्र अब्रार सांगतात, जेव्हा त्यांनी वहिदाला सोडलं तेव्हा ते त्यांना म्हणाले की,
‘‘हे तू चांगलं केलं नाहीस. कारण जेव्हा तू वहिदाशी प्रेमसंबंध ठेवलेत तेव्हा वहिदाची आई आणि तुमची आई सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की वहिदा तुझ्यासाठी योग्य आहे. पण काहीतरी ठोस कारणाशिवाय असं वहिदाला आयुष्यातून दूर करणं योग्य नाही.’’
पण गुरुदत्त या बाबतीत कोणाशीही चर्चा करत नव्हते. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला होता. ‘साहब बीबी गुलाम’ याचं शूटिंग दोघांनी वेगवेगळ्या वेळी पूर्ण केलं.
शेवटच्या एका शूटिंगवेळी चित्रपटात असा सीन होता की, जेव्हा वहिदाला गुरु दत्त यांच्या खांद्यावर हात ठेवायचा होता, खूप मुश्किलीने ती या सीनला तयार झाली.
तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, पण तिने नजर वर करून त्यांच्याकडे पाहिलंही नाही. ‘हर किसी को नहीं मिलता यहा प्यार जिंदगी में’ हेच खरं.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.