Site icon InMarathi

जाऊ तुकोबांच्या गावा: भाग १

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जाऊ तुकोबांच्या गावा
मनबुद्धिसी विसावा ।
मिळवू ज्ञानाचे अमृत
अंतरासी निववीत ।
तुका ज्ञानाचा सागर
मराठीजनां गुरु थोर ।
ज्ञानदास धरितो चरण ।
लेखसंकल्पाचे कारण ।

आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, म्हणून मराठी आहोत. मराठी आहोत म्हणून संतपरंपरेचा वारसा आपल्याला आहे. ज्ञानबा तुकाराम हा महाराष्ट्राचा गजर आहे. ज्ञानदेवांनी गीता मराठीत आणली आणि जगावे कसे ह्या प्रश्नाचे उत्तर सर्वांना उपलब्ध केले. त्याची मग परंपराच झाली. संत तुकारामांनी ती परंपरा कळसाला पोहोचविली. आपल्या अभंगातून जीवनविषयक वेगवेगळ्या प्रश्नांची उकल त्यांनी केली. तुकोबांचा प्रत्येक अभंग विशेष आहे. काव्य आणि विचार यांचा अनोखा संगम तेथे आहे. भाषा कधी अतिशय सोपी तर कधी अतिशय अवघड आहे. किंबहुना, अवघडपणाच्या बाबतीत तर तुकोबा शिखरावरच आहेत. त्यांची शब्द आणि कल्पनांवरील हुकमत अशी आहे की विषय कोणताही असो, मूळ सूत्र न सुटू देता त्यास ते अत्यंत सोपा वा अत्यंत अवघड करू शकतात!

स्रोत

तुकोबांच्या सर्व अभंगांमागे जे एक आणि एकच सूत्र आहे तेच ज्ञानदेवीत आहे. ज्ञानदेवीतील सूत्र त्या आधी आदि शंकराचार्यांनी शिकविले होते आणि त्याही आधी श्रीमद्भगवद्गीतेतून महर्षी व्यासांनी. प्रत्येकाचा सांगण्याचा काळ वेगळा, भाषा वेगळी पण अंतरंग एकच. फार फार जुन्या काळापासून मानव जातीला प्रश्न पडत आला होता की आपले अंतिम कल्याण कशात आहे? अंतिम कल्याण म्हणायचे कशाला? मग खूप काळ खूप विचारमंथन झाले. खूप मतमतांतरे झाली. त्या सर्वांचे सार काढले, महर्षी व्यासांनी. महाभारतात कथा सांगता सांगता निमित्तानिमित्ताने उपदेश पोहोचविण्याचे अलौकिक कार्य व्यासांच्या नावे आहे. त्या विचारांचे सार असणारी गीता त्यांनी श्रीकृष्णाच्या तोंडून अर्जुनासाठी वदविली. केवळ सातशे श्लोकात.

पुढे काय झाले, गीता काय सांगते यावरच वादविवाद होऊ लागले. जो तो आपल्याला सोयीचा अर्थ काढू लागला. तेव्हा आदि शंकराचार्यांनी आपले जीवन त्यासाठी खर्च केले आणि गीतेचे मूळ सूत्र अद्वैताचे आहे हे सिद्ध केले. आचार्यांचे गीताभाष्य अपूर्व आहे. ज्याला ह्या विषयाची आवड आहे त्याच्या सर्व शंकांचे निरसन करणारे आहे. हा ज्ञानविषय नंतर ज्ञानोबांनी मराठीत ओवीबद्ध केला आणि तुकोबांनी तोच अभंग रूपात आपल्यासमोर मांडला. आपल्यासाठी हा दैवयोग आहे! कदाचित, आपल्यासारखे सुदैवी आपणच असू की ज्यांना हा विचार आपल्या मातृभाषेत इतका आकर्षकरित्या मांडलेला अभ्यासास उपलब्ध आहे! शरीरास अन्न पौष्टिक हवे, जीभेस रूचकर हवे आणि दृष्टीसही सुखावणारे हवे. मग पाचक रस आपोआप स्त्रवतात आणि आपले सहज पोषण होते! तुकोबांचा प्रत्येक अभंग असा आहे. त्याचा आस्वाद घ्या आणि विचाराने बलवान व्हा असेच जणू तुकोबा आपणांस सांगत आहेत. तसे मनात धरून ह्या लेखमालेचा संकल्प केला आहे.

ज्ञानदेवांनी गीता सांगितली नेवाशात. अथपासून इतिपर्यंत, जणू एकटाकी. लोकमान्यांनी गीतारहस्य मंडालेच्या तुरुंगात लिहिले, चार महिन्यात लिहून संपविले! तुकोबांच्या अभंगांचे तसे नाही. ते अभंग करू लागले त्या पहिल्या क्षणापासून देह ठेवीपर्यंत त्यांचे अभंगनिर्मितीचे कार्य चालूच होते. त्यामुळे त्यांचे अभंग वेगवेगळ्या परिस्थितीत जन्माला आले आहेत. प्रत्येक अभंगाच्या मागे काय घटना घडली याची माहिती आपल्याला नाही. तसा अंदाज बांधावा लागतो. कल्पना करावी लागते. तसे करण्यासाठी मनाने त्या काळात, देहूगावात जायला हवे. मग एक एक अभंग उलगडू लागतो. अशीच केलेली एक कल्पना आता बघा.

इंद्रायणीकाठी देहू नावाचे गांव आहे. तिथे राहणाऱ्या तुकोबारायांची कीर्ती अल्पावधीत चहूंकडे झाली होती. त्यांच्या दर्शनाला अनेक लोक येत तसे शंकासमाधान करून घेण्यासाठीही येत. तसा एके दिवशी एक मनुष्य दूरवरून देहूगांवी आला. घर शोधीत तुकोबांपाशी आला. तुकोबांना पाहिले आणि त्याला खात्री पटली, आपले शंकासमाधान येथे होणार! हा सत्पुरुष आहे! याचा चेहेरा बघा, किती निर्मळ आहे! याच्या डोळ्यात प्रेम आहे! हा ज्ञानी आहे हे सांगावे लागत नाही, त्यांच्या तेजाने ते काम पहिल्या क्षणीच केले आहे!

तुकोबांच्या केवळ दर्शनाने दिपलेला तो माणूस जरा सावरला, पुढे झाला, पायी लागला. तुकोबांनी नांवगांव पुसलं. आबा पाटील नांव सांगितलं. कुठलंसं गांव सांगितलं. तुकोबांनी येण्याचं कारण विचारलं. तसा म्हणाला, एक शंका हाये. कुणी धड उत्तर देईना. मग आपलं नांव कळलं. म्हणून आलो.

तुकोबांनी स्मित केलं. म्हणाले,

चुकीच्या जागी आलात तुम्ही! मला नाही काही येत!

आबा म्हणाला,

असं कसं हुईल? इतकं नांव ऐकलं त्ये उगीच का? आणि तुम्हाला पाहून खात्रीच पटली. त्येवढी शंका सोडवा माझी! एकच तर प्रश्न हाये माजा!

तुकोबा म्हणाले,

आहो, माझ्या शंका मी पांडुरंगाला विचारतो. तुम्ही बी तसंच करा!

आबा म्हणतो,

 मग मी येगळं काय केलं? तुमीच पांडुरंग, तुमीच सांगा.

तुकोबा हसले,

आसं करा, आधी जेवून घ्या, थोडी विश्रांती होऊ द्या. सांजच्याला कीर्तन आहे पांडुरंगाच्या देवळात. तिथे पाहू काय होतं!

आबा पाटील खूष झाला. पुढे काय झाले ते पुढच्या लेखात!

(क्रमशः)

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

पुढील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा: भाग २

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version