आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
अब्जावधीची मालमत्ता असलेल्या दुबईच्या राजापासून त्याच्या पत्नीला हवाय घटस्फोट! त्याच्या विरोधात घटस्फोटाचा दावा केल्यानंतर राजकुमारी हया लंडन येथे अज्ञातवासात राहिल्याची चर्चा सुरु आहे.
दुबईच्या राजघराण्याशी संबधित असलेल्या दोन सूत्रांनी अशी माहिती दिली की राजकुमारी हया देश सोडून गेली असून तिला राजा शेख मोहम्मद उर्फ रशीद मक्तोम याच्यापासून घटस्फोट हवा आहे.
राजकुमारी हया अल हुसेन हिला तिच्या पतीपासून घटस्फोट हवा असून त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर जीवाच्या भीतीने दुबई सोडून जर्मनी मध्ये गेली आहे जिथे तिला राजकीय आश्रय मिळाला आहे.
अरब प्रसारमाध्यमात दाखवण्यात आलेल्या बातमी नुसार जर्मनीच्या एका राजदूताने तिला देश सोडून पळून जाण्यास सहकार्य केले आहे. ज्यामुळे कदाचित या दोन देशांमध्ये राजनीतिक वाद उद्भवू शकतो.
तिचे पती शेख मोहम्मद उर्फ रशीद मक्तोम यांनी जर्मन अधिकार्यांकडे तिला परत पाठवण्याची विनंती केली पण जर्मन अधिकार्यांनी ती नाकारली अशी देखील चर्चा सुरु आहे.
परंतु, प्रसारमाध्यमातील या बातमी बद्दल जर्मन अधिकार्यांनी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. तसेच, दुबई राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी देखील याबाबत कोणताही खुलासा देण्यास नकार दिला आहे.
परंतु, राजघराण्याशी संबधित सूत्रांनी मात्र राजकुमारी हया यांनी दुबई सोडली असून त्या घटस्फोट मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
गेल्या आठवड्यापासून राजकुमारी रॉयल अस्कॉट मध्ये देखील दिसलेल्या नाहीत.
४५ वर्षीय राजकुमारी घोडेस्वारी मध्ये निपुणअसून दरवर्षी होणार्या क्रीडामहोत्सवात आपल्या पतीसोबत न चुकता हजेरी लावतात.
ड्युक ऑफ एडिनबर्ग मध्ये पाळणाऱ्या घोड्यांवर दोघेही पती पत्नीना सट्टा लावण्याचा छंद होता.
गेल्या आठवड्यात,रॉयल अस्कॉटमध्ये केम्ब्रिजचे ड्युक आणि त्यांच्या राणी सोबत ६८ वर्षांच्या शेख मक्तोम यांचा त्यांच्या सर्व पुरुष नातेवाईकांसह एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्यांची पत्नी त्यांच्यासोबत दिसत नाही.
तसेच मे २० पासून राजकुमारी हया यांना सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आलेलं नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिकलेल्या हया यांचे सोशल मिडिया अकाऊंट देखील फेब्रुवारी पासून बंद आहेत. ज्यावर सतत त्यांच्या चॅरिटेबल कामांचे फोटो आणि पोस्ट अपलोड होत असत.
मक्तोम यांनी लिहिलेली “विश्वासघात” बद्दलची एक कविता देखील यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून पोस्ट केली आहे.
या कवितेत “अनमोल विश्वासाला तू तडा दिलास” आणि “मी तुझ्यावर भरोसा ठेवला, मुभ दिली…. तरीही खोटे बोलण्याची अक्षम्य चूक तू केली” अशा ओळी आहेत.
परंतु, मक्तोम यांनी स्वतः ती कविता सोशल मिडियावर पोस्ट केली का याची खात्री देता येत नाही.
दुबईच्या राजांच्या सहा पत्नींपैकी राजकुमारी हया या चौथ्या पत्नी होत्या. २००४ साली या दोघांचे लग्न झाले होते. तिला राजाची छोटी राणी म्हणून संबोधले जाई. जॉर्डनचे भूतपूर्व राजे हुसैन यांच्या त्या कन्या आहेत.
राजकुमारी हया यांना दोन मुले आहेत, मात्र सध्या ही मुले त्यांच्यासोबत आहेत की दुबईतच आहेत याबाबत काहीहि ठोस माहिती मिळालेली नाही. सध्या तिचे सावत्र भाऊ राजा अब्दुल्लाह जॉर्डनचे राजे आहेत.
दुबईतील एका वेबसाईटने मात्र राजकुमारी हया तिच्या जलीला आणि झायीद या दोन्ही मुलांसह दुबई सोडून गायब झाल्याचे वृत्त दिले आहे.
तर अमेरिकेतील एका साईटने हया लंडनमध्ये लपून राहिली असल्याचे म्हंटले आहे. तसेच हयानेआपल्या सोबत ३१ दशलक्ष डॉलर्स सोबत नेल्याचे वृत्त देखी प्रसिद्ध झाले आहे.
अनेकांनी ट्विटर वरील पोस्टवर देखील याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये इंटरनेट उद्योजक किम डॉक्टम यांचा देखील समावेश आहे.
त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर असे लिहिले आहे, “राजकुमारी हया दुबई सोडून जर्मन राजदूताच्या मदतीने जर्मनीला पळून गेल्याच्या अनेक बातम्या सध्या प्रसिद्ध होत असल्यातरी त्यांची विश्वासार्हता कमी आहे.
मात्र, ही बातमी जर खरी असेल तर, हयाने राजकुमारी लतीफा सोबत नेमके काय घडले ते आत्ता तरी उघडपणे बोलावे. याबद्दल कुणाला काही माहिती असल्यास कृपया माझ्याशी ट्विटरवरून संपर्क साधा.
राजकुमारी लतीफा ही दुबईचे राजे शेख मक्तोम यांची कन्या असून, सध्या ३२ वर्षांची आहे. जिने याआधी दुबईपासून आणि आपल्या वडिलांपासून दूर जाऊन एक नवे आयुष्य सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
राजकुमारी आपल्या फ्रेंच मित्राच्या मदतीने दुबईतून पळून जाण्यात यशस्वी झाली.
–
- श्रीमंतांची नगरी दुबईबद्दल ‘ह्या’ गोष्टी तुम्हाला अचंबित करून सोडतील!
- दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये एका भारतीय व्यक्तीचे तब्बल २२ फ्लॅट्स!
–
तिने स्वतःचे काही व्हिडीओ बनवले होते जे स्वातंत्र्य मिळवण्याचा तिचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यास ती प्रसारित करणार होती. यामध्ये राजकुमारी म्हणून आपण कसे लज्जास्पद जीवन जगतोय याचे चित्रण तिने केले होते.
यामध्ये लातीफाने असा दावा केला होता की, लहानपणी तिने असाच देशातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता तेंव्हा पासून तिला पासपोर्ट दिला जात नव्हता आणि एकटीहून कुठेही जाऊ शकत नव्हती.
यापूर्वीही तिने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याने तिला दोन वर्षे कारावासात डांबण्यात आले होते. दुबईतून निसटल्यानंतर तिचे जहाज भारताच्या समुद्र किनाऱ्यावर पकडण्यात आले.
तिथून तिला जबरदस्ती दुबईला परत आणण्यात आले जिथे तिला सक्तीने अमलीपदार्थ देऊन नशेत ठेवण्यात येते असे तिचे मित्र सांगतात.
दुबईच्या अधिकार्यांनी मात्र तिच्या पळून जाण्याच्या प्रयत्नाबद्दल किंवा तिच्या करावासाबद्दल काहीही बोलत नाहीत. तिला दिल्या जाणार्या अमानुष वागणुकीबद्दल एका अक्षरदेखील बोलत नाहीत.
वॉचडॉग डिटेन्ड दुबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधा स्टर्लिंग यांच्या मते, “राजकुमारी हया यांच्याबद्दलच्या अनेक तपशील, जॉर्डन सरकारच्या आणि संयुक्त अरब अमिरात सरकारच्या जवळच्या सूत्रांकडून सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचत आहेत.
त्यांनी दिलेल्या माहिती नुसार राजकुमारी हया सध्या जर्मनीमध्ये राजकीय आश्रय घेऊन राहत आहेत.”
परंतु, अशा प्रकारे पळून जाऊन आणि लपून राहण्याची वेळ तिच्यावर का आली, हा विचारात पडणारा मुद्दा आहे.
फक्त घटस्फोटाची केस दाखल करून ती आपल्या मुलांसोबत वेगळी राहू शकली असती असे असताना तिला इतके असुरक्षित का वाटते याचा देखील विचार होणे गरजेचे आहे.
ती स्वतः एक समजदार स्त्री आहे आणि जॉर्डनच्या राजाची बहिण आहे तरीही ती स्वतःला असुरक्षित समजते.
लतीफाला पकडून दुबईत परत आणल्या नंतर आणि लतीफाच्या प्रश्नांवर जेंव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले, तेंव्हा गेल्या वर्षी लातीफाची जी अवस्था केली आहे त्यावरून राजकुमारी हया वर देखील आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.
राजकुमारी हया यांना देखील त्यासाठी जबाबदार धरण्यात आले होते. कारण लातीफाला पकडल्यानंतर ती पुन्हा कुठे गायब झाली याबाबत काहीच माहिती मिळत नाही.
त्यानंतर राजकुमारी हयाचे देखील याप्रमाणे दुसर्या देशात राजकीय आश्रय घेऊन राहणे हे गंभीर विचार करण्यास भाग पडणारे आहे.
–
- दुबई मधील ‘ह्या’ अविश्वसनीय गोष्टी तुम्हाला नक्कीच चक्रावून सोडतील!
- ६४ किलो सोन्याच्या अंगठीचा मालक आहे – दुबईतील भारतीय व्यावसायिक!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.