Site icon InMarathi

पाकिस्तानातील हे शहर आजही रणजितसिंहाच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देत उभं आहे

ranjeet-singh-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कालचक्र कधी वेगानं फिरतं तर कधी सावकाश. पण ते फिरत असताना बरीच मोठी उलथापालथ होत असते.

रामायणात उल्लेख असलेलं एक गाव असंच कालचक्राच्या उलथापालथीत वेगवेगळ्या शासकांच्या राजवटीत कधी ऱ्हास पावत तर कधी वैभवशाली बनत आपलं रूप बदलत राहतं.

अखेर एका वैभवशाली इतिहासाचे केवळ अवशेष जपत आणि फाळणीचे ओरखडे सहन करत आजही उभे आहे.

कोणते आहे ते गाव? सध्याचे त्याचे नाव काय आहे? कोणत्या वैभवशाली इतिहासाच्या खुणा ते जपत आहे? चला.. जाणून घेऊया त्याचा इतिहास.

 

Sikh Museum

 

ह्या शहराचे नाव आहे लाहोर. हो तेच लाहोर जे कधी भारताचा एक हिस्सा होतं. अगदी रामायणात देखील त्याचा उल्लेख आहे. प्रभू रामचंद्रांचा पुत्र लव याच्या नावाने ही नगरी वसवली गेली होती आणि “लवपुरी” नावाने ते ओळखले जात होते.

पुढे अनेक शासकांच्या राजवटीनंतर ते मुघलांच्या ताब्यात गेले आणि नंतर ते शिखांचे साम्राज्य बनले. १९४७ च्या भारताच्या फाळणीत ते पाकिस्तानच्या वाटणीस गेले.

आजही भारतीय हद्दीपासून केवळ ४५ किमी अंतरावर असलेलं हे शहर अंगावर फाळणीच्या खुणा झेलत उभे आहे.

चला जाणून घेऊया या शहराविषयी…

ह्या लाहोर शहराची आजची ओळख जरी पाकिस्तान देशातील एक शहर अशी असली तरी ते एके काळी शिख साम्राज्याची राजधानी म्हणून मिरवत होते.

इसवीसनाच्या १६ ते १८ व्या शतकादरम्यान इथे मोंगल साम्राज्य शासन करीत होते.

परंतु त्या नंतर १७९९ ते १८५० असे ५० वर्षे महाराज रणजीतसिंह यांनी स्थापन केलेल्या शीख साम्राज्याची राजधानी म्हणून लाहोरच्या वैभवशाली इतिहासाची आणखी माहिती करून घ्यायलाच हवी.

 

thefamouspeople.com

 

काय आहे हा वैभवशाली इतिहास? महाराजा रणजीतसिंग यांनी कसे स्थापन केले राज्य?

चला तर जरा कालचक्र उलट फिरवूया आणि प्रवेश करूया 1799 या वर्षात. शिख धर्माची स्थापना गुरू नानकदेव यांनी केली आणि शिख समुदाय एका विचारधारेखाली एकवटू लागला.

शीख समुदायात वेगवेगळे गट होते ज्याला मिसल म्हणत. अशाच एका मिसलचे प्रमुख महासिंह चाकोरी यांचा रणजितसिंह हा मुलगा.
रणजितसिंह केवळ १२ वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले.

नंतर त्यांना एका छोट्या मिसलचे प्रमुख बनवले गेले. त्यांना झालेल्या एका अपघाताने त्यांचा एक डोळा कायमचा कामातून गेला होता. फार लवकर मिसलची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्षच झाले.

पुढे रावी आणि चिनाब नद्यांच्या प्रदेशाचे ते शासक बनले.इथेच त्यांना राज्यकारभाराची शिकवण मिळाली.पुढे याच अनुभवाच्या आणि शौर्याच्या जोरावर त्यांनी आपापसात लढणाऱ्या सर्व मिसल ना एकत्र स्वतःच्या अंमलाखाली आणले.

तो क्षण आला जेव्हा त्यांनी सर्व शीख समुदायाना एकत्र आणले आणि शीख राज्याची स्थापना केली आणि लाहोरला आपली राजधानी बनवली.

तुम्हाला हे माहितीय का की त्यांची राजधानी कशी होती?

लाहोर होतं पंजाब प्रांतात. पंजाब मुळातच रावी चिनाब, सतलज अशा नद्यांचा गाळाने सुपीक बनलेल्या शेतीने समृद्ध झालेले. शेती पशुपालन याच्या जोडीला नागरिक सैन्यात चाकरी करणारे. त्यांना रणजितसिंह यांच्यासारखा कुशल प्रशासक लाभल्याने शिखराज्य भरभराटीस आले.

लाहोर तसे मुळातच संपन्न शहर. त्यात आता शिख साम्राज्याची राजधानी. देखण्या हवेल्यांनी नटलेले. एकएक हवेली म्हणजे मुघल शैलीचा उत्तम नमुना.

 

madainproject.com

 

भारतीय आणि मुघल शैली यांचा उत्तम मिलाफ असलेल्या या हवेल्यांचा उपयोग रणजितसिंह यांनी विविध प्रकारच्या कामांसाठी करून घेतला.

तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराज रणजितसिंह यांच्या निवासस्थानाचे वर्णन ऐकून. ते कुठे रहात होते माहितीय? ऐका तर… हे वर्णन केलय त्या काळच्या एका इंग्रज प्रवाशाने.. त्याने स्वतःच्या नजरेने हे सर्व पाहिले होते.

त्या इंग्रज प्रवाशाचे नाव होते अलेक्झांडर बार्स. तो म्हणतो महाराज रणजितसिंह यांचे शयनकक्षच एवढे मोठे की आश्चर्यच वाटावे. ते ज्या मंचकावर झोपायचे तो कलाकुसरीने मढलेला होता आणि त्याचे पाय सोन्याचे होते.

मंचकाच्या चारही बाजू आणि त्याचे खाम्ब सोन्याचे होते. मंचकाच्या वरील भागात नक्षीकाम आणि सोन्याचा वापर केलेला होता. मंचकाच्या बाजूलाच महाराजांच्या बसण्याची खुर्ची होती आणि ती देखील पूर्णपणे सोन्याची. हे झाले सोन्याबद्दल..

खिडक्यांचे पडदे कसले होते माहितीय? ते होते अत्यंत मुलायम आणि अत्यंत महाग अशा काश्मिरी शालींचे. जमीन उंची गालीच्यानी मढलेली.
शयनकक्षाच्या बाजूच्या आणि वरील बाजूच्या खोल्या देखील अशाच संपन्न.. आणि रेशमी पडद्यांनी सुशोभित.

महाराज रहात होते लाहोरच्या बादशाही फोर्टमधे, त्यातील शाहबुर्ज या महालात त्यांनी आपला दरबार सुरू केला होता. इथूनच ते राज्याचा कारभार चालवत होते. तर रहाण्यासाठी त्यांनी निवडला होता शीशमहल.

 

tripadvisor.com.sg

 

अप्रतिम कलाकुसरीने ही वास्तू नटली होती. अतिशय उंची फर्निचर त्यांनी बनवून घेतले होते. आज शिश महल व हमामखाना यांचे केवळ अवशेष उरलेले आहेत.

महाराज रणजितसिंह ओळखले जायचे ते शेर ए पंजाब या नावाने. नावाप्रमाणेच ते खरोखरच शेर होते. त्यांचे स्वतःचे शिक्षण कमी झाले होते पण प्रजेच्या शिक्षणाची त्यांनी चोख व्यवस्था केलेली होती.

न्यायदानाचे काम देखील असे केले की कोणावर जरासाही अन्याय त्यांनी होऊ दिला नाही.ना कोणाला मृत्युदंडाची शिक्षा दिली.

आता बघुया, लाहोरच्या आणि काही वैभवशाली इमारती आणि त्यांची सध्याची अवस्था.

महाराजा रणजितसिंह ज्या ठिकाणाहून न्यायदानाचे काम करायचे ती इमारत म्हणजे आठदरवाजा.. नावाप्रमाणेच आठ दरवाजे असलेली अतिशय देखणी इमारत.

 

pakistantoday.com.pk

 

तर त्याच्याच बाजूस असलेल्या वॉच टॉवरमध्ये त्यांनी आपले खाजगी मंदिर उभे केले होते आणि तेथेच धार्मिकग्रंथ सुद्धा ठेवले होते.
महाराजांचा खजिना जिथे ठेवला होता ती इमारत म्हणजे मोती मस्जिद.

या खजिन्यात ८ करोड रुपये किंमती एवढी चांदीची नाणी जमा होती तर बाकी सोने व जडजवाहीर होते.

आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे ४८०० काश्मिरी शाली जतन करून ठेवल्या होत्या. तुम्हाला माहितीय जगप्रसिद्ध कोहिनुर हिरा महाराज रणजितसिंह यांच्या मालकीचा होता आणि तसेच तिमूर नावाचे जगप्रसिद्ध माणिक देखील त्यांच्या खजिन्यात होते.

मात्र ही दोन अमूल्य रत्ने गोविंदगढ ह्या किल्ल्यात त्यांनी ठेवली होती. आज दुर्दैवाने लाखो डॉलर्स किमतीची ही रत्ने भारतात नाहीत. त्यातील कोहिनुर हिरा इंग्लंडच्या संग्रहालयात आहे.

महाराजांनी आपली सर्व प्रकारची शस्त्रे आणि दारुगोळा बादशाही मशिदीत ठेवला होता. थोडक्यात या इमारतीचा उपयोग बारुदखाना म्हणून केला जात होता. ही जागा लाहोर फोर्टशी एका पॅसेजने जोडलेली होती.

लाहोर फोर्टशी महाराज रणजितसिंह यांचे काय नाते होते? तो महाराजांच्या खास आवडीचा का होता?

महाराज रणजितसिंह जरी बादशाही फोर्टमधील शिश महाल इथे रहात असले तरी उन्हाळ्यात मात्र लाहोर फोर्ट येथील हजुरीबाग इथे राहायला यायचे.

 

Explore Pakistan

 

हजुरीबाग येथील महाल खास त्यांच्या परराष्ट्र मंत्रांच्या आणि फकीर अझुरुद्दीन यांच्या देखरेखीखाली बांधवून घेतला होता.

अतिशय हवेशीर असा हा महाल होता आणि त्याची रचना अशी केली होती की कडक उन्हाळ्यात महाराज तेथेच जमिनीखाली असलेल्या खोल्यांमध्ये रहायला जायचे. त्यामुळेच त्यांचे या जागेवर प्रेम होते.

लाहोर फोर्ट च्या आजूबाजूस त्यांच्या सैन्यातील सरदारांचे तसेच अमिरउमरावांचे वाडे व हवेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याशी केव्हाही सल्ला मसलत करता यायची. आज या पैकी फारच थोड्या वास्तूंचे अवशेष शिल्लक आहेत.

इंग्रजांच्या काळात काही नष्ट केल्या गेल्या तर काही काळाच्या ओघात जीर्ण होऊन कोसळून गेल्या.

याच लाहोर फोर्ट मध्ये २७ जून १८३९ मध्ये वयाच्या ५८ व्या वर्षी महाराजांचा देहांत झाला. पंजाबचा शेर पंजाबच्या मातीत विलीन झाला.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचा देह याच किल्ल्यातील दिवाण ए आम मध्ये ठेवण्यात आला होता.

 

pakistantoursguide.com

 

त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस त्यांच्या चार पत्नी सती गेल्या. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या साम्राज्यास जणू ग्रहणच लागले. त्यांचा पुत्र खरकसिंह वारसदार म्हणून गादीवर बसला.

पण दुर्दैवाने वर्षभरातच ५ नोव्हेंबर १८४० ला महाराज खरकसिंह यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यांच्या मृत्यूमागे दरबारी व्यक्तींचा हात असावा आणि त्यांच्यावर विषप्रयोग झाला असावा असा संशय सर्वांना होता.

आज ही इमारत फाळणीनंतर पाकिस्तानच्या ताब्यात गेल्यावर तेथे पाकिस्तान सरकारचे पुरातत्व खात्याचे कार्यालय आहे.

दुर्दैवाचे फेरे एवढ्या वरच थांबले नाहीत. शिख राजसिंहसनाच्या थोडे पुढेच युवराज नौनिहालसिंह याची हवेली आहे. ही हवेली मात्र पूर्ण चांगल्या अवस्थेत असून तिथे मुलींची शाळा भरते.

 

TripAdvisor

 

युवराज नौनिहालसिंह यांचा मृत्यू अतिशयच दुर्दैवी होता. वडिलांच्या अंत्यसंस्काराहून परतत असतानाच रोशनी दरवाजा इथे कमानीचा दगड डोक्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. हा दरवाजा देखील चांगल्या अवस्थेत आहे.

हिंदीत एक वाक्प्रचार आहे,वक्त वक्त की बात होती है। तसंच काहीसं या साम्राज्याच्या बाबतीत घडलं. केवळ ५० वर्षं हे साम्राज्य टिकले.

महाराज रणजितसिंह यांनी फाटाफूट झालेल्या तसेच आपापसात लढणाऱ्या शिखांना आपल्या तलवारीच्या जोरावर एकत्र आले,

पण त्यांच्या मृत्यूनंतर महाराज खरकसिंह यांच्यावर झालेला विषप्रयोग किंवा रोशनिदारवाज्याच्या कमानीचा दगड पडून झालेला युवराज नौनिहाल यांचा संशयास्पद मृत्यू हेच दर्शवितो की पुन्हा शिख गटांनी उचल खाल्ली व साम्राज्य लयास गेले.

ज्या इंग्रजांना महाराजांनी आपल्या जवळ फटकू दिले नव्हते त्या इंग्रजांनी लाहोर व अमृतसर ताब्यात घेतले.

 

The Hindu

 

आज लाहोर हिंदुस्तानात नाही आणि त्या वैभवसंपन्न शिख साम्राज्याच्या काही जुन्या इमारती किंवा अवशेष सोडल्यास आठवणींखेरीज आपल्या हातात काहीच नाही.

कालचक्र फिरतच राहते आणि फिरतच राहील.आपण फक्त त्या गत वैभवाचे स्मरण करायचे इतकेच आपल्या हाती आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version