Site icon InMarathi

अमेरिकेत प्लॅस्टिक बॅग मध्ये सापडलेल्या ‘नवजात’ बालकाला नाव दिले…”इंडिया”!

baby found in plastic bag inmarathi

crimeonline.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

तुम्ही एखाद्या निवांत रात्रीच्या वेळी जंगल सदृश भागात फिरत आहात  आणि  त्याचवेळी तुमची नजर रस्त्याच्या कडेला जाते, तिथे तुम्हाला वाणसामनाची पिशवी दिसते. काय कराल ?  दुर्लक्ष करून पुढे जाल की, पिशवी तपासाल ?

मंडळी ही घटना आहे एक वर्षापूर्वीची म्हणजेच ६ जून २०१९ च्या रात्रीची.

एक पोलिस अधिकारी पथक रात्रीची गस्त घालत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला साधारण वाण समान आणायला वापरतात तसली पिशवी टाकलेली दिसली, सुदैवाने ते थांबले.

पिशवीत हालचाल जाणवली आणि पाठोपाठ रडण्याचा  आवाजही आला. आता निराळीच शंका येऊन ते पिशवीकडे धावले. सहकाऱ्याने व्हिडीओ कॅमेरा सुरू केला.

 

CNN.com

 

त्यांनी हळुवार हातांनी पिशवी उघडली आणि त्यात त्यांना जे सापडले ते अंगावर काटा आणणारे होते. त्या वाण सामानाच्या पिशवीत थोड्याच वेळापूर्वी जन्म घेतलेले गोंडस नवजात अर्भक होते जे भुकेने कळवळून रडत होते.

आवळलेल्या पिशवीत धडपडत होते.

हे बाळ  म्हणजे एक मुलगी असून तिची गर्भनाळ सुद्धा जोडलेलीच होती. होय पुन्हा एकदा नवजात बाळ कचर्‍यासारखे टाकून देण्यात आले होते.

भारतात अशा घटना वरचेवर घडतात जी अत्यंत लाजिरवाणी  बाब आहे मात्र, मंडळी ह्यावेळी ही घटना भारतात घडलेली नाही ही घटना आहे अमेरिकेतील जॉर्जिया शहरातली.

अटलांटा पासून जवळ जवळ ६४ किलोमीटर लांब जंगलात हे बाळ सापडले. जेव्हा हे बाळ त्या अधिकार्‍यांना सापडले तेव्हा त्या बाळाला त्वरित मेडिकल फर्स्ट रिस्पोंडर्स च्या हाती सोपवण्यात आले.

 

ABC News – Go.com

 

त्यांनी त्याला नीट उबदार कापडात गुंडाळून घेतले आणि बाळाला प्रथमोपचार द्यायला सुरुवात केली. नंतर दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.

बाळ सापडल्यानंतर चार पाच दिवसांनी कॅमेर्‍यात कैद केलेला घडलेला हा संपूर्ण प्रकार पोलिस अधिकार्‍यांतर्फे मंगळवारी प्रसारित करण्यात आला जेणेकरून ह्या प्रकरणाचा नीट तपास होण्यासाठी  मदत होईल.

ह्या व्हिडीओमध्ये बाळाची जगण्याची धडपड आणि पोलिसांनी तिला पाहिल्यावर विस्मयाने काढलेले उद्गार मन हेलावून टाकणारे आहेत.

त्यात दिसणारी बाळाची गुदमरलेली अवस्था काळजाला चरे पाडणारी आहे. बाळाची प्राथमिक  वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की ह्या बाळाचा जन्म तासभरापूर्वीच झालेला होता.

 

Gulf News

 

म्हणजे जन्मानंतर लगेच ह्या नवजात अर्भकाला पिशवीत घालून टाकून देण्यात आले होते हे स्पष्ट झाले.

हे नवजात बाळ तिथे कोणी आणून टाकले ह्याची कसून चौकशी जॉर्जीया पोलिसांतर्फे केली जाते आहे. दरम्यान सध्या बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला “बेबी इंडिया” हे नाव देण्यात आले आहे.

६ जून पासून पोलिस ह्या बाळाच्या आईला शोधण्याचा अथक प्रयत्न करत आहेत, ६ जून पूर्वीच्या काळात प्रसूतीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या सर्व मातांचा कसून तपास करण्यात येत आहे.

त्यासाठी मदत करण्याविषयी पोलिसांनी ट्विटर वर जनतेला आवाहन केले आहे. हयाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळवण्यात यावे असेही कळकळीचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

 

WKRC

 

पोलिस युद्धपातळीवर ह्या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यासाठी त्यांनी देशभरातून माहिती मिळवणे सुरू केले आहे.

ह्या कामात विडिओमुळे मोलाची मदत होईल ह्या विश्वासाने त्यांनी तो विडिओ #babyindia ह्या हैशटैग अंतर्गत जगभरात प्रसारित केलेला आहे.

ह्या घटनेबद्दल ट्विटर वर जगभरातील लोकांच्या अनेक तीव्र आणि संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत काहींनी ह्या कृत्याचा निषेध केला आहे तर  काहींनी बाळ सुखरूप असल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत.

हे बाळ आता सुखरूप असून सध्या ते जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ़ फ़ैमिली अँड चिल्ड्रन सर्विस ह्यांच्या देखरेखी खाली आहे.

एकीकडे पोलिस अधिकारी अजूनही बाळाच्या आईचा शोध घेत आहेत तर दुसरीकडे ह्या लहानगीला दत्तक घेण्यासाठी तिथल्या अनेक कुटुंबांनी पुढाकार घेतला आहे.

 

www.tasnimnews.com

 

परदेशात ही घटना क्वचित घडणारी असली तरी आपल्याकडे हे जणू नित्याचेच झाले आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी आपले सगळे प्रयत्न कायमच अपुरे पडत आलेले आहेत.

आपल्या पोटी मुलगी नको ही धारणा सगळ्या मानवी भावभावनांना मूठमाती देते, माणसाला राक्षस बनवते.

“बहीण हवी, बायको हवी, मग मुलगी का नको” हे आणि अशाप्रकारचे सगळेच संदेश आता ऑटोइग्नोर मोड वर गेले आहेत की काय अशी शंका येते.

मंडळी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या बाळाचे नाव त्या लोकांना “बेबी इंडिया” असे ठेवण्याची इच्छा का झाली असावी ह्या प्रश्नाचे उत्तर एक भारतीय म्हणून लाज वाटणारे आहेच शिवाय विचार करायला भाग पाडणारे आहे.

ही घटना जुनी असली तरी त्या बाळाचं नामकरण हे प्रत्येक भारतीयांच्या जिव्हारी लागल्याशिवाय आपल्या देशातले हे प्रकार थांबणार नाहीत!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version