आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
शालेय, महाविद्यालयीन जीवनात हे शब्द अभ्यास म्हणून आयुष्यात प्रवेश करते झाले, पण संबंधित परीक्षा संपल्यावर त्यांचा संबंध संपला असे नाही.
कारण आपल्या देशाच्या, राज्याच्या सामाजिक, आर्थिक सिद्धांताचा भाग म्हणून ते नकळतपणे आपल्याही जगण्याचा, विचारधारेचा भाग झाले आहेत.
त्यामुळे सिलॅबसमधील ऑप्शनला टाकलेल्या प्रश्नांप्रमाणे यांना बगल देऊन चालणार नाही.
समाजाचा घटक म्हणून मत व्यक्त करताना तुम्ही जेव्हा, ‘ मी साम्यवादी/समाजवादी विचारसरणीचा आहे’ असे म्हणता तेव्हा तुम्हाला स्वतःला त्या शब्दांचा अर्थ माहित असणे आवश्यक आहे.
यांच्या अर्थाबाबत एक गोंधळ कायम आहे.
हिंदी चित्रपटात जसे ‘मेले में बिछडे हुये जुड्वे भाई बहन’ असतात, आणि त्यांच्या सारख्या दिसण्यावरून सिनेमातील पात्रे रामला शाम आणि किंवा सीताला गीता समजून अभूतपूर्व गोंधळ घालतात तसे काहीसे या संज्ञांच्या अर्थाचे झाले आहे.
हे शब्द समानअर्थी आहेत असे ग्राह्य धरले जाऊन एका ऐवजी दुसरा वापरला तरी चालतोय हा चुकीचा ग्रह बऱ्याचदा आपल्याला दिसतो.
हा गोंधळ होण्याचे मुख्य कारण म्हणजे या दोन्ही विचारप्रणालींचा जन्म औद्योगिक क्रांतिदरम्यान झालेल्या कामगार/मजूर वर्गाच्या पिळवणुकीला विरोध करण्याच्या गरजेतून झाला.
आर्थिक आणि राजकीय सिद्धांत भिन्न असणारे कित्येक देश ‘भांडवलशाही’च्या विरोधात आहेत, पण त्यांची राजकीय जगाच्या राजकीय इतिहासात प्रतिमा एकतर समाजवादी किंवा साम्यवादी अशी आहे.
त्यामुळे जेव्हा गंभीर राजकीय वादविवाद सुरु होतात तेव्हा या संज्ञांचा नेमका अर्थ माहित असणे गरजेचे आहे.
उत्पादनाची सर्व साधने आणि देशातील लोकांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा यावर कोणा एका खाजगी व्यवसायाची मालकी असणार नाही तर त्यांवर शासन नियंत्रित संस्था/संघटनांचे नियंत्रण असेल इथपर्यंत दोन्ही विचारप्रणालीमध्ये एकवाक्यता आहे.
शिवाय ‘मागणी आणि पुरवठा’ संबंधित सर्व आर्थिक नियोजन आणि निर्णयांना केंद्र शासन जबाबदार असते. असे असले तरी दोहोतील सूक्ष्म फरक काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे.
साम्यवादी विचार ‘व्यक्ती’च्या अन्न, वस्त्र, निवारा यांसह अनेक गरजा भागवणे या विचाराभोवती फिरतो.
याउलट व्यक्तीच्या गरजा काय आहेत यापेक्षा व्यक्तीचे देशाचा एक घटक म्हणून अर्थकारणाला काय आणि किती योगदान आहे इकडे समाजवाद लक्ष केंद्रित करतो.
साम्यवाद ही अशी आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यंत्रणा आहे जिच्यासाठी ‘व्यक्ती’ पेक्षा समाज महत्वाचा आहे.
साम्यवादाला माणसातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरातील भिन्नतेमुळे निर्माण झालेले भेद अमान्य आहेत. अशा भेदरहित समाजाकडून सर्व गरजा आणि गरजा पुरवणाऱ्या सेवा आणि संसाधनांवर नियंत्रण राहील हा मुख्य विचार साम्यवाद जपतो.
‘सर्वजण समान आहेत’ ही साम्यवादाची प्रेरणा आहे. इथे आर्थिक स्त्रोत कोणा एकाच्या मालकीचे नसून शासनाच्या मालकीचे आहेत. संपत्तीची खाजगी मालकी हे शोषणाचे व दुःखाचे मूळ कारण आहे.
यातून आर्थिक विवंचना दूर झाल्या तरी भेदाभेद, शोषण सारख्या सामाजिक समस्या निर्माण होतात ही साम्यवादी विचारधारा! पैसा ही गरज येथे दुय्यम आहे.
येथे उच्चभ्रू, मध्यमवर्गीय आणि तळागाळातील वर्ग असे स्तर नाहीत.
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय सुविधा या गरजा सर्वच माणसांच्या आहेत. त्या पुरवल्या जाणे हा सर्वांचाच हक्क आहे.
त्यामुळे एकत्रित श्रम करून प्रत्येकाने या गरजा भागवाव्या असे साम्यवाद सांगतो.
समाजवाद
समाजवाद ही भांडवलशाहीच्या दोषांविरोधात निर्माण झालेली प्रतिक्रिया आहे.
भांडवलशाहीने जन्माला घातलेल्या विषमता, शोषण, ‘ नाही रे’ वर्गाची पिळवणूक यांसारख्या अनेक समस्यांचा अंत करायचा असेल तर उत्पादन साधने (जमिनी, खाणी, कच्चा माल, कारखाने, यंत्रे, वाहतुकीची साधने इत्यादी) समाजाच्या मालकीची असणे आवश्यक आहे हे समाजवादाचे मुख्य सूत्र.
थोडक्यात समाजवाद म्हणजे सरकारचा औद्योगिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर शिरकाव. सरकारने पोलाद बनवणे, विमाने बनवणे, बुलडोझर बनवणे ही समाजवादाची उदाहरणे.
समाजवादाच्या केंद्रस्थानी देखील ‘सामाजिक समानता’ आहे. परंतु सर्व पातळीवर समानता अशक्य आहे हे समाजवाद मान्य करतो.
श्रम, उद्योग, भांडवली मालमत्ता ( रेल्वे, जहाजे, यंत्रे इ.) आणि नैसर्गिक संसाधने हे चार मुख्य घटक आहेत ज्यांचे लोकशाही पद्धतीने निवडून दिलेल्या शासनाने समाजातील प्रत्येक व्यक्तीस समान वाटप करणे अपेक्षित आहे.
परंतु समाजवाद हे नाकारत नाही की भांडवलशाहीच्या चढाओढीमुळे अशा प्रकारची संपूर्ण समानता आणणे हे शक्य नाही, अगदी सर्वांनी सहकार्य केले तरीही.
इथे सर्व व्यक्ती समान असल्या तरी आर्थिक मोबदला देताना व्यक्तीची क्षमता आणि त्याने केलेले श्रम/योगदान विच्रारात घेतले जाते. क्षमता आणि योगदानाअनुसार मोबदला हा समाजवादाचा मुख्य विचार आहे.
समाजवादी लोकशाही म्हणजे काय ?
समाजवादी लोकशाही ही आर्थिक, सामाजिक आणि राजकीय तत्वप्रणाली आहे. लोकशाहीचा पाया मजबूत आणि व्यापक करणे या उद्दिष्टातून ही प्रणाली उदयास आली.
नफ्यावर आधारलेल्या व्यक्तीवादास विरोध, खाजगी उत्पादनक्षेत्रांवर नियंत्रण, समानता, न्याय, मुलभूत हक्कांचे रक्षण ही लोकांचे हित जपणारी सूत्रे इथेही प्रमाण मानण्यात आली.
शिक्षणातून विचारपरिवर्तन होते असे समाजवादी मानतात. परिवर्तनाची ही प्रक्रिया लोकशाही मार्गाने, अहिंसेचा मार्ग अवलंबून सुरु ठेवावी, भलेही तिचा वेग मंद असेल असे समाजवाद्यांचे मत आहे.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत कोणा एकाची चंगळ होते. समाजवाद या गोष्टीला प्रोत्साहन देत नाही.
समाज आणि अर्थव्यवस्था लोकशाही मार्गाने चालवले जात असताना समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा भागत आहेत ना याकडे समाजवाद लक्ष पुरवतो.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे समाजवादी अर्थव्यवस्थेत रुपांतर होण्यासाठी मार्क्सच्या क्रांतिपेक्षा लोकशाही प्रक्रियांचा अवलंब करणे आवश्यक आहे असे लोकशाही समाजवाद्यांचे म्हणणे आहे.
निवास, वीज, पाणी, वाहतूक ( प्रवास) आरोग्य यांसारख्या काही सेवा आहेत ज्या सार्वत्रिकरित्या मोठ्या प्रमाणावर नेहमीच वापरल्या जातात.
ज्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो अशा सेवा सरकारी संस्थांमार्फत पुरवल्या जायला हव्यात म्हणजे मुठभर भांडवलदारांचा संपूर्ण समाजावर अंकुश राहणे टाळले जाईल.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समाजवादी लोकशाहीचे आणखी एक बदललेले रूप समोर आले. सार्वजनिक सेवांवर समाजवाद आणि भांडवलशाही या दोहोंचा प्रभाव या लोकशाहीने स्वीकारला.
जगातील अनेक देशांनी समाजवादी विचारप्रणाली स्वीकारली आहे.
चीनचा कम्युनिस्ट पक्ष हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे. या पक्षाची एकछत्री राजवट असून सर्व धोरणे हा पक्ष ठरवतो. चीनच्या संविधानात या पक्षाला कायदेशीररीत्या सर्वोच्च स्थान आहे.
या पक्षाची धोरणे साम्यवादी असली तरी त्याने त्याच्या जोडीला भांडवलशाहीचा देखील मर्यादित प्रमाणावर स्वीकार केला आहे.
त्याचबरोबर क्युबा देशातील कम्युनिस्ट पार्टीचे स्वतःच्या मालकीचे उद्योग आहेत. देशातील लोक राज्यासाठी काम करतात.
आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण या सेवांवर शासनाचे नियंत्रण असून या सेवा मोफत आहेत. निवास मोफत तरी आहे किंवा अनुदानातून उपलब्ध करून दिलेले आहेत.
नॉर्थ कोरिया मध्ये देखील १९४६ पर्यंत कम्युनिस्ट पक्षाचा कारभार होता. आता ‘ सोशालिस्ट कॉन्स्टीट्युशन ऑफ द डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ या नावाने कारभार बघते.
शेतजमिनी, कामगार, अन्नवाटप करणारे स्त्रोत हे सर्व शासनाच्या नियंत्रणाखाली आहे. संपत्तीच्या, मालमत्तेच्या खाजगी मालकीस मनाई आहे. शासनाच्या मालकीची घरे लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या व्यतिरिक्त अनेक आधुनिक देशांनी ही प्रणाली स्वीकारली आहे. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क सारख्या देशात समाजवादी यंत्रणेनुसार काम होते. या देशाची सरकारे मोफत निवास, शिक्षण आणि मरेपर्यंत निवृत्ती वेतन पुरवतात.
याचा परिणाम म्हणून त्यांच्या देशाचे नागरिक जगातील सर्वात महागडे कर भरतात.
शासनाकडून बऱ्याच गरजा भागवल्या जात असल्याने लोकांना संपत्तीचा साठा करण्याची गरज वाटत नाही. या देशाची काही यशस्वी भांडवलशाही क्षेत्रे देखील आहेत.
थोडक्यात सांगायचे झाले तर प्रत्येक विचारधारा परिपूर्ण असतेच असे नाही. त्रुटी असतातच.
अनेकांचे हित डोळ्यासमोर ठेवून स्वीकारलेली प्रणाली देखील शंभर टक्के result देईल असे नसते. सर्वातील सुवर्णमध्य साधून, प्रतेकातील चांगले स्वीकारून, अंगीकारून देशाचा विकास करणे हेच शेवटी महत्वाचे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.