Site icon InMarathi

एका डॉक्टरचे पत्रकाराला खुले पत्रं- “ब्रेकिंग न्यूजच्या नशेत पत्रकारिता करताय की नुसता राग काढताय?”

doctor inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी NRS मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ७५ वर्षीय मोहम्मद शाहीद ह्या पेशन्टचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

रुग्णाच्या अकरा नातेवाईकांनी “डॉक्टरांच्या हलगर्जी”मुळे आमचा रुग्ण दगावला असा कांगावा केला तसेच आम्हाला रुग्णाचे शव सुद्धा वेळेत मिळाले नाही असाही आरोप केला.

रुग्णालय कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की ह्या रुग्णाच्या नातेवाईकांनी ज्युनिअर डॉक्टर्सबरोबर गैरवर्तन केले. थोड्याच वेळात रात्री अकरा वाजता एक घोळका ह्या रुग्णालयात आला आणि त्या लोकांनी ज्युनिअर डॉक्टरांशी भांडण केले.

दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना मारण्यासाठी व रुग्णालयाची नासधूस करण्यासाठी रुग्णालयात ट्रक वगैरे वाहने घेऊन २०० लोक आले. आणि त्यांनी परिबहा मुखोपाध्याय आणि यश टेकवानी ह्या इंटर्न डॉक्टरांना अमानुष मारहाण केली.

यशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि परिबहाला तर आयसीयूमध्ये न्यावे लागले इतकी अमानुष मारहाण ह्या लोकांनी केली. ह्या घटनेचा निषेध संपूर्ण देशातील डॉक्टरांनी केला. ह्या घटनेवर लोकांनी अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

Telegraph India

काहींनी डॉक्टरांची बाजू उचलून धरली तर काहींनी डॉक्टरांना थेट खलनायक ठरवून “ह्यांना असेच केले पाहिजे” असा टोकाचा पवित्रा घेतला. IMA ने देशव्यापी संप केला.

डॉक्टरांना मारहाण होण्याची ही पहिलीच घटना नाही. ह्यापूर्वी सुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची नासधूस करणे, डॉक्टरांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करणे असले प्रकार अनेकदा केले आहेत.

ह्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

लोकांचे जीव वाचविणाऱ्या डॉक्टरांचे जीव कोण वाचवणार हा प्रश्न उभा राहिला आहे. अशी नाजूक परिस्थिती असताना मीडिया मात्र पत्रकारिता सोडून आपल्या ब्रेकिंग न्यूजच्या नादात लोकांची डोकी भडकवण्याचे काम मात्र चोख करीत आहे.

वाटेल त्या पातळीवर उतरावे लागले तरी चालेल पण आम्ही “सबसे तेज” ब्रेकिंग न्यूज देणार ह्या चढाओढीत मीडिया पत्रकारितेचा खरा अर्थ विसरले आहेत असेच म्हणावे लागेल.

काही दिवसांपूर्वी बिहारमधील एका रुग्णालयात ” सबसे तेज” टीमच्या पत्रकार अंजना ओम कश्यप आपला माईक ,कॅमेरा वगैरे घेऊन थेट आयसीयूमध्ये शिरल्या आणि तिथे आपले काम करणाऱ्या डॉक्टरांवरच राग काढू लागल्या.

 

Samachar4media

हे बघून देशभरातील डॉक्टरांचे माथी भडकली नाही तरच नवल! हा व्हिडीओ पाहिला तर कुठलाही सेन्सिबल माणूस वैतागेल! इथे तर ह्या बाईंनी डॉक्टरांच्या कामाबद्दलच प्रश्नचिन्ह उभे केले.

अंजना ओम कश्यप ह्या “पत्रकार” बाईंच्या ह्या पत्रकारितेवर डॉक्टर विष्णू पिल्लई ह्यांनी अंजना कश्यप व आज तक वाहिनीला एक खुले पत्रं लिहिले आहे. ह्या पत्रात त्यांनी अंजना कश्यप व आज तक वाहिनीला काही प्रश्न विचारले आहेत. हे भाषांतरित पत्र खाली देत आहोत.

“एक पोस्ट ग्रॅज्युएट रेसिडेन्ट डॉक्टर असल्यावर तुम्हाला कामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशालाच वेळ मिळत नाही. पण हे लिहिणे अत्यंत गरजेचे होते.

मला काही प्रश्न पडले आहेत ते मी सर्वांपुढे खास करून मीडियापुढे उपस्थित करू इच्छितो. मला खात्री आहे मला जे प्रश्न पडले आहेत तेच किंवा तसेच प्रश्न अनेक डॉक्टरांना पडलेले असतील.

जे दिवसरात्र एक करून, मेहनत करून आजूबाजूचे असंख्य अडथळे पार करून हजारो लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे पत्रकारितेची व्याख्या म्हणजे नुसते माईक घेऊन फक्त राग बाहेर काढणे ही कधीपासून झाली? बातमीसाठीचा अभ्यास होमवर्क वगैरे कुठे आहे?

 

IndiaEducation.net

तुमचे प्रश्न ऐकून असेच म्हणावे लागते की तुम्हाला रोगांविषयी किंवा रुग्णालयात पाळावे लागणारे शिष्टाचार,नियम ह्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. सगळ्यात वाईट काय आहे माहितेय का?

तुमच्या मुलाखतीत तुमचा उद्धटपणा आणि मग्रुरी स्पष्टपणे दिसून येते आहे. त्यामुळे तुम्हाला काही नवे शिकताही येत नाहीये आणि संतुलित, तटस्थ मत देखील ठेवता येत नाहीये.

तुम्हाला दिसत नाहीये का जेव्हा ते लहान बालक दवाखान्यात आले तेव्हा आयसीयूमधील डॉक्टर आधीच एका रुग्णाला तपासत होते.

ह्या सगळ्या रुग्णांसाठी त्यावेळी तिथे एकच डॉक्टर उपलब्ध होते.

त्या डॉक्टरच्या डोळ्यांकडे नीट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यावर किती ताण आला आहे. डॉक्टर असल्यामुळे आम्हाला कळू शकते की एका दिवसात इतके सगळे पेशन्ट तपासून त्याचे डोके बधिर झाले असेल, तो शारीरिक व मानसिक दृष्ट्या थकला असेल.

 

Mirror

पण शारीरिक मानसिक थकवा आला असला तरीही आम्ही आमचे काम करणे थांबवत नाही. मी सांगतोय तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा कारण डॉक्टरांइतकी एखाद्या जीवाची किंमत कुणालाही नसते कारण रोजच आम्ही मृत्यूशी दोन हात करत असतो.

जो डॉक्टर तुमच्या डोळ्यापुढे सगळीकडे धावपळ करून त्याला शक्य तितके प्रयत्न करताना दिसतोय त्याच्यासाठी तुमच्या मनात थोडीदेखील सहानुभूती नाही?

आमच्या क्षेत्रात जर आम्ही अभ्यास व कठोर परिश्रम केले नाही तर त्याचे परिणाम भयानक होतात, कुणाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणूनच आम्हाला असे प्रशिक्षण दिले जाते की कधीही पूर्ण तयारीशिवाय जाऊ नका.

म्हणूनच डॉक्टर होणे हे सगळ्यात कठीण यशांपैकी एक यश आहे. तुमची त्या आयसीयूमधील ती आरडाओरड असेच दाखवून देते की तुमची बातमी नीट द्यायची तयारीच झालेली नाही.

बहुतेक तुमच्या क्षेत्रात तयारी नसेल तरीही काम केल्याने फारसे वाईट आणि भयानक परिणाम होत नसतील. म्हणूनच पत्रकारितेच्या नावाखाली तुमचे असे मूर्खपणाचे आणि अयोग्य वर्तन चाललेले आहे.

तुमची मुलाखत बघून मला तर आता असे वाटू लागले आहे की टीव्ही पत्रकार हे खरंच पत्रकार राहिलेले आहेत का? की ते फक्त करमणुकीचे कार्यक्रम करणारे अभिनेते किंवा कलाकार झाले आहेत ज्यांना फक्त काहीतरी सनसनीखेज दाखवून trp कमवायचा आहे?

ह्याखेरीज अश्या मूर्खपणाच्या रिपोर्टींगचे दुसरे काहीच लॉजिकल स्पष्टीकरण असू शकत नाही.

तुम्हाला आजारी आणि जीवावरच्या संकटात सापडलेल्या रुग्णांविषयी थोडी जरी सहानुभूती वाटत असती तर तुम्ही तुमचा तो सोनेरी माईक आणि कॅमेरा घेऊन थेट आयसीयूमध्ये अश्या घुसल्या नसत्या.

तुमच्याबरोबर तुम्ही अनेक जंतू आणून आयसीयू सरळसरळ जन्तुमय केले. तुमच्या बातम्या विकण्यासाठी, TRP मिळवण्यासाठी तुम्ही लहान लहान मुलांचा उपयोग केला नसता. तुम्हाला खरंच प्रश्न सोडवायचा असता.

 

Anjana om Kashyap

तुमच्याकडे थोडी जरी सहानुभूती असती तर तुम्ही त्या आजाराविषयी माहिती मिळवली असती, तुम्हाला भारतातील आरोग्यसुविधांची माहिती कळली असती आणि तुम्हाला हे ही कळले असते की आपल्या देशात डॉक्टरांना किती ताण दिला जातो आहे.

पण तुम्ही ह्या कुठल्याही गोष्टीचे होमवर्क केले नाही. तुम्हाला फक्त एक आकर्षक हेडलाईन हवी होती आणि आपण स्वतः समाजासाठी कसे मसीहा आहोत अशी भावना तुम्हाला हवी होती.

तुम्ही तुमचे काम करा. पत्रकारिता करा. तुम्हाला नेता व्हायचे असेल तर राजकारणात पडा आणि सिस्टीम बदला.

तुम्ही अतिशय नशीबवान आहात कारण टीव्हीवर तुमचा “शो” आहे. तुमच्यासारखेच आम्ही वागायचे ठरवले ना तर आम्हाला मारहाण होते, कधी अपंग केले जाते अगदी मारून सुद्धा टाकले जाते.

बऱ्याचदा आम्ही आमचे काम अगदी चोखपणे करत असून देखील आमच्यावर हल्ले होतात.

तुमच्या त्या मुलाखतीदरम्यान, आयसीयूमध्ये रुग्णांची इतकी गर्दी असून देखील तुमची मग्रुरी तो डॉक्टर अगदी शांतपणे हाताळत होता ,हे बघून मला त्याच्या सहनशक्तीचे कौतुक केल्यावाचून राहवत नाहीये.

आता मी आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या देशभरातील सर्वच मेहनती डॉक्टरांशी थेट बोलतोय. आपण ही घटना अशीच सोडून देऊन चालणार नाही.

चॅनेलने ह्यावर काहीतरी कारवाई करायला हवी आहे आणि त्यासाठी आपण त्यांच्यावर दबाव आणायला हवा आहे. त्याशिवाय ते काहीही करणार नाहीत.

हीच वेळ आहे की जेव्हा आपण एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. मला असे ठामपणे वाटते की चॅनेलने ह्या मुलाखत घेणाऱ्या बाईंच्या वर्तनाची जबाबदारी घेतली पाहिजे.

 

OpIndia

बदल म्हणून आपल्याला संतुलित, तटस्थ आणि निष्पक्ष पत्रकारिता बघायला मिळायला हवी. मी ह्या बाईंना पत्रकार म्हणू इच्छित नाही कारण त्यांचे वर्तन त्यांच्या क्षेत्राला साजेसे नसून उलटपक्षी अन्यायपूर्ण आहे.

ह्या बाईंच्या गैरवर्तनाबद्दल त्यांनी प्राईम टाइमवर सर्वांसमक्ष माफी मागावी अशी मी चॅनेलकडे मागणी करतो आहे. Enough is enough!”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version