महाराष्ट्राचं अस्सल रंगीबेरंगी सौंदर्य; कास: एक पुष्प पठार
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – लीलाधर ढाके
===
डिसेंबर २०१५ उत्तराखंडच्या सहलीच्यावेळी फुलांच्या खोऱ्याला (व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला ) भेट द्यायचे राहून गेल्याची सल मनाला सारखी बोचत होती.
त्याच वेळी ठरवले हाते की, आपल्या मराठमोळ्या मातीतील फुलांच्या खोऱ्याला येत्या मोसमात भेट द्यायची आणि म्हणता म्हणता कधी दिवस निघून गेले कळलेच नाही.
२०१७ ह्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे कास पठार फुलू लागल्याच्या बातम्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झळकू लागल्या. दिनांक २५ ला आम्ही (मी, प्रविण आणि समीर ) ठरल्याप्रमाणे सकाळी ७ वाजेच्या पुणे सातारा बस ने स्वारगेटहुन प्रवासाला सुरुवात केली.
प्रविणने नेहमीप्रमाणे उशीर केल्याने प्रवास जवळपास एक तास उशिराच सुरु झाला होता. ०९:३० च्या सुमारास आम्ही सातारा बस स्थानकात दाखल झालो.
थोडं फ्रेश होऊन जेव्हा कास किंवा बामणोलीला जाणाऱ्या बसचा तपास केला, तेव्हा समोर आलेल्या माहितीमूळे निराशाच हाती आली, कारण पुढची बस ही १२:३० वाजता होती आणि तोपर्यंत वाट पाहत थांबणे आम्हाला परवडणारे नव्हते आणि भटकंतीच्या नियमानुसार ते योग्यही नव्हतं.
कारण एकदा का आपण भटकंतीसाठी घर सोडलं की रस्ता आपला करत जावं, थांबण्यात किंवा वाट पाहण्यात काहीही अर्थ नाही – बाबा समीर.
ह्या उक्ती प्रमाणे आम्ही वेळ वाया न घालविता, फराळाची सोय जमवून रिक्षाने कास गाठायचे ठरविले आणि आम्हाला सोबत मिळाली ती, बुलढाण्याच्या दोन प्राथमिक शिक्षक मित्रांची ( ते दोघेही आमच्यासारखेच अवलिये … भटकंती च्या बाबतीत.. ) असे आम्ही पाच जण रिक्षा करून कास पठारकडे मार्गस्थ झालो.
रिक्षातून सातारा शहर सोडून पुढे वाटचाल सुरूच होती. शहर संपताच कास पठार / गावाकडे जाणारा घाटमार्ग लागला. आता मात्र रिक्षा जबाब द्यायला लागली होती, कारण आम्ही पाच आणि रिक्षावाला असे सहा जण तेही पूर्ण वाढ झालेले!
आणि अचानक एका वळणावर रिक्षा बंद पडली. वेळ वाया जात होता, तेव्हा कुठे आमच्या रिक्षावाल्याचा ओळखीचाच मित्र रिकामी रिक्षा घेऊन कास कडे जात होता , मग काय दोघे रिक्षा वाल्यांनी काय साट-लोट केलं काय माहीत? आणि आम्ही दुसऱ्या रिक्षात बसून पुढच्या प्रवासाला लागलो.
ही रिक्षा मात्र जोरदार धावत होती. म्हणतात ना “जुने ते सोने”! कासला जाणारा नागमोडी रस्ता आणि आजूबाजूला आसलेल्या डोगर रांगांनी नेसलेला हिरवा शालू मनाला मोहित करीत होता. अगदी प्रसन्न वाटत होतं.
रस्त्याच्या दुतर्फा असणारी सूचीपर्णी (रोपण केलेली ) झाडी जणू काही डेहराडून ते मसुरी च्या प्रवासाची आठवण करून देत होती. त्यातच आजूबाजूच्या खोऱ्यात असणारे उरमोडी आणि काण्हेर धरणं त्या सौंदर्यात अधिकच भर घालत होतं.
हे सगळं काही उघळ्या डोळ्यांनी कैद करीत आम्ही पुढे जात होतो. वाटेत लागणारी ट्राफिक पार करून आम्ही ११ वाजायच्या सुमारास पठारावर दाखल झालो, तेही आमच्या नव्या सैराट रिक्षावाल्या काकांमुळे!
पश्चिम घाटातील हे ठिकाण २०१२ साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले. जवळपास १० चौ. किमी. अंतरावर पसरलेलं हे पठार ८५० प्रकारच्या फुलांचे माहेरघर आहे त्यातील ६२४ तर अति दुर्मिळ प्रकारातील आहे. म्हणून पठाराचे संवर्धन देखील खूप गरजेचे आहे.
कास पठाराच्या प्रवेश शुल्क संकलन केंद्राला भेट देऊन आम्ही पठारावर रीतसर प्रवेश मिळविला आणि निसर्गाच्या प्रेमात पडायला लावणारे ते विलोभनीय दृश्य आम्हास लाभले.
दूर-दूर पर्यंत दिसणारे पठार सोबतच असणारी तारेच्या कुंपणाची भिंत आणि त्यामधून जाणारा लाल मातीचा रस्ता…व्वा! त्या सौंदर्याचे वर्णन करणे हे शब्दांपलीकडचे आहे म्हणून ते चित्र रूपाने मांडण्याचा जास्त प्रयत्न येथे करीत आहे, जेणेकरून कासच्या लौकिकास वर्णिताना काही चूक होणार नाही.
(जागतिक वारसा स्थळांपैकी एक असल्याने आणि आपण नुसतेच जन्मतः भारतीय नाहीत तर सवयीनेने सुद्धा आहोत म्हणून कुंपण हे गरजेचेच, पण त्याचा ही काही उपयोग नाही, कारण शिस्त ही आपल्या पाचवीला न पुजलेली गोष्ट..!
मग तिथे ते जागतिक वारसा स्थळ असो वा काहीही…अहो माझ्या एकट्याने काय फरक पडतो असे म्हणणारे आम्ही सुजाण लोकं!)
(फुलांचे सौंदर्य अनुभवावे ते कास पठारावरचं !)
(रंगीबेरंगी फुलांचा सडा पडलायं जणू !)
कास पठारावरील अजून एक नक्कीच भेट देण्याचे ठिकाण म्हणजे कुमुदिनी तलाव. ( नावातच अर्थ लपलाय!) संस्कृत शब्द “कुमुद” म्हणजे कमल पुष्प जे रात्रीच्या वेळी उमलते.
नैसर्गिकरित्या तयार झालेल्या ह्या तलावात कमळाची फुले बघायला मिळतात, जी रात्रीच्या वेळी उमलतात आणि म्हणूनच याला “कुमुदिनी तलाव” असे नाव पडले असावे.
हे कमल पुष्प पांढऱ्या रंगाचे आणि पाच पाकळ्यांचे…केंद्रीय भाग हा पिवळ्या रंगाचा! काहीतरी नवीन / वेगळं बघायला मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला आणि कास पठाराची भेट सार्थक झाली असे वाटू लागले.
(कुमुदिनी तलावाचे खरे सौंदर्य या कमळांमध्येच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये )
तसेच आम्ही पठारावरून कास तलावाकडे चालू लागलो. कास तलावाला भेट देण्याचे खास आकर्षण म्हणजे जुन्या काळात तलावातून सातारा शहराला पाणी पुरवठ्यासाठी केलेली सोय होय.
कास तलावाला भेट देऊन आम्ही कास गावात दाखल झालो. बस स्थानकाजवळ असलेल्या देवीच्या मंदिरात थोडा आराम करून आम्ही गावाच्या कमानीतून गावात प्रवेश करीत वज्राई धबधब्याकडे चालू लागलो.
एक-दीड किमी अंतर चालून झाल्यावर पाण्याचा खळखळ आवाज व त्याचा प्रतिध्वनी कानी पडू लागला होता आणि थोड्याच अंतरावर समोर उंचावरून कोसळणाऱ्या वज्राई धबधब्याचे दर्शन आम्हास झाले.
ह्याच धबधब्याच्या पाण्याने तयार झालेला ओढा पुढे उरमोडी नदी म्हणून ओळखला जातो. म्हणजे एका अर्थी आम्ही उरमोडी नदीच्या मुखाला सुद्धा भेट दिली.
स्थानिकांच्या नुसार आजही प्रसिद्धीस न पावलेल्या ह्या वज्राई धबधब्याच्या हद्दीवरून कास आणि भांबावली गावात वाद सुरूच आहे आणि तो असाच सुरु राहणार!
(चित्तथराक असा हा वज्राई धबधबा )
(डोळ्याचं पारणं फेडणारं सह्यसौंदर्य)
पुन्हा आम्ही कास गावाच्या बस स्थानकांवर दाखल झालो. येथे गरमागरम वडापाव आणि चहावर ताव मारून आम्ही साताऱ्याला जाणाऱ्या बसने परतीची वाट धरली.
निसर्गाच्या अलौकिक सौंदर्य अनुभवायचं असेल तर नक्कीच भेट द्या… “कास : एक पुष्प पठाराला”
कधी येताय मग ह्या एका आडवाटे वरच्या प्रवासाला????
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.