त्या ८७ वर्षीय क्रिकेटप्रेमी आजीच्या प्रेमात पडून आनंद महिंद्रांनी एक भारी गोष्ट केली!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
गोरे साहेब गेले पण त्यांचे क्रिकेटचे वेड आपल्या मातीत आणि आपल्या मनात रुजवून गेले. आपण भारतीय लोक इतके भावनिक आहोत की सगळ्या गोष्टीत प्रचंड भावनिक गुंतवणूक करतो मग तो कुठला खेळ का असेना!
त्यातल्या त्यात क्रिकेट म्हणजे करोडो भारतीयांचा जीव की प्राण आहे. भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नसून एक धर्म आहे आणि क्रिकेटवेडे लोक अतिशय भक्तिभावाने क्रिकेट बघतात.
आपला बँक अकाउंट नंबर एकवेळ पाठ नसेल पण मोठे मोठे रेकॉर्ड्स ह्या फॅन्सचे अगदी तोंडपाठ असतात. हे क्रिकेटवेडे लोक त्यांच्या आवडीच्या खेळाडूला अगदी देवासमान मानून त्याची फक्त देव्हाऱ्यात ठेवून पूजा करणेच बाकी ठेवतात.
छोट्या मोठ्या मॅचेस सुद्धा न सोडणारे अट्टल क्रिकेटवेडे लोक जर का आंतरराष्ट्रीय सामना असेल तर आपली सगळी कामे बाजूला ठेवून क्रिकेट बघतात.
त्यात जर भारत पाकिस्तान सामना असेल तर कर्फ्यू लागल्याप्रमाणे रस्ते सामसूम असतात.
अशी क्रिकेटची जादू भारतीयांच्या मनावर झालेली आहे. लोक अतिशय भक्तिभावाने क्रिकेट बघत असल्यामुळे ते आपल्या आवडीच्या टीममध्ये प्रचंड भावनिक गुंतवणूक करतात.
चुकून जर का त्यांच्या आवडीची टीम तो सामना हरली तर चक्क टीव्ही फोडून टाकण्यापर्यन्त अतिरेकी प्रकार हे कट्टर फॅन्स करतात.
काही फॅन्स तर जिथे मॅच असेल तिथे जाऊन पोहोचतात. असेच दोन फॅन्स आपल्याला माहिती आहेत.
एक म्हणजे सचिन तेंडुलकरचा कट्टर चाहता सुधीर कुमार गौतम आणि महेंद्रसिंह धोनीचा कट्टर चाहता राम बाबू ह्यांच्याविषयी तर जवळजवळ प्रत्येक भारतीय चाहत्याला माहितीच आहे.
बऱ्याच वेळेला ह्या फॅन्सची दैवतंच त्यांचे आपल्यावरील प्रेम बघून त्यांच्या चाहत्यासाठी मॅचला येण्याची व्यवस्था करतात. आता चाहत्यांचा विषय निघालाय तर ह्या आजींविषयी बोललेच पाहिजे.
भारत विरुद्ध बांगलादेश ह्या सामन्यात एक आजी व्हीलचेअरवर बसून हातात ट्रम्पेट घेऊन टीम इंडियाचा उत्साह वाढवताना आपण बघितले.
ह्या आजींचा उत्साह अगदी तरुणांना लाजवेल असा होता आणि त्यांना बघून प्रत्येक भारतीय क्रिकेटवेड्याला वाटले अरे ह्याच आहे आजच्या “फॅन ऑफ द मॅच”!
काल विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना होता. हा सामना एजबेस्टन येथे सुरु होता आणि बांगलादेशने भारताला अगदी तगडी लढत दिली.
जसप्रीत बुमराहने जादुई गोलंदाजी करत अगदी योग्य वेळेत बळी घेतले आणि भारताने बांगलादेशवर २८ धावांनी मात केली. काल भारत तर ट्रेंडिंग होताच. पण त्याबरोबरच ह्या फॅन ऑफ द मॅच आजी सुद्धा ट्विटर, फेसबुक आणि सगळीकडे झळकत होत्या.
ऋषभ पंतने चौकार लगावल्यानंतर ह्या आजींवर कॅमेरामनने फोकस केले. आपल्या बॅटिंगच्या वेळेला आपल्या खेळाडूंना चिअर करतानाच्या ह्या आजींच्या छान भावमुद्रा कॅमेरामनने टिपल्या आणि ह्या आजी लगेच सगळीकडे फेमस झाल्या.
सोशल मीडियावर लगेच हा फोटो “पिक्चर ऑफ द वर्ल्ड कप” म्हणून सगळीकडे व्हायरल झाला.
ट्विटरवर तर ह्या आजींचे कौतुक करणाऱ्या फोटो आणि व्हिडीओचा पाऊसच पडला. हातात vuvuzela , गळ्यात तिरंग्याचा स्कार्फ,हातात आपला तिरंगा आणि तरुण फॅन्सप्रमाणेच गालांवर तिरंगा रंगवलेल्या आजी मस्तपैकी मॅचचा आनंद घेताना दिसत होत्या.
कॅमेरामनने त्यांच्यावर फोकस करताच कॉमेंट्री करणाऱ्या सौरव गांगुलीचेही ह्या आजींकडे लक्ष गेले आणि त्यानेही आजींची दखल घेत, टीव्हीवर मॅच बघणाऱ्या चाहत्यांसाठी ह्या आजींचे नाव शोधून काढले.
तर सध्या सगळीकडे व्हायरल असलेल्या ह्या आजींचे नाव आहे चारुलता पटेल.
त्या केवळ ८७ वर्षांच्या आहेत. केवळ ८७ असे म्हटले कारण काल ज्या उत्साहाने त्या आपल्या संघाचे मनोबल वाढवत होत्या त्यावरून तरी त्या केवळ शरीराने ८७ च्या आहेत, मनाने त्या अजूनही तरुणच आहेत असेच म्हणावे लागेल.
दुसऱ्या इनींगमध्ये जेव्हा शाकिब आणि त्याच्या टीमने भारताला चांगली लढत दिली तेव्हा भारतीय चाहते मनातून जरा धास्तावले होते. पण पटेल आजींची आशा मात्र कायम होती.
बांगलादेशची घौडदौड आपल्या गोलंदाजांनी वेळीच रोखली आणि आपण सामना जिंकला.भारतीय संघाने काल सामना जिंकला आणि भारतीय संघाप्रमाणेच आजींनी क्रिकेट चाहत्यांची आणि नेटकऱ्यांची मने जिंकली.
फक्त नेटकऱ्यांनीच आजींची दखल घेतली असे नाही तर मॅच संपल्यावर खुद्द विराट कोहली व रोहित शर्मा हे दोघेही ह्या आजींना भेटले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या.
विराटने दोन मिनिटे आजींजवळ खाली बसून त्यांचे आशीर्वाद घेतले.
रोहितने सुद्धा आजींशी थोड्या गप्पा मारल्या आणि आजींनी ह्या दोघांनाही जवळ घेऊन त्यांना छान शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. ह्याचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल आहे आणि तो व्हिडीओ बघितल्यावर आपल्या चेहेऱ्यावर स्मित उमटले नाही असे होणार नाही कारण ही खरंच एक “कोडॅक मुमेंट” आहे.
विराटने ह्या आजींची दखल घेऊन त्यांचे कौतुक केले आणि आता त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढच्या सामन्यासाठी तयार आहोत अस ट्विट केले.
ह्या आजींशी ANI ने गप्पा मारल्या तेव्हा त्यांनी सांगितले की, “जेव्हा १९८३ साली कपिल पाजींनी पहिल्यांदा भारताला विश्वचषक जिंकवून दिला तेव्हाही मी त्या ठिकाणी उपस्थित होते. मी ती मॅच देखील स्वतः स्टेडियमवर जाऊन बघितली होती.
भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला तेव्हा मला तेव्हा इतका आनंद झाला होता की मी नाचायला सुरुवात केली. आजही मी माझ्या नातीला म्हणाले होते की भारत नक्कीच जिंकणार आणि मग मी डान्स करणार! जेव्हाही भारतीय संघ इंग्लंडला येतो, तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासाठी प्रार्थना करते.
मला तर असे वाटते आहे की माझीच मुले इथे खेळत आहेत. मी गणपतीबाप्पांची भक्त आहे. मी जेव्हा जेव्हा देवाकडे प्रार्थना करते तेव्हा तेव्हा देव माझे ऐकतो. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ह्यावेळी भारत नक्कीच जिंकणार! माझा आपल्या खेळाडूंना आशीर्वाद आहे.
मला आशा आहे की ते स्वतःची काळजी घेतील, छान खेळतील आणि आपल्याला नक्कीच विजय मिळवून देतील.”
पटेल आजींचा कालपासून इंटरनेटवर “निस्ता धूर अन निस्ता जाळ” सुरु आहे. त्यांच्या उत्साहपूर्ण चिअरिंगची आयसीसीने देखील दखल घेतली., मॅच संपल्यावर सामनावीर रोहित शर्मा आणि विराट कोहली पटेल आजींना भेटले तो व्हिडीओ आयसीसीने त्यांच्या वर्ल्ड कप ट्विटर हँडलवर शेअर केला.
आज ट्विटरवर #CharulataPatel हे हॅशटॅग भारतात टॉप ट्विटर ट्रेंड होते.
ह्या आजींचे फोटो आणि व्हिडीओ १० हजार वेळेला ट्विटराटींनी रिट्विट केले. त्यांच्या फोटोंना तब्बल पन्नास हजार लाईक्स मिळाले. थोडक्यात काय तर चारुलता आजी कालच्या “फॅन ऑफ द मॅच” ठरल्या.
जगातील सगळ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष ह्या आजींनी वेधून घेतले आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे तर ह्या गोड आजींच्या प्रेमातच पडले आहेत. त्या दिवशी मॅच बघताना जसे सगळ्यांनी ह्या आजींचा उत्साह बघितला तसेच आनंद महिंद्रांचेही लक्ष ह्या आजींनी वेधून घेतले.
ते ह्या आजींचा उत्साह बघून इतके खूश झाले की ह्या आजींचा त्यांनी त्यांचा ट्विटमध्ये “मॅच विनिंग लेडी” म्हणून उल्लेख केला. त्या आपल्या भारतीय संघासाठी लकी ठरल्या असे महिंद्रांचा कयास असावा.
त्यांच्या ट्विटमध्ये ते म्हणाले की
“ह्या मॅच विनिंग आजी सेमी फायनल आणि फायनल मॅच साठी सुद्धा स्टेडियममध्ये उपस्थित असतील ह्याची खबरदारी घ्या. त्यांना मॅचचे तिकीट मोफत द्या!”
एका ट्विटर युझरने त्यांना सुचवले की तुम्हीच त्यांचे तिकीट प्रायोजित का करत नाही?
त्यावर त्यांनी उत्तर देताना पुढे असेही ट्विट केले की “ह्या आजी कोण आहेत हे शोधून काढा आणि मी वचन देतो की भारताच्या पुढील सगळ्या सामन्यांसाठी मी स्वतः त्यांच्या तिकिटांचा खर्च करायला तयार आहे. ”
आता ह्या मॅच विनिंग आजी खरंच आपल्या संघाचा “लकी चार्म” असतील आणि त्या पुढील सगळ्या सामन्यांना उपस्थित राहिल्या तर १९८३,आणि २०११ प्रमाणे हा ही वर्ल्ड कप आपलाच असेल अशी आशा करायला हरकत नाही.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.