लोकांच्या मनावर आजही क्रिकेटची मोहिनी कायम आहे ह्याची साक्ष हे चाहते देतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
“हल्ली पूर्वीसारखी क्रिकेटची मजा राहिली नाही. सतत कुठली ना कुठली टूर्नामेंट होत असल्याने लोकांना क्रिकेटचे नावीन्य राहिलेले नाही. पूर्वी भारताची महत्वाची मॅच असली की कर्फ्यू लागल्यासारखे रस्ते ओस पडायचे. दुकानांपुढे मॅच बघायला गर्दी जमायची.
आता मात्र भारत पाकिस्तान मॅच असली तरी लोकांचे व्यवहार सुरळीत सुरु असतात. आणि जेव्हापासून लोकांना मॅच फिक्सिंगबद्दल कळले आहे तेव्हापासून तर लोकांच्या मनातले क्रिकेटप्रेम कमीच झाले आहे.
लोकांच्या मनावरची क्रिकेटची जादू आता हळूहळू ओसरत चालली आहे,” असे अनेक लोकांना वाटते.
क्रिकेटमध्ये पूर्वीसारखा चार्म राहिला नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. पण असे नाही. लोकांचे क्रिकेटवरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही फक्त त्यांचे ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली आहे.
अजूनही क्रिकेट बघायला स्टेडियम अगदी खचाखच भरलेली असतात.

क्रिकेटचे चाहते अगदी उत्साहात आपापल्या आवडीच्या संघांना प्रोत्साहन देत असतात. अजूनही असे काही कट्टर चाहते आहेत जे आपल्या आवडीच्या खेळाडूसाठी जगभर फिरतात, त्याच्या प्रत्येक सामन्याला ते स्टेडियममध्ये उपस्थित राहून आपल्या दैवताचे मनोबल वाढवीत असतात.
आपण सचिन तेंडुलकरचा कट्टर चाहता सुधीर कुमार गौतम आणि महेंद्रसिंह धोनीचा कट्टर चाहता राम बाबू ह्यांना तर ओळखतोच. आज आपण अश्याच काही “टॉप फॅन्स” विषयी जाणून घेणार आहोत.
१. चारुलता पटेल –
भारत विरुद्ध बांगलादेश ह्या एजबेस्टन येथे झालेल्या सामन्यात ह्या ८७ वर्षीय आजी झळकल्या आणि रातोरात सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. ज्या उत्साहात ह्या आजी भारतीय संघासाठी ‘चिअर’ करत होत्या त्याची दखल आयसीसीपासून तर आनंद महिंद्रा आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी घेतली.
ट्विटरवर तर ह्या आजींचे भरपूर कौतुक झाले.
आपले वय आपल्या क्रिकेटप्रेमाच्या आड येऊ न देता ह्या आजी व्हीलचेअरवर बसून आपल्या नातीसह स्टेडीयममध्ये केवळ भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी आल्या.
गळ्यात छानपैकी तिरंग्याचा स्कार्फ, गालावर तिरंगा काढलेला, हातात आपला झेंडा अश्या रूपात चारुलता पटेल आजी छानपैकी मॅच एन्जॉय करत होत्या. ह्या आजी १९८३ साली सुद्धा वर्ल्ड कप च्या अंतिम सामन्यासाठी गेल्या होत्या.
तेव्हापासून आतापर्यंत आजींचे क्रिकेटप्रेम अजिबात कमी झालेले नाही. त्यांची दखल खुद्द आपल्या विराट कोहली व रोहित शर्माने सुद्धा घेतली आणि सामना संपल्यानंतर त्यांना भेटून, त्यांच्याशी बोलून त्यांचे आशीर्वाद ह्या दोन्ही खेळाडूंनी घेतले.

२. धोनीच्या कट्टर चाहत्या आयपीएल आजी
ह्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सच्या एका सामन्यात एक आजी ” ‘I am here only for Dhoni” असा बोर्ड घेऊन चेन्नई सुपर किंग्सचा उत्साह वाढवताना दिसल्या.
हल्ली इतके फास्ट युग आहे की थोड्याच वेळात ह्या आजींचा फोटो सुद्धा “आयपीएल आजी” म्हणून सगळीकडे व्हायरल झाला.
ह्या आजी धोनीच्या कट्टर चाहत्या आहेत आणि त्या चेन्नईच्या मॅचनंतर त्या महेंद्रसिंह धोनीला भेटल्याशिवाय घरी गेल्या नाहीत.
त्यांचा व धोनीचा व्हिडीओ सुद्धा नेटवर प्रसिद्ध झाला होता.
आयपीएलटीट्वेन्टीच्या ट्विटर हॅन्डलने हा व्हिडीओ अपलोड केला होता ज्यात मॅच संपल्यानंतर धोनी ह्या आजींना भेटायला आला. त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर सेल्फी काढला व त्यांच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीवर स्वाक्षरी करून दिली.

३. सुधीर कुमार चौधरी -सचिन तेंडुलकरचा कट्टर चाहता
भारताच्या प्रत्येक सामन्यात डोक्याच्या केसांपासून तर पायाच्या बोटांपर्यंत सगळे शरीर भारताच्या तिरंग्यात रंगवलेला आणि तेंडुलकर १० असे लिहिलेला माणूस स्टेडियमवर उपस्थित असतो.
२००३ सालापासून ह्या व्यक्तीने भारताचा प्रत्येक सामना स्टेडियमवर जाऊन बघितला आहे.
प्रत्येक मॅचसाठी हा असाच तयार होऊन येतो आणि संघाचा उत्साह वाढवतो. सचिन तेंडुलकरचा कट्टर चाहता असलेला हा सुधीर कुमार चौधरी भारतीय संघाचा टॉप फॅन आहे.
त्याने त्याच्या ह्या क्रिकेटच्या वेडासाठी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारण लग्न झाल्यावर त्याला असे प्रत्येक मॅचला जाता येणार नाही. त्याचे हे क्रिकेटप्रेम बघून त्याला बीसीसीआय कडून प्रत्येक सामन्याचे तिकीट देण्यात येते.सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतल्यापासून तो त्याच्या शरीरावर मिस यु तेंडुलकर १० असे रंगवून येतो.

४. चाचा क्रिकेट उर्फ चौधरी अब्दुल जलील
पाकिस्तानमधील क्रिकेटची अवस्था सध्या फारशी बरी राहिलेली नाही. आधी भल्याभल्यांना धूळ चारणारा पाकिस्तान संघ सध्या मात्र चाचपडताना दिसतो आहे. पाकिस्तानचे क्रिकेट चाहते अर्थातच ह्यामुळे त्यांच्या संघावर नाराज आहेत.
पण एक व्यक्ती मात्र अशी आहे जिने वाईट काळात सुद्धा पाकिस्तान क्रिकेट संघाला सपोर्ट करणे सोडले नाही. हे काका पाकिस्तानच्या प्रत्येक सामन्याला स्टेडियममध्ये उपस्थित राहून संघाचा उत्साह वाढवताना दिसतात.
ह्या काकांना जग “चाचा क्रिकेट” म्हणून ओळखतं. त्यांचे खरे नाव चौधरी अब्दुल जलील असे आहे आणि ते पाकिस्तानचे आहेत.
त्यांचे हे क्रिकेटचे वेड ८० च्या दशकात सुरु झाले आणि अजूनही ते संघाला सपोर्ट करण्यासाठी जिथे मॅच असेल तिथे जातात. सध्या त्यांच्या तिकिटाचा व इतर खर्च पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करतं.

५. पर्सी अबीसेकरा
श्रीलंकन संघाला जेव्हा टेस्टचा दर्जा देखील मिळाला नव्हता तेव्हापासून हे काका श्रीलंकन संघाला सपोर्ट करत आहेत. संघाचा उत्साह वाढवण्यासाठी ते संघाबरोबर जगभर फिरले.
१९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत जेव्हा श्रीलंकेने विजय मिळवला तेव्हा हे पर्सी अबीसेकरा प्रसिद्धीच्या झोतात आले. २०१४ च्या टीट्वेन्टी वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंका जिंकली त्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली.

६. ऑली ब्रूम
इंग्लंडचा ऑली ब्रूम हा मनुष्य स्लो सायकलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. २००९ सालापर्यंत चार्टर्ड सर्व्हेयर म्हणून काम करणाऱ्या ऑलीने त्याच्या क्रिकेटवेडासाठी एक भन्नाट गोष्ट केली.
तो इंग्लंडहून ब्रिस्बेनला चक्क सायकलने गेला, तेही त्याच्या संघाला म्हणजेच इंग्लंडला ऍशेस सिरीजमध्ये सपोर्ट करण्यासाठी!
तब्बल १४ महिने त्याने सायकलने मजल दरमजल करत करत २३ देश पालथे घातले आणि तो अखेर ब्रिस्बेनला पोहोचला.
त्याच्या इतक्या कष्टांचे सार्थक झाले कारण ती ऍशेस स्पर्धा इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशात हरवून ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंडवर म्हणजेच गाबावर ३-१ ने जिंकली.

७. द यलो टायगर उर्फ शोएब अल बुखारी
बांगलादेशच्या प्रत्येक सामन्यात त्यांना सपोर्ट करताना एक चट्टेरी पट्टेरी पिवळा वाघ दिसतो. तो दुसरा तिसरा कुणी नसून शोएब अल बुखारी हा मनुष्य आहे.
बंगाल टायगरच्या रूपात स्वतःला रंगवून घेऊन, हातात बांगलादेशचा झेंडा घेऊन हा क्रिकेट चाहता स्वतःच्या संघासाठी नेहमीच चिअर करताना दिसतो.

सुरुवातीला कच्चा लिंबू असलेला बांगलादेशचा संघ आता मात्र भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवू लागला आहे. बांगलादेश संघाच्या ह्या प्रवासात त्यांच्या प्रत्येक विजयात आणि पराभवात हा त्यांचा चाहता त्यांचा उत्साह वाढवतो.
बांगलादेश संघाचा तो टॉप फॅन आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
हे असे क्रिकेट वेडे बघितले तर कोण म्हणेल क्रिकेटची जादू ओसरत चालली आहे?
उलट ती तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ह्यांच्याकडे बघून असेच म्हणावेसे वाटते की “ये फॅन्स देते है क्रिकेट के लिये दिल और जान.. और हम करते है उनको सलाम… क्योंकी ये गेम है महान!”
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.