Site icon InMarathi

मुंबई पोलीस ‘सब इन्स्पेक्टर’ असा बनला पडद्यावरचा, “जानी ऽऽऽ”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुणाचं नशीब कसं पालटेल कधीच सांगता येत नाही. आताच्या पिढीला राजकुमार हे नांव केवळ ब्रिगेडीयर सूर्यदेव सिंग म्हणूनच माहीत आहे..पण संस्कृत भाषेतील पदवी प्राप्त केलेला हा माणूस मुंबई पोलिस सब इन्स्पेक्टर होता..

त्याच्या लहरीपणाचे किस्से आजही चवीनं चर्चा करणारी पिढी आहे. मॅन ऑफ द मिलेनियम म्हणून माहीती असलेल्या अमिताभला… ट्रॅजिडी किंग असलेल्या दिलीपकुमारला सुध्दा या माणसानं भाव दिला नव्हता.

आपल्या शर्तीवर जगलेला राजकुमार आपल्याच शर्तीवर गेला आणि तो गेल्यानंतरच बाॅलिवुडला त्याच्या अंत्यसंस्कारानंतर त्याचं जाणं कळवलं होतं..

कुलभूषणनाथ पंडीत… राजकुमारचं खरं नांव. सध्या पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तानमध्ये त्याचा जन्म झाला.

 

firstpost.com

संपूर्ण निर्व्यसनी असलेला हा काश्मीरी ब्राह्मण सिनेमात येण्यापूर्वी मुंबई पोलिस सब इन्स्पेक्टर होता. उर्दूची, शेरोशायरीची, साहित्याची उत्तम जाण होती त्याला. त्याला सिनेमात हिरो व्हायचं होतं.

एकदा मेट्रो सिनेमात तो सिनेमा बघायला गेला असताना सोहराब मोदी या प्रतिथयश दिग्दर्शकाने पाहीलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राजबिंडा कुलभूषणनाथ त्यांना पाहता क्षणी आवडला. त्यांनी राजकुमारला सिनेमात काम करण्याची आॅफर दिली. पण सरळपणे सहजासहजी हो म्हणेल तो राजकुमार कसला! धुडकावून लावली त्यानं ती आॅफर.

नंतर रंगीली या सिनेमातून त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सोहराब मोदी यांच्या नौशेरेवान आदिल या सिनेमात राजपुत्र होता तो.

पण राजकुमाराला प्रसिध्दी मिळाली ती मदर इंडिया या सिनेमातून. त्यानंतर दिलीपकुमार सोबत पैगाम या सिनेमात अतिशय साधी मिल कामगाराची भूमिका केली.

दिल एक मंदिर या सिनेमात मीनाकुमारी आणि राजेंद्रकुमार यांच्यासोबत त्यानं मिनाकुमारीच्या कॅन्सरग्रस्त नवऱ्याची भूमिका केली. त्यासाठी त्याला सर्वोत्तम सहनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

 

पाकिजा या रेंगाळलेल्या सिनेमातही मीनाकुमारीच त्याची नायिका होती. मात्र या सिनेमासाठी राजकुमार हा पहीला नट नव्हता. राजेंद्रकुमार, सुनिल दत्त, धर्मेंद्र या तिघांनी नाकारल्या नंतर ही भूमिका राजकुमारकडं आली होती.आणि अर्थातच त्यानं तिचं सोनं केलं होतं. त्याचा त्यातील आपके पैर बहुत हसीन है इन्हे जमीन पर मत उतारीये.. हा डायलॉग एका जाहिरातीत सुध्दा वापरला होता.

 

वक्त या गाजलेल्या मल्टीस्टार सिनेमात बलराज साहनी, शशी कपूर, सुनिल दत्त यांच्यासह काम केलं. त्याच्या विशेष डायलॉग बाजीसाठी तो प्रसिद्ध झाला.

विशेषतः जानी ऽऽऽ हा त्यांचा डायलॉग आजही तितकाच प्रसिद्ध आहे. त्याला आपल्यातून जाऊन दोन दशकं उलटली आहेत तरीही तो तितकाच आवडता डायलॉग आहे.

कोणतेही काॅमेडी शो पहा.. हा डायलॉग नक्की ऐकू येईल.

त्यानंतर त्याने हमराज, हीर रांझा, लाल पत्थर अशा सिनेमांमधून भूमिका केल्या. तिरंगा हा बहुचर्चित सिनेमा ज्यात त्यानं ब्रिगेडीयर सूर्यदेव सिंगची भूमिका केली.

खर्जातल्या आवाजात गेंडा स्वामी…म्हणत पाईप ओढणारा सूर्यदेव सिंग आजही स्मरणात आहे.

 

youtube.com

त्याच्या लहरीपणाचे किस्से आजही सांगितले जातात. अमिताभ बच्चनला त्याने विचारले होते.. तुम वही अमिताभ हो ना.. जिसकी टांगे कंधेसे शुरु होती है?

याच राजकुमारने झिनत अमानला सांगितलं होतं, तू सुंदर आहेस. सिनेमात ट्राय कर.आणि गंमत म्हणजे, ती त्यावेळी लोकप्रियतेच्या लाटेवर होती.

इतकंच नव्हे तर, मोहन चोटी हा त्या वेळचा काॅमेडीयन. एका सिनेमात तो आणि राजकुमार सोबत काम करत होते. तर राजकुमारनं त्याचे काॅमेडी पंचेस स्वतः म्हणून टाकले.

अशावेळी हे अचानक घेतलेल्या त्याच्या अॅडीशन्स सहकलाकारांना गोंधळून टाकत.

१९९२ मध्ये केलेला प्राणलाल मेहरांचा मरते दम तक हा राजकुमाराच्या शेवटचा सिनेमा. या सिनेमाच्या शूटींगमध्ये फार धमाल उडवून दिली होती राजकुमारनं.

सेटवर कुणीतरी स्काॅचची बाटली आणली होती. राजकुमारनं ती बाटली उचलली. आणि कपाटात ठेवून कुलूप लावून टाकलं. आणि सांगितलं, ज्या कुणाला भूक लागेल त्यानं हे पापड, शेंगदाणे खावेत पण सेटवर काम चालू असताना कुणीही दारु प्यायची नाही.

 

huongdandownload.ml

आणि सर्वांनी ते ऐकलं हे विशेष. स्वतः राजकुमार हा निर्व्यसनी मनुष्य होता. त्याच सेटवर अचानक त्याला मुशायरा करायची लहर आली.

मैसूर मधील थंडीत मुशायरा करायला सारे जमले. अंधाऱ्या रात्री शेकोटी पेटवली. त्यानं आपली डायरी आणली. त्याच्या त्या डायरीमध्ये दाग देहलवी, मिर्झा गालिब, मोमिन, इक्बाल यांच्या उत्तमोत्तम रचना नीटपणे उर्दूमध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्या तो सादर करु लागला.

युनिटमधल्या लोकांना इतकं अस्सल उर्दू समजायला हवं ना.. सर्वांचे गोंधळलेले चेहरे पाहून त्यानं विचारलं, तुम्हाला हे समजलं का?

सर्वांनी नाही असं‌ म्हणताच त्यानं डायरी फट्टदिशी मिटली. संतापून म्हणाला, जाहिल हो तुम लोग.. म्हणजे अडाणी आहात!!!! क्षणभरानं शांत होत म्हणाला, असो.. पण माझा मान ठेवायला तुम्ही इथं आलात हे काय कमी आहे.

आता मी तुमचं अगत्य करणारच. पाहुणे आहात तुम्ही माझे. असाच बरा जाऊ देईन तुम्हाला…आणि मग त्यानं स्काॅचची बाटली काढली.

मग जी मैफल रंगली ती बस्स!!! तिथं जो पत्रकार हजर होता, त्यानं ती डायरी पाहीली…. अतिशय सुंदर अक्षरांत त्यानं उर्दू गझल, नज्म, शेर सारं सारं लिहीलं होतं. तो पत्रकारही थक्क झाला.

 

त्याचवेळी पत्रकारांनी त्याला दिलीपकुमार बरोबर काम का करत नाही असं विचारलं. तेंव्हा सहजावारी तो म्हणाला पैगाममध्ये आहोत ना आम्ही सोबत?

मग पत्रकारांनी विचारले, तुम्ही कधी प्रेमात पडला आहात का? राजकुमार गडगडाटी हसला आणि म्हणाला, अरे…प्रेम ही फार मोठी गोष्ट आहे.

त्यात पडतात का? मी तर प्रेमात फार उंचावर पोहचलो आहे!!!

दिलीपकुमार आणि राजकुमार यांचं अजिबात सख्य नव्हतं. सुभाष घई यांनी सौदागर मध्ये ही विळ्या भोपळ्याची मोट बांधली खरी. पैगाम नंतर हे दोघे दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आले होते पण आपल्या सीन शूट व्यतिरिक्त एकमेकांशी एक अक्षरही बोलत नव्हते.

राजकुमारने एका ऐंग्लो इंडियन मुलीशी विवाह केला. तिचं नाव गायत्री ठेवलं. त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी. पण या सर्वांना त्यानं जाणिवपूर्वक सिनेजगतापासून दूर ठेवलं.

त्याचं खाजगी आयुष्य त्यानं पूर्णपणे खाजगी ठेवलं. आज राजकुमार आपल्यातून निघून गेला त्याला २३ वर्षं झाली. पण त्याच्या निधनाची बातमी त्याच्या इच्छेनुसार त्याचं दहन केल्यानंतरच लोकांना कळवली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version