' मुंबईतील प्रत्येकाने वाचावा असा लेख: जलमग्न मुंबई, निसर्ग पूरक व्यवस्थापन आणि आपण – InMarathi

मुंबईतील प्रत्येकाने वाचावा असा लेख: जलमग्न मुंबई, निसर्ग पूरक व्यवस्थापन आणि आपण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : सुजित भोगले

===

भरपूर पाउस, जोडीला high tide आणि पाण्यात बुडालेली मुंबईत यापुर्वीही अनेकदा पहायला मिळाले आहे.

यापुर्वी अनेकदा माणुसकीचा गहिवर, सरकारी हतबलता आणि परस्पर चिखलफेक पण बघून झाली.

आठवडा संपला आणि सगळे आन्हिक संपले. लाखो लोकांनी सहन केलेला मनस्ताप, हकनाक मेलेले अभागी जीव आणि कवडीमोल झालेली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता हे सगळे सोयीस्करपणे विसरून आपण लोक कामाला लागलो.

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण लोकांनी डोके वापरणे सोडून दिलेले आहे. आपल्या समोर असणाऱ्या समस्या सोडवाव्या आणि विकास घडवावा ही मानसिकता आपण मारून टाकली आहे.

 

mumbai 8 inmarathi
Ellevate Network

 

राजकीय नेतृत्वाला वाटत राहते आम्ही समस्या सोडवल्या तर उद्या आम्हाला कोण मत देईल ? सरकारी कर्मचारी वर्गाला पक्के माहित आहे आपण काम केले अथवा केले नाही पगार घट्ट आहे मग कशाला काम करा ?

कंत्राटदार हा प्राणीच मुळातून राजकीय नेते आणि सरकारी कर्मचारी यांची पोटे भरण्यासाठी जन्माला आलेला आहे.

काम करणे आणि त्याचे पैसे घेणे हा फक्त कागदोपत्री तयार केलेला भाग असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी तिजोरीतून त्याने त्याच्या नावाने पैसे काढणे आणि वितरीत करणे हे असते.

त्यामुळे जी आवश्यक आहेत ती कामे होत नाहीत. ज्या समस्या दिसत आहेत त्यावर तत्काळ चुनासफेदी फक्त केली जाते, मध्यम किंवा दीर्घकालीन काम करण्यासाठी मेंदू वापरण्याची प्रक्रिया सरकारी यंत्रणांच्या मध्ये जवळ जवळ संपुष्टात आलेली आहे.

इस्रो, DRDO, BARC, NPCIL हि मंडळी भांगेतील तुळस आहेत त्यांना यात ओढणे चुकीचे आहे, हि संत मंडळी वगळता बाकी सगळा आनंदीआनंद आहे.

मुंबई का बुडाली ?

१) मुंबई हे शहर नसून एक बेटांचा समूह आहे. ब्रिटिशानी मुंबई आंदण मिळाल्यानंतर तिचा विकास केला त्यावेळी त्यांनी भराव घालून ही बेटे एकमेकांना जोडून सलग भूभाग तयार केला.

 

 

mumbai islands inmarathi
travelmyglobe.com

 

त्यामुळे मुंबईचा मुख्य जुना भाग हा जवळ जवळ समुद्र सपाटीला आहे किंवा काही भागात जमिनीची लेव्हल समुद्रसपाटीपेक्षा सुद्धा खाली आहे. मुंबई संदर्भात कोणतेही नियोजन करताना हे महत्वाचे भौगोलिक सत्य लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

२) पारंपारिक पद्धतीने तयार केलेली ड्रेनेज व्यवस्था, नाले हे संपूर्ण मुंबईतून जवळच्या समुद्रकिनाऱ्याकडे वाहतात. सामान्य स्थितीमध्ये ही यंत्रणा उत्तम काम करते.

परंतु भरपूर पाऊस पडला आणि जोडीला high tide असेल तर समुद्रच खवळलेला असतो आणि किनाऱ्याजवळ पाणी दोन ते तीन मीटर अधिक पातळीवर जमा झालेले असते.

या वेळी समुद्राकडे वाहणाऱ्या या सगळ्या यंत्रणा पाणी समुद्रात टाकत नाहीत तर ते पाणी उलट या चेंबर आणि नाल्यांच्या द्वारे शहरात शिरते. नवी मुंबईमध्ये असे ड्रेनेज चेंबर टाकले गेले आहेत की समुद्राचे पाणी आत शिरणार नाही. वन वे फ्लो राहील.

त्यामुळे तो भाग सुद्धा साधारण त्याच उंचीवर आहे पण तिथे पाणी फारसे तुंबत नाही ) ज्या भागात समुद्र सपाटीच्या खाली जमिनीची पातळी आहे तिथे पाणी हमखास साठते आणि तुंबून बसते.

३) हे होऊ नये म्हणून मागील २६ जुलै नंतर brimstowad या प्रकल्पाची घोषणा केली गेली होती. तो बऱ्याच जणांच्या लक्षात सुद्धा नसेल.

त्याची संकल्पना अशी होती की पाणी उपसा करायचा आणि समुद्रात खोलवर टाकून द्यायचे जेणेकरून रस्त्यावर अथवा रेल्वे लाईन वर पाणी साठणार नाही.

 

mumbai 7 inmarathi
Veditum

 

mumbai 6 inmarthiत्याच वेळी या प्रकल्पाविरुद्ध मी लिहिले होते. अर्थात त्याकडे कोणी लक्ष दिले नाही आता परत लिहितो आहे आता तरी लोकांना पटेल हि अपेक्षा आहे.

४) पाण्याचा मुलभूत गुणधर्म आहे कि ते उताराच्या दिशेने वाहते. ते तोवर वाहत राहते जोवर एक समान पातळी निर्माण होत नाही. समुद्र हा सगळ्यात मोठा reservoir आहे. तो बाजूलाच आहे.

आपण वर्षभर सामान्य परिस्थितीत घाण युक्त पाणी ड्रेनेज द्वारे त्यात सोडत असतो.

अतिवृष्टी आणि हाय टाईडच्या वेळी समुद्राची पातळी वाढलेली असते. ते पाणी ड्रेनेज द्वारे शहरात शिरते. हा फ्लो तोवर चालू राहणार आहे जोवर समुद्राच्या पातळी इतके पाणी सर्व सखल भागात साचणार नाही.

तुम्ही कितीही मोठे पंप लावले आणि हे पाणी समुद्रात दूरवर नेऊन फेकले तरी सुद्धा समुद्राचे हे कार्य थांबणार नाही. परिणाम २६ जुलै आणि मागचा आठवडा.

जोडीला पावसाचे पाणी पण जमा होत जाणार आहेच. आता एखाद्या सुनामीचा सुद्धा विचार करा. पाउस पडला आणि हाय टाईड आली तर आपली ही अवस्था होते उद्या सुनामी आली तर आपण काय करणार आहोत ? आपल्याकडे काय पर्याय आहे ?

५) नालेसफाई नीट झाली असती, ड्रेनेज लाईन नीट साफ असत्या, कचरा व्यवस्थापन नीट असते तर जे काही घडले आहे त्याच्या १० % फरक पडला असता. त्यापेक्षा अधिक नाही.

 

mumbai 2 inmarathi
Afternoon DC

 

निसर्गपूरक जलव्यवस्थापन आणि जलप्रलय मुक्त मुंबई

क्यानोत यंत्रणा आणि तिची कार्यपद्धती या बद्दल यापूर्वी लिहिले असल्याने त्याबद्दल पुन्हा लिहित नाही. परंतु क्यानोत ज्या तत्वावर काम करते त्याच तत्वाने काम करणारी एक संकल्पना मांडतो आहे.

मुंबई शहराचा व्यास ३० वर्ग किलोमीटर आहे. त्यातील १० वर्ग किलोमीटर भाग सध्या पाण्यात बुडतो तर तो भाग साधारण १००० मिमी पाउस सलग तीन दिवस झाला तरी सुद्धा कोरडा राहावा या हेतूने ही योजना मांडतो आहे.

मुंबई शहरात दोन मुख्य रेल्वे मार्ग आहेत जे शहराच्या मध्यातून थेट बाहेर पर्यंत जातात. ( वेस्टर्न- चर्चगेट ते डहाणू अंतर १२४ किलोमीटर आणि सेन्ट्रल- छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कसारा / खोपोली अंतर १२० किलोमीटर ) हे दोन्ही मार्ग आणि त्यात रेल्वे ची असणारी सगळी जमीन अतिक्रमणमुक्त करणे.

रेल्वे मार्गावर फलाटांच्या खाली सुमारे ३ ते ५ मीटर व्यास असणारी बोअर प्रत्येकी ६० मीटर अंतर ठेवून मारणे.

या बोअर ची खोली ६० मीटर घेणे. ( समुद्र सपाटीपासून ) सुरुवातीचा बिंदू चर्चगेट शेवटचा डहाणू, सेन्ट्रल मार्गावर सुरुवात CST आणि शेवट कसारा किंवा खोपोली. असे बोअर रेल्वे फलाटांच्या दोन्ही बाजूला मारणे.

आता क्यानोत च्या तत्वाप्रमाणे ६० मीटर खोलीवर हे सर्व खड्डे एकमेकांना जोडणारा एक भूमी अंतर्गत क्यानोल तयार करणे. जिथे रेल्वे मार्ग संपतो तिथे एक प्रचंड मोठे विवर खणणे त्यात समुद्रासपाटीच्या खाली कमीतकमी १०० मीटर खोल आणि भरपूर रुंद खड्डा ( चौकोनी, गोल ) तयार करणे आणि त्याला हे क्यानोत जोडणे.

 

mumbai 1 inmarthi

 

ज्यावेळी कधीही पाउस होईल आणि रेल्वे रुळावर पावसाचे पाणी येईल ते या क्यानोत शाफ्ट ने जमिनीत जाईल आणि ते पाणी थेट १२४ किलोमीटर दूर एका सरोवरात साचायला सुरुवात होईल.

ही प्रक्रिया सतत चालू राहू शकते. यासाठी कोणतीही वीज लागणार नाही.

रेल्वे मार्ग आणि गरज पडल्यास असेच वेस्टर्न आणि इस्टर्न हाय वे सुद्धा याच पद्धतीने वापरले जाऊ शकतात तिथे सुद्धा फुट पाथ आणि रोड डिव्हायडर खालून हा क्यानोत नेला जाऊ शकतो.

क्यानोत जरी जमिनीखालून जाणारी यंत्रणा असली तरी प्रत्येक ६० मीटर वर त्याला शाफ्ट दिलेला असतो. हा शाफ्ट पाणी खाली वाहून नेणे आणि संपूर्ण यंत्रणेत हवा खेळती ठेवण्याचे काम करतो.

या शाफ्ट द्वारे हे पाणी जमिनीत जाणार आहे त्याच्या तोंडाला जाळीदार ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून फक्त पाणी आत जाईल इतर कचरा आत जाणार नाही.

आणि हे शाफ्ट जिथे असतात त्याच्या बरोबर खाली एक थोडा खोल खड्डा केलेला असतो क्यानोत मधील गाळ तिथे साचतो त्यामुळे हे शाफ्ट साफसफाई साठी सुद्धा वापरता येतात. पारंपारिक पद्धतीत त्यांना या शाफ्ट ला काहीच करता येत नसे आणि त्यामुळे माती खाली सतत पडत राहत असे.

आज आपण तिथे कॉंक्रीटचा पाईप वापरू शकतो. तसेच क्यानोत ची खालील क्यानोल सुद्धा आपण आज कॉंक्रीट ची बनवू शकतो.

अशी यंत्रणा चालेल का किंवा यशस्वी होईल का हा प्रश्न ज्याच्या मनात निर्माण होईल त्याने औरंगाबाद ला जाऊन नहरे अंबरी हा प्रकल्प पाहावा. अभ्यास करावा.

 

mumbai 4 inmarthi
EARTH HOUR: Underground water through aqueduct :
bmmann-motherearth.blogspot.com

 

इराण या देशात अजून सुद्धा बहुसंख्य पाणीपुरवठा क्यानोत द्वारे होत असतो त्यांच्या कडून सुद्धा आपल्याला तंत्रज्ञान घेता येईल. वास्तवात यात काहीही रॉकेट सायन्स नाही. फक्त निसर्गाच्या नियमांना अनुकूल अशी बनवलेली जी जलव्यवस्थापन पद्धत आहे.

दुर्दैवाने आपले इंजिनियर निसर्ग उध्वस्त करण्याचे तंत्रज्ञान शिकतो त्यामुळे निसर्गाच्या हातात हात घालून चांगले काही रचनात्मक निर्माण होऊ शकते यावर आपला विश्वासच बसत नाही.

या लेखासह क्यानोतचे काही स्केच आणि फोटो पण आहेत. अर्थात क्यानोत ही संकल्पना डोंगरात पाणी साठवणे आणि ते खेड्यात किंवा शहरात वापरणे.

( उंचावर पावसाचे पाणी साठवणे आणि मग ते सखोल भागात वापरणे ) या साठी बनवली गेली आहे. इथे आपण समुद्र सपाटीवरील जमिनीचे पाणी खोल खड्डा ( सरोवर/ तलाव ) तयार करून त्यात साठवणार आहोत.

 

mumbai 5 inmarthi

 

हे सुद्धा तितकेच साध्य आहे. त्या काळात हे शक्य झाले नसते पण आज तशी यंत्र सामुग्री आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे आज हे सहज शक्य आहे.

या पोस्ट मध्ये टाकलेली तांत्रिक माहिती शतप्रतिशत योग्य आहे हा माझा ठाम विश्वास आहे.

केवळ हा आणि हा एकच प्रयत्न मुंबईची भविष्यकालीन प्रलयापासून सुटका करू शकतो अर्थात यात माझे शून्य डोके आहे मी फक्त पोस्टमन चे काम करतो आहे.

नियम निसर्गाचेच आहेत. इतर मानव विसरले आहेत आणि माझ्या अजून लक्षात आहेत इतकाच फरक. या संदर्भात एका सद्गृहस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती तिथे सुद्धा पारंपारिक पर्यायच चर्चेत होते.

कोणीही थोडा सुद्धा वेगळा विचार करायला तयार नाही हे इथे विषादपूर्णपणे नमूद करावेसे वाटते.

 

mumbai 5 inmarthi

 

जर महापालिका प्रशासन, राज्य अथवा केंद्र सरकार या प्रस्तावावर विचार करायला तयार असेल तर मी पूर्ण detailed प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा देऊ शकतो. अर्थात माझा रोल फक्त मार्गदर्शकाचा असेल.

सरकार दरबारी माझी काहीही ओळख नाही परंतु संबंधितांच्या पर्यंत हा लेख पोचवण्यासाठी फेसबुक मित्रांनी मदत करावी ही विनंती. ही पोस्ट मुक्तपणे शेयर करू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?