आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेल्या अनंत काळापासून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ पसरलेली आहे. आणि दिवसेंदिवस ही कट्टरता वाढत चाललेली आहे. सोशल मीडियाने तर ह्यात भरच टाकली आहे.
अनेक समाजकंटक आणि स्वार्थी राजकारणी लोक स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थीपणाने दोन्ही समाजांत एकमेकांविषयी द्वेष पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात.
म्हणूनच मोठ्या सणांच्या वेळेला किंवा पालखी, मिरवणुकीच्या वेळेला संवेदनशील भागात पोलिसांना काहीही गडबड होऊ नये आणि कुठेही जातीय दंगलींचा भडका उडू नये म्हणून डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागते.
अर्थात समाजातील काहीच लोक इतके कट्टर आहेत. इतर लोक मात्र एकमेकांच्या आनंदात,दुःखात सहभागी होऊन माणुसकी हाच मोठा धर्म आहे ह्याचे पालन करताना दिसतात.
त्या ही पुढे जाऊन बहुसंख्य लोक आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये ह्याचीच काळजी घेताना दिसून येतात.
तसेच सणप्रसंगी एकमेकांना आपल्या घरी बोलावून , मिठाई/प्रसाद खाऊ घालून आनंद साजरा करतात. पण हे सगळे अनेकांना बघवत नाही.
म्हणूनच ह्या दोन्ही समाजातील द्वेष कसा दिवसेंदिवस वाढत जाईल ह्याच प्रयत्नांत असे विघ्नसंतोषी लोक असतात.
लोकांच्या भावनांना हात घालून, लोकांच्या धार्मिक भावना भडकावून, त्यांची दुखरी नस शोधून भावना भडकावणारी भाषणे करून किंवा आजच्या काळात व्हीडिओ किंवा पोस्ट अपलोड करून हे लोक घरबसल्या कुठेही दंगे घडवून आणू शकतात.
हे सगळे बघितल्यावर खरंच समाजात फक्त द्वेषच उरला आहे का अशी भीती वाटू लागते.
पण घराबाहेर पडलं आणि लोकांमधील एकमेकांप्रती असलेली सहिष्णुता बघितली की अजूनही परिस्थिती आटोक्यात आहे, घाबरण्याचे कारण नाही ह्याची खात्री पटते.
जसे हिंदू लोक मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेचा आणि धर्माचा आदर करतात तसेच अनेक मुस्लिम लोक सुद्धा हिंदू धर्मातील श्रद्धांचा अन परंपरांचा आदर करतात हे पुढील उदाहरणातून दिसून येते.
सकाळ वृत्तपत्र समूहाने या दर्ग्यात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेवर विशेष व्हिडीओ केला आहे. ‘सकाळ’चे पत्रकार संकेत कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष दर्ग्याच्या ठिकाणी जाऊन वार्तांकन केले आहे.
गेली सातशे वर्षं विठोबाचे भक्त, वारकरी संप्रदायातील लोक दरवर्षी न चुकता पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला त्यांच्या विठूमाऊलीचे दर्शन घ्यायला जातात.
न चुकता दर वर्षी ही पंढरीची वारी होतेच आणि वेगवेगळ्या गावांतील लाखो लोक पायी वारीत जातात आणि पालखीचे, महाराष्ट्राच्या आराध्यदेवतेचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात. देहू, आळंदी,पैठण इथेही पालखी येते.
पैठण हे संत एकनाथ महाराजांचे गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वसलेले व एकेकाळी सातवाहन साम्राज्याची राजधानी असलेले प्रतिष्ठान उर्फ पैठण गावातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला अनेक लोक येतात.
संत एकनाथ महाराजांची समाधी असलेल्या ह्या गावात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे जिथे हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा आणि सलोखा बघायला मिळतो.
पैठणमधील हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा हा वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण वारीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या ह्या दर्ग्यामध्ये थांबतात.
त्यांच्या निवासाची व्यवस्था ह्या दर्ग्यातच केली जाते आणि ह्या दर्ग्याची व्यवस्था सांभाळणारे मुस्लिम बांधव दिंडीत व वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची अतिशय प्रेमाने व उत्साहाने सेवा करतात, त्यांचा यथायोग्य पाहुणचार करतात.
तसेच वारकरी सुद्धा ह्या दर्ग्यात आल्यावर, तिथल्या मुक्कामात ह्या दर्ग्याची मनोभावे पूजा करतात, उपासना करतात.
मुस्लिम बांधवांकडून दिंड्यांना शिधा दिला जातो आणि इथल्या वस्तीत दिंडीतील भाविकांना भोजन दिले जाते. ह्या दर्ग्यात नमाज सुद्धा होतो आणि भजन सुद्धा होते.
ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते तेव्हा वारकरी आपले भजन थांबवतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी पुन्हा भजन सुरु करतात.
हा दर्गा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. जे लोक इथे येऊन एकनाथ महाराजांचे दर्शन घेतात ते दर्ग्याचेही दर्शन घेतात आणि जे लोक दर्ग्यात येतात ते लोक एकनाथ महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत अशी इथली परंपरा आहे.
असे म्हणतात की नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथ महाराज येथे २४ वर्ष वास्तव्याला होते आणि त्यांनी त्या काळात येथे नदीतून पाणी आणून रांजण भरण्याची सेवा केली.
तो रांजण आजही ह्या ठिकाणी बघायला मिळतो.
इथले मुस्लिम लोक जसे त्यांच्या धर्मगुरूंना मानतात तसेच एकनाथ महाराज व कानिफनाथ महाराजांनाही मानतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि अजूनही ती इथल्या लोकांनी कायम ठेवली आहे.
त्यांच्या धर्मगुरूंनी व एकनाथ महाराजांनी इथल्या लोकांना सलोख्याने राहण्याची, एकमेकांवर प्रेम करण्याची शिकवण दिली.
सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र चालण्याची शिकवण दिली ती अजूनही इथले लोक उत्साहाने पाळताना दिसतात.
पैठणमधील ही “सलोख्याची वारी” बघून खरंच इथल्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले “भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे” आत्मसात केले आहे म्हणूनच हे लोक एकमेकांचा, एकमेकांच्या श्रद्धांचा व धर्माचा आदर करून वागताना बघून मनाला आत्मिक समाधान मिळते.
हीच शिकवण जगातील सर्वच लोकांनी आत्मसात केली आणि ह्या बांधवांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला तर जगातील निम्मे प्रश्न अगदी सहज सुटतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.