आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
मुलांना आपण शाळेत घालतो. शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबरच त्यांनी इतर क्षेत्रात प्रगती करावी असे आपल्याला वाटत असते. आपण मुलांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच कला, क्रीडा याचे वेगवेगळे प्रशिक्षण घ्यावे म्हणून सतत धडपडत असतो.
त्यासाठी सुट्टीच्या दिवशी जादा क्लासेस किंवा सकाळी संध्याकाळी शाळेव्यतिरिक्त कोणता वेळ मिळतोय हे आपण पाहात असतो. पण या व्यतिरिक्त मुलांनी आपणहून काहीतरी शोध लावले किंवा समाजोपयोगी कार्य केले तर आपल्याला आनंदच होतो.
नॅशनल इनोवेशन फाउंडेशन द्वारा मुलांच्या सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण भावनांना चालना देणारी ‘इग्नाइट’ नावाची स्पर्धा घेतली जाते. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाला चालना मिळते. शाळेच्या मुलांनी नवकल्पनने प्रोत्साहित व्हावे यासाठी हा उपक्रम आहे.
त्यातील विजेत्यांना पुरस्कारही दिला जातो. राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी लोकप्रिय अशी ही एक स्पर्धा आहे. त्यात सहभाग घेतलेल्या मुलांनी केलेले काही प्रयोग व संकल्पना आपण बघुया.
१. एकापेक्षा जास्त दिशेला उजेड दाखविणारी बॅटरी
मिट्ट काळोखातून चालत येत असताना आपल्याजवळ बॅटरी असली तरी ठरावीक प्रकाशझोतातच आपण पाहू शकतो. अशीच घटना घडली होती बिहारमधील अलिशर नावाच्या विद्यार्थ्याबरोबर.
त्याच्या मागून चालत येणार्या त्याच्या आजीला बॅटरी दाखविण्याच्या नादात समोर असलेला खड्डा तो पाहू शकला नाही परिणामी तो खड्ड्यात पडला व जखमी झाला.
म्हणूनच त्याने एकच बॅटरी वेगवेगळ्या दिशांना प्रकाश फेकेल ही कल्पना अंमलात आणायचे ठरविले. त्यावर त्याने संशोधन केले आणि बॅटरी तयार केली.
२. नावीन्यपूर्ण सर्व्हिंग ट्रे
आलोकसिंग या गाजियाबाद, उत्तरप्रदेश मध्ये राहणार्या विद्यार्थ्याने एके दिवशी पाहुण्यांना चहा देत असताना ट्रे मधून कप सटकल्यामुळे गरमागरम चहा पाहुण्यांच्या अंगावर आणि सोफ्यावर सांडला होता.
त्यामुळे त्याचा हात भाजला व सोफाही खराब झाला. या घटनेवर विचार करत असताना त्याने एक वेगळ्या प्रकारचा सर्व्हिंग ट्रे बनवायचा ठरविले ज्या ट्रेमुळे कप किंवा ग्लास आपोआपच कोस्टरसकट ट्रेमधूनच टेबलावर ठेवले जातील.
अर्थातच आपल्याला ते ठेवताना कप किंवा ग्लास हाताने उचलून ठेवण्याची गरज लागणार नाही. यामुळे संभाव्य धोका तर टळेलच, आणि दिसतानासुद्धा स्टायलिश दिसेल.
३. स्टेपलरच्या पिना संपत आल्याचा इशारा
काहीतरी महत्त्वाचे कागदपत्रं स्टेपल करायला जावं आणि नेमक्या स्टेपलरच्या पिना संपाव्यात हे अगदी नेहमीच घडतं, पण अगदी महत्त्वाच्या कामाच्या वेळी असं झालं की, आपली खूपच चिडचिड होते, त्यावर उपाय शोधून काढला एका मुलीने जिचे नाव आहे अंकिता नगरकर..
तिने पिना भरताना शेवटी येणार्या दोन-तीन पिनांना आधी नेलपेंट लावले जेणेकरून पिना संपत आल्याचा इशारा मिळेल, पण नेलपेंट फार काळ टिकले नाही म्हणून तिने परमनंट मार्करचा उपयोग केला आणि तो योग्य ठरला.
पिना संपत आल्या आहेत याचा इशारा रंगीत पिन आली की मिळतो. या तिच्या शोधावर तिच्या आईने 67 पानांचं पुस्तकही लिहिलंय.
४. पूर्णपणे वाकणारी पंख्याची पाती
घराची साफसफाई करताना सगळ्यात त्रासदायक प्रकार असतो तो पंखा साफ करणं. पंख्याची आपल्याला दिसणारी बाजू साफ करणं त्यातल्या त्यात सोपं असतं.
परंतु आपल्याला न दिसणारी आणि सगळ्यात जास्त खराब होणारी वरची बाजू साफ करणं म्हणजे खरोखरच कटकटीचं काम आहे.
केरळमधील अतिर्थचंद्रन याने याच समस्येवर तोडगा म्हणून पंखा एका विशिष्ट बटणाबरोबर असावा अशी संकल्पना त्याच्या डोक्यात आली.
जेव्हा हे बटण बंद केलं जाईल तेव्हा पंख्याची पाती देखील पूर्णपणे खाली येऊन खालच्या दिशेने पूर्णपणे उभी होतील.
ज्यामुळे ते साफ करणं अतिशय सोपं होईल. या उलट पंखा चालू केल्यास ते पाती पुन्हा आपल्या मूळ रचनेप्रमाणे आडवी होऊन पंखा पुन्हा सुरू होईल.
५. पाऊस येताच कपडे आत ओढणारी दोरी
छान ऊन पडलंय म्हणून बाहेर अंगणात कपडे वाळत घालावेत आणि अशातच मोठा पाऊस यावा व सुखलेले कपडे परत मस्त ओले व्हावेत हा अनुभव सर्वांनाच येतो.
झारखंड मधील पीयूष अगरवाल हा नेहमीच आपल्या आईला पाऊस आला की लगबगीने कपडे आत आणताना पाहत असे. हे अतिशय कटकटीचे आणि जादाचं काम वाचवण्यासाठी पियुषच्या डोक्यात एका मशीनची कल्पना आली.
जे सेन्सरवर काम करतं. या मोटरच्या वायरमध्ये मिठाचा अंश असतो.
ज्या वेळी पाऊस पडतो तेव्हा हे मीठ विद्युत प्रवाह चालू करण्यासाठी बाष्प शोषून घेतं आणि यामुळेच मोटार चालू होते आणि त्या द्वारे ज्या दोरीवर कपडे वाळत घातले आहेत ती दोरी आपोआप आत ओढली जाते.
६. पाण्याच्या बाटल्यांचा गैरवापर थांबवणे
राजश्री चौधर व शिबज्योती चौधरी या बहीण भावंडांनी रेल्वेमधून प्रवास करत असताना एक धक्कादायक प्रकार पाहिला. काही लहान मुलं वापरून फेकलेल्या, पडलेल्या पाण्याच्या बाटल्या उचलून, त्यात पाणी भरून ते पुन्हा त्याची विक्री करत होते.
ते पाहून त्यांना कल्पना सुचली की, या बाटल्यांच्या खालील बाजूस कोल्ड्रिंकच्या कॅनसारखं एक मेकॅनिझम असावं, जेणेकरून एकदा बाटली वापरली की, ती बाटली आपोआप पंक्चर होईल आणि ती बाटली पुन्हा वापरता येणार नाही.
यामुळे वापरलेल्या बाटल्यातील पाणी भरण्यावर आळा बसेल आणि स्वच्छ बाटल्यांतील पाणीच विक्रीला येईल.
७. ट्रॅफिक सिग्नलजवळ स्वयंचलित खिळे
हैद्राबादमधील शमीत याने एका दुर्दैवी अपघातामध्ये आपल्या जवळच्या मित्राला गमावले. एका ट्रकने सिग्नल तोडल्यामुळे हा अपघात झाला. यामुळे सिग्नल तोडण्यापासून सर्व चालकांना कसं थांबवता येईल याचा विचार शमीत करत होता.
त्यातूनच स्वयंचलित खिळ्यांची कल्पना त्याला सुचली. हे खिळे सिग्नल लाल होताच झेब्रा क्रॉसिंगच्या आधी आपोआप वर येतील व सिग्नल हिरवा होताच आपोआप खाली जातील.
यामुळे सर्व चालकांना नाइलाजाने सिग्नलला थांबावेच लागेल अथवा गाडीचा टायर पंक्चर होऊ शकतो.
त्यामुळे चालक ती रिस्क घेणार नाही. आश्चर्य म्हणजे दिल्लीमधील सिवा महिमा यांनी देखील ही संकल्पना स्वतंत्रपणे राबविली होती. अशी योजना सगळीकडे राबविली पाहिजे.
८. ध्वनिप्रदूषण
वाढलेलं ट्राफिक आणि गाड्यांचे कर्कश हॉर्न याने मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होतं तसेच आसपासच्या लोकांना देखील त्याचा त्रास होतो.
झारखंड मधील मणीभूषण प्रसाद मोठ्या शहरात शिकायला गेल्यानंतर त्याला याचा इतका त्रास झाला की, कधी कधी ट्रॅफिक व हॉर्नच्या आवाजामध्ये पालकांचा फोन येऊन गेल्याचंही त्याला कळायचं नाही.
खरं तर हॉर्न हा फक्त पुढील गाड्यांमधील ड्रायव्हरसाठी असतो आणि म्हणूनच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली ज्या द्वारे हॉर्न हे फक्त ड्रायव्हरला ऐकू जातील.
एक एमीटर सिग्नल पास करण्यासाठी हा सिग्नल इन्फ्रारेड किंवा अल्ट्राव्हायलेट किरणांच्या स्वरूपातला असू शकतो.
एक सेन्सर सिग्नल डिटेक्ट करण्यासाठी जेव्हा हॉर्न वाजवला जाईल तेव्हा आवाजाऐवजी सिग्नल पास केला जाईल आणि हे सिग्नल पुढील गाडीमधील सेन्सर डिटेक्ट करतील आणि त्यामुळे गाडीत लागणारा छोटासा दिवा व आवाज चालकाला सतर्क करील.
विशेष म्हणजे या उपकरणांची किंमत गाडीच्या सामान्य हॉर्नइतकीच आहे. याहून अधिक सुविधा ती कोणती? आहे ना छान आयडीया?
९. वाहन चालवण्याचा परवाना व हेल्मेट याशिवाय गाडी चालवणे अशक्य
रस्त्यावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता काही मुलांनी नवीन कल्पना शोधली आहे. गाडीच्या इग्निशनजवळ वाहन परवाना इन्सर्ट करण्यासाठी एक स्लॉट असावा. अगदी आपल्या एटीएम मशीन मधल्या स्लॉटसारखा.
ज्यामुळे जर लायसन्स नसेल किंवा ते वैध्य नसेल किंवा त्याची मुदत संपली असेल तर गाडी चालूच होणार नाही. आहे ना भन्नाट आयडीया.
तर काही जणांनी असं सुचवलं आहे की, दुचाकीसाठी हेल्मेटच इग्निशन म्हणून वापरण्यात असावं.
यामुळे अर्थातच हेल्मेट घातलं नाही तर गाडी चालूच होणार नाही. म्हणजे हेल्मेट सक्ती आपोआपच होईल.
१०. कमकुवत दृष्टी असणार्या लोकांसाठी उपकरण
ज्योती राजन साहू भुवनेश्वर, ओडिसा येथे अंधशाळेसमोर राहात होता. त्याला असं जाणवलं की, सर्व विद्यार्थी हे पुर्णत: आंधळे नाहीयेत काही जणांना ग्लाकोमा हा आजार आहे, ज्यामध्ये नजर कमुकवत होते.
त्यामुळे त्यांना अंधूक दिसतं. त्यांना कुणावरही अवलंबून राहावं लागणार नाही यासाठी ज्योती याला एक कल्पना सुचली. त्याला एक असं उपकरण बनवायचं होतं ज्यामध्ये दूर अंतरावर असलेल्या गोष्टींचा एक क्लिअर फोटो घेईल व जवळच्या एका स्क्रीनवर तो फोटो दाखवेल.
खूप प्रयोग केल्यानंतर त्याने झूम कॅमेरा आणि एलसीडी या दोघांची सांगड घातली व एक हेल्मेट तयार केलं. हे हेल्मेट कॅमेराच्या मदतीने दूरच्या गोष्टींचा फोटो काढते. या कॅमेरामध्ये एक एलसीडी स्क्रीनदेखील आहे ज्यावर हे फोटो दाखवले जातात.
कमकुवत दृष्टी असणारी व्यक्ती लांबवर असणार्या गोष्टी पाहण्यासाठी या हेल्मेटचा वापर करू शकते. किती दूरदृष्टी आहे ना ज्योतीची. यासाठी त्याला इग्नाईट हा पुरस्कार इयत्ता नववीमध्ये मिळाला.
त्याचप्रमाणे एन आयएफ या संस्थेद्वारे ज्योतीच्या नावावर या उपकरणाचे पेटंट मिळविलेले आहे.
तर असे आहेत हे मुलांनी बनवलेले नवनवे उपक्रम. हे वाचून आपल्यालाही काही नवीन कल्पना नक्कीच सुचतील. तशा सुचल्या तर नमूद करायला विसरू नका.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.