Site icon InMarathi

जेल प्रशासनाने एक अनोखी शक्कल लढवलीय ज्यामुळे कैद्यांना चक्क नोकऱ्या मिळाल्या आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

तेलंगणा राज्यातील वारंगल हे जिल्ह्याचे ठिकाण. एक आगळ्यावेगळ्या गोष्टीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलंय. तिथल्या सेंट्रल जेलच्या मुख्य गेटच्या बाहेर अलीकडे बरीच गर्दी दिसू लागलीय. शेकडो लोक रांगा लावून ताटकळत उभे असतात.

आता तुम्हाला वाटेल की ते तुरुंगात असलेल्या आपल्या नातेवाईकांना भेटायला आले असतील.तर साफ चुक. ते इथे रांगेत उभे असतात ते नोकरी मिळवण्यासाठी.

कानांवर विश्वास नाही ना बसत? मग ऐका तर या मागील एक मोठे कारण.

होय हे खरंय की इथे लोक जमलेत ते केवळ नोकरी करण्यासाठी आणि त्यातही आश्चर्यकारक गोष्ट ही की हे कोणी बेरोजगार लोक नाहीत की जे मिळेल ते काम करून पोटापाण्याचा प्रश्न सोडवायला आलेत, तर ते आहेत याच तुरुंगातून सुटलेले कैदी.

 

thenewsminute

आता तर कठीण जातंय ना या गोष्टीवर विश्वास ठेवायला?

पण मंडळी, ही गोष्ट खरी आहे. सध्या वारंगल तुरुंगाबाहेर रोजगार मेळा भरतो आणि तुरुंगातून आपण केलेल्या वाईट कृत्याची सजा भोगून बाहेर आलेल्या कैद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी तेथील तुरुंग प्रशासन प्रयत्नशील आहे.

तेथे वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिकारी येऊन त्यांच्या गरजेनुसार भरती प्रक्रिया राबवून या कैद्यांना पुन्हा मानाने जगण्याची एक संधी देत आहेत.

तेलंगणा सरकारने “तेलंगणा स्टेट प्रिझनर्स डिपार्टमेंट” ची स्थापना करून या खात्यामार्फत कैद्यांचे पुनर्वसन करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

तुरुंगात कोणीच आपल्या मर्जीने येत नसतात.

काही थोडेफार मुद्दामहून परिणाम माहीत असूनही चैनीसाठी किंवा जास्त सुखाच्या भ्रामक कल्पनेपाई गुन्हा करतात आणि पकडले गेल्यावर खटल्यात अडकून तुरुंगात येतात.

पण जास्त प्रमाणात येणारे कैदी हे क्षणिक रागाच्या भावनेतून आपल्या भावनांवरील नियंत्रण हरवून बसतात आणि मारामारी किंवा खुन अशी वाईट कृत्ये करून तुरुंगात दाखल होतात.

 

india.com

इथे घरापासून दूर गजाआड कोठडीत राहिल्यावर त्यांना पश्चाताप होतो पण तोपर्यंत वेळ निघुन गेलेली असते. कोर्टाने फर्मावलेली शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर त्यांना कोणी नोकरी देण्यास तयार नसते आणि त्यांची परवड सुरू होते.

मग काहीजण नोकरी मिळत नाही म्हणून परत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात आणि पकडले जाऊन परत तुरुंगात येतात.

विचार करा की त्यांच्या कुटुंबाचे किती हाल होत असतील. काही कैदी अतिशय तरुण वयाचे असतात.

एक दोन वर्षे तुरुंगात काढून बाहेर आल्यावर जर त्यांना नोकरी नाही मिळाली तर पुढे एवढे मोठे आयुष्य पसरलेले असते त्यात ते कसे स्वतःला निभावून नेणार?

तुम्हाला आठवतोय तो १९५७ साली आलेला व्ही.शांताराम यांचा “दो आँखे बारह हाथ ” हा सिनेमा?

ह्युमनिस्टिक सायकॉलॉजी वर आधारित या सिनेमात एक असा पोलीस अधिकारी असतो ज्याचा मानवातील चांगुलकीवर विश्वास असतो आणि प्रत्येकाच्या मनात दडलेली ही भावना त्याला वाममार्गापासून चांगल्या मार्गाकडे घेऊन येते यावर त्याचा विश्वास असतो.

हा अधिकारी तुरुंग प्रशासनात काम करत असतो आणि आपल्या विचारांवर ठाम असतो. तो तुरुंग प्रशासनाकडे मागणी करतो की तुम्ही काही कैदी माझ्या ताब्यात द्या, मी त्यांना सुधारून दाखवतो व त्यांचे पुनर्वसन करतो.

 

youtube.com

आधी त्याची खुप थट्टा होते नंतर वरिष्ठ त्याला बरेचदा सांगून बघतात की ही गोष्ट शक्य नाहीय. पण तो परतपरत आपली मागणी लावून धरतो आणि खुनाची शिक्षा भोगत असलेले ६ कैदी त्याच्या ताब्यात दिले जातात.

तो अधिकारी त्या सहा कैद्यांना घेऊन स्वतःच्या शेतावर येतो आणि त्यांना काम करण्यास देतो.

सुरवातीस हे कैदी आपापसात मारामारी करतात, वेळोवेळी पळून जायचा प्रयत्न करतात पण तो अधिकारी प्रत्येकवेळी त्यांच्यावर करडी नजर ठेवून असतो.

अखेर बऱ्याच प्रसंगांना तोंड देत तो त्यांच्यातील माणुसकी जागवतो आणि ते कैदी चांगल्या मार्गावर परत येतात

ग. दि. माडगूळकरांनी ही कथा लिहिली होती आणि बर्लिन व अमेरिकेतील फिल्म महोत्सवात या सिनेमाला अवॉर्ड मिळाले. याचा परिणाम म्हणून सरकारने तुरुंगात कैद्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले.

कैद्यांना विविध प्रकारच्या कामांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून खुर्च्या बनविणे, सतरंज्या व चादरी विणून घेणे, कलाकुसरीच्या वस्तू बनवून घेणे अशी कामे करवून घेऊन त्यातून त्यांना कमाईचा मार्ग उपलब्ध करून दिला.

कैदी आपली शिक्षा भोगून बाहेर पडल्यावर त्यांना नोकरी मिळावी हा उद्देश यात होता.

 

hence.com

शेतीचे प्रशिक्षण देखील सुरू करण्यात आले. पुढे किरण बेदी दिल्ली च्या तिहार जेलच्या तुरुंग महानिरीक्षक बनल्यावर त्यांनी कैद्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी योग आणि ध्यानधारणेचे वर्ग तिहार तुरुंगात सुरू केले.

वारंगल तुरुंग प्रशासन आणि तेलंगण स्टेट प्रिझनर्स डिपार्टमेंट यांनी याही पुढे एक पाऊल टाकले आहे.

तुरुंगात प्रशिक्षित होऊन कैदी बाहेर पडले तरी त्यांना काम देण्यास कोणीच तयार होत नाही. कैद्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीने पुन्हा त्यांनी काही गुन्हेगारी कृत्य केले तर? अशी शंका त्यांच्या मनात असते.

पण कैद्यांचे पुनर्वसन झालेच नाही तर त्यांनी उर्वरित आयुष्य कसे जगायचे?

नेमका हाच विचार करून तुरुंग प्रशासनाने काही कंपन्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे शंकानिरसन करून त्यांना तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांना नोकरी देण्यासाठी राजी केले.

त्याच वेळी कैद्यांसाठी देखील चर्चासत्र आयोजित करून त्यांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तुरुंगातून बाहेर पडल्यावर नोकरी मिळणार म्हटल्यावर तेही खुश आणि त्यांचे कुटुंबीय देखील खुश झाले आहेत.

 

Storypick.com

कोणकोणत्या कम्पन्या या योजनेतून नोकरी देत आहेत?

आणि किती जणांना प्रत्यक्षात नोकऱ्या मिळाल्या असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर जाणून घ्या ही माहिती.

यामाहा, सुझुकी, स्वीग्गी, ऍक्वागार्ड, एस. बी. आय. लाईफ, एशियन पेंट्स सारख्या मोठ्या कंपन्यांशी तेलंगणा तुरुंग प्रशासनाने संधान बांधले. त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या रिक्त जागांसाठी तुरुंगातून मुक्त झालेल्या कैद्यांची यादी पाठवली.

या कंपन्यांनी तेथे रोजगारमेळा घेऊन आत्तापर्यंत ९७ जणांना नोकरीची संधी दिलीय ज्यात ७ स्त्रियांचा देखील समावेश आहे.

तुरुंग प्रशासनाने “आफ्टर केअर सर्व्हिसेस” नावाने वेगळा विभाग स्थापन केलाय आणि त्या मार्फत ते नोकरीच्या संधी कोठे उपलब्ध आहेत ते बघून या माजी कैद्यांसाठी प्रयत्न करीत आहेत.

या साठी जिल्हावार समित्या नेमून माजी कैद्यांची नावनोंदणी करून घेतली जाते आणि जिथे संधी उपलब्ध असेल तिथे त्यांना पाठवले जाते आणि सन्मानाने जगण्याची संधी देऊ केली जाते.

 

 

अतिशय सुंदर अशा या उपक्रमाची इतर राज्यांनी माहिती घेऊन आपापल्या राज्यात हे प्रयोग सुरू केले तर शिक्षा भोगून आलेल्या या माजी गुन्हेगारांचे पुनर्वसन होऊन त्यांच्या कुटुंबियांना देखील आनंदाने श्वास घेता येईल.

तेलंगणा राज्य कैदी विभागाचे कौतुक आणि अभिनंदन केलेच पाहिजे. हॅट्स ऑफ टु यू!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version