Site icon InMarathi

अचानक बेपत्ता झालेला कॉन्स्टेबल तिहार जेलमध्ये? चित्रपटात शोभेल अशी “सत्यकथा”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

उत्तर प्रदेश पोलीसमध्ये कार्यरत असलेला कुंवर पाल सिंग ह्याने १५ नोव्हेंबर रोजी गावी जाण्यासाठी एका महिन्याच्या रजेसाठी अर्ज केला आणि त्याची रजा मंजूर झाली.

रजेवर जाण्याआधी बिजनोर बधपूर पोलीस स्थानकातील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला येताना त्याच्या गावाहून मिठाई आणण्यास सांगितली.

पण एक महिना,दोन महिने अगदी पाच महिने उलटून गेले तरी मिठाई तर आलीच नाही पण कुंवर पाल सिंग सुद्धा कामावर रुजू झाला नाही. तो अचानक बेपत्ता झाला होता.

 

bristo.com

५५ वर्षीय कॉन्स्टेबल कुंवर पाल सिंगचा ठावठिकाणा शोधून काढण्यास उत्तर प्रदेश पोलिसांना अखेर पाच महिन्यांनी यश आले पण तो सापडला मात्र तुरुंगात!

१९८७ साली झालेल्या हशिमपुरा हत्याकांडात तो आरोपी असल्याने त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते.

२२ मे १९८७ साली हशिमपुरा येथे ४२ मुसलमान लोकांची हत्या करण्यात आली होती आणि हे हत्याकांड १५ हत्यारबंद लोकांनी केल्याचे तपासात स्पष्ट झाले होते.

इतके मोठे हत्याकांड घडवून आणल्यानंतर ह्या १५ आरोपींनी त्या सगळ्यांचे मृतदेह एका कालव्यात टाकून दिले होते.

 

theindianexpress.com

ह्या गुन्ह्याची सुनावणी २०१८ या वर्षी १५ डिसेंबर रोजी दिल्ली हायकोर्टात झाली आणि आरोपींना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

ह्या सुनावणीत कोर्टाने असे म्हटले की हे हत्याकांड म्हणजे, “अल्पसंख्यांक समुदायातील लोकांची जाणूनबुजून केलेली हत्या होती.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुंवर पाल सिंग जेव्हा साडेतीन महिन्यानंतर सुद्धा कामावर रुजू झाला नाही तेव्हा पोलीस स्टेशनने त्याला कामाप्रती केलेल्या निष्काळजीच्या आरोपावरून सस्पेंड करण्यात आले.

आणि त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी विभागीय चौकशी समिती नेमून चौकशी सुरु करण्यात आली.

 

indiatoday.com

चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिंगच्या गुन्हयाबद्दल आणि त्याला मिळालेल्या शिक्षेबद्दल माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी त्याला अखेर नोकरीतून बडतर्फ केले. बिजनोरच्या पोलीस अधीक्षकांनी सूत्रांशी बोलताना अशी माहिती दिली की,

“कुंवर पाल सिंग ह्याला दिल्ली हायकोर्टाने आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. तीस हजारी कोर्ट येथे तो स्वतःहून पोलीस आणि कोर्टाला शरण गेला आणि सध्या तो तिहार जेलमध्ये त्याच्या गुन्ह्याची शिक्षा भोगतो आहे.”

भारतात गुन्हा घडल्यानंतर कायदेशीर कारवाई होण्यास आणि न्याय मिळण्यास इतकी वर्षे निघून जातात की सर्वसामान्य लोक त्या गुन्ह्याबद्दल विसरून सुद्धा जातात.

ज्यांना गुन्ह्याची झळ बसते ते लोक वर्षानुवर्षे न्यायाच्या शोधार्थ कोर्टाच्या तारीख पे तारीख ह्या धोरणात अडकून पडतात आणि काहींना तर त्यांच्या संपूर्ण हयातीत न्याय मिळत सुद्धा नाही.

 

andjusticeforall.org

पण आता इतक्या वर्षांनी का होईना १९८७ साली झालेल्या हत्याकांडातील बळींच्या नातेवाईकांना अखेर न्याय मिळाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल स्वतःच तुरुंगात आजन्म कारावासाची शिक्षा भोगतो आहे.

खरं तर पोलिसांचे काम समाजाचे रक्षण करणे हे आहे पण असले काही लोक पोलिसांची प्रतिमा मलिन करून ठेवतात आणि त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात पोलिसांविषयी गैरसमज निर्माण होतात.

भयंकर हत्याकांड करून इतकी वर्षे मोकाट असलेला आरोपी अखेर जेरबंद झाला ह्यातच काय ते समाधान मानायचे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version