आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
युनायटेड स्टेट्स मध्ये जून महिना ‘एल जी बी टी प्राईड मंथ ‘ म्हणून मानला जातो.
लैंगिकता हा विषय कुजबुजत बोलण्याचा जिथे प्रघात आहे, जिथे स्त्री पुरुषामधील लैंगिक संबंध नैसर्गिक मानले जातात तर पुरुष पुरुष किंवा स्त्री स्त्री मधील संबंधांना अनैसर्गिक, चूक, पाप किंवा काहीतरी गलिच्छ या दृष्टीकोनातून बघितले जाते, जिथे समोरच्याच्या भिन्न लैंगिकतेचा खुलेपणाने, विनासंकोच स्वीकार होत नाही.
अशांकरता एल जी बी टी ही संकल्पना काहीशी धक्कादायक असण्याची शक्यता आहे.
चला तर, अजून काही धक्कादायक माहिती घेऊ या. जाणून घेऊ या काही अशा व्यक्तींच्या लैंगिकतेबद्दल, ज्यांना आपण शालेय जीवनात अभ्यास करताना फार मोठ्या, प्रसिद्ध व्यक्ती म्हणून भेटलेलो आहोत.
१. सर फ्रान्सिस बेकन –
वकील, तत्वज्ञ आणि राजनीतिज्ञ असलेला बेकन शास्त्रीय पद्धतीचा जनक म्हणून ओळखला जाई. त्याची महती सांगणाऱ्या पुस्तकात तो समलिंगी असल्याचा उल्लेख टाळला जातो.
त्याच्या घरी असणाऱ्या ७५ सेवाकांपैकी कित्येक डझन पुरुष सेवक फ्रान्सिस बेकनच्या खास मर्जीतील होते.
त्यातील कित्येक जणांना तो महागड्या भेटवस्तू देत असे. बेकनच्या आई आणि भावामधील पत्रव्यवहारातून या गोष्टीवर प्रकाश पडतो की बेकन आणि त्याच्या नोकरांमधील संबंध ‘ मालक-नोकर’ या नात्यापलीकडील होते.
कित्येकांना त्याने नोकरासारखी वागणूक कधीच दिली नाही. सर टॉबी मॅथ्यू हा बेकनचा खास जिवलग मित्र होता आणि त्याच्या ‘ ऑफ फ्रेन्डशिप’ या प्रसिद्ध निबंधांची प्रेरणा देखील होता.
३. फ्लोरेंस नायटिंगेल –
फ्लोरेंसला जग एक उत्तम परिचारिका म्हणून ओळखते. गरीब आणि आजारी लोकांची तिने कायम सेवाभावी वृत्तीने सुश्रुषा केली.
क्रिमियन युद्धात जखमी सैनिकांच्या जखमांचे ती ड्रेसिंग करत असे. ती एक प्रेरणादायी/मार्गदर्शक संख्याशास्त्रज्ञ देखील होती. दोन स्त्रियांबरोबर असलेल्या तिच्या नातेसंबंधांची जास्त चर्चा झाली.
एक मै स्मिथ, तिची आत्या, जिने जीवघेण्या आजारात तिची सुश्रुषा केली. ती कायम फ्लोरेन्स्ची रक्षक, दुभाषी आणि नियंत्रक या भूमिकेत राहिली.
दुसरी मारीअन निकोल्सन, फ्लोरेंसची चुलत बहिण, जिच्याबद्दल फ्लोरेंसला प्रचंड आकर्षण होते पण त्याला निकोल्सन कडून कधीही प्रतिसाद मिळाला नाही.
फ्लोरेंस लिहिते, ‘ आयुष्यात कोणावर केलं नसेल इतकं वेड्यासारखं प्रेम मी फक्त एका व्यक्तीवर केलं, ती व्यक्ती म्हणजे निकोल्सन.
३. अॅलन हार्ट –
एनसाय्क्लोपिडीया किंवा विज्ञान पुस्तकांत तुम्हाला अॅलन हार्ट कदाचित सापडणार नाही, परंतु या यादीत त्याचे नाव असणे अनिवार्य आहे. एक प्रशिक्षित आरोग्य तज्ञ आणि संशोधक ही त्याची ठळक ओळख !
युनायटेड स्टेट्स आणि युरोपच्या बऱ्याचशा भागात क्षयरोग धुमाकूळ घालत होता. त्या काळात प्रभावी औषधे उपलब्ध नसल्याने कित्येकांचा या रोगाने बळी घेतला होता.
या रोगाशी आरोग्य तज्ञाच्या भूमिकेतून मुकाबला करणारा म्हणून अॅलन ओळखला जातो. शस्त्रक्रियेने गर्भाशय काढून टाकून उर्वरित आयुष्य एक पुरुष म्हणून जगणारा तो पहिली व्यक्ती होता.
वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर त्याने अॅलन गिल्बर्ट या आपल्या प्रोफेसरकडून मानसोपचार घेतले आणि त्यालाच गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली.
गिल्बर्टच्या म्हणण्यानुसार ही शस्त्रक्रिया म्हणजे त्याच्या आयुष्यातील सकारात्मक बदल ठरली. त्याच्या सारख्या बुद्धिमान मनुष्याला गरजेचा असणारा आत्मविश्वास या बदलाने त्याला बहाल केला.
हार्टने दोनदा लग्न केले, भरपूर कादंबऱ्या लिहिल्या आणि कनेक्टीकट राज्यातील ट्युबरक्यूलोसीस कमिशनच्या हॉस्पिटलायझेशन आणि पुनर्वसन विभागाचा डायरेक्टर म्हणून मरेपर्यंत काम पाहिले.
४. अॅलन टुरिंग –
एल जी बी टी शास्त्रज्ञांच्या इतिहासामध्ये सर्वांना ठाऊक असलेली अतिशय दुःखी अंत असलेली कहाणी म्हणजे अॅलन टुरिंगची कहाणी. सर्व संगणकांचा बेस असलेली टुरिंग मशीन या शास्त्रज्ञाची निर्मिती आहे.
दुसऱ्या महायुद्धात गणितज्ञ मंडळींच्या सहाय्याने त्याने जर्मन सांकेतिक कोडे उलगडले होते. यावर ‘ द इमिटेशन गेम’ ही फिल्म देखील बनली आहे.
अॅलन या यादीतील इतरांच्या मानाने दुर्दैवी ठरला. इंग्लंड मध्ये त्या काळात समलैंगिकता अपराध मानली जाई.
असे असूनही टुरिंगने परुष मित्रांबरोबर असणारे संबंध लपवले नाहीत. परिणामस्वरूप त्याला अपराधी घोषित करून शिक्षा म्हणून हार्मोन्सचे इंजेक्शन दिले ज्यामुळे त्याला नपुंसकत्व आले.
असे म्हणतात की दोन वर्षांनी सायनाईड युक्त मद्य प्रश्न करून त्याने आत्महत्या केली.
५. सॅली राईड –
१८ जून १९८३ रोजी सॅली चॅलेंजर स्पेस शटल मधून अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला ठरली. कॅलीफोर्निया विद्यापीठात कॅलीफोर्निया स्पेस इंस्टीट्युटचे डायरेक्टर पद तिने काही काळ भूषवले.
लहान मुलांना विज्ञान आणि गणिताची गोडी लागावी म्हणून तिने २००१ मध्ये स्वतःची सॅली राईड सायन्स ही कंपनी सुरु केली.
या कंपनीत तिची पार्टनर होती टॅम ओ शॉनेसी. २७ वर्षे सॅली आणि तिचे प्रेमसंबंध होते याची कोणाला फारशी माहिती नाही. सॅलीची बहिण बेअर हिने सॅलीच्या मृत्युनंतर त्यावर प्रथम भाष्य केले.
सॅली पँक्रिअॅटिक कॅन्सरने २०१२ मध्ये मरण पावली. बेअर म्हणते,
‘सॅलीने टॅमबरोबरचे तिचे संबंध कधीही लपवले नाहीत. त्या व्यवसायात भागीदार होत्या, त्यांनी एकत्र मिळून पुस्तके लिहिली, आणि सॅलीच्या जवळच्या मित्र मैत्रीणीना त्यांच्यातील संबंधांची कल्पना होती.
टॅम आमच्यासाठी कुटुंबातील एक सदस्यच होती. सॅलीनंतर आता ती सॅली राईड सायन्स या कंपनीची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.
६. लिओनार्डो द व्हिन्सी-
कलेचे, विद्येचे पुनरुज्जीवन झाल्याच्या कालखंडातील जगप्रसिद्ध चित्रकार. वाल्टर आयझॅकसन याने लिहिलेल्या लिओनार्डोच्या चरित्रात तो समलैंगिक असल्याचा उल्लेख आहे.
विज्ञान आणि कला, दोन्ही क्षेत्रात आपले महत्वपूर्ण योगदान देताना लिओनार्डोने स्वतःच्या भिन्न लैंगिकतेचा खुलेपणाने स्वीकार केला असे तो म्हणतो.
७. सर आयझॅक न्यूटन –
हे नाव आपल्याला नवीन नाही. झाडावरून पडलेल्या सफरचंदामुळे ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याच्याबद्दल आपल्याला तो एक अब्सेंट माइंडेड शास्त्रज्ञ आहे इतकीच मर्यादित माहिती आहे.
सतत आत्मरत असणारा न्यूटन मानसिक दृष्ट्या आजारी असे. तो डायरी लिहून व्यक्त होत नसे, त्याचा पत्रव्यवहार देखील अत्यल्प होता.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूटनवरील एका प्रोजेक्ट अनुसार तो आपल्या शारीरिक भावना दाबून ठेवणारा समलैंगिक होता.
याबद्दल फारसे पुरावे नाहीत, पण ते जर खरे असेल तर तो ज्या वातावरण नि ज्या सामाजिक पार्श्वभूमीमध्ये वाढला त्याचा विचार केल्यास आपली ही बाजू लपवताना त्याला आत्यंतिक मानसिक तणाव झेलावा लागला असणार आहे.
८. बेन बॅरेस –
जगप्रसिद्ध मज्जातंतूविज्ञानविशारद !
माणसाच्या मेंदूची गुंतागुंतीची रचनेच्या रहस्याची उकल याने केली. मेंदू माणसाच्या शरीरावर, हालचालींवर कसे शिस्तबद्ध नियंत्रण करतो याचा अभ्यास या शास्त्रज्ञाने केला.
नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स या प्रतिष्ठित संस्थेचे सभासदत्व प्रथमच त्याला, एका समलैंगिक व्यक्तीला बहाल करण्यात आले. वयाच्या चाळीशीनंतर त्याच्या वाट्याला हा बहुमान आला.
न्यू रिपब्लिक ल २०१४ मध्ये दिलेल्या मुलाखतीत बेन त्याची खंत व्यक्त करताना म्हणाला, ‘ ज्यांना मी गे आहे हे माहित नाही, ते मला आदराने वागवतात’.
बेनला श्रद्धांजली वाहताना त्याच्या कार्याचा आढावा घेताना विद्यापीठाने त्याचा, ‘ न्युरोसायन्स क्षेत्रात त्याने क्रांती आणली’ या शब्दांत त्याचा गौरव केला.
९. सारा बेकर आणि लुईस पिअर्स –
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात दोन्ही अमेरिकन महिलांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. लहान अर्भकांच्या मृत्युच्या प्रमाणासंदर्भात असणाऱ्या प्रश्नांवर बेकर काम करत होती तर लुईस रॉकफेलर विद्यापीठात रोगनिदानतज्ञ होती.
आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस या भयंकर रोगावर उपचार शोधण्यात तिने आपले ज्ञान, कौशल्य पणाला लावले.
त्या दोघी लेखिका, पटकथालेखिका इडा ए आर विली हिच्यासोबत राहत असत. या तीनही महिला हेटरोडॉक्सी या स्त्रीवादी क्लबच्या सभासद होत्या. या क्लबच्या बहुतांश स्त्रिया लेस्बियन किंवा बायसेक्शुअल होत्या.
हे सर्व वाचले की लक्षात येते की ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात तज्ञ होती. त्यांचे विज्ञान, तंत्रज्ञान, कला, संशोधन या क्षेत्रातील कार्य बहुमोल, अनमोल असे आहे. लैंगिकता म्हणजे संपूर्ण व्यक्ती असते का ?
त्याची बुद्धी,त्याची कामावरील निष्ठा, हे लैंगिकतेपासून वेगळे तपासून पाहिले जाऊ शकत नाही का ?
विकृत आणि अनैसर्गिक समजल्या जाणाऱ्या या मंडळींच्या लैंगिकतेचा त्यांच्या कामावर काही विपरीत परिणाम झाला का? उलट त्यांच्या कार्यामुळे कित्येक सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत झाली आहे.
मग आपण जी लैंगिकता अंगिकारली आहे तीच नैसर्गिक, योग्य, पवित्र हा दृष्टीकोन बदलून लैंगिकता हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे हा विचार रूढ व्हायला हवा, म्हणजे कोणा व्यक्तीला आपली ‘समलैंगिक’ ही ओळख लपवून मन मारून जगावे लागणार नाही. एवढी क्रांती तर आपण सामान्य माणसे करू शकतोच ना?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.