निसर्गसंपन्न भारतातील या स्वर्गासारख्या १२ सुंदर गावांना एकदातरी अवश्य भेट द्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारत हा खेड्यांचा देश आहे. आपल्या बहुतेक सर्व परंपरा, रिती रीवाज खेड्यांत कसोशीने पाळलेल्या आहेत. शहरीकरणाचा वाराही न लागता असेही काही भाग आहेत जिथं सृष्टी सौंदर्याने केलेली उधळण जपून ठेवली आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेला आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. असा निसर्गसंपन्न देश पूर्ण पाहायचा म्हटलं तरी काही वर्षे लागतील!
पण भारतात काही गावे अशी आहेत जी आपल्याला निसर्ग संपन्नतेची परमावधी काय असते हे अनुभवू देतात. या गावांमध्ये पर्यटन करणे ही एक पर्वणीच असते.
ट्रीप ठरवली तर मोजक्याच ठिकाणी आपण जातो.. ती ठिकाणं लोकप्रिय असतात आणि मग सगळेच लोक तिकडे जातात आणि आपण बदल म्हणून गर्दी टाळण्यासाठी गेलेलो असतो तिथं गर्दीचाच एक भाग बनून जातो.
आणि ट्रीपची मजा मिळत नाही.
ट्रीप ठरवता आहात? जर तुम्हाला असं हटके काही पहायचं आहे तर हा लेख वाचा…आणि तिथलं निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या!!!
१. कासोल
हिमाचल प्रदेश हे राज्य देवभूमी समजले जाते. खळाळत्या पाण्याचे छोटे मोठे प्रवाह, गर्द हिरवी वनराई, प्रदूषणाचा अभाव आणि हिमालयाच्या कुशीत साद देणारी हिमशिखरे यांचं पर्यटकांना आकर्षण न वाटलं तरच नवल!!!
तरुण तरुणींना ट्रेकिंग करायला पर्वणी, नितळ आरस्पानी निसर्गाचा आविष्कार म्हणजे कसोल.. उत्तर भारताचं हे प्रवेशद्वारच आहे.दिल्लीहून एका रात्रीचा प्रवास करुन आपण कसोलला पोहोचतो.
कितीतरी लोक हौसेने या छोट्याशा गावात येतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भागात तरुण तरुणी निव्वळ ट्रेकींगची हौस भागवायला म्हणून आवर्जून येतात. नक्की जा आणि पहा….
जाण्यासाठी योग्य काळ- एप्रिल ते आॅक्टोबर.
२. डिस्कीट- लडाख-
डिस्कीट हे गांव लडाखच्या दुर्गम भागात आहे. पण तरीही या गांवाला भेट द्यावीच. या गावातील घरांचे, मठांचे बांधकाम १४ व्या शतकातील आहे.

याच गावात भगवान बुद्धाचा पुतळा आहे. ज्यांनी या गावाला आशीर्वाद दिला अशी मान्यता आहे. या गावाला आजूबाजूच्या पर्वतांची धीरगंभीरता आणि नर्बा दरीची अश्वासक शांतता यांचे वरदान आहे.
छोटीशी ट्रीप तुमची पक्षीनिरीक्षणाची हौसही पूर्ण करु शकते.
जाण्यासाठी योग्य काळ- जून ते सप्टेंबर
३. लैंडोर, उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये असलेल्या लैंडोर या गावाला निसर्ग सौंदर्याचा ठेवा तर आहेच शिवाय प्रसिध्द लेखक रस्कीन बाॅण्ड यांचं घरही तिथं होतं. पर्वतरांगांनी वेढलेले हे गांव बारा महीने उत्तम वातावरणात असते.

त्याचबरोबरीने या गावात पुरातन ब्रिटिश चर्चेसचा ठेवाही आहे. सेंट पॉल चर्च, केलाॅग्ज चर्च, आणि मेथाॅडीस्ट चर्च या चर्चना अवश्य भेट द्या.
याच गावातून ट्रेकिंग साठी कितीतरी रस्ते आहेत जे निसर्गरम्य दरीतून तुम्हाला निसर्गाचा नाद ऐकवत नेतात. रस्कीन बाॅण्ड उन्हाळ्यात इथेच असायचे.. त्यांचं घरही येथे तुम्ही पाहू शकता.
जाण्यासाठी योग्य काळ- आॅक्टोबर ते जून.
४. मलाना ( हिमाचल प्रदेश)
हिमाचल प्रदेशात असलेल्या मलानाला निसर्ग प्रेमींनी आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातील लोक हे अलेक्झांडरच्या सैन्याचे थेट वंशज आहेत.

हे लोक आपल्या परंपरांचे कट्टर पालन करतात. जगातील सर्वात जुनी लोकशाही या गावात आहे. तसेच चालत जाणाऱ्या लोकांसाठी अनेक पदपथ इथे आहेत. चंद्रखणी पास, रशोल पास, आणि मंत्रमुग्ध करणारा जरी फाॅल्स…
जाण्यासाठी योग्य काळ- मार्च ते जून आणि सप्टेंबर व आॅक्टोबर.
५. नाको लाहूल स्पीटी
तिबेटी सीमेवर असलेल्या नाकोचा प्रदेश चंद्रभूमीसारखा आहे. सांस्कृतिक बाबतीतही काही तिबेटी परंपरांचा पगडा इथे आहे. येथील मठ हे अत्यंत प्राचीन काळापासूनचे आहेत.

आणि युनेस्कोच्या जागतिक प्राचीन पारंपरिक स्थळात या मठांचा समावेश आहे.
तेथील दगडी बांधकाम असलेल्या मठात घरात राहून तुम्ही तिबेटी परंपरांचा जवळून अभ्यास करु शकता.
कितीतरी लोक केवळ यासाठीच नाकोला भेट देतात.
जाण्यासाठी योग्य काळ- जुलै ते सप्टेंबर
६. मावलायनौंग
मेघालयात असलेले हे गांव, लपलेल्या माणकासारखे आहे. या गावातील लोक पर्यावरणपूरक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत व्यापकपणे काम करतात. यासाठी त्यांना सरकारने सुध्दा पाठिंबा दिला आहे.
२००३ साली अत्यंत स्वच्छ खेडं हा पुरस्कार या गावाला देण्यात आला आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे जे पूल बांधण्यात आले आहेत ते जिवंत झाडांच्या मुळांपासून बनवले आहेत.
आणि ते बांधत असताना झाडाला कसलाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाते.
जाण्यासाठी योग्य काळ- आॅक्टोबर ते एप्रिल
७. माजूली (आसाम)
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर असलेले गाव आणि जगातील सर्वात मोठे बेट अशी या माजूलीची ओळख आहे. ४०० स्क्वेअर किलोमीटर पसरलेला हा भूभाग अतिशय प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो.

येथील पर्यटन केवळ नावेच्या सहाय्याने केले जाते. इथे असलेले कोळी लोक सर्वसामान्य माणसांपेक्षा कितीतरी जास्त वेळ पाण्यात श्वास रोखून राहू शकतात.
आसामी संस्कृती आणि हा नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी देशोदेशीचे पर्यटक येथे येतात. येथील नौका पर्यटन आणि वस्तूसंग्रहालय बघण्यासारखे आहे.
जाण्यासाठी योग्य काळ-ऑक्टोबर ते एप्रिल
८. मांडवा ( राजस्थान)
मांडवा हे शहर १८ व्या शतकात एका श्रीमंत व्यापाऱ्याने वसवले आहे. येथील शाही थाटात असलेल्या जीवनशैलीचा समावेश प्रत्येक महालात केला जातो.

या साऱ्याचा ऐतिहासिक वारसा मांडवाला लाभला आहे. दिमाखदार मोठमोठ्या महालांचे आणि भित्तीचित्रांचे फोटो काढून पर्यटक आनंदी होतात.
बाजारात असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करुन आठवण म्हणून घरी नेता येतात.
त्याचबरोबर येथील लोक ज्या पारंपरिक राजस्थानी पदार्थांची रेलचेल करतात ते खरोखरच उत्तम स्वादाचे असतात. तुमची जीभ तृप्त होऊन जाते.
जाण्यासाठी योग्य काळ-आॅक्टोबर ते मार्च
९. झिरो व्हॅली ( अरुणाचल प्रदेश)
हा अरुणाचलातील अस्वस्थ भाग. आणि थोडा वेगळा असा पर्यटन भाग. पाईनच्या झाडांनी आणि हिमाच्छादीत पर्वतरांगांमध्ये लपलेले हे गांव.

अतिशय दुर्मिळ प्रजातींचे कीटक येथे सापडतात. भातशेतीतून चालत जाणे किंवा आपतानी पध्दतीने शरीरावर गोंदण काढणे असे वेगवेगळे प्रकार पर्यटक आवडीने करतात.
हृदयाच्या जवळ पोचणारे संगीत हे ही इथले वैशिष्ट्य. त्यासाठी आयोजित करण्यात येणारा झिरो व्हॅली फेस्टीव्हल तुमच्या हृदयाच्या तारा छेडतो.
जाण्यासाठी योग्य काळ- मार्च ते आॅक्टोबर.
१०. गोकर्ण महाबळेश्वर ( कर्नाटक)
कर्नाटक गोवा सीमेवर असलेल्या या गावाला एक पौराणिक कथेचा इतिहास आहे. रावणाकडून फसवून गणपतीने शंकराचे आत्मलिंग इथेच ठेवले होते त्यामुळे येथे यात्रेकरु आणि पर्यटक सर्वांची वर्दळ असते.
निसर्गरम्य स्थळ म्हणून याचा लौकिक आहेच पण हे धार्मिक स्थळही आहे.
जाण्यासाठी योग्य काळ- जून ते ऑगस्ट
११. पूवार (केरळ)
त्रिवेंद्रम पासून ३० किमी अंतरावर असलेले हे गांव आजही शहरीकरणाच्या रेट्यात सापडले नाही. आणि लोकांना विशेष माहिती उपलब्ध नसलेले हे गांव आहे.

अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर असलेलं हे गांव तुम्ही हाऊसबोटीतून आरामात पाहू शकता. बॅकवॉटर मध्ये पूवारच्या परिसरात तुम्ही मस्त राईड करु शकता. भद्रकाली मंदिर याच गावात आहे.
जाण्यासाठी योग्य काळ- ऑक्टोबर ते मार्च
१२. खिमसर ( राजस्थान)

राजस्थानच्या मधोमध असलेलं हे गांव थरच्या वाळवंटाने वेढलेले आहे. रजपूत संस्कृतीचा वारसा सांगणारे हे गांव सौंदर्याचा उत्तम नमुना आहे. वाळवंटात तुम्ही जीप किंवा उंटावरुन सफारीचा आनंद लुटू शकता.
जाण्यासाठी योग्य काळ-आॅक्टोबर ते मार्च.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.