Site icon InMarathi

उत्तराखंडच्या जलप्रलयात शेकडोंना वाचवणाऱ्या तिच्या शौर्याची कथा अंगावर काटा आणेल!

uttarakhand featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

ममता रावत… हे नांव ऐकलं आहे का?एका सर्वसामान्य मुलीनं केलेल्या पराक्रमाची ही कथा. या कथेची नायिका आहे ममता रावत. २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या पुराच्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये लोकांना वाचवण्याचं काम या तरुणीने केलं आहे.

आज तिची प्रेरणादायी कहाणी पाहूया.

देवभूमी.. उत्तराखंड…अशी ओळख असलेला भारतातील हा भूभाग किती धोकादायक आहे!! हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगा मधील हा भाग..

 

Wikipedia

या भागाने आपल्या धोकादायकतेची प्रचिती वारंवार कोसळणाऱ्या दरडी, पाऊस, थंडी यांनी दिली आहे. लोक चारधाम यात्रा करुन पुण्य प्राप्त करण्यासाठी या भागात येतात. ही यात्रा हिंदू धर्मात किती महत्त्वाची आहे.

गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. एका बाजूला उंचच उंच पहाड आणि दुसरीकडे खळाळ वाहणारी नदी आणि मध्ये एका वेळी एकच गाडी जाऊ शकेल असा अरुंद रस्ता.

अशा प्रवासात अचानक एखादं आसमानी संकट आलं तर काय होईल? हा अनुभव याची देही याची डोळा घेतलेले लोक तुमच्या आसपास असतील तर त्यांना विचारा..

तिकडे असलेली भयंकर थंडी, भयंकर कोसळणारा पाऊस, अन्न पदार्थांचा तुटवडा..कोसळणाऱ्या पावसात जीव वाचेल ना? घरी परत तरी जाऊ शकू का? असा विचार करत हतबल होऊन फक्त पहात राहणं किती भयंकर असते.

पण अशाही परिस्थितीत काही माणसं देवदूत बनून येतात नी जीवाची पर्वा न करता आपल्याला जीवदान देतात. आपण सुखरूप घरी पोहोचतो. त्याचं श्रेय त्या देवदूताचंच. त्या प्रसंगात माणुसकीचा झरा बाळगून अन्न देणाऱ्या माणसांचं!!!

 

Scroll.in

आपत्ती येते आणि आपली आपल्याला नव्यानं ओळख करुन देते. आपल्यालाही माहीत नसलेले आपले गुण आपल्याला, आजूबाजूला असणाऱ्या लोकांना कळतात. कधीकधी त्या आपत्तीमुळे माणूस सोन्यासारखी झळाळी प्राप्त करतो.

पैसा नाही मिळाला तरी समाधान इतकं मोठं असतं … ममता रावत ची कहाणी अशाच सोन्याच्या झळाळीची आहे!!!!

१६ जून २०१३ या दिवशी उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली. या प्रचंड पावसामुळे कित्येक लोकांची घरं वाहून गेली. कितीतरी प्रवासी अडकले. कुणी वाहून गेले. पण त्याचवेळी बांकोली गावात राहणाऱ्या ममता रावत या तरुणीने आपल्या नावाला साजेसं काम केलं.

पुराशी झुंजणाऱ्या कितीतरी मुलांना, प्रवाशांना बोटाला धरून वाचवलं. एक अगदी साधारण प्रकृतीची तरुणी लोकांना पुरातून वाचवते..आश्चर्य वाटतं ना? पण हे घडलंय. चारधाम यात्रा आपल्या हिंदू धर्मात किती महत्त्वाची मानली जाते.

 

Prasar Bharati Parivar

याच यात्रेसाठी आलेल्या प्रवाशांना कल्पना तरी असेल का, की हीच यात्रा त्यांच्या स्वर्गारोहणाचा रस्ता ठरेल?

अचानक झालेल्या ढगफुटीने उत्तरकाशी आणि गंगोत्रीकडे पोचलेल्या प्रवाशांना या पावसामुळे अतिशय कठिण परिस्थिती निर्माण होऊन अडकून पडावं लागलं.

ममताकडे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असल्याचा ना गणवेश होता, ना बॅज, पण तरीही तिनं खूप लोकांचे प्राण वाचवले. ती म्हणते, मी उत्तरकाशीत राहते,अशा परिस्थितीत कसं सावरायचं याचं मला ज्ञान आहे.

त्याचा उपयोग करुन लोकांना मदत करायलाच हवी. ती मी नाही तर कोण करेल? मग माझ्या त्या ज्ञानाचा उपयोग काय?

ममता रावत ही INME या दिल्लीस्थित साहसी क्रीडा कंपनीत काम करत होती. ती पगारी कर्मचारी नव्हती. पण या साहसी खेळात सहभागी होण्यासाठी जे विद्यार्थी आले होते त्यांना तिनं सुरक्षित ठिकाणी पोचवलं.

रोंरावत वाहणारी गंगा, खचलेल्या जमिनीमुळं भू-स्खलनाचा धोका , पूलही वाहून जायच्या घाईला आलेला अशा परिस्थितीमध्ये ममताने त्या मुलांना हाताला धरुन उत्तरकाशी येथे सुरक्षित ठिकाणी आणलं.

त्यांना उत्तरकाशी ते डेहराडून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत आपल्याकडेच ठेवून घेतलं. नंतर त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केलं. उत्तरकाशी ते गंगोत्री हा रस्ताही पार धुऊन निघाला होता.

 

bbc.co.uk

तिथं अडकलेल्या भाविकांना मदत करणं गरजेचं होतं. या मुलांना सुरक्षित ठिकाणी आणल्यानंतर ती त्या प्रवाशांना मदत करायला तयार होऊन निघाली.

नेहरु गिर्यारोहण संस्थेतर्फे तिनं काम चालू केलं. एका प्रवासी स्त्रीला पाठीवर घेऊन तीन किलोमीटर चालत तिने हेलिकॉप्टरपर्यंत पोचवले व तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवले.

हीच ती मुलगी… जिचं स्वतःच्या घराचं छप्पर मोडलं होतं पण तरीही तिनं लोकांना प्राण वाचवून त्याच छपराखाली आसरा दिला. त्या पुरानं तिच्या घराचा धुव्वा उडवून दिला.

 

The Better India

पण तरीही ती आजही तिथं राहते. त्या मोडक्या छपराखाली!!!

तिला विचारलं की तुला काय हवं? तर तिनं सांगितलं जे करायचं ते माझ्या गावासाठी करा. केबल कार, रोप वे, याची गरज गावाला आहे. नदी ओलांडायला!!!

कारण जुने पूल पुरात वाहून गेले आहेत.  घरच्या परिस्थितीमुळे ममताला शाळा सोडून द्यावी लागली होती.तिला गिर्यारोहण तंत्राची माहिती करुन घ्यायची होती. पण पैशाअभावी ते जमेना.

मग दोन वर्षं ती थांबली. काम करुन तिने पाच हजार रुपये साठवले आणि ते ट्रेनिंग पूर्ण केलं. नंतर तिनं रेस्क्यू आॅपरेशनचा अॅडव्हान्स्ड कोर्सही केला. तोच कोर्स या पूरजन्य परिस्थितीत कामी आला.

तिने लोकांचे प्राण वाचवले होते आणि बदल्यात कसलीही अपेक्षा न ठेवता.

 

BBC

ममता सांगते, माझं घर मोडकळीला आलं म्हणून मी सरकारी कचेरीत तक्रार दाखल केली. पण त्यांचा प्रतिसाद नाही मिळाला.

फार पाठपुरावा केला तेंव्हा सांगितलं गेलं की पाहणीसाठी आमचे अधिकारी येतील पण कुणीच आलं नाही आणि आजतागायत मला नुकसानभरपाई सुध्दा मिळाली नाही.

असं का होतं आपल्याकडे? ही दप्तरदिरंगाई माणसाच्या जीवावर बेते पर्यंत वाट पहात राहते. पण तरीही चांगूलपणा असणारी माणसं चांगली वागत राहतात.‌ममता हेच दाखवून देते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version