आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
जंटलमन्स गेम अशी ख्याती असलेल्या क्रिकेटवेड्या लोकांना चांगलेच तापवले आहे.
पूर्वी एक दिवसीय आणि कसोटी सामना इतकीच मर्यादीत व्याप्ती असणाऱ्या या खेळाने आता टी ट्वेंटी हा नवा पायंडा पाडला आहे आणि चांगलाच यशस्वी होऊन विविधतेत एकता हा नवा आयाम जगाला दिला आहे.
तरीही विश्वचषक स्पर्धा आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. दर चार वर्षांनी भरणारी ही स्पर्धा क्रिकेट प्रेमी लोकांसाठी पर्वणी आहे.
विविध देशांतील संघ अटीतटीची स्पर्धा खेळत एकेक फेरी पार करत अंतिम फेरीत दाखल होतात आणि विश्वचषक जिंकतो तो देश ही गोष्ट अभिमानाने वर्षानुवर्षे मिरवतो.
आजवर सर्वाधिक वेळा हा चषक आॅस्ट्रेलियाने जिंकला आहे. भारताने पहील्यांदाच १९८३ मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
तो क्षण आजही लोक विसरलेले नाहीत. कपिलदेव हा आजही ती मॅच आठवतो तसेच प्रेक्षकही!!!!
कपिलदेव, विव्हियन रिचर्ड्स, इम्रान खान, अर्जुन रणतुंगा हे मास्टर्स आहेत. ज्यांचा सुंदर आणि शास्त्रशुध्द आणि तंत्रपूर्ण खेळ पाहून लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं आहे पण त्यांच्या गप्पासुद्धा लोकांना आवडतील…
त्या दरम्यान झालेल्या मॅचेसमध्ये घडलेले किस्से, आपल्याला माहीत नसलेले संदर्भ यासाठी ESPN ने विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने एक छोटा प्रचाराचा कार्यक्रम ठेवला होता.
यामध्ये या दिग्गजांच्या अनौपचारिक गप्पा आयोजित केलेल्या होत्या. त्यात विव्हियन रिचर्ड्स यांचा कपिलदेव यांनी पकडलेला झेल, जो भारत विजयी होण्यासाठी कामी आला होता..
इम्रान खान यांनी सांगितलेले जावेद मियांदादचे गुदगुल्या करून हसवणारे किस्से, या सर्वांचा समावेश होता.
कपिलने घेतलेला कॅच-
१९८३ साली भारत आणि वेस्ट इंडिज अंतिम सामन्यात पोचले. सर्वांना धाकधूक होतीच.
या सामन्याच्या दरम्यान सर विव्हीयन रिचर्ड्स यांचा कपिलदेव यांनी घेतलेला कॅच हा ऐतिहासिक क्षण ठरला होता. नी त्यामुळं भारताचा विजय सुकर झाला होता.
कप्तान असलेले कपिलदेव मिड विकेट ला क्षेत्ररक्षक म्हणून थांबले होते. विव्हियन रिचर्ड्स फलंदाजी करत होते.
मदनलाल नी चेंडू टाकला. विव्हियन नी टोलावला आणि काही यार्डाचे अंतर अत्यंत वेगाने धावत जाऊन कपिलदेव यांनी खांद्यावर तो चेंडू पकडला होता. त्यावेळी १८४ धावांचं लक्ष अगदी हाताशी आलेला वेस्ट इंडिज चा संघ..
विव्हियन रिचर्ड्स सारखा आक्रमक खेळाडू ज्यानं २७ बाॅलमध्ये ३३ धावा काढल्या होत्या…वेस्ट इंडिजने २ विकेट गमावत ५७ धावा केल्या होत्या. रिचर्ड्सचा खेळच आक्रमकतेने भरलेला होता. मदनलालनी बाॅल टाकला.. आणि अतिशय वेगाने पुढे गेला तो चेंडू…
थेट मिड विकेटला उभ्या असलेल्या कपिलदेवनी त्याच वेगाने पाठीमागे पळत तो पकडला…
रिचर्ड्स कॅच आऊट झाल्यानंतर वेस्ट इंडिजला पुढचा डाव सावरताच आलं नाही. पुढं वेगाने भारतीय संघ विजयाकडे दौडत गेला. पुढे ८३ धावातच वेस्ट इंडिजने आपल्या आठ विकेट गमावत भारतीय संघाला जिंकण्याचा रस्ता दाखवला.
भारताने विश्वचषक जिंकला. तो ऐतिहासिक क्षण आजही कितीतरी जणांच्या मनात ताजा आहे.
विव्हियन रिचर्ड्स सांगतात,
“मी बाॅल टोलवला….आणि कपिल तिथं कुठून आला तेच मला समजलं नाही. तो जरा वेगाने उलटा धावत होता, ते पाहून मी ओळखलं आता आपण आऊट!!! संपला आपला खेळ!!!”
कपिलदेवनी सांगितलं,
“विव्ह आमच्यासमोर असताना आम्ही त्या कॅचचा विचार करत नव्हतो पण ती ओव्हर मड्डीपा (मदनलाल यांना क्रिकेटपटू या नावाने बोलावतात.) यांना दिली हेच या विजयाचं कारण.
अक्षरशः मदनलालनी माझ्या हातातून चेंडू हिसकावून घेतला होता आणि ती ओव्हर खेळायला घेतली.
एखाद्याला तसा जबरदस्त आत्मविश्वास असेल तर खरंच ते करावं. त्याला करु द्यावं….हे समजलं यातून. पण विव्हनी तो बाॅल टोलवला आणि माझा जीव गोळा झाला.. यशपाल तिकडून येत होता मी त्याला सांगितलं थांब…मी झेलला…बस्स!!! विकेट पडली”
इम्रान खान, रणतुंगा, कपिलदेव हे मोकळेपणाने व्यक्त होत होते. त्यांनी सांगितलं विव्हियन रिचर्ड्स हा त्या काळातील सर्वात आक्रमक आणि घातक खेळाडू होता.
आक्रमकतेने फलंदाजी करत गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवणं हे विव्हना डाव्या हातचा मळ होतं. इम्रान खान म्हणतात,
“मी जेंव्हा बाॅल टाकायला सुरुवात करत होतो तेंव्हा बॅट्समनकडं एक धारदार कटाक्ष टाकायचो. तो एक मानसिक दबाव तंत्राचा भाग होता. पण विव्हियन रिचर्ड्सपुढे हे दबाव तंत्र काम करायचं नाही. विव्ह पण नजरेला नजर भिडवून मी तुला भीत नाही असं दाखवायचा..”
या चौघांनी एका गोष्टीवर एकमत सांगितलं.. चौघेही एकेकाळी संघाचे कप्तान होते. आपल्या सहकाऱ्यांना आदराची वागणूक दिली पाहिजे यावर चौघांचं एकमत आहे.
आणि तुम्ही कप्तान म्हणून काम करत असताना सुरुवातीपासूनच आघाडीवर रहावं त्यामुळे सहकारी सुध्दा तुमचा आदर राखतात.
जावेद मियांदादबद्दल इम्रान खान म्हणतात,
“तो अठरा वर्षांचा असताना जसा होता तसाच अजूनही आहे. विकासाच्या प्रक्रियेनं त्याला बाजूला केला आहे..पण तो लढवय्या आहे. कितीही दबावाखाली खेळ आला तरी तो त्याचं कसब पणाला लावून दबावाखाली न येता खेळायचा.”
एकेकाळी एकमेकांना विरुद्ध संघाचे प्रतिस्पर्धी कप्तान म्हणून खेळलेले हे खेळाडू त्या ऐतिहासिक विजयाच्या क्षणाबाबत मोकळेपणाने बोलतात, एकमेकांच्या उत्तम कामाचं कौतुक करताना आपल्यातील त्रुटींवर मोकळेपणाने व्यक्त होतात.
या बेभरवशाच्या खेळात सहभागी होऊनही एकमेकांविषयी कटूता ठेवत नाहीत..दिलदारपणा दाखवतात हेच त्यांच्या ठिकाणी असलेल्या खिलाडूवृत्तीचं द्योतक आहे.
आजही १९८३ साली जिंकलेला विश्वचषक या सगळ्या खेळाडूंना त्या दिवसांतला आनंद देतो.
आपली सद्दी संपली आहे म्हणून हे कुरकुरत नाहीत. नव्या नियमांना, नव्या पिढीतील खेळाडूंना नावं ठेवत नाहीत. उलट आनंदाने साऱ्या गोष्टींची चर्चा करतात हे आपणही लक्षात घेऊन खेळापुरता खेळ हे बघावं… नाही का?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.