आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
माणूस जगण्यासाठी, चरितार्थ चालविण्यासाठी काहीतरी उद्योग-धंदे शोधत असतो. काही लोक सुरुवातीलाच यशस्वी होतात, तर काहींना त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.
माणूस यशस्वी होण्यासाठी सतत धडपडत असतो, पण त्याला कधी संधी मिळेल किंवा त्याचे नशीब कधी उजळेल सांगता येत नाही.
कदाचित आपण जो व्यवसाय करत असतो त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याच गोष्टीत एकदम आवड निर्माण होऊन त्यात यश मिळत जाते आणि कधी कधी ते इतके मिळते की आपण आपला पहिला व्यवसाय विसरून जातो.
कधी कधी माणसाला स्वत:च्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी दुसरेच एखादे काम करावे लागते व त्याच्यातून मिळालेल्या फायद्यातून आवडीच्या व्यवसायात गुंतवणूक करावी लागते.
आज आपण अशाच एका यशस्वी माणसाची माहिती घेऊ, जो एकेकाळी दारोदारी जाऊन व्हॅक्युम क्लीनर विकत होता, पण आता त्याच्या नावावर सर्वांत जास्त ऑस्कर पुरस्कार आहेत.
मंडळी, ऑस्कर पुरस्कार ही काही साधीसुधी गोष्ट आहे का? पाहू तरी ही व्यक्ती कोण होती ते?
वॉल्ट डिस्ने या माणसाने सर्वांत जास्त ऑस्कर पुरस्कार मिळवले. ५ डिसेंबर १९०१ रोजी वॉल्ट डिस्ने यांचा शिकागो येथे जन्म झाला. ती पाच भावंडं होती, त्यात त्यांचा नंबर चौथा होता.
जेव्हा ते चार वर्षांचे होते तेव्हा त्यांचे कुटुंब मर्सिलीन, मिसौरी येथील एका शेतात राहायला गेले.
तिथे शेजारी एक रिटायर्ड डॉक्टर आणि त्यांची पत्नी राहात होते. यांच्यामुळे प्रथमच डिस्नेमधील चित्रपटाच्या वाढत्या रुचीला प्रोत्साहन मिळाले.
परंतु डिस्नेच्या वडिलांना तेथे फार काळ राहणे शक्य झाले नाही म्हणून त्यांनी १९१० मध्ये ते शेत विकले आणि त्यांचे कुटुंब कानस शहरात राहू लागले.
तिथे डिस्नेच्या वडिलांनी वृत्तपत्राचा व्यवसाय सुरू केला आणि पुढच्या सहा वर्षांसाठी वॉल्टने शाळा सुटल्यावर किंवा शाळा भरायच्या आधी आणि सुट्टीच्या दिवशी वडिलांना वितरणात मदत केली.
१९१७ मध्ये वडिलांनी परत तो व्यवसाय बंद करून कुटुंब परत शिकागोला हलवले. तिथे त्यांनी एका जेली आणि फ्रूट ज्यूस कंपनीत नोकरी केली.
वॉल्टने वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडली. त्याचं शाळेत फारसं लक्ष नव्हतं, पण तो सतत चित्र मात्र काढत असे.
जेव्हा युनायटेड स्टेट्स पहिले महायुद्ध लढत होते तेव्हा तो रेडक्रॉस ऍम्ब्युलन्स कॉर्प्सच्या संपर्कात आला. परंतु कॉर्प्ससोबत काम करण्यासाठी किमान १७ वर्षं पूर्ण असावे अशी अट होती, परंतु बनावट सर्टिफिकेटच्या साहाय्याने त्याने रेड क्रॉस जॉईन केले.
१९१८ च्या अखेरीस युद्धबंदीवर स्वाक्षरी झाल्यामुळे त्यांना फ्रान्सला पाठविण्यात आले.
नंतर १९१९ मध्ये त्यांनी तो जॉब सोडला. रेडक्रॉस सोडल्यानंतर त्यांनी वृत्तपत्रामधील कार्टुनिस्ट व्हायचे ठरविले आणि तो कानस शहरात आला. तिथे त्यांना मासिकात आणि चित्रपटात जाहिराती करण्याचे काम मिळाले आणि त्याला ऍनिमेशनमध्ये मध्ये आवड निर्माण झाली.
१९२२ साली त्याने एक स्टुडिओ चालू केला त्याचे नाव होते ‘लाफ-ओ- ग्राम’, पण त्यामध्ये तोटा झाल्यामुळे तो १९२३ साली बंद झाला.
त्याच वर्षी ते हॉलिवूडमध्ये स्थायिक झाले आणि त्यांचा मोठा बंधू रॉय याच्यासह डिस्नी ब्रदर्स स्टुडिओची स्थापना केली. खरे तर त्यांचे मोठे बंधू रॉय दारोदारी जाऊन व्हॅक्युम क्लीनर विकत होते आणि वॉल्टने पण आपल्याबरोबर तेच काम करावे अशी त्यांची इच्छा होती.
वॉल्टने त्यांच्या इच्छेखातर थोडे दिवस ते काम केले, पण त्यात त्यांचे मन रमले नाही. कसे रमणार? त्या गोष्टीची त्यांना आवडच नव्हती. दुसऱ्या ध्येयाने त्यांना झपाटले होते.
मग त्यांनी आपल्या डिस्नी स्टुडिओत छोट्या छोट्या फिल्म आणि वेगवेगळे ऍनिमेटेड कार्टून तयार केले.
१९२७ मध्ये त्यांनी Oswald the Lucky Rabbit नावाचे कार्टून तयार केले, जे खूप गाजले. त्याच्यात त्यांना आर्थिक फायदा सुद्धा झाला.
१९२८ साली डिस्नेने या कार्टूनवरील आपले अधिकार गमावले. त्यामुळे कंपनीच्या कामगारांना पगार देऊ शकला नाही आणि तो कार्पोरेट वादात अडकला.
जवळपास सर्व संपत्ती त्याने गमावली असे वाटत असतानाच त्याने एका कार्टूनची निर्मिती केली. डिस्नीने एक पात्र चित्रित केले ते म्हणजेच आपले सर्वांचे लाडके मिकी माऊस.
१९२८ मध्ये वॉल्टने एक शॉर्ट फिल्म केली त्याचे नाव होते ‘स्टीमबोट विली’.
ती पहिली कार्टून फिल्म होती ज्याला सिन्क्रोनाईज साऊंड इफेक्ट होते. यातील उंदीर लोकांना खूपच आवडला आणि उंदीर स्टार झाला आणि मुले मिकी माऊसची फॅन झाली. लहान मुलांसाठी मिकी माऊस क्लब तयार झाले, कॉमिक बुक प्रसिद्ध झाली.
१९२९ मध्ये मिकी पहिल्यांदा ‘द कार्निव्हल कीड’ या चित्रपटात पहिल्यांदा बोलला.
त्यात त्याच्या तोंडी शब्द होते ‘हॉट डॉग, हॉट डॉग’ पण वॉल्टला तो आवाज अजिबात आवडला नाही म्हणून वॉल्ट मिकीला दुसरा कोणता आवाज द्यावा यासाठी जरा चिंतेत होते.
शेवटी त्यांनी स्वत:चा आवाज मिकीला दिला आणि १९४७ पर्यंत ते तो देत राहिले. नंतर मात्र आपण बिझी आहोत आता आवाज देऊ शकणार नाही असे सांगितले.
नंतर त्याने सर्व लक्ष दिग्दर्शन, ऍनिमेशन आणि कथा यावर लक्ष केंद्रित केले. त्याने चित्र काढण्यासाठी काही चित्रकार ठेवले होते.
त्याने मिकी कधीही चित्रपटात किंवा ऍनिमेशनमध्ये वापरले नाही तर जेव्हा लोक त्याची सही घेण्यासाठी येत तेव्हा त्यांनी विनंती केली तरच मिकी काढत असे.
नंतरच्या काळात त्याने सरकारसाठी प्रचार फिल्म काढल्या. वॉल्ट डिस्नेला रेल्वेची फार आवड होती. कॅलिफोर्नियाच्या त्याच्या घरी एक छोटी रेल्वे होती त्याच्यात लोकांना बसवून तो फिरवत असे.
त्याच्या घरात नोकर-चाकर होते तरीही मुलींना शाळेत सोडण्यासाठी तो स्वत: जात असे. तर असे हे वॉल्ट डिस्ने हुशार तितकेच कष्टाळूही होते.
वॉल्ट डिस्ने यांच्याबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते फिल्म इंडस्ट्रीतील अशी व्यक्ती आहेत की ज्यांनी सर्वांत जास्त ऑस्कर पुरस्कार मिळवले आहे.
ऑस्कर पुरस्कार हा फिल्म इंडस्ट्रीतील खूपच महत्त्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. ज्यासाठी नुसते नामांकन झाले तरी लोक खूष होतात. बक्षीस मिळाले नाही तरी नुसते नामांकन होणे सुद्धा खूप कठीण काम असते.
फिल्म इंडस्ट्रीतील चांगले कलाकार आणि चांगले तंत्रज्ञ यांना हा पुरस्कार देण्यात येतो.
तर वॉल्ट डिस्नेंना २२ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहे. तर ५९ पुरस्कारांसाठी त्यांचे नामांकन झालेले आहे. हैं ना बडी बात… १९३२ मध्ये त्यांनी ‘फुलर्स अँड ट्रीज’ साठी सर्वोत्कृष्ट लघू विषयातील (कार्टून) पुरस्कार त्यांना मिळाला.
त्यानंतर पुढील सात ऑस्कर समारंभामध्ये डिस्नेने तोच पुरस्कार जिंकला. १९६४ मध्ये ‘मेरी पॉपिन्स’ साठी नामांकन झाले, पण पुरस्कार नाही मिळाला.
मिकी माऊस तयार करण्यासाठी डिस्नेंना १९३२ मध्ये चार ऑस्कर पुरस्कार मिळाले. १९३९ मध्ये ‘स्नो व्हाईट आणि सेव्हन ड्वाफ्स’ यासाठी पुरस्कार.
१९४२ मध्ये ‘फटासिया’ साठी ध्वनी योगदान म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला.
तर मंडळी आहे ना प्रेरणादायी गोष्ट. छोटी-मोठी कामे करणारे वॉल्ट डिस्ने यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात काम केले.
नुसते केले नाही तर त्यांनी त्यात फार मोठे योगदान दिले आणि खूप सारे पुरस्कार पण मिळवले. जर ते व्हॅक्युम क्लीनर विकत राहिले असते तर आपण आपले लाडके ‘मिकी माऊस’ कधीच पाहू शकलो नसतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.