या पत्रकार जोडप्याने नुकतीच जन्मलेली मुलगी दत्तक घेऊन माणुसकीवर विश्वास ठेवायला भाग पाडलंय
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
मुलगी जन्माला आली म्हटलं की आजही किती लोक खुश होतात? दुसरी मुलगी झाली म्हणून तिचा गळा घोटणाऱ्या, उकीरड्यावर टाकून देणाऱ्या, दवाखान्यात सोडून पळून जाणाऱ्या आयांच्या बातम्या पेपरमध्ये येतात. जीव गलबलतो.
एखाद्या मॅटर्निटी होममध्ये जा नी पहा, दुसरी मुलगी झाली की चेहरा पाडून बसलेल्या आया, आज्या दिसतात.
अजूनही किती लोक या खेपेला मुलगा झाला नाही तर घरी घेणार नाही म्हणून बायकोला धमकी देऊन माहेरी बाळंतपणाला पाठवणारे महाभाग आहेत.
इतकंच नव्हे तर नको असताना मुलगी झाली म्हणून तिचं नांव नकुशी ठेवून तिच्या नको असण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आघाडीवर असतात त्याही बायकाच.
गर्भात मुलगी आहे हे समजताच गर्भपात करुन तिचं जगात येणं अडवतात त्याही बायकाच. या सर्व गोष्टींचा परिणाम झाला तो म्हणजे मुलींचा जन्मदर कमी झाला.
सगळ्यांनाच मुलगा हवा. मुलगी कुणालाही नको. हजार मुलांमागे आठशे मुली.. दोनशे मुलांना बायको, बहीण आहेच कुठे?
हा सारासार विचार करून लोकांमध्ये जागृती अभियान चालविले. बेटी बचाव अभियान राबविण्यात आले आहे. मुलींच्या जन्माचा टक्का थोडा वाढला आहे.
कितीतरी डॉक्टरांनी मुलगी झाल्यावर प्रसूतीच्या बिलाची रक्कम माफ केली. एका मुलीवर थांबलेल्या, दोन मुलींवर आॅपरेशन केलेल्या पालकांचे जाहीर सत्कार करण्यात आले. याचा कितीतरी सकारात्मक प्रतिसाद म्हणून मुलींचा जन्मदर वाढला आहे.
सोशल मीडिया वर सुध्दा विविध प्रकारच्या पध्दतीने सामाजिक अभियानात सामील लोक आपल्या कामाचा बोभाटा करताना दिसतात…
अशावेळी, जेंव्हा मानवी भाव भावनांचा कोळसा झालाय की काय असंच काहीसं वाटत असताना एखादी सुखद झुळूक येते आणि पुन्हा एकदा माणुसकीचा झरा वाहतो आहे यावर विश्वास ठेवायला भाग पाडते.
ही गोष्ट आहे राजस्थान येथील नागपूर येथे घडलेली. उकीरड्याच्या ढिगावर एक नवजात मुलगी कुणीतरी टाकून दिली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
चित्रपट निर्माते आणि पत्रकार श्री. विनोद कापरी आणि एका वृत्तवाहिनीवर बातमीदार असलेल्या त्यांची पत्नी साक्षी जोशी यांनी हा व्हीडिओ पाहीला आणि त्या नवजात बाळाची चौकशी केली.
त्यांना समजलं की ते बाळ उपचारासाठी जवाहरलाल नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या दोघांनी ठरवलं की, तिची मदत करुया.
विनोद कापरींनी त्या दवाखान्यात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवलेल्या नवजात मुलीचा व्हिडिओ टि्वटरवर पोस्ट केला आणि जाहीर केलं की, ते या मुलीला कायदेशीर रित्या दत्तक घेणार आहेत.
त्याचबरोबर त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले की दत्तक घेण्याची वेळखाऊ कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण कशी करता येईल हे पहावे.
Central Adoption Resource Authority (CARA) यांच्या माध्यमातून ते ती मुलगी दत्तक घेणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी तो व्हिडिओ पाहीला आणि त्या दवाखान्याच्या डाॅक्टरना बोलावून त्या नवजात मुलीला नीट आणि आवश्यक ती सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्याचं आवाहन केलं.
या कृतीमुळे नेटीझन्सनी या दांपत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
विनोद कापरींनी टि्वट केलं आहे की या बाळाच्या रडण्याचा आवाज आपली अंगाई शांत करेल असं एका प्रतिक्रियेमध्ये एका नेटिझन्सनी दिली आहे.
नेटिझन्सनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे, विनोद कापरींनी केलेली ही कृती माणुसकीच्या नात्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा असं वाटायला लावणारी एक संवेदनशील झुळूक आहे.
उकीरड्याच्या ढिगावर पडलेली ही नवजात मुलगी रक्तात माखली होती. खरंतर कुत्र्यांनी फाडून तिचे तुकडे ही खाऊन टाकले असते.
पण या संवेदनशील दांपत्याने केवळ हा व्हिडिओ पाहून या मुलीला कायदेशीर रित्या दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करताच सूत्रे भराभर हालली आणि पुढील कारवाई सुरुही झाली.
सोशल मीडियावर कितीदा अपघाताचे व्हिडिओ लोक व्हायरल करतात. मदत करण्याऐवजी हे व्हिडिओ बनवण्यात लोक धन्यता मानतात, माणुसकीचा गहिवर आटला आहे अशी ओरड ऐकू येत असते.
मात्र या घटनेनंतर विनोद कापरीं आणि साक्षी जोशी यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा झरा अजूनही आटलेला नाही ही गोष्ट अधोरेखित केली आहे.
उन्हात उभी झाडं सावली देतात. अशी झाडांसारखी परोपकारी वृत्ती असलेली माणसं जगात आहेत हे सिद्ध केले आहे.
साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या ओळी आठवतात.. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा… इन्सान की औलाद है इन्सान बनेगा…
अशा विनोद कापरीं आणि साक्षी जोशी यांच्यासारख्या माणसाच्या, मानवतेच्या मुलांनी ही माणुसकी जिवंत ठेवली आहे. जगात चांगुलपणा आहे यावरचा विश्वास पुन्हा एकदा दृढ केला आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.